नि.३४
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष : श्री.अनिल य.गोडसे
मा.सदस्या : श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या : श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र.१९९४/२००९
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : २१/७/२००९
तक्रार दाखल तारीख : २८/७/२००९
निकाल तारीख : २३/८/२०११
--------------------------------------------------------
आनंदराव लक्ष्मण साळुंखे
व.व.४६, व्यवसाय – शेती/मजूरी
रा.आंदळी, जाधवनगर, ता.पलूस
जि.सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
मा. कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कं.लि.
विश्रामबाग, सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.एस.बी.पाटील, आर.बी.साळुंखे
जाबदार तर्फे : +ìb÷. श्री चिप्रे
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज विद्युत अपघाताबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
दि.११/३/२००७ रोजी तक्रारदार हे मजुरीने कामाला गेले होते व शाळेला सुट्टी असल्याने तक्रारदार यांची मुले धनाजी व विजय हे तक्रारदार यांच्या वडिलार्जित शेतजमीनीमध्ये शेळया राखत होते. सदर शेतजमीनीवरुन पूर्व-पश्चिम अशी इलेक्ट्रीक टॉवर (H.T.) लाईन गेली आहे. तक्रारदार यांची मुले शेळया राखीत असताना अचानक सदर इलेक्ट्रीकल वायरचा स्फोट होवून ज्वाला व मोठया ठिणग्या तक्रारदारांच्या मुलांच्या अंगावर पडल्या व ते दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना आसपासच्या लोकांनी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी अथक प्रयत्न करुनही तक्रारदार यांचा मुलगा विजय दि.१३/३/२००७ रोजी मयत झाला व सदर अपघातामध्ये दुसरा मुलगा धनाजी हा ३५ टक्के भाजून गंभीर जखमी झाला. सदर अपघातामुळे धनाजीच्या मनावर गंभीर परिणाम झाला आहे. जाबदार यांनी वेळच्या वेळी विद्युत वाहक तारांची देखभाल व दुरुस्ती न करणे व जाबदारांची बेफिकीरी यामुळे सदरचा अपघात झाला आहे. सदर अपघाताबाबतची नुकसान भरपाई मागणेसाठी जाबदारांच्याकडे मागणी केली असता जाबदारांनी टाळाटाळ केली. सरतेशेवटी वकीलांमार्फत नोटीस पाठविली. सदर नोटीसलाही जाबदार यांनी थातुरमातूर उत्तरे देवून उचित कार्यवाही केली नाही. जाबदार यांनी दिलेल्या सदोष सेवेमुळे अर्जदारांनी सदरचा अर्ज सदर अज्ञान मुलांचे जनक वडील या नात्याने दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ११ कागद दाखल केले आहेत.
३. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार यांनी विद्युत वितरण कंपनी यांना पक्षकार केले होते. त्यांनी त्यांचे म्हणणे नि.८ वर दाखल केले आहे. सदर जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये महाराष्ट्र विद्युत कायदा २००३ नुसार महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची विभाजन होवून त्याच्या तीन कंपन्या झाल्या असून त्या कंपनी कायद्याप्रमाणे नोंदणीकृत झाल्या आहेत. सदरच्या विद्युत अपघाताबाबतची जबाबदारी व विद्युत लाईनचे दुरुस्ती देखभाल करणेची जबाबदारी ही विद्युत पारेषण कंपनीवर येते. त्यामुळे सदरचे जाबदार प्रस्तुत प्रकरणी जबाबदार नाहीत असे जाबदार यांनी म्हणणेमध्ये नमूद केले आहे. जाबदार यांनी आपले म्हणणेचे पृष्ठयर्थ नि.९ ला प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
४. तक्रारदार यांनी नि.१६ वर अर्ज देवून जाबदार म्हणून विद्युत वितरण कंपनी यांना कमी करुन त्यांच्या ऐवजी विद्युत पारेषण कंपनी यांना सामील करण्यात यावे अशी विनंती केली. सदरचा अर्ज मंजूर करणेत आलेने तक्रारदार यांनी नि.१ मध्ये त्याप्रमाणे दुरुस्ती केली व नि.१८ वर दुरुस्त अर्जाची प्रत दाखल केली. जाबदार यांनी नि.२४ वर अर्ज देवून जाबदार पारेषण कंपनीचे विभाजन होवून सांगली येथे स्वतंत्र कार्यालय सुरु झाले असल्याने जाबदार यांना सांगली येथील पत्त्यावर नोटीस मिळाली आहे व त्याप्रमाणे सांगली येथील कार्यालयातर्फे कार्यकारी अभियंता यांनी आपले वकीलपत्र व म्हणणे याकामी दाखल केलेने तक्रारदार यांना जाबदार यांच्या पत्त्यामध्ये दुरुस्ती करण्याबाबत निर्देश देणेत आले. त्याप्रमाणे नि.३३ वरील आदेशाप्रमाणे दुरुस्ती करणेत आली.
५. सामील जाबदार यांनी नि.२८ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार हे ग्राहक होत नाहीत. अर्जदार यांच्याकडून कोणतीही सेवा पुरविण्यासाठी जाबदार यांनी शुल्क आकारलेले नाही. लाईन देखभाल व दुरुस्ती वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक लाईन ही तीन महिन्यातून एकदा देखभाल दुरुस्तीसाठी तपासण्यात येते. सदरची लाईन दि.२२/२/२००७ रोजी तपासली होती. सदर लाईन तपासणी करताना त्यावर टेपरेकॉर्डरमधील टेप अथवा इतर काही टाकलेचे आढळून आले नाही. सदर अपघातस्थळाची पाहणी विद्युत निरिक्षक मिरज यांनी केली असून त्यांनी आपल्या अहवालात लाईन खाली टेपरेकॉर्डरमधील टेपचे तुकडे व त्याला ऊसाच्या कांडया बांधलेल्या आढळून आल्याचे नमूद केले आहे. सदरचा अपघात हा मुलांच्या खोडकरपणामुळे झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर अपघास जाबदार कंपनी जबाबदार नाही. अर्जदारास औषधोपचारासाठी पैशाची आवश्यकता असल्याने माणुसकीच्या दृष्टीकोनातून व तात्काळ मदत म्हणून दि.१३/३/२००७ रोजी मयत मुलाचे बाबतीत रु.१०,०००/- व जखमी मुलाचे बाबतीत रु.२,०००/- अशी रक्कम दिलेली आहे. ती रक्कम स्वीकारुन अर्जदारांनी पोहोच दिलेली आहे. तसेच जखमी मुलाच्या औषधोपचारासाठी म्हणून रक्कम रु.३४,७८३/- चेक नं.२७३७१९ ने दि.२३/७/२००७ रोजी दिलेले आहेत. अशा प्रकारे एकूण रु.४६,७८३/- अर्जदारांना अदा करण्यात आलेले आहेत. परंतु अर्जदार यांनी जाणुनबुजून या सर्व बाबींचा उल्लेख आपल्या अर्जात केलेला नाही. त्यामुळे अर्जदार हे स्वच्छ हाताने मंचापुढे आलेले नाहीत. अर्जदार यांना जाबदार यांनी कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही त्यामुळे प्रस्तुतचा अर्ज फेटाळणेत यावा. जाबदार यांनी नि.२९ वर शपथपत्र दाखल केले आहे व नि.३० च्या यादीने ६ कागद दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी नि.३१ ला जादा पुरावा देणेचा नाही अशी पुरशिस दाखल केली आहे.
६. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे व दोन्ही बाजूंचा ऐकण्यात आलेला युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाचे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होतात का ? होय.
२. तक्रारदार हे मागणीप्रमाणे अनुतोष मिळणेस पात्र आहेत का ? अंशत: मान्य.
३. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे का ? नाही.
४. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
विवेचन
७. मुद्दा क्र.१ –
तक्रारदार यांचेकडून जाबदार यांनी कोणतेही शुल्क आकारले नसल्याने तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होत नाहीत असा आक्षेप जाबदार यांनी आपले म्हणणेमध्ये व युक्तिवादामध्ये घेतला आहे. तक्रारदार हे ग्राहक कसे होतात ? याबाबत कोणतेही कथन तक्रारअर्जामध्ये केलेले नाही असेही जाबदार यांनी आपल्या युक्तिवादामध्ये नमूद केले आहे. तक्रारदार यांनी त्याबाबत युक्तिवाद करताना मंचासमोर नि.३२ चे यादीने अनेक निवाडे दाखल केले आहेत. तक्रारदार हा अपघातग्रस्त मुलांचा वडील आहे व तो लाभार्थी आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील ग्राहक या शब्दाची व्याख्या लक्षात घेता लाभार्थी हा ग्राहक होतो. जाबदार यांनी आपले युक्तिवादामध्ये त्यांनी कोणतेही शुल्क आकारले नाही व कोणतीही सेवा दिली नाही. त्यामुळे तक्रारदार हा विद्युत पारेषण कंपनीचा ग्राहक होत नाही असे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. विद्युत मंडळाच्या तीन वेगवेगळया कंपन्या झाल्या असल्या तरीही सर्व तिन्ही कंपन्यांचे कार्य हे मोबदला घेवून ग्राहकाला वीज देणे व त्या अनुषंगाने योग्य ती सेवा देण्याचे आहे ही गोष्ट याठिकाणी प्रामुख्याने नोंद घेण्यासारखी आहे. त्यामुळे रस्त्यावरुन टाकलेले विद्युत पोल व त्यावरुन जाणारी लाईन याची सुरक्षितता ठेवणे या सर्व गोष्टी या सेवा या सदरात अंतर्भूत होतात. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या सर्व निवाडयांचे अवलोकन केले असता विद्युत अपघाताने अपघातग्रस्त होणारी व्यक्ती अथवा लाभार्थी ग्राहक या व्याख्येत येते हे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत सदरचा मंच येत आहे.
८. मुद्दा क्र.२
सदर मुद्याचा विचार करता तक्रारदार यांच्या मुलांना दि.११/३/२००७ रोजी सामनेवाला यांच्या विद्युतभारीत वायरमुळे अपघात झाला ही गोष्ट उभयपक्षी मान्य आहे. सदरचा अपघात हा कोणाच्या चुकीमुळे झाला किंवा जाबदार यांच्या निष्काळजीपणामुळे झाला का ? या गोष्टी ठरविताना जाबदार यांनी याकामी दाखल केलेले विद्युत निरिक्षक यांचे नि.३/२ वरील पत्र विचारात घेणे गरजेचे आहे. सदर पत्रामध्ये विद्युत निरिक्षक यांनी धनाजी याचे हात पाय व छाती भाजली व विजय हा पूर्णपणे भाजलेने मृत झाला असे नमूद केले आहे. तसेच निष्कर्षाअंती टेपरेकॉर्डमधील टेप ऊसाच्या कांडीला बांधून लाईनवर टाकलेने सदरचा टेप लोंबकळत असावा व त्या संपर्कात दोन्ही भावंडे आल्याने हा अपघात झाला व विद्युत कंपनीने मानवतेच्या दृष्टीकोनातून सदर दोन्ही अपघाती मुलांना नुकसान भरपाई द्यावी असे वाटते असे नमूद केले आहे. विद्युत निरिक्षक यांना महाराष्ट्र विद्युत कायदा २००३ मधील कलम १६१ नुसार विद्युत अपघातासंदर्भात चौकशी करण्याचे अधिकार बहाल केले आहेत. सदर कलम १६१ नुसार चौकशी करताना विद्युत निरिक्षक यांना कलम १६१(३) प्रमाणे दिवाणी न्यायालयाचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत व विद्युत निरिक्षक यांच्या अहवालावर कलम १६२(२) नुसार अपील करण्याची तरतूद आहे. जाबदार यांनी नि.३०/२ वर विद्युत निरिक्षकांचे पत्र दाखल केले आहे. परंतु सदर पत्रावरुन नेमकी काय चौकशी केली व कोणता निष्कर्ष काढला याबाबत कोणताही ऊहापोह दिसून येत नाही व सदरच्या पत्रामधील निष्कर्ष हा ठाम वाटत नाही. त्यातूनही मानवतेच्या दृष्टीकोनातून मुलांना नुकसान भरपाई द्यावी असे वाटते असे मत विद्युत निरिक्षक यांनी नोंदविलेले आहे. विद्युत निरिक्षक यांचे मत व आलेला पुरावा पाहता सदरचा अपघात जाबदार यांचे चुकीमुळे झाला असे दर्शविणारा पुरेसा पुरावा मंचासमोर आलेला नाही.
९. तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्ये रक्कम रु.५,००,०००/- ची मागणी केली आहे. सदर मागणी करताना तक्रारदार यांनी औषधोपचाराचा खर्च, झालेले आर्थिक नुकसान याबाबतची मागणी केली आहे. मानवतेच्या दृष्टीने नुकसान भरपाई देणेबाबत विचार करताना जाबदार यांनी याकामी दाखल केलेले नि.३०/६ वरील सर्क्युलर विचारता घेणे गरजेचे आहे. सदर सर्क्युलरप्रमाणे विद्युत अपघाताने मृत्यू झाल्यास रक्कम रु.१,००,०००/- व पूर्णत: अपंगत्व आल्यास रक्कम रु.१,२५,०००/- देण्याची तरतूद आहे. जाबदार यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांना रु.४६,७८३/- दिलेले आहेत असे नमूद केलेले आहे. त्यापैकी मयत मुलाबाबत रक्कम रु.१०,०००/- व जखमी मुलाबाबत रक्कम रु.२,०००/- तात्काळ व त्यानंतर जखमी मुलासाठीऔषधोपचाराचे बिलासाठी रक्कम रु.३४,७८३/- अदा केले आहेत असे नमूद केले आहे. सदरची बाब तक्रारदार यांनी त्यांच्या अर्जामध्ये नमूद केलेली नाही व जाबदार यांनी म्हणणे दिल्यावर नाकरलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांना जखमी मुलाबाबत रक्कम रु.३६,७८३/- मिळाली आहे. सदरच्या मुलास कायमचे पूर्ण अपंगत्व आले असे दाखविणारा कोणताही पुरावा तक्रारदार यांनी मंचासमोर आणला नाही. सदरच्या मुलास वैद्यकीय उपचारासाठी किती खर्च आला याबाबतही कोणताही पुरावा मंचासमोर आणलेला नाही, वैद्यकीय बिले हजर केलेली नाहीत, त्यामुळे पुराव्याअभावी त्यापेक्षा जादा रक्कम मंजूर करणे संयुक्तिक ठरणार नाही असे या मंचाचे मत आहे. अपघातामध्ये मयत झालेल्या मुलाबाबत तक्रारदार यांना केवळ रक्कम रु.१०,०००/- अदा करण्यात आले आहेत. जाबदार यांच्या सर्क्युलरप्रमाणे अपघातामध्ये मयत झाल्यास रक्कम रु.१,००,०००/- देणेची तरतूद करण्यात आली आहे. जाबदार यांनी केवळ रक्कम रु.१०,०००/- अदा केले आहेत त्यामुळे उर्वरीत रक्कम रु.९०,०००/- तक्रारअर्ज दाखल केले तारखेपासून द.सा.द.शे.९ टक्के व्याजदराने अदा करणेबाबत आदेश करणे संयुक्तिक ठरेल असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार यांनी शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारअर्जातील परिच्छेद ९ मध्ये मागणी रकमांचा तपशील देताना रक्कम रु.१२,८५,०००/- ची मागणी केली आहे व विनंती कलम मध्ये मात्र दुरुस्ती करुन रक्कम रु.५,००,०००/- ची मागणी केली आहे. विनंती कलम मध्ये शारिरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची स्वतंत्र मागणी केलेली नाही. जाबदार यांनी सर्क्युलरप्रमाणे रक्कम अदा केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांना या मंचामध्ये धाव घ्यावी लागली व सदरचा तक्रारअर्ज दाखल करावा लागला ही बाब विचारात घेता तक्रारदार यांना रक्कम रु.५,०००/- एकत्रित मंजूर करण्यात येत आहेत.
१०. मुद्दा क्र.३
तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे असा आक्षेप जाबदार यांनी घेतला आहे. सदरचा अपघात हा दि.११/३/२००७ रोजी झाला आहे. तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज हा दि.२१/७/२००९ रोजी दाखल केला आहे. नि.१ वर तारीख नमूद करताना तक्रारदार यांनी दि.२१/६/२००९ अशी तारीख नमूद केली आहे. परंतु सदरची तारीख चुकीची नमूद केली आहे. प्रत्यक्षात तक्रारअर्ज या मंचामध्ये दि.२१/७/२००९ रोजी नोंदविण्यात आला आहे. दि.११/३/२००७ रोजी अपघात झालेनंतर दि.२१/७/२००९ रोजी दाखल करण्यात आलेला तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे का ? याचा विचार करताना दरम्यानच्या काळात घडलेला घटनाक्रम लक्षात घेणे गरजेचे आहे. जाबदार यांनी नि.३०/२ वर दाखल केलेले विद्युत निरिक्षक यांचे पत्र दि.२४/७/२००७ रोजीचे आहे. त्यामुळे विद्युत अपघात झाला तरी त्यानंतर चौकशी ही दि.२४/७/२००७ ला पूर्ण झाली आहे. जाबदार यांनी दरम्यानचे काळात तक्रारदार यांना रु.३४,७८३/- चेकने दि.२३/७/२००७ रोजी अदा केले आहेत असे नमूद केले आहे. चेकने पैसे अदा केले, तसेच विद्युत निरिक्षक यांनी अहवाल दाखल केला, त्या दिनांकापासून सदरचा तक्रारअर्ज दोन वर्षाचे आत दाखल केला आहे. त्यामुळे तक्रारअर्ज मुदतबाहय झाला या जाबदारांच्या कथनामध्ये कोणतेही तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे. त्यामुळे वरील मुद्याचे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
२. तक्रारदार यांना जाबदार यांनी रक्कम रु.९०,०००/- व सदर रकमेवर दि.२१/७/२००९
पासून द.सा.द.शे. ९ टक्के दराने व्याज अदा करावे.
३. यातील जाबदार यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे
खर्चापोटी म्हणून रक्कम रु.५,०००/- अदा करावेत.
४. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार यांनी दि.०७/१०/२०११ पर्यंत न केल्यास
तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल
करु शकतील.
सांगली
दिनांकò: २३/०८/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११