जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 180/2010 तक्रार दाखल तारीख- 10/12/2010
1. श्रीमती. इनायतून्नीसा बेगम भ्र. महंमद मुसा,
वय – 82 वर्षे, व्यवसाय – घरकाम
रा.बलभीम चौक, खंदक,बीड ता.जि.बीड
2. अब्दुल खालेक महंमद मुसा,
वय – 60 वर्ष, धंदा – व्यापार, वरील प्रमाणे ....... तक्रारदार
विरुध्द
उपकार्यकारी अभियंता,
शहर उप-विभाग,बीड,
महाराष्ट राज्य विद्युत वितरण कंपनी लि;
(महावितरण) कार्यालय, माळीवेस, बीड ता.जि.बीड ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – के.आर.टेकवाणी,
सामनेवालेतर्फे – वकील – ए.एस.पाटील,
।। निकालपत्र ।।
( घोषितद्वारा अजय भोसरेकर, सदस्य)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे बीड येथील रहिवाशी असुन तक्रारदाराने सर्व कागदपत्राची पूर्तता करुन कायदेशीर विद्युत कनेक्शन सामनेवाले यांचेकडून घेतले आहे. त्याचा ग्राहक क्रमांक 576010091003 असा आहे.
तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडे उपरोक्त क्रमांकाचे विज कनेक्शन चालू ठेवून उर्वरीत कनेक्शन बंद करण्या बाबत दि.11.7.2006 रोजी अर्ज दिला होता. त्यात त्यांनी कायमस्वरुपी विज पुरवठा बंद करावा असे म्हंटले आहे. तक्रारदाराने उपरोक्त कनेक्शन असलेले घर जुने झाल्यामुहे ते बांधकाम करावयाचे असल्या कारणाने डिसेंबर,2007 मध्ये उपरोक्त ग्राहक क्रमांकाचे कनेक्शनचा विज पुरवठा तात्पूर्ता स्वरुपात बंद करण्या बाबत कळविले. सदर कनेक्शन 25 डिसेंबर,2008 रोजी परत पूर्ववत चालू करुन घेतले. सामनेवाले यांचे भरारी पथकाने दि.21.1.2010 रोजी अचानक भेट देवून ग्राहक क्रमांक 576010091003 याची तपासणी केली. सदर जुने मिटर काढून नवीन इलेक्ट्रॉनिक मिटर बसविले याबाबतचा कोणताचही पंचनामा आणि कागदपत्रे तक्रारदारास आजपर्यन्त दिले नाहीत, असे म्हंटले आहे. तक्रारदाराने दि.20.1.2010 पासुन आजपर्यन्त विज देयके दिली गेली नाहीत असा अर्ज सामनेवाले यांचेकडे दि.24.11.2010 रोजी दिला आहे.
सामनेवाले यांनी दि.23.11.2010 रोजी उपरोक्त ग्राहक क्रमांकाचा स्थळपंचनामा केला असता त्यांवार त्यांनी तक्रारदाराचा वापर हा 4 बल्प, 3 फॅन, 1 कुलर, 1 टीव्ही, 1 फ्रिज एवढा असल्या बाबत म्हंटले आहे. दिनांक 10 डिसेंबर,2010 रोजी ग्राहक क्रं.576010091003 या नंबरचा ग्राहक नावाने एक बील रक्कम रु.1,51,591/- चे देवू केले. त्यावर अन्य तीन ग्राहक क्रमांक लिहून फेब्रुवारी,10 ते नोव्हेंबर,10 थकबाकी दाखवण्यात आली होती. त्यात ग्राहक क्रमांक अनुक्रमे 576010087022, 576010002086, 576010088185 अशा मिटरचे एकुण 4 विद्युत देयकाची एकत्रीत बील तक्रारदारास दिले. असे बील देवून सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करुन सेवेत कसूरी केली असे म्हंटले आहे. सामनेवाले यांनी दि.25 डिसेंबर,2010 रोजी तक्रारदारास विज कायदा 2003 चे कलम 56/1 नुसार ग्राहक क्रमांक 576010091003 यावर रक्कम रु.1,51,529/- पंधरा दिवसात भरणा न केल्यास विज पुरवठा खंडीत करण्याची नोटीस दिली. तसचे दि.25.11.2010 रोजी सविस्तर प्रत्येक ग्राहक क्रमांकानुसार देणे असणारी अशी नोटीस सामनेवाले यांनी तक्रारदारास दिली.
तक्रारदाराने सदर प्रकरणात अंतरिम आदेशाची मागणी केली होती. त्यानुसार न्यायमंचाने तक्रारदारास वादातीत बीला पोटी रक्कम रु.30,000/- भरणा करावा व सामनेवाले यांचे लेखी खुलासा येईपर्यन्त तक्रारदाराचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये असा आदेश पारीत केला. अंतरिम आदेशाप्रमाणे तक्रारदाराने दि.13.12.2010 रोजी सामनेवाले यांचेकडे रक्कम रु.30,000/- भरणा केली.
सामनेवाले यांनी आपले लेखी म्हणणे दि.11.2.2011 रोजी दाखल केले असुन तक्रारदार हा त्यांचा ग्राहक आहे हे त्यांना मान्य आहे. परंतु तक्रारदाराची सर्व कनेक्शन चालू असल्यामुळे त्यावरील वापराप्रमाणे देयके दिली आहे ती बरोबर असुन त्यात आम्ही कोणत्याही प्रकारच्या सेवेत त्रूटी केली नाही व अशा प्राप्त परिस्थितीत सदर प्रकरण या न्यायमंचास चालविता येणार नाही असे म्हंटले असून तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी असे म्हंटले आहे.
सामनेवाले यांनी आपले लेखी म्हण्याचे पुष्ठयार्थ एकुण 08 कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रारदाराची तक्रार, सोबतची कागदपत्रे सामनेवाले यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, दोघांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर त्याचे बारकाईने आवलोकन केले असता,
तक्रारदाराने दि.11.7.2006 रोजी ग्राहक क्रं.576010091003 हे सोडून उर्वरीत विज कनेक्शन कायमस्वरुपी बंद करण्याचा अर्ज केला आहे तो सामनेवाले यांना मान्य आहे. सामनेवाले यांनी दाखल केलेली पत्रे दि.9.4.2008, 18.12.2008, 23.08.2009, व 9.3.2010 यांचे बारकाईने अवलोकन केले असता उपरोक्त चारही तक्रारदाराचे विद्युत कनेक्शन कायमस्वरुपी बंद केल्याचे म्हंटले आहे. सामनेवाले यांनी दाखल केलेली तक्रारदाराची सीपीएल यांचे आवलोकन केले असता ते तक्रारदाराने दाखल पत्र दि.11.7.2006 , यापूर्वीचे बंदचे रेकॉर्ड याबाबत आढळून येत नाही आणि तक्रारदाराने या तारेखस अर्ज देवून कायमस्वरुपी विज पुरवठा खंडीत करण्याचे कळविले असताना सुध्दा सामनेवाले यांनी सदर विज पुरवठा खंडीत न केल्या बाबचा पुरवा स्वत: दाखल केला आहे. तसेच तक्रारदाराने त्याचे नावावरील एक कनेक्शन दुस-या ग्राहकाकडे वापरात होते याबाबतचा योग्य पुरावा व संबंधीत विज वापरत असलेल्या ग्राहकाचे शपथपत्र या न्यायमंचात दाखल केले आहे. यावरुन हे सिध्द होते की, सामनेवाले यांनी तक्रारदारास अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करुन द्यावयाचे सेवेत कसूरी केली आहे हे सिध्द होते.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, सामनेवाले यांनी तक्रारदारास दि.10.12.2010 रोजी ग्राहक क्रमांक.576010091003 यावर रक्कम रु.1,51,529/- चे दिलेले विज बील रद्द करण्यात येते.
3. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदाराने अंतिम निकालाचे अधिन राहून अंतरीत आदेशात सामनेवाले यांचेकडे भरणा केलेली रक्कम रु.30,000/- ( अक्षरी तीस हजार रुपये फक्त) आदेश मिळाले पासुन 30 दिवसाचे आत तक्रारदारास परत करावी.
4. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्रमांक 3 चे पालन मुदतीत न केल्यास सदर रक्कमेवर दि.13.12.10 पासुन तक्रारदाराचे पदरीपडेपर्यन्त द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
5. सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/-(अक्षरी रुपये तीन हजार फक्त) व दाव्याचा खर्चापोटी रक्कम रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) आदेश मिळाल्या पासुन 30 दिवसाचे आत अदा करावी.
6. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावीत.
( अजय भोसरेकर ) ( पी. बी. भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड