न्या य नि र्ण य
(दि.30-01-2024)
व्दाराः- मा. श्री अरुण रा. गायकवाड, अध्यक्ष
1. प्रस्तुतचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 35 प्रमाणे सामनेवाला यांनी तक्रारदाराचा खंडीत केलेला वीज पुरवठा पुन्हा सुरु करुन मिळणेसाठी दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथने थोडक्यात पुढील प्रमाणे-
तक्रारदार यांचे तक्रारीत नमुद पत्त्यावर स्वत:चे घर आहे. तक्रारदार यांना सामनेवाला वीज कंपनीकडून नवीन विदयुत कनेक्शनची आवश्यकता असलेने त्यासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा करुन 3 फेज विदुयत कनेक्शन मिळण्यासाठी दि.03/05/2021 रोजी ऑनलाईन पध्दतीने सामनेवाला यांचेकडे अर्ज केला होता. सदर अर्जाची छाननी झाल्यानंतर राजापूर उपविभागाकडून तक्रारदार यांचा अर्ज दि.08/07/2021 रोजी मंजूर करण्यात आला. त्यानंतर दि.28/07/2021 रोजी उपविभाग राजापूर-1 शाखा कार्यालय, जैतापूर यांचेकडे प्रस्ताव जोडणीसाठी पाठविण्या आला. त्यानुसार तक्रारदारास ग्राहक क्रमांक 21391014157 अन्वये 3 फेज विदुयत कनेक्शन उपलब्ध करुन दिले. सदर नवीन विदयुत कनेक्शनसाठी सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून रक्कम रु.10624/- इतकी रक्कम स्विकारुन पावती क्र.BVOI0099159316 दिली. असे असताना दि.06/09/2021 रोजी सामनेवालाकडून तक्रारदार यांचा विदयुत पुरवठा कोणतेही संयुक्तिक कारण न देता खंडीत करण्यात आला. त्याबाबत तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे चौकशी केली असता नितेश शामराव कांबळी यांनी तक्रारदार यांचे नवीन विदुयत कनेक्शन संदर्भात तक्रार अर्ज करुन तक्रारदाराचे विदयुत कनेक्शन रद्दबातल करणेबाबतचा अर्ज दिला असल्याची माहिती तक्रारदारास मिळाली. तक्रारदाराचे नवीन विदयुत कनेक्शन रद्द न केल्यास श्री नितेश शामराव कांबळी यांनी लाक्षणीक उपोषणाचा इशारा दिल्याचे तक्रारदारास समजून आले. सदरचा नितेश कांबळी यांचा अर्ज सामनेवाला यांना प्राप्त झालेनंतर सदर तक्रारीची शहानिशा करुन तक्रारदार यांचेकडे आवश्यक तो खुलासा मागणे गरजेचे होते. सामनेवाला यांचे अधिकारी यांनी वस्तुस्थिती पाहिली त्यावेळी श्री नितेश कांबळी यांचे विदुयत मिटरचे सन-2021 पासून विदुयत बील थकीत असल्याचे आढळून आले तर तक्रारदार यांचे विदुयत बील थकबाकी स्वरुपात नसल्याचे दिसून आले. तरीही सामनेवाला यांचे संबंधीत अधिकारी यांनी तक्रारदाराचे नवीन विदयुत कनेक्श्न काढून टाकले.
वास्तविक नितेश कांबळी व तक्रारदार यांचे दरम्यान इमल्यावरुन वादविवाद चालू आहेत. नितेश कांबळी यांनी गैरमार्गाने तक्रारदार यांचा इमला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असल्याने तक्रारदार यांनी त्यासंदर्भात विविध शासकीय कार्यालयाकडे तक्रार अर्ज केलेले आहेत. त्याकारणातून नितेश कांबळी यांनी तक्रारदारांचे नवीन विदुयत कनेक्शन खंडीत करण्याबाबतचा अर्ज दिला होता. नितेश कांबळी यांचे वडील शामराव कांबळी हे सन-2019 मध्ये मयत झालेले आहेत. सदरचा विदुयत मीटर आजतागायत वापरात नाही. त्यामुळे सदर मिळकत क्र.1414 मध्ये कोणतेही विदुयत मीटर कार्यान्वित असल्याचे दिसत नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवालास दि.13/09/2021 रोजी पुन्हा विदुयत मीटरची जोडणी करण्यात यावी असा अर्ज दिला.त्यावर सामनेवाला यांनी दि.03/11/2021 रोजी आदेश पारीत करुन तसा अहवाल मुख्य कार्यालयाकडे पाठविला आहे. तसेच तक्रारदार यांनी सामनेवालाकडे जमा केलेली रक्कम परत करण्याबाबत सामनेवाला यांनी कोणताही आदेश पारीत केलेला नाही. सदरची रक्कम आजही सामनेवाला यांचेकडे जमा आहे. त्यामुळे तक्रारदारास जनरेटर खरेदी करुन त्याआधारे विदुयत पुरवठा करुन घ्यावा लागत आहे. जनरेटरच्या पेट्रोलचा खर्चही करावा लागत आहे. तक्रारदार हा कधीही विदुयत बिलाचा थकबाकीदार नसताना व कोणतेही संयुक्तिक कारण घडलेले नसताना तक्रारदाराचे विदयुत कनेक्शन रद्दबातल ठरवून सामनेवाला यांनी तक्रारदारास अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवेत त्रुटी ठेवलेने तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन तक्रारदारास सामनेवाला यांचेकडून खंडीत केलेले विदुयत कनेक्शन पुन्हा जोडणी करुन देण्यासंदर्भात सामनेवालांना आदेश व्हावा तसेच सामनेवालाकडून तक्रारदारास शारिरीक व मानसिक, आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.7000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने त्यांचे तक्रारीमध्ये केली आहे.
2) तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.6 कडे एकूण 10कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये नि.6/1 कडे वीज जोडणा भरणा रक्कम रु.10624/- ची पावती, नि.6/2 कडे तक्रारदाराचे मिळकतीचा 7/12 उतारा, नि.6/3 कडे ग्रामपंचायत वास्तव दाखला, नि.6/4 कडे शरद शिरवडकर यांचे नांवे मुखत्यार नि.6/5 कडे महावितरण कंपनीला दिलेले प्रतिज्ञापत्र , नि.6/6 पंचायत समिती निर्णय, नि.6/7 कडे सामनेवाला यांनी केलेली चौकशी व निर्णय, नि.6/8 कडे मुख्य महावितरण कंपनीला केलेली तक्रार, नि.6/9 कडे मुख्य महावितरण कंपनीकडून दिलेला आदेश नि.6/10 कडे महावितरण कंपनीने दिलेले उत्तर इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.10 व 17 कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.19 कडे एकूण तीन कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये नि.19/1 कडे ज्योती इंजिनिअरींग आणि स्पेअर्स यांचे जनरेटर संदर्भातील बील, नि.19/2 वस्तुस्थिती दर्शविणारे फोटो, नि.19/3 कडे शामराव कांबळी यांच्या नावाचे विदुयत बील इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच नि.20 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. तसेच नि.25 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. तसेच नि.27 कडे नितेश कांबळी व शामराव कांबळी यांचा मृत्यू दाखला दाखल केला आहे.
3) सामनेवाला यांनी प्रस्तुत कामी वकीलांमार्फत हजर होऊन नि.14 कडे त्यांचे म्हणणे दाखल केलेले आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराची तक्रार खोटी, खोडसाळ व अयोग्य व बेकायदा असलेने फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला त्यांचे कथनात पुढे सांगतात,तक्रारदार यांनी ज्या घरामध्ये वास्तव्यास आहे असे नमुद करुन नवीन वीज कनेक्शन मागितले होते. त्याच ठिकाणी पुर्वी श्री शामराव कृष्णा कांबळी यांचे नांवे ग्राहक क्र.213910013444 अन्वये सिंगल फेज घरगुती वापराकरिता वीज कनेक्शन होते. सदर वीज कनेक्शनचा वापरदेखील तक्रारदार करत होते व त्याचे वीज देयक त्यांची थकीत ठेवले होते. सदरची बाब तक्रारदाराने सामनेवाला यांचेपासून लपवून नवीन वीज कनेक्शन फसवणुकीने मिळविले. नवीन वीज कनेक्शनबाबत सामनेवाला यांचेकडे नितेश शामराव कांबळी यांनी तक्रार केल्यावर सामनेवाला यांनी सदर प्रकरणाची चौकशी केली. सदर चौकशीमध्ये तक्रारदार यांनी एकाच घरामध्ये एकाच प्रयोजनाकरिता दोन वीज कनेक्शन घेतलेचे स्पष्ट झाले. त्यामुळे सामनेवाला यांनी सदरचे नवीन वीज कनेक्शन कायम स्वरुपी बंद करणेचे व जुन्या वीज कनेक्शनची थकबाकी वसुल करणेच्या सुचना वीज पुरवठा करणारे कार्यालय उप कार्यकारी अभियंता, उपविभाग राजापूर-1 यांना दिल्या. तसेच तक्रारदाराने दिलेल्या ॲफीडेव्हीटनुसार तक्रारदारास दि.06/09/21 रोजी पत्र देऊन त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. सामनेवाला यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेमध्ये कोणतीही त्रुटी केलेली नाही. केवळ नियमबाहय केलेला वीज पुरवठा नियमाने कारवाई करुन बंद केला. सबब सदरची तक्रार मे. आयोगाच्या अधिकारक्षेत्रात येणारी नसून सदर तक्रार अधिकार क्षेत्राच्या मुददयावर फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे.
4) सामनेवाला यांनी त्यांचे म्हणणेच्यापुष्टयर्थ सोबत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. तसेच नि.16 कडे एकूण 6 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये नि.16/1 कडे तक्रारदार वापरत असलेले जुने मिटरचे बील, नि.16/2 कडे तक्रारदार वापरत असलेल्या घराचे व वीज मिटरचे फोटो, नि.16/3 कडे सामनेवाला यांनी उपकार्यकारी अभियंता यांना पाठविलेले पत्र, नि.16/4 कडे सामनेवाला वीज कंपनीचे E A 2003 नुसारचे नियम, नि.16/5 कडे सामनेवाला यांनी कनिष्ठ अभियंता यांना दिलेले कारणे दाखवा नोटीस, नि.16/6 कडे कनिष्ठ अभियंता यांचा अंतिम शिक्षा आदेश इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. नि.22 कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.24 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली. नि.26 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
5) वर नमुद तक्रारदार यांचा तक्रार अर्ज व दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे म्हणणे, दाखल कागदपत्रे व उभयतांचा लेखी व तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन करता सदर आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ खालील मुददे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | सामनेवाला यांनी तक्रारदाराचे नवीन वीजमीटर कनेक्शन बंद करुन सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून बंद केलेले नवीन वीज कनेक्शन पुन्हा सुरु करुन मिळणेस पात्र आहेत तसेच मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळणेस पात्र आहेत काय? | होय. अंशत: |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-विवेचन-
6) मुददा क्र.1 :– तक्रारदार यांना सामनेवाला वीज कंपनीकडून नवीन विदयुत कनेक्शनची आवश्यकता असलेने त्यासाठी लागणारी आवश्यक ती सर्व कागदपत्रे गोळा करुन 3 फेज विदयुत कनेक्शन मिळण्यासाठी दि.03/05/2021 रोजी ऑनलाईन पध्दतीने सामनेवाला यांचेकडे अर्ज केला होता. सदर अर्ज दि.08/07/2021 रोजी सामनेवालांकडून मंजूर करण्यात आला. सदर नवीन विदुयत कनेक्शनसाठी सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून रक्कम रु.10624/- इतकी रक्कम स्विकारुन पावती क्र.BVOI0099159316 दिली असलेचे तक्रारदाराने दाखल केलेले नि.6/1 कडे पावतीवरुन स्पष्ट होते. दि.28/07/2021 रोजी उपविभाग राजापूर-1 शाखा कार्यालय, जैतापूर यांचेकडे प्रस्ताव जोडणीसाठी आलेनंतर तक्रारदारास ग्राहक क्रमांक 21391014157 अन्वये 3 फेज विदुय कनेक्शन उपलब्ध करुन दिले होते. ही बाब सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये मान्य केलेली होती. सबब, तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झालेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर या आयोगाने होकारार्थी दिले आहे.
7) मुददा क्र.2 :– तक्रारदार यांनी नवीन विदयुत कनेक्शनसाठी घेणेसाठी रक्कम रु.10624/- इतकी रक्कम सामनेवालांकडे जमा केल्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदारास ग्राहक क्रमांक 21391014157 अन्वये 3 फेज विदयुत कनेक्शन उपलब्ध करुन दिले. परंतु दि.06/09/2021 रोजी सामनेवालाकडून तक्रारदार यांचा विदयुत पुरवठा कोणतेही संयुक्तिक कारण न देता खंडीत करण्यात आला. त्याबाबत तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे चौकशी केली असता नितेश शामराव कांबळी यांनी तक्रारदार यांचे नवीन विदयुत कनेक्शन संदर्भात तक्रार अर्ज करुन तक्रारदाराचे नवीन विदयुत कनेक्शन रद्द न केल्यास लाक्षणीक उपोषणाचा इशारा दिल्याने सामनेवाला यांचे संबंधीत अधिकारी यांनी तक्रारदाराचे नवीन विदयुत कनेक्श्न बंद केले. त्यामुळे तक्रारदारास जनरेटर खरेदी करुन त्याआधारे विदुयत पुरवठा करुन घ्यावा लागत आहे. तक्रारदार हा कधीही विदुयत बिलाचा थकबाकीदार नसताना व कोणतेही संयुक्तिक कारण घडलेले नसताना तक्रारदाराचे विदयुत कनेक्शन रद्दबातल ठरवून सामनेवाला यांनी तक्रारदारास अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सेवेत त्रुटी ठेवली आहे.
8) सामनेवाला यांनी दाखल केलेले म्हणणेचे अवलोकन करता तक्रारदार राहात असलेल्या मिळकतीमध्ये पूर्वी श्री शामराव कृष्णा कांबळी यांचे नांवे ग्राहक क्र.213910013444 अन्वये सिंगल फेज घरगुती वापराकरिता वीज कनेक्शन होते. सदर वीज कनेक्शनचा तक्रारदार वापर करीत होते व त्याचे वीज देयक तक्रारदार यांनी थकीत ठेवून नवीन वीज कनेक्शन फसवणूकीने घेतले होते. तक्रारदाराच्या सदर नवीन वीज कनेक्शनबाबत सामनेवालांकडे श्री निलेश शामराव कांबळी यांनी तक्रार केल्यावर सदर प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सदर चौकशीमध्ये तक्रारदार यांनी एकाच घरामध्ये एकाच प्रयोजनाकरिता दोन वीज कनेक्शन घेतलेचे स्पष्ट झाले. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराचे नवीन वीज कनेक्शन कायम स्वरुपी बंद करण्याचे व जुन्या वीज कनेक्शनची थकबाकी वसुल करण्याच्या सुचना उप कार्यकारी अभियंता, उपविभाग, राजापूर-1 यांना दिल्या. तसेच संबंधीत अधिकारी यांचेवर खातेनिहाय प्रमादीय कारवाई करुन दंडाची शिक्षा करण्यात आली आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारास कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही असे कथन केले आहे. परंतु तक्रारदाराने नि.6/1 कडे सामनेवालांकडे नवीन वीज मिटरच्या कनेक्शनसाठी रक्कम रु.10,624/- भरलेची पावती क्र.BVOI0099159316 दाखल केलेली आहे व सदरची पावती सामनेवाला यांनी मान्य केलेली आहे. तसेच तक्रारदाराचे नवीन कनेक्शन बंद करताना तक्रारदारास दि.06/09/21 रोजी पत्र दिलेचे सामनेवाला यांनी त्यांचे म्हणणेमध्ये नमुद केले आहे. श्री नितेश शामराव कांबळी यांचे तक्रारीवरुन तक्रारदारचे नवीन वीज कनेक्शन बंद करताना तक्रारदारास त्याबाबतची कोणतीही कल्पना न देता तसेच तक्रारदाराचा खुलासा न घेता तक्रारदारचे नवीन वीज कनेक्शन बंद केलेले आहे. तसेच तक्रारदाराने नि.6/10 कडे सामनेवाला यांचे दि.03/11/21 रोजीचे पत्र दाखल केले आहे. त्यामध्ये श्री शिरवडकर (तक्रारदार) रहात असलेले जुने सिंगल फेज कनेक्शन थकबाकीस्तव तात्पुरते बंद केले आहे असे नमुद आहे. यावरुन तक्रारदार रहात असलेल्या घरामध्ये असलेले जुने वीज मीटर व नवीन वीज मीटर दोन्ही बंद असलेचे स्पष्ट होते. सध्याच्या काळात वीज ही मुलभूत गरज असताना तक्रारदाराने दोन्ही वीज मीटर बंद करुन सामनेवाला यांनी तक्रारदारास दयावयाचे सेवेत त्रुटी केलेचे स्पष्ट होते. त्यामुळे मुददा क्र.2 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
9) मुददा क्र.3 :– तक्रारदार यांनी नवीन विदयुत कनेक्शनसाठी घेणेसाठी रक्कम रु.10624/- इतकी रक्कम सामनेवालांकडे जमा केल्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदारास ग्राहक क्रमांक 21391014157 अन्वये 3 फेज विदुय कनेक्शन उपलब्ध करुन दिले. परंतु दि.06/09/2021 रोजी सामनेवालाकडून तक्रारदार यांचा विदयुत पुरवठा तक्रारदारास कोणतेही संयुक्तिक कारण न देता खंडीत केला. तक्रारदार यांचे कथनानुसार श्री नितेश शामराव कांबळी यांचे तक्रारीनंतर सामनेवाला यांनी तक्रारदाराचे नवीन वीज कनेक्शन बंद केले. परंतु सामनेवाला यांनी त्यांचे म्हणणेमध्ये कथन केले आहे की, तक्रारदार रहात असलेल्या घरात जुने वीज मीटर श्री शामराव कृष्णा कांबळी यांचे नांवे असताना व सदर वीज कनेक्शनचा तक्रारदार वापर करीत होते व त्याचे वीज देयक तक्रारदार यांनी थकीत ठेवून नवीन वीज कनेक्शन फसवणूकीने घेतले होते. तक्रारदाराच्या सदर नवीन वीज कनेक्शनबाबत सामनेवालांकडे श्री निलेश शामराव कांबळी यांनी तक्रार केल्यावर सदर प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सदर चौकशीमध्ये तक्रारदार यांनी एकाच घरामध्ये एकाच प्रयोजनाकरिता दोन वीज कनेक्शन घेतलेचे स्पष्ट झाले. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराचे नवीन वीज कनेक्शन कायम स्वरुपी बंद करण्याचे व जुन्या वीज कनेक्शनची थकबाकी वसुल करण्याच्या सुचना उप कार्यकारी अभियंता, उपविभाग, राजापूर-1 यांना दिल्या असे म्हटले आहे. सामनेवाला यांनी त्यापुष्टयर्थ नि.16/3 कडे दाखल केलेले सामनेवाला यांनी त्यांचे उपकार्यकारी अभियंता, उपविभाग, राजापूर-1 यांना दि.31/08/21 रोजी पाठविलेल्या पत्राचे अवलोकन करता, त्यामध्ये एकाच घरात एकाच प्रयोजन वापरासाठी (घरगुती) दोन वीज कनेक्शन देण्यात आली आहेत, त्यामुळे सदर प्रकरणी महावितरणाच्या नियमांचे उल्लंघन झालेले दिसून येते. मौजे अणूसरे येथील घर क्र.1414 मध्ये श्री प्रशांत गोपीचंद शिरवडकर, यांचे नांवे ग्राहक क्र.213910014157 देणेत आलेले नवीन वीज कनेक्शन कायमस्वरुपी बंद करणेत यावे व जुने श्री शामराव कृष्णा कांबळी यांचे नावे असणारे ग्राहक क्र.213910013144 हे वीज कनेक्शन चालू ठेवून थकबाकी वसूली करणेत यावी असे लिहीलेचे स्पष्ट दिसते. तसेच नि.16/1 कडे सामनेवाला यांनी दाखल केलेले श्री शामराव कृष्णा कांबळी यांचे नांवे असलेले ग्राहक क्र.213910013444 या वीज मीटरचे ऑगस्ट-2022 चे बीलाचे अवलोकन करता, सदरच्या बीलाची थकीत रक्कम रु.31,160/- असलेचे दिसून येते. यावरुन तक्रारदार हा श्री शामराव कृष्णा कांबळी यांचे नावे असलेल्या वीज मीटरचाही वापर करत होता हे स्पष्ट होते. तसेच तक्रारदाराने नि.6/3 कडे दि.07/04/21 रोजीचा सरपंच,ग्रामपंचायत अणुसरे, ता.राजापूर जि.रत्नागिरी यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला जोडलेला असून त्यामध्ये ग्रामपंचायत अणुसरे कार्यक्षेत्रातील पंगेरे वाडी येथील इमारत क.1414 ही इमारत कै.शामराव कृष्णा कांबळी यांचे नांवे ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे व सदर व्यक्ती मयत असून इमारत क्र.1414 या इमारतीमध्ये श्री प्रशांत गोपीचंद शिरवडकर हे कायम वास्तव्याला असतात असे नमुद केले आहे. तसेच नि.6/6 कडे तक्रारदाराने दाखल केलेल्या दि.04/10/21 रोजीच्या पंचायत निर्णयामध्ये दुस-या परिच्छेदमध्ये “ग्रा.पं.अणसुरे कर व फी बाबत नमुना नं.10 ची पावती शामराव कृष्णा कांबळी इमारत क्र.1414 हस्ते प्रशांत गोपीचंद शिरवडकर यांनी कर भरणा केलेची पावती सन 2017-18पासून ते 2020-21 पर्यंत भरणा केल्याची दिसून येते.” असे नमुद केले आहे. याचा अर्थ शामराव कृष्णा कांबळी यांचे नांवे असलेले जुने वीज मीटर तक्रारदार पूर्वीपासून वापरत होते ही बाब शाबीत होते. सदरचे वीज मीटर सुरु असताना तक्रारदार यांनी नवीन वीज मीटर कनेक्शनसाठी सामनेवालांकडे ऑनलाईन फॉर्म भरला व नवीन कनेक्शन घेतलेले आहे. सबब तक्रारदार यांनी शामराव कृष्णा कांबळी यांचे नांवे असलेल्या वीज मीटरची ऑगस्ट-2022 अखेर असलेली थकीत रक्कम रु.31,160/- सामनेवालांकडे भरणा करावी. सदरची थकीत रक्कम तक्रारदाराने सामनेवालांकडे जमा केलेनंतर सामनेवाला यांनी तक्रारदारास जुने श्री शामराव कृष्णा कांबळी यांचे नांवे असलेले ग्राहक क्र.213910013144 हे वीज कनेक्शन बंद करावे. तसेच तक्रारदाराने नवीन वीज कनेक्शनसाठी सामनेवालांकडे रक्कम रु.10,260/- भरलेले आहेत. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास नवीन वीज कनेक्शनची जोडणी करुन नवीन वीज कनेक्शन सुरु करुन दयावे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. तसेच तक्रारदार शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
10) मुददा क्र.4 :– वरील विवचेनास व कारणमिमांसेस अनुसरुन हे आयोग खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- आ दे श -
(1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येतो.
(2) तक्रारदार यांनी त्यांचेकडील शामराव कृष्णा कांबळी यांचे नांवे असलेले जुने ग्राहक क्र.213910013144 या वीज मीटरची असलेली थकीत रक्कम रु.31,160/- सामनेवाला यांचेकडे भरणा करावी. तक्रारदारांनी सदरची रक्कम भरणा केलेनंतर सामनेवाला यांनी तक्रारदाराचे श्री शामराव कृष्णा कांबळी यांचे नांवे असलेले जुने ग्राहक क्र.213910013144 हे वीज कनेक्शन बंद करुन तक्रारदारास नवीन वीज कनेक्शन सुरु करुन दयावे.
(3) तक्रारदार यांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (र.रुपये पाच हजार मात्र) तसेच तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/-(र.रुपये तीन हजार मात्र) सामनेवाला यांनी अदा करावेत.
(4) वरील आदेशाची पुर्तता उभय पक्षकारांनी सदरहू आदेश पारीत झालेच्या दिनांकापासून 45 दिवसांचे आत करणेची आहे.
(5) सदर आदेशाची पुर्तता वरील मुदतीत न केल्यास उभय पक्षकार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 71 व 72 प्रमाणे सामनेवाला विरुध्द दाद मागू शकेल.
(6) उभय पक्षकारांना निकालपत्राच्या सत्यप्रती विनामुल्य पुरवाव्यात.