(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा. सदस्य)
(पारीत दिनांक : 20 जुलै 2016)
1. उपरोक्त नमूद चारही तक्रारदारांनी सदरच्या तक्रारी मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारी ह्या जरी वेगवेगळ्या दाखल केलेल्या असल्या तरी नमूद तक्ररींमधील विरुध्दपक्ष हे एकच आहेत आणि तपशिलाचा थोडाफार भाग वगळता ज्या कायदेविषयक तरतुदींचे आधारे ह्या तक्रारी निकाली निघणार आहेत, त्या कायदेविषयक तरतुदी सुध्दा नमूद तक्रारींमध्ये एक सारख्याच आहेत आणि म्हणून आम्हीं नमूद तक्रारींमध्ये एकञितरित्या निकाल पारीत करीत आहोत. वरील तक्रारींचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. चारही तक्रारकर्ते हे म.रा.वि.वि.कंपनी यांचे ग्राहक आहेत. विरुध्दपक्ष यांचेकडून तक्रारकर्त्यांना विजेचा पुरवठा होतो. त्याकरीता चारही तक्रारकर्त्यांचे घरी त्यांचे नावाने वेगवेगळे मिटर लावलेले आहे. तक्रारकर्ते पुढे असे नमूद करतात की, मिटरमध्ये कोणताही दोष नसतांना विरुध्दपक्ष यांनी 10 ते 12 व्यक्तीसोबत अचानक नोव्हेंबर 2011 च्या दरम्यान चारही तक्रारकर्त्यांचे घरी येऊन मिटरची कोणतीही तपासणी न करता किंवा कोणतेही पॅरेलल मिटर लावून तपासणी न करता तक्रारकर्त्यांचे जुने मिटर काढून त्याठिकाणी नविन मिटर लावण्यात आले. सर्व तक्रारकर्त्यांना सदरचे मिटर बदलवितांना विरुध्दपक्ष यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, तुमचे मिटर फॉल्टी आहे करीता आम्हीं मिटर बदलवीत आहोत. त्यानंतर सर्व तक्रारकर्त्यांना पुढील बिलात अवाढव्य रकमेचे बिल देण्यात आले व त्यांना ताकीद देण्यात आली की, जर पैशाचा भरणा न केल्यास विज पुरवठा खंडीत करण्यात येईल अशा मजकुराचे नोटीस बजावण्यात आले व त्याप्रमाणे सर्व तक्रारकर्त्याचा विज पुरवठा खंडीत करण्यात आला. करीता सदरच्या विरुध्दपक्षाच्या कृत्यांमुळे अतिशय शारिरीक व मानसिक ञासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी खालील प्रमाणे प्रार्थना केली आहे.
1) विरुध्दपक्षाची कृती व अकृती ही सेवेतील ञुटी आहे व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे त्यामुळे विज पुरवठा पुर्वत करुन द्यावे.
2) अवाजवी पाठविलेले विज बिल रद्द करुन व बिला दुरुस्ती करुन केवळ त्याच महिन्याच्या विज वापराप्रमाणे भरण्याची परवानगी द्यावी.
3) तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई द्यावी.
3. तक्रारकर्त्यांच्या तक्रारीला अनुसरुन सर्व विरुध्दपक्ष क्र.1 ते 5 यांना नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारीचे उत्तर सादर केले त्यात नमूद केले की, सर्व तक्रारकर्ते यांचेकडे विद्युत पुरवठा घरगुती स्वरुपाचा असून सर्व तक्रारकर्ते त्यांच्या सदनिकेत व्यवसाय करतात, तसेच त्या व्यवसायातून नफा कमाविण्याचा दृष्टीकोन आहे, तसेच तेथे कार्यालय चालवितात व त्यांच्या कार्यालयात कर्मचारी सुध्दा आहेत. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 अन्वये तक्रारकर्ते हे ग्राहक या संज्ञेत बसत नाही त्यामुळे सदरचे प्रकरण या मंचात चालु शकत नाही. तक्रारकर्त्यांना विज पुरवठा हा घरगुती कारणसाठी दिलेला होता, परंतु तक्रारकर्ते हे विजेचा वापर व्यावसायीक कारणाकरीता करीत होते, त्याच कारणासाठी सर्व तक्रारकर्त्यांवर कलम 126 विद्युत कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. त्यामुळे तक्रारकर्त्यांची तक्रार दंडानिशी खारीज होण्यास पाञ आहे.
4. विरुध्दपक्ष क्र.4 व 5 यांनी तक्रारीला उत्तर देवून आपल्या उत्तरात असे सादर केले आहे की, जरी तक्रारकर्त्यांनी सदरची तक्रार ही विरुध्दपक्ष क्र.1 ते 5 यांचे विरोधात दाखल केली तरी विरुध्दपक्ष क्र.1 म.रा.वि.वि. ही कंपनी अॅक्ट अंतर्गत असून विद्युत वितरणाचे काम करीत आहे. तसेच विरुध्दपक्ष क्र.2 हे झोनल ऑफीस असून नागपूर शहरात स्थित आहे व विरुध्दपक्ष क्र.3 हे विरुध्दपक्ष क्र.2 च्या देखरेखे खाली कार्य करीत असतो. तसेच विरुध्दपक्ष क्र.4 हे कंपनी अॅक्ट अंतर्गत नोंदणीकृत असून विरुध्दपक्ष क्र.1 चे अधिकृत वितरणाकरीता फ्रेंचांयची म्हणून कार्य करीत असतो व त्याचे कार्यालय मुंबई येथे स्थित आहे. तसेच विरुध्दपक्ष क्र.5 हे विरुध्दपक्ष क्र.4 चे वतीने नागपूरातील विद्युत वितरणाचे तसेच ग्राहाकांचे वापराप्रमाणे विज आकारणी करुन बिल पाठविणे, बिलाचे वितरण करणे, बिलांची रक्कम स्विकारणे, तसेच वेळोवेळी ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या विद्युत बाबतच्या तक्रारीचे निराकरण करणे इत्यादी काम बघतात. पुढील तक्रारकर्त्यांचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्यामुळे सदरची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे असे नमूद केले आहे.
5. तक्रारकर्त्यांनी तक्रारी बरोबर दस्ताऐवज दाखल केले असून त्यात प्रामुख्याने विज बिले आहे. तसेच, प्रकरणात दाखल केलेल्या अभिलेखावरील तक्रार, लेखी जबाब, रिजॉईन्डर, व दस्ताऐवजांचे अवलोकन करण्यात आले. दोन्ही पक्षांनी मंचासमक्ष आपले लेखी युक्तीवाद दाखल केले, तसेच मंचासमक्ष त्याचां तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ते हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक आहे काय ? : नाही.
2) तक्रारकर्त्यांना विरुध्दपक्षांकडून दोषपूर्ण सेवा दिली : नाही.
आहे काय ?
- निष्कर्ष –
6. सदर चारही प्रकरणात तक्रारकर्त्यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, सर्व तक्रारकर्ते हे विरुध्दपक्ष यांचे ग्राहक आहेत. तसेच विरुध्दपक्ष ही विज पुरवठा कंपनी असून विज पुरविण्याचे काम करते. अभिलेखावर दाखल दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारकर्ता श्री जयक्रिष्णन पिल्लई हे सदनिकेत एस-4 मध्ये राहतात व त्यांचे नावे एकच मिटर आहे. तसेच, श्रीमती मेरीकला ए.जोसेफ स्टॅलीन ऑगस्टीन ह्या सदनिका टी-1 व टी-2 मध्ये राहात असून त्यांचे नावे दोन मिटर आहेत. तसेच श्री ए जोसेफ स्टॅलीन ऑगस्टीन हे सदनिका टी-5, टी-6 व जी-2 मध्ये राहात असून त्यांचे नावे तिन वेगवेगळे मिटर आहेत. त्याचप्रमाणे श्रीमती बिंदु जयक्रिष्णन पिल्लई ह्या एस-5 मध्ये राहात असून त्याचे नावे एकच मिटर आहे.
7. गैरअर्जदार यांनी नोव्हेंबर 2011 च्या दरम्यान तक्रारकर्त्यांचे चालु असलेले जुने मिटर काढून कोणतीही तपासणी न करता, त्याऐवजी नविन मिटर लावण्यात आले. त्याचप्रमाणे पुढील येणा-या बिलात सर्व तक्रारकर्त्यांना अवाढव्य बिले देण्यात आली. यामध्ये विरुध्दपक्षांनी आपल्या उत्तरात असे नमूद केले आहे की, सर्व तक्रारकर्ते सदनिकेत व्यवसाय करतात, तेथे कार्यालय, गेस्ट रुम व त्या कार्यालयात काम करणारे नोकरीवर लोक सुध्दा आहे. त्यामुळे जरी मिटर घरगुती वापरासाठी दिला आहे, तरी विजेचा वापर हा व्यावसायीक कारणासाठी होत आहे. तसेच तक्रारकर्त्यांनी आपल्या तक्रारीतील परिच्छेद क्र.4 मध्ये नमूद केले आहे की, सदर जागेत तक्रारकर्त्याचे कार्यालय आहे. त्यामुळे चारही तकक्रारकर्त्यांचे कार्यालय असल्याकारणाने तेथे व्यवसाय करतात, ही बाब सिध्द होते. करीता तक्रारकर्त्यांची सदारच्या तक्रारी ह्या खारीज होण्यास पाञ आहे, कारण व्यावसायीक व्यक्ती हा ग्राहक या संज्ञेत बसत नाही.
सबब, आदेश खालील प्रमाणे पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्यांच्या वरील चारही तक्रार खारीज करण्यात येते.
(2) सदर आदेशाची प्रत तक्रार क्र. RBT/CC/12/74 व RBT/CC/12/77 मध्ये ठेवण्यात येते.
(3) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 20/07/2016