(आयोगाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य(गाडगीळ), मा. सदस्या)
(पारीत दिनांक १०/११/२०२२)
तक्रारदाराने ग्राहक सरंक्षण कायदयाचे १४ सह १२ अन्वये सदर तक्रार दाखल करुन नमूद केले की,
१. तक्रारदार हा चंद्रपूर येथील रहीवासी असून सेवानिवृत्त आहे. तक्रारदाराचे मालकीचे घर असून विरुध्दपक्षाकडून दिनांक ०६/०४/१९९८ रोजी त्यांनी विज कनेक्शन संपूर्ण कायदेशीर बाबीची पुर्तता करुन घेतले. तक्रारदाराने दिनांक ०६/०४/१९९८ पासून विज कनेक्शन ग्राहक क्रमांक ४५००१०७६६२९५/१ असून तक्रारदार अंदाजे १० वर्षापासून त्यांनी बांधलेले नवीन घरी तुकूम चंद्रपूर येथे राहायला आल्यामुळे तक्रारदाराचा विज वापर कमीत कमी झालेला आहे व विरुध्दपक्ष हयांनी तक्रारदाराला वेळोवळी कमीत कमी वापराचे देयक पाठविले व त्याचा भरणा तक्रारदाराने केला आहे. तक्रारदाराची विरुध्दपक्ष हयांचेकडे विज देयकाची कोणतीही थकबाकी नसतांना विरुध्दपक्षाने तक्रारदारास दिनांक २६/०८/२०१९ रोजीचे १७३ युनिट विज वापराचे रुपये १३५०/- चे देयक पाठविले. परंतू तक्रारदाराने विज वापर केला नसल्यामुळे व विज वापर शुन्य युनिटचा असल्यामुळे तक्रारदाराने देयकाचा भरणा केला नाही व दिनांक १४/१०/२०१९ रोजी विरुध्दपक्षाकडे लेखी तक्रार दिली. पंरतू त्या तक्रारीची विरुध्दपक्ष हयांनी दखल घेतली नाही व तक्रारदारास दिनांक २५/१०/२०१९ रोजीची २२० युनिट विज वापराचे रुपये ४,६९०/- चे देयक पाठविले, हे देयक आल्यावर तक्रारदाराने दिनांक १३/११/२०१९ रोजी विरुध्दपक्षाकडे पुन्हा लेखी तक्रार दिली व घरात विज पुरवठा नसतांनाही मीटर आपोआप फिरत आहे याची जाणीव करुन दिली व नादूरुस्त विद्युत मीटर बदलले. विशेष म्हणजे तक्रारदाराने लावलेले नवीन मीटर सुध्दा घराला विज पुरवठा नसतांना किंवा एकही विद्युत उपकरणे चालू केले नसतांना फिरत असल्याचे निदर्शनास आहे. विरुध्दपक्ष हयांनी तक्रारदारास दिनांक १३/१२/२०१९ रोजीचेपत्रासोबत तथाकथीत मीटर तपासणी अहवाल पाठविला व त्यामध्ये त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराकडील विज मीटर व्यवस्थीत आहे, वास्तविक विरुध्दपक्षाने तक्रारदाराकडील विज मीटर तक्रारदाराचे उपस्थितीत तपासणे आवश्यक होते, तसेच मीटर काढते वेळी सिलबंद करुन पंचनामा करुन घेणे अपेक्षीत होते, तसेच तपासणी करते वेळी तक्रारदाराला उपस्थित राहण्याकरीता आधी सुचना विरुध्दपक्ष हयांनी दिली नाही ही विरुध्दपक्ष हयांनी अवलंबलेली अनुचीत व्यापार पध्दती आहे. तक्रारदार पुढे नमुद करतो की, तक्रारदाराचा विज पुरवठा बंद असतांना विज मीटर फिरत असून वाढीव रिडींग दर्शवीत आहे, यावरुन स्पष्ट होते की, तक्रारदाराकडील विद्युत मीटर किंवा जोडणीत कुठेतरी बिघाड आहे व त्यामध्ये विज वापर न करता सुध्दा प्रोग्रेसीव्ह रिडींग मीटर दर्शवित आहे. तक्रारदाराचे घर मागील १० वर्षापासून बंद असून तेथील वीज पुरवठा बंद आहे याची खात्री विरुध्दपक्षाच्या अधिका-यांनी करुन घेतली आहे. विरुध्दपक्ष हयांनी पाठविलेले ६४ यनिट दिनांक२७/०१/२०२० चे देयक आहे परंतू विज पुरवठा खंडीत असल्याने हे देयक येणे शक्यच नाही. सबब दिनांक १८/०२/२०२० रोजी विरुध्दपक्षाकडे लेखी तक्रार केली व खंडीत विज पुरवठा पूर्ववत करुन न वापलेल्या विजेच्या वादग्रस्त देयकांना रद्द करुन कमीत कमी आकारणीचे विज देयक देण्याची विनंती केली, परंतू विरुध्दपक्ष हयांनी तक्रारीची दखल घेतली नाही. सबब तक्रारदाराला आयोगाकडे तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारीत तक्रारदाराने मागणी केली आहे की, विरुध्दपक्ष हयांनी अवलंबलेली सेवा अनुचीत
व्यापार पध्दती व न्युनतापूर्ण सेवा ठरविण्यात यावी, तसेच विरुध्दपक्ष हयांनी पाठविलेले दिनांक २६/०८/२०१९ चे रुपये १३५०/- चे वीज देयक, दिनांक २५/१०/२०१९ रोजीचे रुपये ४७२०/-चे वीज देयक व दिनांक २५/०१ /२०२० चे रुपये ७,६००/-चे वीज देयक बेकायदेशीर ठरवून रद्द करण्यात यावे व विरुध्दपक्ष हयांनी कमीत कमी वापराचे सुधारीत देयक दयावे, तसेच तक्रारदाराचे मीटरचा खंडीत वीज पुरवठा विरुध्दपक्षाने पुर्नस्थापीत करुन दयावा, तसेच विरुध्दपक्ष हयांनी वरील थकबाकी देयकाकरीता तक्रारदाराचा ग्राहक क्रमांक ४५००१०७६६२९५/१ चा पुरवठा खंडीत करु नये, तसेच तक्रारदाराला झालेल्या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रुपये ५०,०००/- तसेच तक्रारीचा खर्च रुपये २५,०००/- विरुध्दपक्षावर लादण्यात यावा.
३. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करुन विरुध्दपक्ष हयांना नोटीस पाठविण्यात आली.
४. विरुध्दपक्ष हयांनी तक्रारीत उपस्थित होऊन त्यांचे लेखी उत्तर विशेष कथनासह दाखल करुन तक्रारदाराचे तक्रारीतील कथन खोडून काढले. विशेष कथनामध्ये नमूद केले की, तक्रारदार हयांचे माहे जुलै-२०१९ पर्यंत विज वापर नसल्यामूळे त्यांना शुन्य युनिट बिलाची आकारणी करण्यात येत होती परंतू त्यानंतर कदाचीत तक्रारदाराने विज वापर सुरु केला असावा किंवा त्याच्या पुरवठयावरुन दुस-यांना विज पुरवठा असावा म्हणून ऑगष्ट-२०१९ ते नोव्हेंबर-२०१९ पर्यंत प्रोग्रेसिव्ह रिडींग प्राप्त होत असल्यामुळे रिंडीगप्रमाणे बिलाची आकारणी करण्यात येत होती. त्यानंतर तक्रारदाराने केलेल्या बिलाबाबतच्या तक्रारीनुसार विज मिटरची तपासणी करण्यात आली परंतू मिटर सुस्थितीत आढळले व तसे तक्रारदारास कळविण्यातआले. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार विज केंन्द्र, समाधी वार्ड यांचेकडून स्थळ निरीक्षण अहवाल मागविण्यात आला व त्यावरुन संबधीत विज पुरवठयाचा आऊट गोईंग विज वापर बंद असल्याचे निदर्शनास आले व विज मिटर योग्य गतीने फिरत असल्याचे समजले. परंतू तसे असतांनाही प्रोग्रेसिव्ह रिडींग प्राप्त होत असल्याने तक्रारदार हा विज वापर करत असावा. तक्रारदाराने खोटेआरोप करीत विरुध्दपक्ष विरुध्द सदर तक्रार दाखल केली. जर तक्रारदाराकडील विज मिटर फॉल्टी असते किंवा त्यांनी केलेल्या आरोपानुसार विज जोडणीत खराबीअसती तर तक्रारदाराला सुरुवातीपासून प्रोग्रेसिव्ह युनिटचे देयक दिली गेली असती. परंतू तक्रारदाराने कथन केल्याप्रमाणे तक्रारदाराला माहे २६/०८/२०१९ पासून प्रोग्रेसिव्ह युनिट वापराचे देयक देण्यात येत आहे यावरुन तक्रारदार विज वापर करीत असून विज देयकाचा भरणा करण्यात सुट मिळावी या हेतूने तक्रारदाराने सदर तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदाराला विरुध्दपक्ष हयांनी कसलीही न्युनतापूर्ण सेवा दिली नसुन अनुचीत व्यापार पध्दतीचा वापर केलेला नाही, सबब सदर तक्रार खारीज करण्यात यावी.
५. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दस्ताऐवज तसेच युक्तिवाद तसेच विरुध्दपक्ष हयांचे उत्तर, शपथपत्र व युक्तीवाद व दोन्ही पक्षांचा तोंडी युक्तिवादावरुन सदर प्रकरण निकाली काढण्याकरीता खालिल मुद्दे व त्यावरील निष्कर्ष कायम करण्यात येत आहे..
कारणमीमांसा
६. तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष हयांचा ग्राहक असून विरुध्दपक्षहे सेवा पुरवठादार आहेत. प्रस्तूत विवादात विरुध्दपक्ष हयांनी तक्रारदाराचे घरी विज कनेक्शन दिनांक ०६/०४/१९९८ पासून लावले आहे परंतू तक्रारकर्ता हा अंदाजे १० वर्षापासून त्यांनी बांधलेल्या घरात तुकूम येथे राहायला असल्यामुळे तक्रारदाराचा विवादीत मिटरचा वापर कमीत कमी झालेला असून विरुध्दपक्ष हयांनी तक्रारदाराला कमीत कमी देयक पाठविले व तक्रारदाराने त्याचा भरणा केलेला आहे, परंतू कोणतीही थकबाकी नसतांना विरुध्दपक्ष हयांनी दिनांक २६/०८/२०१९ रोजी १७३ युनिट विज वापराचे रुपये १३५०/- चे देयक तक्रारकर्त्यास पाठविले. परंतू विज वापरच नसल्यामुळे तक्रारदाराने सदर देयक न भरता विरुध्दपक्षाकडे तक्रार केली.परंतू त्यावर विरुध्दपक्ष हयांनी दुर्लक्ष करुन पुन्हा दिनांक २५/१०/२०१९ रोजी २२० युनिटचे रुपये ४६०/- चे देयक पाठविले म्हणून तक्रारदाराने पुन्हा तक्रार करुन मिटर बदलविण्याचा अर्ज केला.विरुदपक्ष हयांनी तक्रारदाराचे मिटर बदलवून नवीन मीटर लावले पंरतू तक्रारदाराच्या घरात कोणताही वापर नसतांना मीटर फिरत होते. तक्रारदाराचे तक्रारीनुसार विरुध्दपक्ष हयांनी तक्रारदाराला दिनांक१३/१२/२०१९ रोजी मीटर तपासणी अहवाल पाठविला त्यामध्ये मीटर व्यवस्थित आहे असे नमूद आहे पंरतू मीटर काढतेवेळी कोणताही पंचनामा केला नाही. यापुढेही तक्रारदाराला विरुध्दपक्ष हयांनी दिनांक २५/०१/२०२० रोजी ६४ युनिटचे विज वापराचे रुपये ७५९०/-देयक पाठविले. तक्रारदाराचे तक्रारीनुसार सदर घरात १० वर्षापासून कोणीही राहत नसुन सदर बिल विरुध्दपक्ष हयांनी पाठविल्यामुळे तक्रारदाराने खंडीत विज पुरवठा पुर्नस्थापित करुन न वापरलेल्या देयकाचे वादग्रस्त देयक रद्द करण्याची विनंती केली त्यावर विरुध्दपक्षहयांनी त्यांच्या लेखी उत्तरात तक्रारदार यांनी माहे जुलै-२०१९ पर्यंत विज वापर नसल्याने त्यांना शुन्य युनिटची आकारणी होत होती परंतू कदाचीत तक्रारदाराने विज वापर चालू केला असावा म्हणून माहे २०१९ ते नोव्हेंबर -२०१९ पर्यंत प्रोग्रसिव्ह रिडींग प्राप्त होत असून बिलाची आकारणी केली गेली. तसेच स्थळ निरीक्षण अहवालावरुन संबधीत विज अहवालानुसार आऊट गोंईग विज वापर बंद असल्याचे निदर्शनास आले असे कथन केले आहे.
७. आयोगाचे मते विरुध्दपक्ष हयांनी त्यांचा शपथपत्रात तक्रारकर्त्याचे घर बंद असून त्याचा विज वापर नसल्यामुळे माहे जुलै-२०१९पर्यंत विज वापर नसल्यामुळे शुन्य युनिट आकारणी येत होती ही बाब मान्य केली परंतू पुढे त्यांनी तक्रारदाराने त्यांच्यािविज पुरवठयातून दुस-यांना विज दिली गेली किंवा विज पुरवठा कदाचीत चालू केला गेला असावा बचाव केला. परंतू त्याबाबत कोणताही पुरावा, दस्तएवज आयोगासमोर आणले नाही. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमीटेड कडून दिलेल्या निर्देशनानुसार मीटरच्या नियतकालीन तपासणी व देखभालीस विज सेवा पुरवठादार जबाबदार असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे विज मीटरची देखभाल व विज मीटर चालू स्थितीत राखण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्ष हयांची आहे, त्याबाबत कुठलीही जबाबदारी ग्राहकावर टाकता येणार नाही त्यामुळे विरुध्दपक्ष यांचा बचाव ग्राहय धरता येणार नाही. प्रस्तूत प्रकरणात विरुध्दपक्ष हयांनी तक्रारदारास विज मीटरचा वापर दाखल सीपीएल नुसार माहे जुलै-२०१९ पर्यंत शुन्य दर्शवित आहे, परंतू त्यानंतर रिंडीग प्रोग्रेसिव्ह व रिडींगनुसार युनिट दाखवून देयके तक्रारदाराला देण्यात आली असे कथन केले आहे,परंतू तक्रारदाराचे घरात कुणीही राहात नसुनही व कोणतेही विद्युत उपकरणाचा वापर नसून रिडींग कसे दाखवितआहे याबद्दल विरुध्दपक्ष हयांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही, तसेच तक्रारदार दुस-या व्यक्तीला त्या मीटरवरुन विजेचा पुरवठा केल्यामुळे रिडींग दाखवित आहे असे पोकळ कथन विरुध्दपक्ष हयांनी त्यांचे उत्तरात केले, परंतू त्याबद्दलचाही कोणताही सक्षम पुरावा आयोगासमोरआणला नाही. तसेच विरुध्दपक्ष हयांनी दाखल केलेल्या दिनांक २८/०७/२०२०च्या स्थळ निरीक्षण अहवालावर तक्रारकर्ता हयांची स्वाक्षरी असणे अनिवार्य आहे, परंतू विरुध्दपक्ष हयांनी स्थळ निरीक्षण करतांना तक्रारदार हयांना कोणतीही आगाऊ सुचना दिल्याचे दस्ताऐवज प्रकरणात दाखल नाही.
८. वरील सर्व बाबींचा विचार करता विरुध्दपक्षाची कृती ही कायदेशीर तरतुदीचे उल्लंघन व सेवेतील न्युनता आहे हे स्पष्ट होत आहे. विरध्दपक्ष हयांच्या सेवेतील न्युनतेमुळे तक्रारदाराला त्यांचे घर बंद असूनही विरुध्दपक्षाकडून आलेल्या देयकामुळे दोनदा तक्रार करुनही विरुध्दपक्ष हयांचे कडून दुर्लक्षीत झाल्यामुळे मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला असे आयोगाचे मत आहे. सबब आयोग खालिल आदेश पारीत करीत आहे.
अंतिम आदेश
१. तक्रारकर्त्याची तक्रार क्र. २४/२०२० अंशतः मंजूर करण्यात येते.
२. विरुध्द पक्ष हयांनी तक्रारदाराला पाठविलेले देयक दिनांक २६/०८/२०१९ चे रुपये १३५०/-, दिनांक २५/१०/२०१९ चे रुपये ४,७२०/- तसेच दिनांक २५/०१/२०२० चे रुपये ७,६००/- चे देयक या आदेशान्वये रद्द करण्यात येत असून विरुध्दपक्ष हयांनी तक्रारदारास वरील विज वापराचे नियमानुसार देयक पाठवावी व तक्रारदाराने त्या देयकाचा भरणा करावा. तसेच विरुध्दपक्ष हयांनी तक्रारदाराचा विज पुरवठा पुर्नस्थापीत करुन दयावा.
३. तक्रारदाराला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- विरुध्दपक्ष हयांनी तक्रारदारास दयावा.
४. उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावेत.