नि. ४९
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १७५२/२००९
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : १८/०४/२००९
तक्रार दाखल तारीख : २४/०४/२००९
निकाल तारीख : ०३/०१/२०१२
----------------------------------------------------------------
१. श्री शिवाजी कुंडलिक शेंडगे
वय वर्षे ४८, व्यवसाय – नोकरी व शेती
रा.पेड ता.तासगांव जि. सांगली
सध्या मुक्काम २४, सुखसागर अपार्टमेंट,
वारणाली रोड, विश्रामबाग, सांगली-४१६४१५ ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. सहायक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि.
उपविभाग क्र.१, तासगांव
ता.तासगांव जि. सांगली
२. कार्यकारी अभियंता,
महावितरण (ग्रामीण)
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि.
विश्रामबाग, सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.आर.बी.पोतदार, व्ही.एस.गोडसे
जाबदार तर्फे : +ìb÷. श्री व्ही.एस.हिरुगडे, पवार
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज नुकसान भरपाईबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी त्याच्या मौजे तासगांव येथील जमीनीमध्ये शेतीसाठी दोन बोअरवेल खोदले आहेत व सदर जमीनीमध्ये द्राक्षबाग लावण्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेतले आहे. सदर बोअरवेलला तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून दोन वेगवेगळी विद्युत कनेक्शन घेतली आहेत. सदर बोअरवेल मार्फत तक्रारदार हे द्राक्ष बागेस पाणी देणेचे कार्य करीत असताना कमी दाबाने वीजपुरवठा होवून बोअरवेलवरील विद्युत मोटार पूर्ण क्षमतेने पाणी खेचत नसलेचे व दोन्ही बोअरवेल एकाच वेळी सुरु होत नसलेचे लक्षात आले. सदर बोअरना पाणी खेचण्यासाठी आवश्यक असणारा विद्युत पुरवठा हा कमी दाबाने होत असल्याने त्याबाबत तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे वेळोवेळी तोंडी तक्रार करण्याचा प्रयत्न केला. जाबदार यांनी तक्रारदार यांना त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तथापि जाबदार यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांची द्राक्ष बाग पाण्याअभावी करपू लागली. अशातच तक्रारदार यांच्या बोअरला पाणीपुरवठा अयोग्य दाबाचा असल्यामुळे तक्रारदार यांचेकडे विद्युत पुरवठा होणारा ट्रान्स्फॉर्मर जळाला. ट्रान्स्फॉर्मर जळाल्याच्या व त्याच्या नव्याने दुरुस्ती होण्याच्या कालावधीत तक्रारदार याचे द्राक्ष बागेस पाणीपुरवठा होवू शकला नाही व नव्यानेच बसविण्यात आलेला ट्रान्स्फॉर्मरही पूर्ण क्षमतेने काम करीत नाही. त्यामुळे तक्रारदार यांची द्राक्ष बाग जाबदार यांच्या निष्काळजीपणामुळे कोमेजून व काळवंडून गेली. तक्रारदार यांनी दि.१६/११/२००८ रोजी वीजपुरवठा सुरळित व योग्य दाबाने होण्यासाठी नव्याने सुधारणा सुचविणारा अर्ज सादर केला. परंतु जाबदार यांनी त्यानुसारही काही कार्यवाही केली नाही. जाबदार यांच्या या निष्काळजीपणामुळे तक्रारदार यांचे द्राक्ष बागेचे नुकसान झाले. सदरची नुकसान भरपाई रक्कम रु.७,००,०००/- वसुल होवून मिळावेत या मागणीसाठी व इतर तदानुषंगिक मागण्यांसाठी तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने १६ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार यांनी याकामी नि.१५ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी कमी दाबाच्या वीज पुरवठयाबाबत कोणतीही तक्रार जाबदार यांचेकडे कधीही केली नाही. तक्रारदार यांनी नमूद केलेप्रमाणे ट्रान्स्फॉर्मर जळाल्याबाबतची घटना ही तांत्रिक बिघाडामुळे घडली आहे. त्याबाबत जाबदार कंपनीने नवीन ट्रान्स्फॉर्मर ४८ तासांच्या आत बसवून दिला आहे. तक्रारदार यांची द्राक्ष बाग जळाली याबाबतचा मजकूर कपोलकल्पित आहे. तक्रारदार यांनी नमूद केल्याप्रमाणे दि.१६/११/२००८ च्या तक्रारअर्जाबाबतचा अर्ज जाबदार कंपनीस कधीही प्राप्त झाला नाही. तक्रारदार हे मूळचे पेड येथील रहिवासी असून तक्रारदार यांनी अनाधिकृतरित्या वीज कंपनीच्या लघुदाब वाहिनीवर तारेचा हूक टाकून वीजचोरी करीत होते. त्याबाबत जाबदार वीज कंपनीच्या फिरत्या पथकाने वीज चोरी पकडली. सदरची चोरी मान्य करुन तक्रारदार यांनी तडजोडीची रक्कम भरली. सदरच्या खटल्यामुळे तक्रारदार यांच्या मनात जाबदार यांच्याविरुध्द रोष निर्माण झाल्याने तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी अर्जातील वादासंबंधी दि.१८/३/२००९ रोजी मा.अध्यक्ष, अंतर्गत तक्रार निवारण कक्ष, मंडल कार्यालय, सांगली यांचेकडे त्यांच्या प्रतिनिधींमार्फत केलेल्या तक्रारीनुसार त्यांना ४८ तासांच्या आत ट्रान्फॉर्मर बदलून दिलेला आहे. सदर निवाडयाबाबत तक्रारदार यांनी नियमानुसार दाद मागितली नाही त्यामुळे प्रस्तुतचा तक्रारअर्ज चालणेस पात्र नाही, तो फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१६ ला प्रतिज्ञापत्र व नि.१७ च्या यादीने ९ कागद दाखल केले आहेत.
४. तक्रारदार यांनी नि.१९ ला आपले प्रतिउत्तर दाखल केले आहे व सोबत नि.२० वर शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदार यांनी आपल्या प्रतिउत्तरामध्ये जाबदार यांचे म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी नि.२१ वर कमिशन नेमणूकीचा अर्ज सादर केला होता. सदरचा अर्ज मंजूर करण्यात येवून वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय विद्युत शाखा यांची कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक करण्यात आली. तक्रारदार यांनी नि.२४ चे यादीने कागद दाखल केले आहेत. कोर्ट कमिशनर यांनी आपला अहवाल नि.२७ ला दाखल केला आहे. जाबदार यांनी सदर कोर्ट कमिशन अहवालला नि. ३४ ला म्हणणे दिले आहे व तक्रारदार यांनी सदरचे अहवालास नि.३६ ला म्हणणे दाखल केले आहे. तक्रारदार यांनी नि.३८ चे यादीने ६ कागद दाखल केले आहेत. जाबदार यांनी नि.४२ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.४६ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तसेच नि.४७ च्या यादीने तक्रारदार यांनी काही कागद दाखल केले आहेत व नि.४८ वर तोंडी युक्तिवाद करणेचा नाही अशी पुरशिस दाखल केली आहे. जाबदार यांचे विधिज्ञ तोंडी युक्तिवादासाठी उपस्थित राहिले नाहीत.
५. तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज हा सन २००८-०९ या हंगामातील तक्रारदार यांच्या द्राक्षाच्या पिकाचे झालेले नुकसान रक्कम रु.७,००,०००/- व तक्रारअर्जाचा खर्च मिळावा या प्रमुख मागणीसाठी दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नुकसान भरपाई मागणी करताना सन २००८ मध्ये त्याचे बोअरला पुरेशा दाबाने विद्युत पुरवठा होत नसल्याने द्राक्ष पिकास पाणी कमी पडले त्यामुळे द्राक्ष बाग कोमेजून गेली या कारणासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रारदाराच्या तक्रारअर्जातील मागणीबाबत निष्कर्षाप्रत येताना दोन गोष्टी पाहणे गरजेचे आहे त्या म्हणजे सन २००८ मध्ये कमी दाबाने विद्युत पुरवठा झाला का ? व तक्रारदाराच्या बागेचे नुकसान झाले का ? तक्रारदार यांनी याकामी दाखल केलेला पुरावा पाहता प्रस्तुत प्रकरणी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय विद्युत शाखा यांची कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक केली होती व सदर कॉलेजतर्फे विभाग प्रमुख, इलेक्ट्रीकल विभाग यांनी कमिशन काम करुन आपला अहवाल दाखल केला आहे. सदरचा अहवाल हा दि.९/६/२०१० रोजी केलेल्या कमिशन कामाबाबत आहे. तक्रारदाराची तक्रार ही सन २००८ मधील कमी दाबाच्या विद्युत पुरवठयाबाबत व त्या अनुषंगाने झालेल्या द्राक्ष पिकाच्या नुकसानीबाबत असल्याने सदरचा कमिशन अहवाल प्रस्तुत तक्रारअर्जाचे कामी फारसा उपयुक्त ठरणारा नाही असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार यांचेकडे कमी दाबाने विद्युत पुरवठा झाला हे दर्शविण्यासाठी नि.५/८ ला दि.१६/११/२००८ रोजी जाबदार यांना दिलेल्या पत्राची झेरॉक्सप्रत दाखल केली आहे. जाबदार यांनी सदरचे पत्र आपणास मिळाल्याची बाब नाकारली आहे. सदर पत्राचे अवलोकन केले असता सदरची प्रत ही जाबदारांना मिळाली असे त्यावरुन कोठेही दिसून येत नाही त्यामुळे कमी दाबाच्या विद्युत पुरवठयाबाबत सन २००८ मध्येच जाबदार यांचेकडे तक्रार केली होती हे ठरविण्यासाठी सदरचे पत्र उपयुक्त नाही. तक्रारदार यांनी नि.३८ च्या यादीने गावातील सहा लोकांची शपथपत्रे दाखल केली आहेत. सदर शपथपत्रावरुनही सन २००८ मध्ये कमी दाबाने विद्युत पुरवठा होत होता ही बाब स्पष्ट होत नाही. तक्रारदार यांच्या शेतामध्ये कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असेल तर सदरचा विद्युत पुरवठा हा योग्य त्या दाबाने होण्यासाठी जाबदार यांना निर्देश देण्याबाबतची कोणतीही विनंती तक्रारअर्जामध्ये केलेली नाही. तक्रारदारतर्फे दाखल शपथपत्रामध्ये दि.९/६/२०१० रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या काळात वीजपुरवठा बंद होता तसेच सध्या कमी दाबाने विद्युत पुरवठा होत आहे असेही नमूद आहे. तक्रारदार यांची विद्युत पुरवठा योग्य त्या दाबाने करण्याची मागणी नसल्याने सदरची शपथपत्रे ही प्रस्तुत तक्रारअर्जाचे कामी पुरावा म्हणून फारशी उपयुक्त नाहीत असे या मंचाचे मत आहे. सन २००८ मध्ये कमी दाबाने विद्युत पुरवठा झाला हे दर्शविण्यासाठी तक्रारदार यांनी इतर कोणताही अन्य कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. प्रस्तुत प्रकरणामध्ये सन २००८ सालातील वस्तुस्थिती ठरविण्याची असल्याने सदरची शपथपत्रे तक्रारदारांच्या तक्रारअर्जाच्या शाबीतीसाठी पुरेशी नाहीत असेही या मंचाचे मत आहे.
तक्रारदार यांनी आपल्या तक्रारअर्जामध्ये प्रमुख एकच मागणी केली आहे ती म्हणजे सन २००८-०९ सालामध्ये द्राक्ष पिकाचे झालेले नुकसान रक्कम रु.७,००,०००/- मिळावे व त्याअनुषंगाने इतर अन्य मागण्या केल्या आहेत. तक्रारदारतर्फे दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांचे द्राक्ष बागेचे रक्कम रु.७,००,०००/- इतक्या रकमेचे नुकसान झाले असे दाखविणारा कोणताही पुरावा तक्रारदार यांनी याकामी दाखल केलेला नाही त्यामुळे तक्रारदार यांचे रक्कम रु.७,००,०००/- इतक्या रकमेचे नुकसान झाले ही बाब तक्रारदार यांनी पुराव्यानिशी शाबीत केली नसल्याने त्याही कारणास्तव तक्रारदार हे मागणीप्रमाणे कोणताही अनुतोष मिळणेस पात्र नाहीत असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: ३/१/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११