निकालपत्र :- (दि.16.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सामनेवाला यांच्या वकिलांचा मागील तारखेस युक्तिवाद ऐकलेला आहे. आजरोजी तक्रारदारांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून तक्रार निकालाकरिता घेतली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांच्या पतीचा केबल टी.व्ही वितरणाचा व मोबाईल रिचार्जचा व्यवसाय आहे. तक्रारदारांनी इचलकरंजी येथील वॉर्ड नं.10, घ.नं.1065 येथे बांधले गेलेले ‘विठ्ठल निवास’ या बहुउद्देशीय इमारतीत ब्लॉक नं.4 विकत घेतला असून तेथे आपले पती, मुले व नणंद यांचेसह रहात आहे. सदर ब्लॉकसाठी सामनेवाला विद्युत कंपनीकडून घरगुती विद्युत पुरवठा घेतला आहे. त्याचा ग्राहक क्रमांक 250640071482 (आर 5901) असा आहे. सदर विठ्ठल निवास या संकुलामध्ये तक्रारदारांच्या पतीने फलॅट घेतलेला आहे. त्यास स्वतंत्र विद्युत पुरवठा सामनेवाला विद्युत कंपनीने केलेला आहे. त्यातील बिलाबाबत सामनेवाला विद्युत कंपनीने अकारण वाद उत्पन्न केलेला आहे. तक्रारदारांच्या पतीच्या नांवे असलेला विद्युत पुरवठा व बिल यांचा तक्रारदारांनी घेतलेल्या विद्युत पुरवठयाशी काहीही संबंध नाही. तरीही, सामनेवाला विद्युत कंपनीने तक्रारदारांचा विद्युत पुरवठा कोणतीही नोटीस न देता एप्रिल 2009 मध्ये बंद केलेला आहे. याबाबत तक्रारदारांनी दि.05.05.2009 रोजी पत्र देवून विद्युत पुरवठा बंद करणेचा कोणतेही कारण नसलेचे कळविले. (3) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, तक्रारदारांच्या पतीने त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करु नये याबाबत सक्षम प्राधिकरणाकडे दाद मागितली आहे. तक्रारदारांन आजपावेतो विद्युत देयकांचा भरणा केलेला आहे. तरीही आकसबुध्दीने तक्रारदारांचा विद्युत पुरवठा खंडित केलेला आहे. सबब, तक्रारदारांचा राहते घराचे ग्राहक नं. 250640071482 (आर 5901) चे वीज कनेक्शन पूर्ववत करावा, जोडून द्यावा अशी विनंती केली आहे. तसेच, नुकसानीदाखल रुपये 1,80,000/-, अर्जाचा खर्च रुपये 15,000/- व विद्युत पुरवठा होईपावेतो दररोज रुपये 5,000/- नुकसान भरपाई देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत दि.03.03.2009, दि.01.04.2009 व दि.01.05.2009 रोजीची बिले, बिले भरलेच्या पावत्या, दि.05.05.2009 रोजी सामनेवाला यांचेकडे दिलेला अर्ज, तक्रारदारांच्या पतीने दाखल केले अपिलाबाबतची समज, अंतरिम आदेश, तक्रारदारांच्या पतीने पैसे भरलेबाबतचे पत्र इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला विद्युत कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदार या विठ्ठल निवास या संकुलात रहात नाहीत. तक्रारदार त्यांच्या पतीसह करोडपती कॉलनी, भाग्यरेखा टॉकिजमागे, इचलकरंजी येथे घेतलेल्या फलॅटमध्ये रहातात. तक्रारदार व त्यांचे पती यांनी विठ्ठल निवास या इमारतीत दोन फ्लॅटस् शेजारी एकमेकांना लागून असे घेतले आहे व या ठिकाणी आर 5901, आर 5902 व सी 5901 असे ग्राहक क्र. 250640071482/1, 250640071491/1 व 25064401892621 असे तीन ग्राहक कनेक्शन्स दोन ब्लॉककरिता एकाच ठिकाणी घेतले आहेत. तक्रारदारांचे पती, रामनिवास लालचंद अग्रवाल हे सदर ठिकाणी केबल कनेक्शनचा व्यवसाय करीत आहेत. त्यांनी केबल व्यवसायाकरिता एक कमर्शियल कनेक्शन घेतले आहे. परंतु, त्यांनी कमर्शिअल व दोन घरगुती कनेक्शन यांना तीन स्विचओवहर जोडून त्याद्वारे कधी व्यापारी तर ब-याच वेळा दोन घरगुती मिटरमधून केबल प्रक्षेपणाकरिता चेंजओवहर स्विच वापरुन व्यवसायास वीजेचा वापर करत होते. त्यामुळे त्यांचे व्यपारी मिटरवर बिल कमी येत. दोन घरगुती मिटरपैकी एक मिटर बंद होता, परंतु त्यातून चालू असलेला वीजप्रवाह मात्र ते उपयोगात आणत होते. मिटर बंद असलेने बिलाचा प्रश्नच आला नाही. परंतु, सामनेवाला कंपनीच्या अधिका-यांनी अचानक तपासणी करतेवेळी तक्रारदारांचे पतीने केलेली वीज चोरीचा प्रकार लक्षात आलेनंतर सामनेवाला कंपनीचे अधिका-यांनी पंचनामा केला. तक्रारदारांच्या पतीनी तशी कबुली दिली. सदर वीज चोरीबाबतचे असेसमेंट करुन त्यांना रुपये 1,96,935 इतके बिल पाठविले. त्याविरुध्द तक्रारदारांच्या पतीने इचलकरंजी येथील दिवाणी कोर्टात रे.क.नं.412/01 चा दावा दाखल करुन त्याकामी तुर्तातुर्त मनाईचा अर्ज देवून एकतर्फी तुर्तातुर्त मनाईचा हुकूम घेतला होता. सदरचे काम गुणदोषावर चालून मनाई अर्ज नामंजूर केला. त्याविरुध्द तक्रारदारांचे पतीने मे.जिल्हा न्यायाधिश, कोल्हापूर यांचे कोर्टात अपिल नं.133/03 दाखल केले. परंतु, नंतर त्यांनी सामनेवाला कंपनीने पाठविलेल्या असेसमेंटप्रमाणे 50 टक्के रक्कम भरती व अपिल काढून घेतले व सामनेवाला कंपनीचे ग्राहक मंचाकडे अपिल दाखल केले. तक्रारदारांचे पतीकडून दि.31.01.2009 अखेर 250644018926 या ग्राहक क्रमांकाचे रुपये 2,85,410/- इतकी थकबाकी येणे आहे. (6) सामनेवाला त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी त्यांचा व त्यांच्या पतीचे नांवचा फलॅट नं.11 असे दोन्ही प्लॉट मधले पार्टीशन काढून केबल व्यवसायाकरिता वापर केला आहे. त्यासाठी घरगुती कनेक्शनचा वापर केलेला आहे. प्रत्यक्ष पाहणीचेवेळी तसे दिसून आले; सदरची वस्तस्थिती लपवून प्रस्तुतच तक्रार दाखल केलेली आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह रद्द करणेत यावी अशी विनंती केली आहे. (7) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत दि.29.04.2009 दि.09.06.2009 रोजीचे अहवाल, दि.13.04.2009 रोजीचे पत्र, रामनिवास अग्रवाल यांचा दि.10.12.2008 रोजीचा अर्ज, रे.क.नं.412/09 दावा अर्ज, किरकोळ अपिल नं.133/03 इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (8) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. प्रस्तुत प्रकरणातील वस्तुस्थितीचा विचार करता तक्रारीत उल्लेख केलेल्या विठ्ठल निवास या संकुलात तक्रारदार व त्यांचे पतीने त्यांचे नांवावर प्रत्येकी 1 अशा दोन सदनिका खरेदी केलेल्या आहेत व दोन्ही सदनिकांमध्ये विद्युत कनेक्शनस् घेतलेली आहेत. त्यातील एक विद्युत कनेक्शन हे वाणिज्यिक स्वरुपाचे आहे. ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येते. सामनेवाला विद्युत कंपनीचे फिरत्या पथकाने सदर ठिकाणी अचानक तपासणी केली आहे. याबाबतचा अहवाल प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. प्रस्तुत अहवालाचे अवलोकन केले असता असता तक्रारदारांच्या नांवे असलेल्या वीज कनेक्शनमधून तक्रारदारांच्या पतीच्या केबल व्यवसायाकरिता विद्युत पुरवठा घेतला जात होता. त्यामुळे विद्युत चोरीचा अहवाल तयार करुन तसे बिल तक्रारदारांना पाठविले आहे. याविरुध्द तक्रारदारांच्या पतीने इचलकरंजी येथील दिवाणी कोर्टात दाद मागितली आहे. सदर दाव्यामध्ये तक्रारदारांचा तुर्तातुर्त अर्ज नामंजूर केला आहे. त्याविरुध्द केलेल्या अपिल तक्रारदारांच्या पतीने असेसमेंटच्या 50 टक्के रक्कम भरलेनंतर काढून घेतले आहे व सामनेवाला यांच्या ग्राहक मंचाकडे अपिल दाखल केले आहे. उपरोक्त वस्तुस्थिती ही तक्रारदारांनी लपवून ठेवलेली आहे. सामनेवाला विद्युत कंपनीच्या फिरत्या पथकाने अचानक तपासणी करुन तक्रारदारांचा ग्राहक क्रमांक असलेल्या मिटरमधून तक्रारदारांच्या पतीचा केबल व्यवसाय करणेसाठी विद्युत पुरवठयाचा वापर करण्यात येत होता. याबाबतच्या अहवालाचे अवलोकन केले असता तक्रारदारांच्या तक्रारीत कोणतीही गुणवत्ता या मंचास दिसून येत नाही. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाही.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |