1 अर्जदाराने, प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 14 सह 12 अन्वये दाखल केले आहे. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 2 अर्जदार चंद्रपूर येथिल रहिवासी आहे. अर्जदाराने नोव्हे. 2008 मध्ये बिगर घरगुती प्रवर्गातील विज कनेक्शन मिळण्याकरिता अर्ज सादर केला. गैरअर्जदाराच्या अधिका-यांनी वर्कशॉप मध्ये मौक्यावर येवून तपासणी केली. आवयशक बाबींची पूर्तता करुन घेतल्यानंतर 13/12/2008 रोजी विज कनेक्शन लावून दिले. अर्जदारास ग्राहक क्रमांक 450010585916 असा दिला. अर्जदार यांनी या विज कनेक्शन चे सर्व देयकाचा चुकारा दि.29/7/11 पर्यंत नियमित पणे भरणा केलेला आहे. 3 गैरअर्जदार विजकंपनी फोटोग्राफर पाठवून मिटर वाचन करतात व त्याप्रमाणे देयक पाठवित असते. अर्जदाराचा विज वापर हा 0.90 किलोवॅट मंजुर असून सलंग्न भार हा 0.90 वॅट आहे. अर्जदाराचा छोटासा व्यवसाय असून त्याचे उदरनिर्वाह करिता करतो. अर्जदार कुलरच्या पार्टची पूर्नजोडणी व दुरुस्ती करतो. या व्यवसायाची साधारण दिवाळी ते एप्रिल या सहा महिण्यातच उलाढाल असते. बाकी वेळेस व्यवसाय थंड बस्त्यात असतो. अर्जदारास गैरअर्जदाराचे कार्यालयाकडून दि. 30/7/11 चे 77,820/- रु चे देयक प्राप्त झाले. यामध्ये अर्जदाराचा विजवापर 1 महिन्यात 9623 युनिट दर्शविण्यात आला. अर्जदारास गैरअर्जदाराकडून 4/12/10 चे 4022 चालु रिडींग असलेले 427 युनिट असलेले 640/- रु. चे देयक प्राप्त झाले. त्या देयकाचा भरणा केला. अर्जदारास दि. 30/7/11 चे देयक प्राप्त होताच 22/8/11 रोजी लेखी तक्रार दिली गैरअर्जदाराने त्याचे निरसण केलें नाही आणि अर्जदाराचे माघारी गैरहजेरी मध्ये परस्पर बाहेर लावलेला मिटर सूचना न देता अथवा पंचनामा न करता काढून नेला व त्या ठिकाणी दुसरा मिटर लावून दिला. गैरअर्जदाराने चालु रिडींग 33 असलेले 79,740/- रुपयाचे हस्तलिखित देयक पाठविले आणि 11/10/11 पावेतो बिल न भरल्यास पुरवठा खंडीत करण्याची धमकी दिली. गैरअर्जदार यांनी पंचनामा न करता मिटर काढून नेवून दुसरे मिटर लावले. रु. 79,740/- देयक चुकीचे कोणताही हिशोब नमूद नसलेले पाठविले. गैरअर्जदाराचे कृत्य हे संशयास्पद असून अनुचित व्यापार पध्दती आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांनी अवलंबलेली व्यापार पध्दती अनुचित व्यापार पध्दती आहे. तर दिलेली सेवा न्युनतापूर्ण आहे असे ठरविण्यात यावे. अशी मागणी केली आहे. तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास पाठविलेले दि.30/7/11 चे रु. 77,820/- व दि.26/9/11 चे रु. 79,740/- देयक बेकायदेशीर ठरविण्यात यावे. आणि या बेकायदेशीर देयकाकरिता अथवा थकबाकी करिता विज पुरवठा खंडीत करण्यात येवू नये असा आदेश गैरअर्जदारा विरुध्द करण्यात यावा. अर्जदारास शारीरीक मानसीक ञासापोटी रु.15,000/- आणि केसचा खर्चापोटी रु,5,000/- गैरअर्जदाराकडून अशी विनंती केली आहे.
4 अर्जदाराने तक्ररी सोबत नि. 4 नुसार एकूण 11 झेरॉक्स दस्तऐवज दाखल केले.. तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आले. अर्जदाराने नि. 5 नुसार अंतरिम आदेशाचा अर्ज दाखल केला. सदर अर्ज नि. 14 नुसार निकाली काढण्यात आला. गैरअर्जदार यांनी नि. 10 नुसार लेखीउत्तर व अंतरिम अर्जाचे उत्तर दाखल केला. 5 गैरअर्जदार यांनी तक्रार मधील आरोप अमान्य केले. अर्जदाराची तक्रार खोटया कथनाच्या आधारावर असून पूर्ण पणे खोटी आहे म्हणून अ-ब-क नुसार केलेली मागणी खारीज होण्यास पाञ आहे. गैरअर्जदार यांनी लेखीबयानात अर्जदारास बिगर घरगुती प्रवर्गातील विज कनेक्शन मिळण्यासकरिता अर्ज सादर केला. वर्कशॉप मध्ये मौक्यावर येवून जागेची तपासणी केली. आवश्यक बाबींची पूर्तता करुन घेतल्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदारास दि.13/12/08 रोजी विज कनेंक्शन लावून दिले हे म्हणणे वादात नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे बाकी म्हणणे अमान्य करुन तक्रारीतील मागणी खारीज करण्याची विनंती केली आहे.
6 गैरअर्जदार यांनी आपले लेखीबयानातील विशेष कथनात, कथन केले की, अर्जदार यांचा कुलर बनविण्याचा व इतर तत्सम काम करण्याकरिता कारखाना उभा केलेला आहे. अर्जदार हा मजुर केलेल्या संलग्न भारचा वापर कारखान्यात करीत आहे. अर्जदाराच्या कथनानुसार कुटूंबातील इतर सदस्य मदत करीत असतात याचा अर्थ स्वंयरोजगाराचा व्यवसाय नाही. अर्जदाराच्या कथनानुसार ऑक्टो. नोव्हे. ते एप्रिल या सहा महिन्यात उलाढाल असते असे गृहीत धरले तर नोव्ह. 2010 मधील विजेचा वापर 427 युनिट वापर केलेले आहेत असे दिसते. परंतु त्यानंतर छायाचिञकार यास मिटर मधील युनिट ची नोंद घेता आली नसल्याने त्यानंतरचे बिल INACCS दाखवून 1/11/10 ते 1/12/10 या कालावधीपासून सरासरी 118 युनिट दर्शवून बिल देणे चालु केले. अर्जदार यांनी डिसें.2010 ते जून 2011 पावेतो मिटर रिडींग बाबत किंवा मिटर बाबत कुठलिही तक्रार किंवा वाच्यता न करता निमूटपणे सरासरी बिलाची रक्कम भरत गेला. छायाचिकारास मिटर मधली नोंद पुसटसी दिसत असल्याने कागदावर लिहून तो कागद मिटरवर चिपकवून त्याचे छायाचिञ घेतले. दि.11/7/11 रोजी दर्शविलेली चालु रिडींग 13745 आणि दि. 1/11/10 रोजी दर्शविलेली चालु रिडींग 4022 या दोन्ही रिडींग मधली तफावत काढून एकूण आठ महिन्याचे वापरलेले विजेचे युनिट 9623 यावर स्थिर आकार विज आकार, विज शुल्क, इंधन समायोजन, विज विक्री कर, अतिरिक्त आकार लावून सरासरी दिलेल्या सात महिन्याच्या बिलाची रक्कम रु. 4,666.85/- वजा केली त्याप्रमाणे अर्जदाराला 77,820/- चे देयक देण्यात आले. सदर बिल 8 महिन्याचे कालावधी धरुन देण्यात आले. परंतु अर्जदार मंचाची दिशाभूल करण्याकरिता रु.77,820/- चे बिल 1 महिन्याचे असल्याचे कांगावा करीत आहे. आणि कंपनी विरुध्द अंतरिम आदेश पारीत व्हावा म्हणून विज पुरवठा खंडीत करण्याची धमकी देत असल्याचे खोटे आरोप करीत आहे.
7 गैरअर्जदार यांनी लेखीबयानात पुढे असेही कथन केले आहे की, अर्जदार यांनी केलेल्या तोडी विनंतीनुसार तक्रारीवरुन अर्जदाराच्या कारखान्याला लागलेले जुने मिटर 9006129174 हा बदलवून नविन मिटर 5500410656 हा लावण्यात आला. सदर जुने मिटर तपासणी केंद्राकडे पाठविल्यावर 36.44 टक्के कमी वेगाने चालत असल्याचा रिपोर्ट प्राप्त झाला. एकूण विज वापरामध्ये, अधिकचा वापर निघत असल्याने अर्जदाराकडून घेणे निघते. अर्जदारास जुने मिटर तपासणीचा अहवाल बिला सोबत दिला आहे. अर्जदाराने गैरअर्जदार कंपनी वर दबावतंञ आणण्याचा एक भाग आहे. अर्जदाराने गेरअर्जदार कंपनी विरुध्द केलेले आरोप निव्वळ हवेत गोळीबार करणे अशा प्रकारात मोडतो. गैरअर्जदार कंपनी दोन भागामध्ये विभाजून अर्जदारास थकीत रक्कम भरण्यास मूभा देण्यास तयार आहे.
8 गैरअर्जदार यांनी नि. 11 च्या यादीनुसार एकूण 4 झेरॉक्स दस्तऐवज दाखल केले. अर्जदाराने तक्रारीच्या कथना पृष्ठार्थ नि. 15 नुसार पुरावा शपथापञ दाखल केला त्यासोबत गैरअर्जदारास दिलेल्या नोटीसाची प्रत, पोच पावती व चेकची प्रत झेरॉक्स दाखल केली. गैरअर्जदार यांनी लेखी उत्तरालाच पुरावा शपथपञ समजण्याज यावा या आशयाची पुरसीस नि. 16 नुसार दाखल केली आहे. 9 अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्तऐवज, शपथपञ आणि उभयपक्षंच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. // कारणे व निष्कर्ष // 10 अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडून वर्कशॉप करीता 13/12/2008 रोजी बिगर घरगुती प्रवर्गातील विज पुरवठा घेतला असून, आजही त्याचा वापर करीत आहे. अर्जदाराचा विज वापर 0.90 किलोवॅट मंजुर असून संलग्न भार 0.90 किलोवॅट आहे. याबाबत वाद नाही. अर्जदार व गैरअर्जदार यांच्यातील वादाचा मुद्दा असा आहे की, माहे जुलै 2011 आणि ऑगस्ट 2011 ला देण्यात आलेले बिल अनुक्रमे रु. 77,820/- आणि 79,740/- या बद्दल आहे. अर्जदाराने दोन्ही बिलाच्या झेरॉक्स प्रति नि. 4 अ- 7 व 8 वर दाखल केले आहे. वरील दोन्ही वादग्रस्त बिलाचे अवलोकन केले असता बेकायदेशीर व अवाजवी असल्याचे दिसून येतो. हे दोन्ही बिले विज अधिनियम 2003 च्या तरतुदी नुसार अवाजवी असल्याने, प्रथम दर्शनी खारीज होण्यास पाञ आहे. गैरअर्जदार यांनी लेखीबयानात असे कथन केले आहे की, छायाचिञकाराने पुसटसी दिसत असलेली रिडींग कागदावर लिहून तो कागद मिटर वर चिपकवून त्याचे छायाचिञ घेतले. या गैरअर्जदाराच्या कथनावरुन छायाचिञकारास अस्पष्ट दिसत असलेली रिडींग 13645 ही कागदावर लिहून स्पष्ट दिसत आहे असा भासविण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक गैरअर्जदाराच्या कथना नुसार मिटर रिडींग ही पुसटसी दिसत आहे व होती असे असतांना दिलेले 9623 युनिट चे बिल 8 महिन्याच्या वापाराचे योग्य रिडींगचे आहे असे निश्चित पणे म्हणता येणार नाही. यावरुन दस्त अ-7 व 8 वरील देयक हे अवाजवी असल्याचा निष्कर्ष निघतो.
11 अर्जदार याने तक्रारीत असे म्हणणे मांडले आहे की, जुलै 2011 चे 1 महिण्याचे देयक 9623 युनिट चे आहे. अर्जदाराने जरी 24 तास विज जोडणी वापरली तरी 1 महिन्यात 9623 विज वापर शक्य नाही. गैरअर्जदार यांनी असे सांगीतले की, जुलै 2011 चे देयक 1 महिन्याचे वापराचे नसून 8 महिन्याचे देयक असून त्यामध्ये डिसेबर 10 ते जुन 11 पर्यंत सरासरी 118 युनिट प्रमाणे देण्यात आलेल्या बिलाची रक्कम 4,666.85 वजा करुन देण्यात आले. अर्जदाराचे म्हणण्यानुसार जुलै 2011 चे देयक 1 महिन्याचे नसून 8 महिन्याचे देयक आहे. गैरअर्जदार यांनी डिसेंबर 2010 पासून मिटर रिडींग INACCS दाखवून सरासरीचे देयक दिलेले आहेत. गैरअर्जदारास मिटर रिडींग INACCS असतांना महाराष्ट्र इलेक्ट्रीसिटी रेग्युलेट्री कमिशन, रेगुलेशन 2005 च्या विनियम 15.3.2 नुसार कार्यवाही करुन योग्य वाचनाचे बिल देण्याची जबाबदारी गैरअर्जदार (Licensee) यांची आहे. तसेच मिटर नादुरुस्त असल्यास विनियम 15.4 नुसार तिन महिन्याचे सरासरी नुसार आकारणी करावी अशी तरतुद दिली आहे. परंतु प्रस्तुत प्रकारणात गैरअर्जदाराने INACCS चे बिल दिले, परंतु त्याची कोणतीही चौकशी केली नाही. आणि दिलेल्या देयकाचे सविस्तर वर्णन अर्जदारास दिले नाही त्यामुळे वादग्रस्त देयक जुलै 2011 व ऑगस्ट 11 रद्द होण्यास प्राञ आहे. 12 अर्जदाराने माहे मार्च 2011 चे देयकाची प्रत अ- 5 वर दाखल केली आहे. सदर देयकाचे निरिक्षण केले असता मागील रिडींग 4022 पेक्षा व चालु रिडींग 3302 दाखविलेली आहे. वास्तविक केव्हाही मागील रिडीग पेक्षा चालु रिडींग ही कधीही जास्त असावयास पाहीजे तरच ते देयक योग्य वाचनाचे आहे असे म्हणता येईल. परंतु सदर दस्त अ- 5 मध्ये मागील रिडींग पेक्षा चालु रिडींग कमी दाखविली असुन 1 महिन्याचे सदोष मिटर वाचन म्हणून नोंद केली आहे. अशा स्थितीत जुलै 2011 ला पुसटसे दिसणारे रिडींग 13645 होते, आणि त्यानुसार कागद चिपकवून बिल दिले व ते योग्य आहे असे ठरविता येणार नाही. यावरुन अर्जदाराकडील जुन्या मिटर चे रिडींग ही सदोष होती असाच निष्कर्ष निघतो. त्यामुळे वादग्रस्त देयक रद्द होण्यास पाञ आहे. 13 गैरअर्जदाराने लेखीबयानासोबत सीपीएल ची प्रत ब-4 वर दाखल केली आहे. त्यामध्ये जुन्या मिटर ची रिडींग सरासरी प्रमाणे दाखविली आहे. तसेच नविन मिटरची रिडींग सीपीएल मध्ये सप्टेंबर 11 ला 27 युनिट दाखविले आहे. त्यामुळे गैरअर्जदार यानी सुटसुटीत अर्जदारास समजेल अशा भाषेत हिशोब दयावा किंवा नवीन मिटर च्या सहा महिन्याचे सरासरी प्रमाणे आकारणी करुन त्याप्रमाणे अर्जदारास देयक देण्यास पाञ आहे या निष्कार्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 14 एकंदारीत अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन माहे जुलै 2011 चे देयक अवाजवी असून न्युनतापूर्ण सेवेत मोडणारे आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदारास लेखी अ-10 नुसार पञ देवून चौकशी करुन बिल दुरुस्ती करुन मागीतले परंतु गैरअर्जदार यांनी बिल दुरुस्त करुन दिले नाही. गैरअर्जदार यांनी ऑगस्ट 2011 मध्ये जुने मिटर काढून नविन मिटर लावले तेव्हा ही कोणतीही सूचना दिली नाही. व वादग्रस्त मिटरची तपासणी अर्जदारा समक्ष केली नाही. वास्तविक अर्जदाराने दि.22/8/11 च्या लेखी पञा नुसार मिटर बाबत आक्षेप घेतला असतांना त्याचे समाधान होण्याकरीता त्याचे समक्ष तपासणी होणे आवश्यक होते. परंतु गैरअर्जदार यांनी कायदेशीर बाबीचा अवलंब केला नाही ही गैरअर्जदार यांची अनुचित व्यापार पध्दती असुन न्युनता पूर्ण सेवा आहे. या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 15 वरील कारणे व निष्कर्षा वरुन वादग्रस्त देयक रद्द होवून नविन तपशिल वार हिशोबाचे सुधारीत देयक देण्यास गैरअर्जदार जबाबदार आहे. या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने तक्रार अशंतः मंजुर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर. (2) गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले देयक माहे जुलै 2011 दि.30/7/2011 रु. 77,820/- तसेच ऑगस्ट 2011 देयक दि.26/9/2011 रु. 79,740/- रद्द करण्यात येत आहे. (3) गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसीक शारीरीक ञासापोटी व तक्रार खर्चापोटी सर्व मिळून रु. 1000/- दयावे. (4) गैरअर्जदार यांनी वादग्रस्त कालावधीतील तपशिलवार हिशोब करुन सुधारीत देयक दंड व विलंब शुल्क न आकारता दोन महिन्याचे आत दयावे. अर्जदाराने अंतरिम आदेशानुसार जमा केलेली रक्कम समायोजीत करावी. (5) अर्जदार व गैरअर्जदार यांना आदेशाची प्रत देण्यात यावी. चंद्रपूर, दिनांक : 11/1/2012. |