Dated the 05 Mar 2015
न्यायनिर्णय
द्वारा- श्री.म.य.मानकर...................मा.अध्यक्ष.
1. तक्रारदार यांनी त्यांच्या घरामध्ये असलेले विदयुत मापक ज्याचा क्रमांक-020152010487 असा आहे. त्याबाबत ही तक्रार दाखल केलेली आहे. त्यांच्याप्रमाणे जुने मापक बदलुन नविन इलेक्ट्रॉनिक मापक लावल्यापासुन ते जुन्या मापकाच्या तुलनेत वीज वापर दुप्पट ते तिप्पट दाखवत आहे. तक्रारीची नोटीस सामनेवाले यांना देण्यात आली व त्याप्रमाणे सामनेवाले हजर झाले व आपली लेखी कैफीयत दाखल केली.
2. तक्रारदार यांच्या प्रमाणे ता.06.10.2010 पासुन विजेचे देयक जास्त येत आहे. वापराप्रमाणे 50 ते 60 युनिट यावयास पाहिजे, परंतु ता.06.10.2010 पासुन जास्त येत आहे. त्यांच्या घरातील जुने मापक काढले व रु.500/- ची मागणी केली. त्या करीता धमकी सुध्दा दिली. सामनेवाले यांनी घेऊन गेलेले जुने मापक तक्रारदार यांच्या अनुपस्थितीमध्ये तपासण्यात आले ते मायनस 24 टक्के हळू चालत असल्याचे सांगितले व पंचनाम्याची प्रत दिली. तक्रारदार यांच्याप्रमाणे सामनेवाले यांच्या एका कर्मचा-याने त्यांना मापकामध्ये दोष नसल्याचे सांगितले. सामनेवाले यांनी नविन इलेक्ट्रॉनिक मापक चेक न करता त्यांच्या संमतीशिवाय लावले. तक्रारदार यांच्याकडे दोन टयुब लाईटस व दोन पंखे आहे, शिवाय लोड शेडिंग राहते. तरी सुध्दा आधीपेक्षा त्यांना विजेचे देयक दुप्पट किंवा तिप्पट येते. सामनेवाले यांचे कर्मचारी श्री.भोसले यांच्याशी देयकाबाबत वाद झाला तेव्हा श्री.भोसले यांनी हाताने 133 युनिटचे देयक लिहून त्यांना दिले, व ते भरावयास लावले. सामनेवाले यांचे कर्मचारी भ्रष्टाचारी आहेत व मनात येईल तसा व्यवहार करतात व तक्रारदारास त्रास देतात. तक्रारदार यांना सामनेवाले यांनी रु.33,343/- नुकसानभरपाई म्हणुन दयावी व नविन इलेक्ट्रॉनिक विदयुत मापक बदलुन त्या ऐवजी जुन्या सारखे विदयुत मापक लावुन दयावे अशी मागणी केलेली आहे.
3. सामनेवाले यांच्याप्रमाणे तक्रारदार हे उपभोगता नाही व त्यांच्याकडे ग्राहकाचे अधिकारपत्र सुध्दा नाही. सामान्य निरीक्षणाच्या वेळेस तक्रारदार यांच्या घरातील विदयुत मापक तपासले असता ते मायनस 24.53 टक्के मंदगतीने फीरत असल्याचे आढळून आले. त्याप्रमाणे निरीक्षण अहवाल तयार करण्यात आला. त्यावर संबंधीत अभियंताची सही आहे तसेच ग्राहकाची सुध्दा सही आहे. जुनेच विदयुत मापक बदलुन त्या ऐवजी नविन विदयुत मापक बसविण्यात आले. जुने विदयुत मापक सिल करण्यात आले. त्यावर पंचांच्या व तक्रारदार यांच्या सहया घेण्यात आल्या. तक्रारदार यांना ता.11.10.2010 रोजी सकाळी-11.30 वाजता हजर राहणे विषयी सांगण्यात आले. ता.11.10.2010 रोजी सिल वगैरेची पडताळणी करण्यात आली व तक्रारदार व पंचांच्या समक्ष अभियंता यांनी जुने विदयुत मापक तपासले असता ते मायनस 22.53 टक्के मंदगतीने फीरत असल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार यांनी नविन मापक जलदगतीने फीरते अशी तक्रार केल्याने ते मापक ता.18.10.2011 रोजी तपासले असता ते दोषमुक्त असल्याचे दिसले. सामनेवाले यांना विदयुत मापक पुर्व नोटीस न देता तपासण्याचा अधिकार आहे, ते ग्राहकाच्या अनुपस्थितीमध्ये सुध्दा विदयुत मापक तपासु शकतात. तक्रारदार यांनी आधारहिन तक्रारीव्दारे खोटा दावा मंचात केला आहे. सामनेवाले यांना तक्रारदार यांच्या विषयी वैमानस्याची भावना कदापि नाही, तक्रार खारीज करण्यात यावी.
4. तक्रार प्रलंबीत असतांना सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा विदयुत पुरवठा खंडीत केला. तक्रारदार यांनी ता.12.01.2015 रोजी अर्ज दाखल करुन खंडीत केलेला विदयुत पुरवठा पुर्ववत करण्यात यावा व ते प्रतिमाह 60 युनिटप्रमाणे पैसे भरण्यास तयार आहे असे नमुद केले. सामनेवाले यांनी या अर्जास ता.19.01.2015 रोजी जबाब दाखल केला. त्यांच्याप्रमाणे तक्रारदार यांच्याकडे देयकाची रक्कम थकीत झाली होती व त्या करीता त्यांना दोन वेळा ता.29.03.2014 रोजी रु.12,878/- व ता.14.08.2014 रोजी नोटीस दिल्यानंतर सुध्दा त्यांनी रक्कम न अदा केल्याने विदयुत पुरवठा ता.03.01.2015 रोजी खंडीत करण्यात आली.
5. तक्रारदार यांनी शपथपत्र, लेखी युक्तीवाद व कागदपत्रे दाखल केली. सामनेवाले यांनी लेखी कैफीयत, शपथपत्र व लेखी युक्तीवाद तसेच कागदपत्र दाखल केली.
6. तक्रारदार यांच्यातर्फे वकील सुजाता भार्गव व सामनेवाले यांच्यातर्फे वकील सुजाता कांबळे यांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
7. उभयपक्षांचे प्लिडिंग्स व युक्तीवाद विचारात घेता खालील बाबी हया वादातीत आहेत.
8. विदयुत मापक क्रमांक-020152010487 चा धारक हा सामनेवाले यांचा ग्राहक आहे, नविन विदयुत मापक बसविण्यापुर्वी उभयपक्षांमध्ये वीज देयकावरुन वाद नव्हता, नविन विदयुत मापक लावल्यानंतर ते विजेचा वापर वाढल्याचे दर्शविते. देयकाची रक्कम अदा न केल्याने ता.03.01.2015 रोजी विदयुत पुरवठा खंडीत करण्यात आला.
9. वकील सुजाता भार्गव यांनी तोंडी युक्तीवादाचे दरम्यान तक्रारदार हे अर्जात नमुद केल्याप्रमाणे प्रतिमाह 60 युनिट वापराबद्दल देयक भरण्यास सदैव तत्पर आहे असे नमुद केले.
10. वकील सुजाता कांबळे यांनी तोंडी युक्तीवादाचे दरम्यान नमुद केले की, तक्रारदार यांचा विजेचा वापर जुने विदयुत मापक असतांना सुध्दा काही महिन्यांमध्ये 100 युनिटपेक्षाही जास्त वापर होता हे तक्रारदार यांनी दाखल केलेल्या वीज देयकावरुन स्पष्ट होते.
11. तक्रारदार यांनी तक्रारी व अर्जामध्ये नमुद केल्याप्रमाणे त्यांचा प्रतिमाह वापर 50 ते 60 युनिट आहे व नविन मापक लावल्यानंतर हा वापर दुप्पट व तिप्पट वाढल्याचे नविन विदयुत मापक दर्शवित आहे, ते पुर्णतः चुकीचे आहे. नविन विदयुत मापक हे दोषपुर्ण आहे. तक्रारदार हया बाबी अभिलेखावरुन सिध्द करतात काय ते पाहणे आवश्यक ठरते. आमच्या मते ठराविक महिन्यांचा वापर पाहण्यापेक्षा मासिक सरासरी वापर पाहणे न्यायोचित व तर्कसंगत होणार. त्या करीता आम्ही तक्रारदार यांनी तक्रारी सोबत दाखल केलेल्या वीज देयकावरुन खालील तक्ता तयार केला आहे.
महिना 2007 2008 2009 2010 2011
जाने. 35 60 77 71
फेब्रु. 28 38 84 94
मार्च 54 55 61 124
एप्रिल 53 99 122 105 122
मे 65 66 91 74 125
जुन 74 76 115 108 143
जुलै 78 80 105 85 127
ऑग. 84 63 **89 ***83 137
सप्टे. 97 76 96 88 160
आक्टों. 70 84 100 *110
नोव्हे. 75 80 98 133
डिसें. 49 72 89 103
वापरलेले युनिट- 646 813 1058 1111 1103
मासिक सरासरी 71.66 67.75 88.16 85 122
वापर
* या महिन्यामध्ये जुने विदयुत मापक बदलुन नविन इलेक्टॉनिक विदयुत मापक बसविण्यात
आले होते.
** या महिन्यात तक्रारदार यांनी दुरचित्रवाणी संच विकत घेतला होता.
*** या महिन्यात तक्रारदार यांनी संगणकयंत्र विकत घेतले होते.
12. वरील तकत्याचे निरीक्षण केले असता हे स्पष्ट होते की, सन-2007 मध्ये मासिक सरासरी वापर 71.66 व सन-2008 मध्ये मासिक सरासरी वापर 67.75 असा होता. म्हणजेच मासिक सरासरी वापर हा 65 युनिटपेक्षा कमी नव्हता. तक्रारदार जो दावा करीत आहे की त्यांचा मासिक वापर 50 ते 60 युनिट होता तो त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन सिध्द होत नाही. उलटपक्षी त्यांचा दावा चुकीचा ठरतो.
13. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीच्या परिच्छेद क्रमांक-7 मध्ये नमुद केले आहे की, पुर्वीपेक्षा युनिट तिप्पटीपेक्षा जास्त येत आहे व त्यांच्याकडे फक्त दोन टयुब लाईटस व दोन पंखे आहेत. तक्रारदार यांची ही तक्रार करण्यापुर्वी जवळपास एक वर्ष आधी ता.21.09.2010 रोजी एक पत्र सामनेवाले यांना पाठविले होते, त्याची प्रत तक्रारी सोबत दाखल केली आहे, या पत्राच्या पुष्ठ क्रमांक-2 वर तक्रारदार यांनी नमुद केले आहे की, त्यांच्याकडे फक्त दोन पंखे व दोन टयुब लाईटस आहेत व एका वर्षापुर्वी दुरचित्रवाणी संच आणला आहे. तसेच ऑगस्ट-2010 मध्ये संगणक यंत्र आणले आहे. परंतु आजुन त्याचा वापर केला नाही. दुरचित्रवाणी व संगणकयंत्रा बद्दल तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीमध्ये नमुद करण्याचे पुर्णपणे विसरल्याचे दिसते. आमच्या मते ही फार महत्वाची बाब व आवश्यक बाब होती. ही महत्वाची बाब लपवुन ठेवल्याने या एकाच बाबीवर तक्रारदार यांची तक्रार खारीज करता येते.
14. तक्रारदार यांच्या ता.21.09.2010 च्या पत्राप्रमाणे ऑगस्ट-2009 मध्ये दुरचित्रवाणी संच घेतला. सन-2009 चा मासिक सरासरी वापर पाहिला असता तो 88.16 युनिट असा आहे. हा जुन्या विदयुत मापकाप्रमाणेच आहे. याबाबत तक्रारदार यांची तक्रार नाही. म्हणजेच दुरचित्रवाणी संचाचा वापर सुरु झाल्यानंतर त्यांचे प्रतिमाह वापर 20 युनिटने अर्थात 30 टक्केने वाढला. हाच वापर सप्टेंबर-2010 पर्यंत होता म्हणजेच तक्रारदार हे जवळपास प्रतिमहा 88 युनिटचा वापर करीत होते जो त्यांच्या 50 ते 60 युनिटच्या दाव्यापेक्षा 28 युनिटने जास्त आहे. या कालावधीसाठी सुध्दा त्यांचा दावा चुकीचा ठरतो.
15. तक्रारदार यांनी तक्रारीच्या परिच्छेद क्रमांक-7 मध्ये नमुद केल्याप्रमाणे नविन विदयुत मापक लावल्यानंतर त्यांचा युनिटचा वापर तिप्पट पेक्षा जास्त येत होता. ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? नविन विदयुत मापक ऑक्टोंबर-2010 मध्ये बसविण्यात आले. सन-2011 चे देयक नविन मापकाप्रमाणे आले. या अवधीमध्ये तक्रारदार यांचा मासिक सरासरी वापर 122 युनिटचा होता सन-2009 मध्ये तक्रारदार यांचा मासिक सरासरी वापर 88 युनिट होता, नविन मापका प्रमाणे हा वापर दिडपट दर्शवितो. तो दुप्पट सुध्दा नाही. म्हणजेच तक्रारदार जो दावा करीत आहेत की, नविन विदयुत मापकाप्रमाणे त्यांचा वापर तिप्पट पेक्षा जास्त येत होता तो चुकीचा व खोटा ठरतो. म्हणजेच तक्रारदार ही बाब सुध्दा सिध्द करु शकत नाही व ते अपयशी ठरतात.
16. सन-2011 चा मासिक सरासरी वापर हा नविन मापकातील दोषामुळे आहे की अजुन कोणत्या कारणांमुळे आहे ते पाहणे सुध्दा आवश्यक आहे. कारण तक्रारदार यांची मागणी नविन विदयुत मापक बदलवुन जुन्या सारखे विदयुत मापक लावणे बाबतची आहे. सामनेवाले यांनी जुन्या मापकाची तपासणी केली असता त्यामध्ये मायनस 22.53 टक्के मंदगतीने चालत असल्याचे आढळून आले. याबाबत पंचनामा तयार करण्यात आला व त्यावर पंचांच्या, अभियंताची व तक्रारदार यांची सही आहे. सामनेवाले यांना तक्रारदार यांच्या विषयी काही वैमानस्य आहे जेणे करुन ते खोटा अहवाल तयार करतील असे समजण्या करीता अभिलेखावर काहीही नाही. तेव्हा सामनेवाले यांची ही बाब की, जुने विदयुत मापक मायनस 22.53 टक्के मंदगतीने चालत होते हे ग्राहय धरावे लागेल.
17. तक्रारदार यांचा सन-2009 मध्ये मासिक सरासरी वापर 88.16 युनिट होता जो जुन्या मापका प्रमाणे होता हे विदयुत मापक दोषपुर्ण होते. जर तेव्हा दोष रहित विदयुत मापक असते तर ते युनिट 108 असे दर्शविण्यात आले असते. सन-2011 चे मासिक सरासरी वापर 122 युनिट असा आहे हा जो 14 युनिटचा फरक आहे तो कशामुळे आहे ? तर त्याचे उत्तर तक्रारदार यांनी ऑगस्ट-2010 मध्ये जे संगणक यंत्र घेतले असे देता येईल. तक्रारदार यांनी जेव्हा दुरचित्रवाणी संच घेतला तेव्हा त्यांच्या वापरामध्ये 20 युनिटचा फरक जुन्या विदयुत मापकाप्रमाणे आला व जेव्हा त्यांनी संगणक यंत्र घेतले तेव्हा हा वापर 14 युनिटने वाढला. या करीता नविन मापकाला दोष देता येणार नाही. तक्रारदार यांनी ऑगस्ट-2009 व ऑगस्ट-2010 मध्ये अनुक्रमे दुरचित्रवाणी संच व संगणक यंत्र घेतल्यामुळे त्यांच्या मासिक युनिटच्या वापरामध्ये वाढ झाली. नविन मापक दोषपुर्ण आहे हे सुध्दा सिध्द होत नाही.
18. सामनेवाले यांनी तक्रारदार हे उपभोक्ता नसल्याने त्यांना तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही असा आक्षेप घेतला. परंतु सामनेवाले यांनी तयार केलेल्या पंचनाम्यावर व
विदयुत मापक तपासणी अहवालावर ग्राहक म्हणुन तक्रारदार यांची सही असल्याचे दिसते. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या आक्षेपाला फारसे महत्व देता येणार नाही असे आम्हास वाटते.
19. आमच्या मते तक्रारदार यांनी त्यांच्या वापरामध्ये विजेवर चालणा-या उपकरणांमध्ये वाढ केल्याने युनिटच्या वापरामध्ये आपोआप वाढ झाली. तक्रारदार सध्या वापरत असलेल्या युनिट करीता रक्कम अदा करणे आवश्यक व क्रमप्राप्त आहे. विदयुत देयक वापरत असलेल्या युनिटशी निगडीत आहे.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
-आदेश-
(1) तक्रार क्रमांक-520/2011 खारीज करण्यात येते.
(2) तक्रारदार यांचा ता.12.01.2015 चा अंतरीम अर्ज खारीज करण्यात येतो.
(3) खर्चाबाबत आदेश नाही.
4. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
ता.05.03.2015
जरवा