निकालपत्र :- (दि.13.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला तसेच त्यांचे वकिल गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांनी सामनेवाला विद्युत कंपनीकडून विद्युत पुरवठा घेतलेला आहे; त्याचा ग्राहक क्र.251590039333, ए-00128 असा आहे. सामनेवाला विद्युत कंपनीची तक्रारदारांनी दि.21.08.2006 रोजीअखेर वेळोवेळी देयकांचा भरणा केला आहे. त्यानंतर सामनेवाला विद्युत कंपनीने दि.24.04.2007 रोजी रुपये 14,690/-, दि.23.07.2007 रोजी रुपये 16,270/- व दि.27.10.2007 रोजी रुपये 19,390/- इतकी अवास्तव थकबाकी दाखविली आहे. सदरची कृती ही सामनेवाला विद्युत कंपनीची सेवेतील त्रुटी आहे. सबब, सामनेवाला विद्युत कंपनीने देयक दुरुस्त करुन ना हरकत दाखला द्यावा. तसेच, आर्थिक नुकसानीपोटी रुपये 50,000/-, मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 25,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत वटमुखत्यारपत्र, दि.24.04.2007, दि.23.07.2007, दि.27.10.2007, दि.31.01.2008 रोजीची वीज बिले, दि.03.03.2008 रोजी माहिती अधिकाराखाली सामनेवाला यांनी दिलेली माहिती, दि.05.02.2008 रोजी सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, सामनेवाला क्र.3 यांचे तक्रारदारांच्या नोटीसीस दि.29.02.2008 रोजीचे उत्तर, तक्रारदारांनी मंडल कार्यालयाअंतर्गत तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार दि.27.03.2008, सामनेवाला क्र.3 यांनी दि.03.04.2008 रोजी दिलेली नोटीस, तक्रारदारांनी दि.03.12.2003 रोजी मिटर बदलणेबाबत दिलेला अर्ज, दि.07.02.2009, दि.30.10.2009, दि.27.01.2010 रोजीची वीज बिले, सामनेवाला यांचे दि.12.12.2008 रोजीचे उत्तर, विद्युत खंडित करणेबाबतची सुचना दि.12.03.2009, दि.18.03.2009 रोजी वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, डी.डी.क्र.527153, चालू वीज बिल मागणी पत्र दि.05.02.2010, सामनेवाला यांचा सदर पत्रास खुलासा व वीज बिल कोटेशन, तक्रारदारांनी कोटेशन ऐवजी बिल मिळणेबाबत दिलेला अर्ज, सामनेवाला यांचा दि.17.03.2010 रोजीची विद्युत पुरवठा खंडित करणेबाबतची नोटीस इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला विद्युत कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांची देयके बरोबर असून त्यांची सेवेत त्रुटी झालेली नाही. तक्रारदारांनी सदर देयकांबाबत सामनेवाला विद्युत कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारांना त्याच कारणावरुन या मंचाकडे तक्रार दाखल करता येणार नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रारीत उपस्थित केलेला वाद हा सामनेवाला विद्युत कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाखल केलेला आहे व सदरचा वाद सदर मंचाकडे प्रलंबित आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 3 मधील तरतुदी विचार घेतल्या असता प्रस्तुतचा कायदा हा इतर कायद्यांना न्युनतम आणणारा नसून पुरक आहे. इलेक्ट्रिसिटी अॅक्ट मधील तरतुदींचा विचार करता विद्युत कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे चालणारे कामकाज हे अर्ध-न्यायिक स्वरुपाचे असते. तक्रारदारांनी उपस्थित केलेला वाद हा सदर विद्युत कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे उपस्थित केलेला असल्याने त्याबाबतचा पुन्हा तोच वाद या मंचाकडे उपस्थित करता येणार नाही. इत्यादीचा विचार करता प्रस्तुतची तक्रार काढून टाकणेत यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. प्रस्तुतची तक्रार काढून टाकणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |