Dated the 26 Mar 2015
न्यायनिर्णय
द्वारा- श्री.ना.द.कदम...................मा.सदस्य.
1. सामनेवाले ही विदयुत वितरण कंपनी आहे. तक्रारदार ही सदस्यांची सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांना पाठविण्यात आलेल्या बिला विषयी प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
2. तक्रारदारांचे तक्रारीमधील कथनानुसार तक्रारदार हे सामनेवाले यांचे सन-2006 पासुन ग्राहक आहेत. तक्रारदार यांचा पुर्वीपासुन दरमहा सरासरी वापर 2500 युनिट पर्यंत असतांना सप्टेंबर-2010 मध्ये 6101 युनिट, तर जुन-2011 मध्ये 5289 युनिट असा वापर झाल्याचे सामनेवाले यांनी दर्शवुन त्याप्रमाणे विदयुत देयके दिली. याबाबत तक्रारदारांनी अनेकवेळा तक्रार करुन सुध्दा सामनेवाले यांनी कोणतीच कारवाई केली नाही. यानंतर, माहे-फेब्रुवारी-2012 महिन्यामध्ये तक्रारदार यांना देण्यात आलेल्या देयकामध्ये विदयुतवापर 20308 इतका प्रचंड दाखविण्यात आला होता. तक्रारदारांनी यापुर्वी ता.22.09.2010 रोजी बिलींग संबंधीत केलेल्या तक्रारी संदर्भात, सामनेवाले यांनी तक्रारदाराचे विदयुत मापक व्यवस्थितरित्या कार्यरत आहे का याची खातरजमा करण्यासाठी तक्रारदाराच्या इमारतीमध्ये सर्व्हिस मीटर बसविले. परिणामतः समान कालावधीमधील सर्व्हिस मीटरचे रिडींग व तक्रारदारांचे मीटर रिडींग सारखेच असल्याचे आढळून आले. याशिवाय तक्रारदाराच्या मिटरचे टेस्टींग करण्यात आले. त्यानंतर मिटरचे एमआरआय ही करण्यात आले, त्यानुसार सुध्दा मीटर व्यवस्थित असल्’याचा अहवाल देण्यात आला. त्यामुळे तक्रारदारानी मीटर रिडींग घेतलेले फोटो देण्याची विनंती केली, परंतु सामनेवाले यांनी ती नाकारली. माहे-फेब्रुवारी-2012 मध्ये दिलेले 20308 युनिट वापराचे बील हे अवाजवी, अयोग्य असल्याने ते दुरुस्त करण्यासाठी विनंती केली. परंतु सामनेवाले यांनी ती नाकारली. यासंबंधी तक्रारदार यांनी पुढील महिन्याच्या बिलामध्ये म्हणजे मार्च-2012 महिन्याच्या बिलामध्ये केवळ 3046 इतकेच युनिट वापर असल्याचे निदर्शनास आणले. एवढेच नव्हेतर, डिसेंबर-2011 मधील बिलामध्ये चुकीचे युनिट दर्शविल्याचे सामनेवाले यांच्या निदर्शनास आणुन मिटर रिडींग चुकीचे होत असल्याची बाब निदर्शनास आणुन दिली. तथापि, सामनेवाले यांनी बिलासंबंधी कोणतीही कार्यवाही न केल्याने, प्रस्तुत तक्रार दाखल करुन अतिरिक्त वसुल केलेली रक्कम रु.2,51,090/- तसेच नुकसानभरपाई रु.50,000/-, 12 टक्के व्याजासह मिळावी अशा मागण्या केल्या आहेत.
3. सामनेवाले यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदारांचे आक्षेप फेटाळतांना असे नमुद केले आहे की, तक्रारदारांना दिलेले फेब्रुवारी-2012 चे बील हे मीटरवर नोंदविलेले व प्रत्यक्ष वापरलेले युनिट्सबाबत असल्याने ते बरोबर आहे. तक्रारदारांचे बिलाबाबतचे आक्षेपाची खातरजमा करण्यासाठी, मिटरचे टेस्टींग केले असता ते योग्य असल्याचे आढळून आले. शिवाय, मिटरचे एमआरआय टेस्टींगही करण्यात आले व या चाचणीअंती मिटर एकदम व्यवस्थित /बरोबर असल्याचे निष्कर्ष निघाले व याबाबी तक्रारदारांना कळविल्या आहेत. सामनेवाले यांनी असेही कथन केले आहे की, माहे-जुलै-2010 ते डिसेंबर-2011 पर्यत, मिटर रिडिंग घेणा-या एजन्सीने, तक्रारदारांच्या मिटरचे प्रत्यक्ष रिडींग न घेता, चुकीचा युनिट वापर दिल्याने, तक्रारदारांना या कालावधीत चुकीच्या युनिट वापराची बीले पाठविण्यात आली होती. यानंतर माहे-जानेवारीमध्ये फेब्रुवारी-2012 देण्यात आलेले बील हे प्रत्यक्ष मिटर रिडिंगनुसार, वापरलेल्या व जुलै-2010 ते डिसेंबर-2011 पर्यंत संचित युनिटचे (Accumulated Unit) असल्याने ते बरोबर आहे. सबब तक्रारदार यांनी नमुद केल्यानुसार ते बील चुकीचे नसुन योग्य आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांचे इतर सर्व आक्षेप नाकारले आहेत.
4. तक्रारदार व सामनेवाले यांनी पुरावा शपथपत्र, कागदपत्रे व लेखी युक्तीवाद दाखल केला. मंचाने त्याचे सुक्ष्म अवलोकन केले. शिवाय तक्रारदार व सामनेवाले यांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन प्रकरणामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष निघतात.
अ. तक्रारदार ही सहकारी गृहनिर्माण संस्था असुन सदस्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी त्यांच्या वॉटर पंपासाठी 8 किलो वॅट मंजुर व सलग्त भार असलेली 3 फेजची, घरगुंती दराने एक जोडणी ता.20.03.2006 पासुन सामनेवाले यांनी तक्रारदारांना दिली आहे. ही बाब सामनेवाले यांनी मान्य केली आहे. सदर पंपाची मासिक बीले तक्रारदार नियमितपणे अदा करतात याबद्दल सामनेवाले यांचा आक्षेप नाही. शिवाय माहे-जानेवारी-2012 चे 20308 चे बील ही तक्रारदारांनी अदा केल्याचे मान्य केले आहे.
ब. माहे-ऑगस्ट-2010 ते जानेवारी-2012 या कालावधीमध्ये सामनेवाले यांनी तक्रारदार यांना पाठविलेल्या वीज वापर बीलापैंकी माहे-सप्टेंबर-2010 व जुन-2011 आणि फेब्रुवारी-2012 या तीन महिन्यांची बीले वगळता, इतर बिलांबाबत तक्रारदारांचा आक्षेप नाही. तथापि सप्टेंबर -10, जुन-2011 व फेब्रुवारी-2012 या तीन महिन्यांचा वीज वापर इतर महिन्यांच्या बिलाच्या तुलनेत अत्यंत जास्त दर्शवित असल्याने ती चुकीची आहेत, त्यामुळे तक्रारदार यांनी त्याबद्दल आक्षेप घेतला आहे. सदर कालावधीमधील बिलामध्ये दर्शविलेल्या युनिट वापराचे निरीक्षण केल्यास ऑगस्ट 2010 मधील न्युनतम 806 युनिट वापराच्या तुलनेत सप्टेंबर-2010 मधील नोंदीत युनिट वापर हा 7.5 पटीपेक्षा जास्त आहे, तर माहे-डिसेंबर-2011 मधील 682 युनिट वापराच्या तुलनेत जुन-2011 चा वापर हा 7 पटीपेक्षा जास्त तर फेब्रुवारी-2012 मधील वापर हा 300 पटीने जास्त आहे. सदरील 3 महिन्याचा वापर हा इतर 16 महिन्यातील युनिट वापराच्या तुलनेत अस्वाभाविक व विसंगत वाटतो ही बाब स्पष्ट होते.
क. यासंदर्भात सामनेवाले यांनी असे नमुद केले आहे की, तक्रारदारांची बिलाबाबत तक्रार आल्यानंतर त्वरीत मिटर तपासणी केली असता ते बरोबर असल्याचे आढळून आले. शिवाय, सदर मिटर दर्शवित असलेला युनिट वापर बरोबर आहे का याची खातरजमा करण्यासाठी समांतर सर्व्हिस मिटर ही जोडून दोन मिटर्सनी त्याच कालावधीमध्ये दर्शविलेला युनिट वापर, यतकिंचित फरक वगळता, योग्य असल्याचे आढळून आला, त्यामुळे सदर मिटरने माहे-सप्टेंबर-2010 , जुन-2011 व फेब्रुवारी-2012 मध्ये दर्शविलेला 20308 युनिट वापर बरोबर व योग्य आहे. सामनेवाले यांनी आपल्या कथनाच्या संदर्भात आवश्यक ती कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यावरुन सामनेवाले यांचे कथन योग्य वाटते. त्यामुळे तक्रारदारांना अनावश्यक अथवा वापरापेक्षा जास्त युनिट्सचे बील देण्यात आले असे म्हणता येणार नाही.
ड. माहे-जुलै/ऑगस्ट-2010 ते डिसेंबर-2011/जानेवारी-2012 या कालावधीमधील देयके ही, चुकीच्या रिडींग आधारे दिल्याचे सामनेवाले यांनी मान्य केले आहे. सामनेवाले यांनी या संदर्भात नमुद केले आहे की, मिटर रिडींग घेण्यासाठी नेमलेल्या एजन्सीच्या कर्मचा-यांनी प्रत्यक्ष रिडींग न घेता चुकीची माहिती पुरविली, व त्या आधारे देयके तयार केली गेली. त्यामुळे प्रत्यक्ष वापरलेल्या युनिटपेक्षा कमी युनिटची बीले तक्रारदारांना पाठविण्यात आली. ही बाब माहित झाल्यानंतर प्रत्यक्ष रिडींग घेऊन माहे-डिसेंबर-2011/जानेवारी-2012 अखेर वापरलेल्या युनिटचे बील फेब्रुवारी-2012 मध्ये सामनेवाले यांनी तक्रारदारांना दिले. सदर 20308 युनिटमध्ये ऑगस्ट-2010 पासुन प्रत्यक्ष वापरलेल्या युनिटसचा समावेश असल्याने सदर बिलामधील युनिटसची संख्या जास्त आहे.
इ. मंचाने उपलब्ध देयकांचे वाचन केल्यानंतर माहे-ऑगस्ट-2010 (जुलै महिन्याचा वापर) कालावधीच्या बिलावर दर्शविल्याप्रमाणे मिटर रिडींग नुसार युनिट वापर खालील प्रमाणे आहे.
* ऑगस्ट-2010 (जुलै-2010 महिन्याचे सुरुवातीचे रिडींग).....................................54023
* फेब्रुवारी-2012 (डिसेंबर-2011 महिन्याचे चालु रिडिंग)......................................118951
एकूण वापरलेले युनिट..................................................................................64928
* वजा डिसेंबर-2011 (नोव्हेंबर महिन्याचा वापर) मधील चुकीचे युनिट..................1367
अठरा महिन्यामधील एकुण युनिट वापर (मीटर रिडिंगप्रमाणे)=.......................63561
* दर महिना सरासरी वापर = (63561÷18) =3531 युनिट दर महिन्याला सरासरी वापर.
या अगोदर नमुद केल्याप्रमाणे, विदयुत जोडणीवरील मीटर बिनचुक असल्याने, मिटर नोंदीनुसार नोंदविलेल्या प्रत्यक्ष वापराच्या युनिट नुसार, तक्रारदार यांना बीले देणे गरजेचे आहे. वर नमुद केल्याप्रमाणे दरमहा 3531 युनिटचा सरासरी वापर घेऊन, माहे-सप्टेंबर-2010 (ऑगस्ट मधील वापर) ते फेब्रुवारी-2012 (जानेवारी-2012 मधील वापर) या आठरा महिन्यातील बिलामध्ये दुरुस्ती करुन त्यानुसार अंतिमतः येणा-या रकमेची तक्रारदाराकडून वसुली करावी अथवा परतावा दयावा असे मंचाचे मत आहे. सामनेवाले यांनी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल केलेल्या न्याय निर्णयानुसार, क्लेरीकल एरर (Clerical Error) मुळे चुकीची देयके देण्यात आली असल्यास, अशी बीले सुधारीत करुन, येणे असलेल्या रकमेची वसुली करता येते. हा न्याय निवाडा प्रस्तुत प्रकरणामध्ये, लागु होत असल्याने, प्रस्तुत प्रकरणात बिलामध्ये दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात येत आहेत.
5. उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेतल्यास माहे-फेब्रुवारी-2012 मध्ये दर्शविण्यात आलेला 20308 या संचयी युनिटस (Accumulated Units) वापर चुकीचा आहे हे तक्रारदारांचे कथन वस्तुस्थिती विरुध्द असल्याने ते अमान्य करण्यात येते. याशिवाय माहे-सप्टेंबर-2010 व जुन-2011 मध्ये दर्शविण्यात आलेले युनिटस हे चुकीचे आहेत हे म्हणणे सुध्दा अयोग्य वाटते. तथापि, एमईआरसी रेग्युलेशन 15.1.1 व 15.5.1 मधील तरतुदीनुसार, सामनेवाले यांनी अचुक वापराची योग्य ती बीले दरमहा नियमितपणे देणे आवश्यक असतांना, चुकीचा युनिट वापर दर्शविणारी बीले देऊन तसेच अंतिमतः 18 महिन्यांचे संचित युनिटसचे एकत्रित बील देऊन, रेग्युलेशन मधील तरतुदींचा भंग केल्याचे स्पष्ट होते. त्यानुसार खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
- आ दे श -
(1) तक्रार क्रमांक-161/2012 अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) परिच्छेद 4 इ मध्ये दर्शविल्याप्रमाणे दरमहा सरासरी युनिट 3531 प्रमाणे, सामनेवाले
यांनी तक्रारदाराची माहे-सप्टेंबर-2010 ते फेब्रुवारी-2012 मधील 18 महिन्यांची
देयके ता.30.04.2015 पर्यंत सुधारीत करावी, व त्यानुसार अंतिमतः तक्रारदारांकडून
वसुली योग्य असलेली रक्कम वसुल करावी अथवा जास्त वसुल केलेली रक्कम
ता.15.05.2015 पर्यंत तक्रारदारांना परत करावी. तथापि, सदर समायोजन करतांना,
तक्रारदारांना स्लॅब वाईज रेटचा फायदा दयावा, विलंब आकार/व्याज लावुनये, शिवाय,
तक्रारदारांनी यापुर्वी अदा केलेली रक्कम समायोजित करावी.
(3) सामनेवाले यांनी, एमईआरसी रेग्युलेशन 15.1.1 व 15.5.1 मधील तरतुदीनुसार,
तक्रारदार यांना दरमहा अचुक बीले न देऊन तसेच 18 महिन्यानंतर, संचयित युनिटसचे
एकत्रित बील देऊन सेवा सुविधा पुरविण्यामध्ये कसुर केल्याबद्दल तसेच तक्रारदारास
झालेल्या न्यायिक खर्चाबद्दल रक्कम रु.5,000/- (अक्षरी रक्कम रुपये पांच हजार मात्र)
ता.23.05.2015 रोजी किंवा तत्पुवी अदा करावी अन्यथा ता.24.05.2015 पासुन दरसाल
दर शेकडा 6 टक्के व्याजासह संपुर्ण रक्कम अदा करावी लागेल.
(4) आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनाविलंब विनाशुल्क पाठविण्यात याव्यात.
ता.26.03.2015
जरवा/