जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक 397/2014 तक्रार दाखल करणेत आलेची तारीखः- 21/08/2014.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-10/08/2015.
श्री.विलास माधव नेमाडे,
उ.व.सज्ञान, धंदाः शेती,
रा.माधवाश्रय गायत्री शक्तीपीठ रोड,भुसावळ. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि.कंपनी विभागीय कार्यालय, सावदा,
ता.रावेर.
2. सहायक अभियंता,
म.रा.वि.वि.कंपनी, उपविभागीय कार्यालय,यावल,
ता.यावल,जि.जळगांव. ......... सामनेवाला.
कोरम-
श्री.विनायक रावजी लोंढे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार स्वतः
सामनेवाला तर्फे सौ.सरोज डी.लाठी वकील.
निकालपत्र
व्दारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्षः
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवली आहे म्हणुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणेः-
2. तक्रारदार यांनी त्यांचे शेतातील विहीरीवरील विद्युत मोटर चालविण्यासाठी सामनेवाला यांचेकडुन विद्युत प्रवाह घेतला होता. तक्रारदाराची शेत जमीन मौजे चिखली बु शिवारात आहे. तक्रारदाराने त्यांचे शेत गट क्रमांक 87 मध्ये शेती पंपाचे विज कनेक्शन घेतलेले आहे. तक्ररदाराचे सदरचे कनेक्शनचे बिलाबाबत तक्रार होती. तक्रारदार यांनी दि.18/3/2014 रोजी सामनेवाला क्र. 2 यांचेकडे तक्रार दाखल केली होती. सदरील तक्रारीचे कोणतेही निवारण केले नाही. तक्रारदार वापरत असलेले विज कनेक्शन हे त्याचे वडीलांचे नांवे होते. तक्रारदाराचे वडील हे मयत झाले. त्यांचे मृत्युनंतर विज कनेक्शनच्या नावात बदल करण्यासाठी व विज कनेक्शनचा लोड 3 अश्वशक्ती वरुन 12.5 अश्वशक्ती करण्याबाबत विनंती केली. तसेच मिटर पध्दतीने बिल मिळण्यासाठी अर्ज दिला. सदरील अर्ज माहे जानेवारी,2007 मध्ये दिला. तक्रारदार यांनी डिमांड नोटचा भरणा केला. सोबत टेस्ट रिपोर्ट दिला. सामनेवाला यांनी नावात बदल करुन कनेक्शनवर मिटर न बसवता फक्त कनेक्शनचा लोड वाढविला व त्यानुसार तक्रारदारास बिले देण्यास सुरुवात केली. आजपावेतो तक्रारदार ती बिले भरत आहेत. सामनेवाला यांनी दि.7/2/2007 पासुन तक्रारदाराकडुन जादा पैसे लुबाडले आहेत. तक्रारदाराचा पाणी वापर कमी आहे. मिटर पध्दतीने बिल मिळावे म्हणणे तक्रारदाराने अर्ज दिला परंतु त्याप्रमाणे बिल दिले नाही. सबब तक्रारदारास सदरील अर्ज दाखल करावा लागला आहे. सामनेवाला हे दि.1/7/2007 पासुन मार्च,2014 पावेतो प्रती आठवडा रक्कम रु.100/- प्रमाणे नुकसान भरपाई देणे लागतात. तसेच चुकीचे बिले देऊन जास्त पैसे तक्रारदाराकडुन घेतले आहेत. सबब तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडुन रु.2,23,260/- नुकसान भरपाई मिळावी व त्यावरील व्याज मिळावे अशी विनंती केली आहे.
3. सामनेवाला क्र. 1 व 2 हे या मंचासमोर हजर झाले व त्यांनी लेखी खुलासा सादर केला. सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या तक्रारीतील सर्व कथने नाकारलेली आहेत. सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदार यांनी कोणताही विरोध न नोंदविता नमुद विद्युत देयके भरलेली आहेत. सबब तक्रारदाराचे बिलाबाबत कोणतीही तक्रार नव्हती. तक्रारदार यांनी सन 2007 पासुन ते डिसेंबर,2013 पर्यंत विज बिल भरले नाही. सदरील बिलाबबत कोणतीही तक्रार केली नाही म्हणुन सदरील तक्रार मुदतबाहय आहे. सामनेवाला यांचे कथन की, प्रचलीत कायदयाप्रमाणे डिमांड नोट घेतांना प्रत्येक ग्राहकाकडुन विज मिटरची रक्कम घेतली जाते त्याप्रमाणे तक्रारदाराकडुन रक्कम घेण्यात आली. सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदार यांनी डिमांड नोट भरल्यानंतर विज भार वाढवण्याकरिता लागणारी कागदपत्रे सादर केल्याने तात्काळ विज भार वाढविण्यात आला. त्याप्रमाणे विज बिले देण्यात आली परंतु नावात बदल करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे तक्रारदाराने आणुन दिली नाहीत त्यामुळे बदल करणे शक्य झाले नाही. सामनेवाला यांनी पुढे असे कथन केलेले आहे की, तक्रारदार हे महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीत उपकार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत होते. सावदा विभागात त्यांचे नियुक्ती होती. माहे जानेवारी,2014 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कार्यवाहीत ते सापडले व त्यांना सेवेतुन निलंबीत करण्यात आले. त्याचा राग येऊन सदरील तक्रार दाखल केली आहे तसेच तक्रारदारास संपुर्ण माहिती असतांनाही त्यांनी कागदपत्रांची पुर्तता केली नाही. कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर सामनेवाला यांनी नावात बदल करुन दिला आहे व विज बिल तक्रारदाराचे नांवे दिलेली आहेत. तक्रारदाराने विज मिटर रिडींग प्रमाणे विज बिले मिळावी ही मागणी कधीही केलेली नाही. सहा वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर सदरील वाद उपस्थित करीत आहेत. तक्रारदार हे स्वतः दोषी आहेत. सबब तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात यावी.
4. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचे खुलाश्यावर प्रतिउत्तर दिले आहे. तक्रारदाराने पैसे भरुन सामनेवाला यांचेकडुन सेवा मागीतली होती व ते पैसे सामनेवाला यांनी स्विकारले आहेत. सेवा देण्यासाठीचे दायित्व सामनेवाला यांचेवर आहे. तक्रारदाराने कोणत्याही कागदपत्रांची पुर्तता न करताही सामनेवाला यांनी मार्च,2014 मध्ये नावात बदल करुन दिला आहे तसेच मिटर लावलेले आहे त्याप्रमाणे विज बिले देत आहेत. तक्रारदाराकडुन जास्त पैसे उकळण्याचे दृष्टीने सदरील कृती केलेली आहे.
5. तक्रारदार यांनी तक्रारीसोबत फॉर्म क्र.33 ची झेराक्स प्रत, पैसे भरल्याच्या पावत्या, तसेच दि.18/3/2014 ची नोटीस, विद्युत देयक हजर केलेले आहे. तक्रारदार यांनी स्वतःचे पुराव्याचे शपथपत्र दिलेले नाही. सामनेवाला यांनी योगेश भंगाळे, सक्षम अधिका-याचे पुराव्याचे शपथपत्र दिलेले आहे. तक्रारदार व त्यांचे वकीलांचा युक्तीवादाचे वेळेस गैरहजर राहीले. सामनेवाला यांचे वकील हजर त्यांचा युक्तीवाद ऐकला. न्याय-निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत
त्रृटी ठेवलेली आहे काय ? नाही.
2) तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत
, काय ? नाही.
3) कोणता आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसाः
मुद्या क्र. 1 ते 3 ः
6. सामनेवाला यांचे वकील सौ.लाठी यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडे उपअभियंता या पदावर कार्यरत होते. लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने त्यांना पकडले त्यामुळे त्यांना सेवेतुन निलंबीत करण्यात आले. सदरील बाब जानेवारी,2014 मध्ये घडली त्यानंतर तक्रारदार यांनी सदरील तक्रार दाखल केली व वाद उपस्थित केला आहे. तक्रारदार हे सन 2007 पासुन नियमित विद्युत देयके भरत आलेले आहेत त्यांनी मिटर बसवणेबाबत अगर नाव कमी करण्याबाबत कधीही तक्रार केली नाही. विद्युत देयका प्रमाणे नियमित विद्युत देयके भरलेली आहेत. तक्रारदाराने कागदपत्रांची पुर्तता न केल्यामुळे विद्युत मिटर देता आले नाही तसेच नावात बदलही करुन देता आला नाही. तक्रारदाराने मुळ दस्तऐवज या मंचाचे समोर दाखल केले नाहीत तसेच पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले नाही. तक्रारदाराने विनाहरकत माहे डिसेंबर,2007 पासुन विद्युत देयके भरलेली आहेत त्यामुळे तक्रारदार यांना सदरील विद्युत बिलांबाबत वाद उपस्थित करता येणार नाही. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदाराचे बिलावरील नांव बदलुन दिले व विद्युत मिटर बसवुन दिले आहे त्यामुळे तक्रारदाराची तक्रार रद्य होण्यास पात्र आहे.
7. वरील नमुद केलेला युक्तीवाद लक्षात घेतला व तक्रारदाराच्या तक्रारीतील कथने व दस्त ऐवजांचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी दि.7/2/2007 रोजी मिटर बदलुन देणेकामी व नावात बदल करुन मिळणेकामी रक्कम रु.4,735/- भरल्याचे निर्दशनास येते. सदरील रक्कम भरल्यानंतर तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे रितसर अर्ज दिला होता व कागदपत्रांची पुर्तता केली होती याबाबत पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी अर्ज दिला आहे त्याबाबत कोणताही पुरावा उपलब्ध नाही. तक्रारदार यांनी सन 2014 मध्ये म्हणजेच सामनेवाला यांचे कथनानुसार तक्रारदारास निलंबीत केल्यानंतर सदरील नाव बदल करण्याबाबत व मिटर बसविण्याबाबत तक्रारदाराने वाद उपस्थित केलेला आहे. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे जी नोटीस पाठविली आहे त्या नोटीसीनुसार सामनेवाला यांनी तक्रारदारास नावात बदल करुन दिला आहे व मिटर बसवुन दिला आहे. सन 2007 पासुन तक्रारदार हे कोणतीही तक्रार न करता विद्युत देयक सतत भरत आहेत त्यामुळे तक्रारदाराचे वर्तणुकीवरुन त्यांना आता सदरील वाद उपस्थित करण्याचे अधिकार नाही असे या मंचाचे मत आहे. यास्तव मुद्या क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन आम्ही मुद्या क्र. 3 चे निष्कर्षास्तव खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदाराची तक्रार रद्य करण्यात येते.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
ज ळ गा व
दिनांकः- 10/08/2015. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विनायक रा.लोंढे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.