न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांची मौजे यड्राव येथे शेतजमीन असून त्यामध्ये त्यांनी शेवगा, गहू, ज्वारी इ. पिके घेतली होती. सदरचे शेतजमीनीमध्ये वि.प. विद्युत कंपनीचे वीज कनेक्शन आहे. तक्रारदार यांचे शेतजमीनीचे बांधावर वि.प. कंपनीचे थ्री फेज कनेक्शनची विद्युत वाहिनी व खांब पोल आहे. दि. 1/3/17 रोजी तक्रारदार यांच्या शेतजमीनीच्या बांधावर वि.प. यांच्या विद्युत वाहिनीमध्ये शॉट सर्किट झाल्यामुळे ठिणग्या पडून आग लागली. त्यामध्ये तक्रारदाराचे शेतजमीनीमध्ये असलेली शेवग्याची झाडे, गहू, ज्वारीचे पीक, दोन आंब्याची झाडे, पी.व्ही.सी. पाईप 16 नग, सुकी लाकडे जळून गेली आहेत. तक्रारदार यांनी सदर घटनेची माहिती तात्काळ गावकामगार तलाठी यड्राव यांना तसेच वि.प. यांना दिली. तलाठी यांनी दि. 2/3/17 रोजी पंचनामा केला. सदर पंचनाम्यात तलाठी यांनी तक्रारदार यांचे रु.1,80,000/- इतके नुकसान झाले असे नमूद केले आहे. तदनंतर तक्रारदार यांनी दि. 2/3/17 रोजी वि.प.क्र.3 यांचे कंपनीकडे रितसर नुकसान भरपाई अर्ज करुन नुकसान भरपाई मागितली. तदनंतर तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे चौकशी केलेनंतर दि. 8/6/17 रोजी विद्युत निरिक्षक, कोल्हापूर यांनी रितसर नुकसान भरपाई देणेबाबत अभिप्राय वि.प.क्र.3 यांचेकडे सादर केल्याचे समजले. सदर अभिप्रायामध्ये विद्युत निरिक्षक यांनी सदरची सदरची जळीताची घटना वि.प. यांचे चुकीमुळे झालेचे मान्य करुन तक्रारदार यांना नुकसान भरपाई देणेबाबत वि.प.क्र.3 यांना कळविले होते. तदनंतर तक्रारदार यांनी वि.प. यांचे मागणीप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली. परंतु वि.प.क्र.3 हे तक्रारदार यांना नुकसान भरपाई देणेस टाळाटाळ करीत असल्याचे तक्रारदाराचे लक्षात आले. म्हणून त्यांनी वि.प. यांना वकीलामार्फत दि. 27/7/17 रोजी नोटीस पाठविली. परंतु सदर नोटीसीस उत्तर देताना पुन्हा वि.प. यांनी तक्रारदारांकडून कागदपत्रांची मागणी केली. त्यामुळे वि.प. यांना नुकसान भरपाई देणेची नाही हे तक्रारदारांचे लक्षात आले म्हणून त्यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदार यांचे जळीतामध्ये झालेली नुकसान भरपाईची रक्कम रु.1,80,000/-, नोटीस फीचा खर्च रु.3,000/- मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व प्रवास खर्चापोटी रु. 5,000/- अशी एकूण रक्कम रु.2,38,000/- व सदर रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे होणारे व्याज अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेल्या नोटीसच्या प्रती व त्याच्या पोचपावत्या, वि.प.क्र.3 यांनी दिलेले उत्तर, जळीताचा पंचनामा, विद्युत निरिक्षक, कोल्हापूर यांचा अहवाल इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने मिळकतीमधील लाईट बिल, मिळकतीचे खरेदीपत्र, 7/12 उतारा, तक्रारदारांनी वि.प.कडे सादर केलेा अर्ज, पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्हणणे दाखल केले आहे. वि.प. यांचे कथनानुसार, तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी पिकांच्या बियाणाबद्दल पावत्या दाखल केलेल्या नाहीत. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये ग्राहक क्रमांक नमूद केलेला नाही. त्यामुळे ते ग्राहक होवू शकत नाहीत. निव्वळ तक्रारदाराचे बांधावर वि.प. यांनी पोल उभा केला आहे यावरुन तक्रारदार हे वि.प. कंपनीचे ग्राहक होवू शकत नाहीत. वि.प. यांचे पोलवर शॉर्ट सर्किट होवून ठिणग्या पडल्या व आग लागली हा मजकूर खोटा आहे. तलाठी यांनी तक्रारदाराने दिलेल्या माहितीवरुन पंचनामा तयार केला आहे. आग लागली, त्यावेळी घटनास्थळी कोणीही प्रत्यक्ष हजर नव्हते. इलेक्ट्रीक वायरमधून ठिणग्या पडल्या व आग लागली याबाबत विद्युत निरिक्षक यांचे अहवालात कोणताही उल्लेख नाही. तक्रारदारांनी याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली नाही. त्यामुळे घटनास्थळाचा पंचनामा तयार झालेला नाहीत. सदर पोलवरुन नेलेल्या वीज वाहक तारांची व पोलचे खालील जमीनीवर उगवलेले गवत वेळोवेळी काढून देखभाल केली जाते. या तारांचे जवळ कोणतीही झाडे नाहीत. तक्रारदाराचे शेतामध्ये अन्य कोणत्या तरी कारणाने आग लागली असण्याची शक्यता आहे. आग विझवणेकरिता तक्रारदारांनी कोणते प्रयत्न केले याचा उल्लेख तक्रारदाराने केलेला नाही. आग विझवणेकरिता तक्रारदाराने इचलकरंजी नगरपालिकेकडे फोन करुन अग्निशामक गाडी मागवणे आवश्यक होते परंतु तसा प्रयत्न केलेला नाही. तक्रारदाराचे शेतातील कोणत्याही झाडाची फांदी वि.प. कंपनीचे तारांना स्पर्श करीत नाही. त्यामुळे विद्युत निरिक्षक यांनी झाडाच्या फांदया वा-याने वायरला थडकून स्पार्कींग झालेबाबतचा दिलेला अभिप्राय हा संशय निर्माण करणारा आहे. वि.प. यांनी तक्रारदारांकडे कागदपत्रांची मागणी केली होती परंतु तक्रारदारांनी याबाबत पूर्तता केली नाही. सबब, तक्रारअर्ज खर्चासह रद्द करावा व वि.प. यांना नाहक पक्षकार करुन मानसिक त्रास दिलेबद्दल तक्रारदाराकडून रु.5,000/- कॉम्पेन्सेटरी कॉस्ट देवविणेत यावी अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.
4. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प. यांचे म्हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
5. प्रस्तुतकामी तक्रारदार यांची मौजे यड्राव येथील गट नं. 14, याचे क्षेत्र हे 1.13 आर, पो.ख.हे 0.04 आर असे एकूण हे 1.17 आर, आकार रु.2,75 पैसेची शेतजमीन आहे. सदर शेतजमीनीमध्ये तक्रारदार यांनी शेवगा, गहू, ज्वारी, इ. पिके घेतली होती. तक्रारदार हे वि.प. कंपनीकडून लाईट घेवून त्याचा नियमित उपभोग घेवून त्याची बिले भरतात. तक्रारदार यांचे शेतजमीनीचे बांधावर वि.प. कंपनीची थ्री फेज कनेक्शनची विद्युत वाहिनी व खांब पोल आहे. तथापि वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदार यांनी वि.प. कंपनीचे लाईट कनेक्शन घेतले आहे. परंतु त्यांचा ग्राहक क्रमांक याकामी नमूद नाही. निव्वळ तक्रारदाराचे बांधावर वि.प. कंपनीने पोल उभा केला आहे यावरुन तक्रारदार हे वि.प. चे ग्राहक होवू शकत नाहीत. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. त्याअनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी कागदयादीसोबत सदर वाद मिळकतीचे सप्टेंबर 2017 चे लाईट बिलाची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. सदर लाईट बिलावर दयानंद चव्हाण यांचे नांव नमूद आहे. तसेच सदर वादमिळकतीचे ता. 9/10/2007 रोजीचे खरेदीपत्र दाखल केले आहे. सदर खरेदीपत्राचे अवलोकन केले असता, सदर मिळकत ही तक्रारदार यांनी दयानंद चव्हाण यांचेकडून खरेदी केलेचे दिसून येते. तसेच तक्रारदार यांनी सदर मिळकतीचा 7/12 उतारा दाखल केलेला असून त्यावर तक्रारदारांचे नांव नमूद आहे. तक्रारदार यांनी त्यांचे लेखी युक्तिवादामध्ये दयानंद चव्हाण यांनी तक्रारदार यांना त्यांचे नावे असलेले लाईट कनेक्शन वापरण्यास संमती दिलेली आहे. त्या कारणाने तक्रारदार हे सदर जमीन विकत घेतलेपासून सदर जमीनीमध्ये वि.प. कंपनीची लाईट वापरत आहे व उपभोगत आहेत असे कथन केले आहे. दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदार वि.प. यांचेकडे लाईट बिले नियमितपणे भरत आहेत. त्या कारणाने वरील सर्व बाबींवरुन तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
6. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. ता. 1/3/2017 रोजी तक्रारदार यांचे शेतजमीनीच्या बांधावर असलेल्या वि.प.कंपनीचे थ्री फेज कनेक्शन विद्युत वाहिनीमध्ये शॉर्ट सर्कीट झाल्यामुळे ठिणग्या पडून आग लागली. सदर आगीमध्ये तक्रारदार यांनी शेतजमीनीमध्ये असलेली शेवग्याची झाडे, गहू, ज्वारीचे पिक, दोन आंब्याची झाडे, पीव्हीसी पाईप 16 नग जळून गेले. ता. 2/3/2017 रोजी जळीताचा रितसर पंचनामा करुन मा. तलाठी यांनी तक्रारदारांचे सदर पिकाचे नुकसान रु.1,80,000/- झालेचे नमूद केले. तक्रारदार यांनी ता.2/3/17 रोजी वि.प.क्र.3 यांचेकडे रितसर नुकसान भरपाई मागितली असता, ता. 18/3/17 रोजी वि.प.क्र.3 याने तक्रारदार यांचेकडून कागदपत्रांची मागणी केली. सबब, तक्रारदार यांनी मा. गावकामगार तलाठी, यड्राव यांचे पंचनामेप्रमाणे नुकसान भरपाई घेणेची तयारी दर्शवून देखील व तसे वेळोवेळी वि.प. यांना कळवून देखील वि.प.क्र.3 यांनी तक्रारदार यांस सदर नुकसान भरपाई देणेस टाळाटाळ केली. वि.प. यांनी तक्रारदार यांना सदर नुकसान भरपाई देणेस टाळाटाळ करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. त्या अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वि.प. यांना पाठविलेली नोटीसची प्रत व पोहोच पावत्या दाखल केलेल्या आहेत. ता. 5/8/17 रोजी वि.प.क्र.3 यांनी सदर नोटीसीस दिलेले उत्तर दाखल केलेले आहे. सदर नोटीसीचे अवलोकन केले असता, सदर नोटीसीने वि.प. यांनी तक्रारदार यांना कागदपत्रांची पूर्तता करणेसाठी सांगितलेले आहे. पिकांचे झालेले नुकसान व भरपाईची रक्कम पी.व्ही.सी. पाईप यांची संख्या व किंमतीच्या होणारी रकमेची मागणी केलेली आहे. पोलीस पंचनाम्याची प्रतीची मागणी केली आहे. 7/12 उता-याचे नोंदीची व चालू वर्षातील उत्पन्न व झालेले नुकसान याचा तपशीलवार विचार केलेवर तालुका कृषी अधिकारी याचा दाखला सादर करावा असे सांगितले आहे. तथापि वि.प. यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये सदर पोलवरुन नेलेल्या वीज वाहक तारांची तसेच त्यावर बसविलेल्या अन्य उपकरणांची व पोलचे खालील जमीनीवर उगवणारे गवत वेळोवेळी काढून देखभाल व दुरुस्ती केली जाते. या तारांचे जवळ कोणतीही झाडे नाहीत व जी झाडे आहेत, ती वीज वाहक तारांच्या उंचीपर्यत वाढलेली नाहीत. अशा परिस्थितीत ठिणगी पडली व ती खाली येवून झाडे जळाली व शेतात इतर जळीत होवून नुकसान झाले या तक्रारदाराच्या म्हणण्यात कसलाही सत्यांश नाही. तक्रारदाराचे शेतामध्ये अन्य कोणत्या तरी कारणावरुन आग लागली असण्याची शक्यता आहे. मात्र तक्रारदार आता त्याची जबाबदारी वि.प. कंपनीचे माथी मारण्याचा प्रयत्न करीत आहेत हे सर्वस्वी चुकीचे व बेकायदेशीर आहे. यावरुनही तक्रारदाराची तक्रार रद्द होणेस पात्र आहे आग विझवणेचा तक्रारदार यांनी प्रयत्न केलेचा उल्लेख केलेला नाही. तलाठी यांनी ता. 2/3/17 रोजीचा पंचनामा तक्रारदार यांचे सांगणेवरुन व दिलेल्या माहितीवरुन केला. आग लागली त्यावेळी घटनास्थळी व त्या ठिकाणी कोणीही हजर नव्हते असे कथन वि.प. यांनी लेखी म्हणणेमध्ये केले आहे. तथापि ता. 5/8/17 रोजी वि.प. यांनी तक्रारदार यांना पाठवलेल्या नोटीसीचे उत्तरामध्ये सदरची घटना वि.प. यांनी नाकारलेली नाही. सदरचे नोटीस उत्तरामध्ये वि.प. यांनी केवळ नुकसानीचे तपशीलाची मागणी केलेली दिसून येते.
7. प्रस्तुतकामी ता. 8/6/2017 रोजी एफ.एम.मुल्ला, विद्युत निरिक्षक, विद्युत निरिक्षण विभाग, कोल्हापूर यांनी कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.वि. कं.लि. इचलकरंजी विभाग, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यांना नुकसान भरपाई देणेबाबतचा अभिप्राय पाठविलेला आहे. सदर अभिप्रायाचे अवलोकन केले असता, ता. 1/3/17 रोजी गट क्र. 14 यड्राव येथील श्री गणेश शिवाजी गवळी यांच्या शेतावरील बांधावर वीज कंपनीच्या लघुदाब वाहिनीमध्ये स्पार्कींग झाल्यामुळे ठिणग्या पडून आग लागली. लघुदाब वाहिनीजवळ आंब्याची झाडे असल्याने झाडाच्या फांद्यांच्या हालचालीमुळे लघुदाब वाहिनीचे वाहक एकमेकांच्या संपर्कात आल्याने शॉर्टसर्कीट होवून बांधावरील सुक्या गवतावर ठिणगी पडली. सुक्या गवताने पेट घेतल्याने आग पसरत जावून श्री गणेश शिवाजी गवळी यांची शेवग्याची झाडे तसेच पीव्हीसी पाईप, सुकी लाकडे यांना आग लागली. सदरचा अपघात विद्युत कारणामुळे झालेला जळीत अपघात आहे. सदर अपघात म.रा.वि.वि. कंपनीच्या संचमांडणीवर घडला आहे. ज्याअर्थी सदर अपघात आपण उपरोक्त विद्युत संचमांडणीवर योग्य निगा, देखभाल व दुरुस्ती न केल्यामुळे घडल्याचे व त्यात केंद्रीय विद्युत प्राधीकरण (सुरक्षा व विद्युत पुरवठा संबंधीचे उपाय) विनियम 2010 मधील विनियम 46(5) याचे उल्लंघन झाले असल्याचे या कार्यालयाचे निदर्शनास आले आहे. सदरचे अभिप्रायावरुन वि.प. कंपनी यांचेमुळे तक्रारदारांचे मिळकतीमध्ये थ्री फेज कनेक्शनचे विद्युत वाहिनीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ठिणग्या पडून आग लागलेचे स्पष्टपणे दिसून येते. तथापि सदरचे अर्जामध्ये तक्रारदारांचे झालेल्या पिकाचे नुकसान वि.प. यांनी नाकारलेले आहे. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांनी ता. 2/3/2017 रोजी वि.प.क्र.3 यांना सादर केलेल्या अर्जाची प्रत दाखल केलेली आहे. सदरचे पत्रामध्ये भ्रमणध्वनीवरुन यड्राव येथील वीज कार्यालयास वेळोवेळी कळविले होते परंतु त्यांनी दुर्लक्ष केले असलेमुळे सदरचा प्रसंग घडून मोठे नुकसान झालेले असून नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. तसेच तक्रारदार यांनी सदर मिळकतीचा 7/12 उतारा दाखल केलेला आहे. सदर 7/12 उता-यावर इतर पिकासोबत शेवग्याचे झाडाची नोंद असलेचे दिसून येते. सदरचा 7/12 उतारा वि.प. यांनी नाकारलेला नाही. तक्रारदार याने ता. 2/3/2017 रोजी गावकामगार तलाठी यांनी केलेला जळीताचा पंचनामा दाखल केलेला आहे. सदर पंचनाम्यामध्ये सदर जळीतामध्ये ड्रीप, पी.व्ही.सी.पाईप, आंब्याची मोठी झाडे, लहान झाडे, गवत व शेवगा बाग इत्यादींचे आम्हा पंचानुमते रु.1,80,000/- चे नुकसान झालेचे निदर्शनास आले आहे असे नमूद असून त्यावर पंचाच्या सहया आहेत. तसेच गावकामगार तलाठी मौजे यड्राव ता. शिरोळ यांची सही आहे.
8. दाखल कागदपत्रांवरुन ता. 12/6/17 रोजी वि.प.क्र.3 यांनी मागणी केलेल्या कागदपत्रांप्रमाणे तक्रारदार यांनी पूर्तता केली. मात्र वि.प.क्र.3 ता. 13/6/17 रोजी तक्रारदार यांस पोलीस पंचनामा तसेच कृषी अधिकारी यांचा दाखला वगैरे कागदपत्रांची मागणी केली. त्यास ता. 21/6/17 रोजी तक्रारदार यांनी खुलासा केला आहे. वरील सर्व बाबींचा व कागदपत्रांचा बारकाईने विचार करता, ता. 8/6/17 रोजीचे विद्युत निरिक्षक यांचे अभिप्रायावरुन ता. 1/7/17 रोजी झालेली जळीताची घटना ही वि.प.क्र.1 यांचे विद्युत कनेक्शनचे झालेल्या स्पार्कींगमुळे झाली असलेचे स्पष्टपणे सिध्द होते. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना सदर विद्युत कनेक्शनचे स्पार्कींगमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम आजतागायत अदा न करुन त्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे ही बाब सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.3 व 4
9. उपरोक्त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता, वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी गावकामगार तलाठी यड्राव यांचा सदरचे जळीत घटनेचा पंचनामा दाखल केलेला आहे. सदरचा पंचनामा हा महसूल अधिका-यानेच केलेला आहे. केवळ पोलीस पंचनामा नाही या कारणास्तव सदरची घटना नाकारता येत नाही. तसेच तक्रारदार यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये सदर आगीमध्ये माझ्या शेतजमीनीतील शेवग्याची झाडे, गहू, ज्वारीचे पीके, दोन अंब्याची झाडे, पी.व्ही.सी. पाईप 16 नग, ड्रीप पाईप, सुकी लाकडे जळून गेलेली आहेत असे कथन केले आहे. सबब, मा. तलाठी यांचे रितसर पंचनाम्यानुसार तक्रारदार हे वि.प. कंपनी यांचेकडून सदरचे जळीत घटनेच्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.1,80,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच मानसिक त्रासापोटी रु.8,000/- व अर्जाचे खर्चपोटी रु.3,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सबब, मुद्दा क्र.3 व 4 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
- आ दे श -
- तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. क्र.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना नुकसान भरपाईची रक्कम रु. 1,80,000/- अदा करावी. सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 26/10/17 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- वि.प. क्र.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.8,000/- (रक्कम रुपये आठ हजार मात्र) व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (रक्कम रुपये तीन हजार मात्र) अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. क्र.1 ते 3 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.