::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगीळ (वैदय) मा.सदस्या.)
(पारीत दिनांक :- 06/04/2015 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदार त्याचे वर्कशॉप अरुण इंजिनियरिेग वर्कस या नावाने चालवितो व त्याकरीता मिटरक्रं. 450010362399 चा वापर करतो. गैरअर्जदार यांनी अर्जदाराला वर्कशॉप करीता 1997 ते 98 साली औदयोगिक कामाकरीता विदयुत पुरवठा केलेला असल्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. अर्जदार पुढे असे कथन करतो कि, दि. 19/1/13 रोजी गैरअर्जदाराचे भरारीपथक हे अर्जदाराच्या वर्कशॉप मध्ये आले व मिटर तपासणी करुन रिपोर्ट तयार केला . रिपोर्ट मध्ये असे आढळले कि, विदयुत मिटर नियमित पणे सुरु आहे परंतु भरारी पथकाच्या अधिकराचे म्हणणे आहे कि, विदयुत मिटर हे गॅरेज साठी उपयोग करण्यात येत असल्यामुळे त्याला व्यवसायीक प्रमाणे चार्जेस लावण्यात आले पाहिजे. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराला दि. 2/2/13 ला रक्कम रु. 41,499/- चे विज बिल अर्जदाराला दिले व त्या बिलाप्रमाणे रु. 44,916/- हे अरिअर्स म्हणून मागणी करीत आहे. अर्जदाराने सदर बिलाबाबत चौकशी केली पण गैरअर्जदाराने समाधानकारक उत्तर दिले नाही. व बिज न भरल्यास विज कापण्याची धमकी दिली. सदरचे गैरअर्जदाराचे कृत्य बेकायदेशिर व चुकीचे असल्यामुळे अर्जदाराने वारंवार विनवणी केली. परंतु दि. 09/03/13 ला गैरअर्जदाराने अर्जदाराचा विज पुरवठा खंडीत करण्याचा नोटीस पाठविला व नोटीस नुसार बिल न भरल्यास 24/3/13 ला गैरअर्जदार व विज पुरवठा खंडीत करणार होते. अर्जदार पुढे असे कथन करतो कि, त्याचा उदरनिर्वाह वर्कशॉप वरील कमाई वर अवलंबून असल्यामुळे गैरअर्जदाराची सदर कृती ही अर्जदाराप्रति सेवेत न्युनता व अनुचित व्यापार पध्दती असल्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने दि. 2/2/13 चे रक्कम रु. 44,916/- चे बिल रद्द करण्यात यावे. तसेच अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्रं. 13 दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्या लेखीउत्तरात अर्जदाराने तक्रारीत लावलेले सर्व आरोप नाकबुल करुन असे कथन केले कि, अर्जदाराकडील असलेले वादातील विज कनेक्शन हे एल टी व्ही आदयोगिक टॅरिफनुसार दिले असून सदर विज कनेक्शनचा वापर अर्जदार हा गॅरेज कामाकरीता म्हणजे व्यावसायिक हेतु करीता करीत आहे. गैरअर्जदाराच्या भरारी पथकाने अर्जदाराकडे 19/1/13 ला टाकलेल्या धाडीमध्ये सदर बाब निर्देशनास आली आणि त्यांनी मौका पंचनामा करुन अर्जदाराकडे होत असलेल्या चुकीच्या विज आकारणी दुरुस्ती करुन औदयोगिक ऐवजी व्यावसायिक वापराबाबत असेसमेंट तयार करण्यात यावे असा अहवाल दिला. तसेचपञानुसार गैरअर्जदाराच्या कार्यालयातही कळविले कि, अर्जदाराचे टॅरीफ बदलवून सुधारित देयक तसेच थकीत रक्कम वसुल करण्यात यावी. गैरअर्जदाराने पुढे असे कथन केले कि, अर्जदाराला दिले गेलेले देयक हे योग्य असून सदर देयक भरण्यास अर्जदार जबाबदार आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति कोणतीही अनुचित व्यवहार पध्दती अवलंबविलेली नसून सेवेत ञुटी केलेली नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
4. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? नाही.
(2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? नाही.
(3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? नाही.
(4) आदेश काय ? अंतीम आदेश प्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून 1997 ते 98 त्यांचे वर्कशॉप चालविण्याकरीता वीज पुरवठा घेतला होता व गैरअर्जदाराने सदर वीज पुरवठा अर्जदाराला औद्योगीक कामाकरीता दिला होता. दि.19.1.2013 रोजी गैरअर्जदाराचे भरारी पथकाने अर्जदाराचे वर्कशॉपमध्ये मीटर तपासणीकरुन त्यांचे रिपोर्टमध्ये असे नमूद केले की, विद्युत मिटर मध्ये कोणताही फॉल्ट नाही व अर्जदारास दिलेला विद्युत मीटर गॅरेजसाठी उपयोग करण्यात येत असल्यामुळे व्यावसायाकरीता वापरण्यात येत असल्यामुळे अर्जदाराला व्यवसायाप्रमाणे चार्जेस लावण्यात आला पाहिजे.
मा.राष्ट्रीय ग्राहक निवारण आयोगाने दिलेल्या न्यायनिर्णयानुसार
III (2006) CPJ 409 (NC)
HOTEL CORP OF INDIA LTD. V/S. DELHI VIDYUT FBOARD & ORS.
Decided on 23.2.2006
Consumer Protection Act, 1986- Sections 2(1)(C), 2(1)(G)- Complaint- Maintainability- Commercial purposes- Electricity- Installation of electric line- Non-refund of deposited amount- Complainant hotel- Electric line was to be utilized for commercial purpose- Definition of consumer excludes service for commercial purpose- Complaint not maintainable under Act.
Result: Complaint dismissed.
7. सदर प्रकरणात सुध्दा अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडून वीज पुरवठा औद्योगीक वापराकरीता घेतला परंतु उपयोग हा व्यावसायीक कामाकरीता केलेला असल्यामुळे अर्जदार हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 2 (ड) (ii) प्रमाणे ग्राहक संज्ञेत मोडत नाही. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी नोदंविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
6. मुद़दा क्रंमाक 1 च्या विवेचनावरून अर्जदार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 2 (ड) (ii) नुसार ग्राहक या संज्ञेत बसत नसल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति कोणतीही सेवेत ञुटी किंवा अनुचित व्यवहार पध्दती अवलंबविलेली नाही. सबब मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
(2) उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
(3) आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक – 06.04.2015