पारीत दिनांकः- 28/10/2010 (द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदार हे गैरअर्जदार महावितरण कंपनीचे ग्राहक असून, त्यांना देण्यात आलेल्या चुकीच्या वीज बिलाबाबत त्यांनी मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. दि.30.09.2009 ते 31.10.2009 या काळात त्यांना गैरअर्जदार यांच्यातर्फे 18971 = 11 रुपयाचे वीज बिल देण्यात आले. या चुकीच्या वाढीव वीज बिलाबाबत त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार केली, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीत त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडून 3 एच.पी.च्या शेती पंपाची मागणी केली व त्यापोटी 15,000/- रुपये गैरअर्जदार यांच्याकडे भरले आहेत. गैरअर्जदार यांनी नंतर पुन्हा वर्तमानपत्रात जाहिरात देऊन मीटर असणा-या ग्राहकांना अधिक रक्कम भरणे जरुरी नसल्याचे जाहिर केले व आधी दिलेली जाहिरात रदद् केली. अर्जदाराने ही रक्कम परत करण्याची मागणी गैरअर्जदार यांच्याकडे केली असता, त्यांनी नकार दिला. गैरअर्जदार यांनी घरगुती वापराचे सुधारीत बिल तसेच शेती पंपासाठी भरलेले 15,000/- रुपये परत करण्याची मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत वीज बिलाच्या प्रती व पैसे भरल्याच्या पावत्या जोडल्या आहेत. मंचाने पाठविलेली नोटीस प्राप्त होऊनही गैरअर्जदार मंचात उपस्थित राहिले नाहीत, म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला. अर्जदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे निरीक्षण केल्यावर असे आढळून येते की, अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून दोन वीज जोडण्या घेतल्या आहेत. यापैकी एक वीज जोडणी घरगुती वापरासाठी असून, त्याचा ग्राहक क्रमांक 490090000508 असा आहे. दुसरी वीज जोडणी ही शेती पंपासाठी असून, त्याचा ग्राहक क्रमांक 490090320936 असा आहे. घरगुती बिल चुकीचे आल्याची व शेती पंपासाठी जास्त रक्कम आकारल्याची अर्जदाराची तक्रार आहे. अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या सी.पी.एल. चे निरीक्षण केल्यावर असे आढळून येते की, फेब्रुवारी 2009 पर्यंत अर्जदारास मीटरवरील नोंदीप्रमाणे बिल आकारण्यात येत होते. मार्च 2009 ते ऑगस्ट 2009 या काळात गैरअर्जदार यांनी अर्जदारास मागील रिडींग 2019 व चालू रिडींग 2019 असे दर्शवून 87 युनिट वीज वापराचे सरासरीवर आधारीत बिल आकारले. सप्टेंबर 2009 मध्ये रिडींग घेतल्यावर अर्जदारास सरासरीवर आधारीत बिल वजा करुन क्रेडीट बिल देण्यात आले. ऑक्टोबर 2009 मध्ये मागील रिडींग 2287 व चालू रिडींग 4866 दर्शवून गैरअर्जदार यांनी अर्जदारास 2579 युनिट वीज वापराचे (18971 = 11) बिल आकारण्यात आले. व याच बिलाबाबत अर्जदाराची मूळ तक्रार आहे. अर्जदारास ऑक्टोबर 2009 आधी म्हणजेच मार्च 2009 ते सप्टेंबर 2009 या दोन महिन्याचा वीज वापर 158 + 69 = 227 = 124 युनिट प्रतिमाह असा आढळून येतो. अर्जदाराने दि.19.11.2009 रोजी वाढीव बिलाबाबत सहाय्यक अभियंता ग्रामीण उपविभाग यांच्याकडे तक्रार केलेली दिसून येते, पण त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे अर्जदारास देण्यात आलेल्या वीज बिलावरुन दिसून येते. ऑक्टोबर 2009 या महिन्याचे बिल अर्जदाराच्या सरासरी वापराप्रमाणे आकारणे योग्य राहील असे मंचाचे मत आहे. अर्जदाराचा सरासरी वीज वापर 124 + 45 = 169 = 85 युनिट असा आढळून येत असल्यामुळे ऑक्टोबर 2009 या महिन्याचे 85 युनिट प्रमाणे बिल आकारणी करणे योग्य राहील. अर्जदाराकडे असलेल्या शेती पंपाच्या वीज पुरवठयाबाबत अर्जदाराने 3 एच.पी. ते 8 एच.पी.असा वीज भार वाढविण्यासाठी गैरअर्जदार यांनी दिलेल्या वर्तमानपत्रातील जाहिरातीच्या आधारावर अर्ज दाखल केलेला दिसून येतो. गैरअर्जदार यांनी अर्जदारास 15,000/- रुपये भरण्यासाठी मागणीपत्र दिले, ज्याचा भरणा अर्जदाराने दि.29.09.2007 रोजी केलेला दिसून येतो. गैरअर्जदार यांनी दि.25.10.2007 रोजी वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीमध्ये वाढीव भारासाठी सुरक्षा ठेव घेतली जाणार नाही असे म्हटले आहे. त्यामुळे अर्जदाराने 15,000/- रुपये परत करण्याबाबत केलेली मागणी योग्य असल्याचे मंचाचे मत आहे. आदेश 1) गैरअर्जदार यांनी ऑक्टोबर 2009 नंतर दिलेली वीज बिले रदद करण्यात येत आहे. 2) गैरअर्जदार यांनी ऑक्टोबर 2009 या महिन्याचे बिल 85 युनिट याप्रमाणे आकारावे व अर्जदाराला सुधारीत वीज बिल द्यावे, व यात कोणतेही व्याज व दंड आकारु नये. 3) गैरअर्जदार यांनी स्विकारलेली सुरक्षा रक्कम, दि.25.10.2007 पासून 9% व्याजासह 30 दिवसात परत करावी. 4) गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रास व खर्चाबददल रु.2500/- 30 दिवसात द्यावे.
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |