नि. 28
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्या - सौ मनिषा कुलकर्णी
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 148/2012
तक्रार नोंद तारीख : 24/09/2012
तक्रार दाखल तारीख : 21/03/2013
निकाल तारीख : 05/01/2016
1. श्रीमती शांताबाई दगडू मंडले
2. श्रीमती सुनिता उमाजी मंडले
3. कु.कोमल उमाजी मंडले
4. कु.राधिका उमाजी मंडले
5. चि.रोहित उमाजी मंडले
तक्रारदार क्र.3 त 5 करिता अ.पा.क. म्हणून
तक्रारदार क्र.2 श्रीमती सुनिता उमाजी मंडले
सर्व रा. मु.पो. करगणी ता.आटपाडी जि. सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. मुंबई
शाखा विटा नगरपालिका इमारत
सं. व सु. विभाग विटा 415 311
तर्फे कार्यकारी अभियंता,
श्री पोपट लक्ष्मण चव्हाण ....... जाबदार
तक्रारदार तर्फे - अॅड श्री एम.एन. शेटे
जाबदार तर्फे – अॅड श्री यू.जे.चिप्रे
- नि का ल प त्र -
द्वारा : मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार, तक्रारदारांनी जाबदार विद्युत वितरण कंपनीने कथितरित्या दिलेल्या दूषित सेवेबद्दल दाखल केली असून मयत उमाजी दगडू मंडले याच्या दि.26/9/10 रोजी झालेल्या अपघाती मृत्यूबद्दल, त्यांचे वारस म्हणून रु.15 लाखची नुकसान भरपाई व पुत्र, पती व पितृसुखापासून वंचित राहिलेबद्दल नुकसान भरपाई म्हणून रु.2 लाख, मानसिक त्रासापोटी व जाबदारांनी ठरवून दिलेले बंधनकारक कर्तव्य केले नाही म्हणून नुकसान भरपाई रु.1 लाख व तक्रारअर्जाचा खर्च रु.5,000/- ची मागणी जाबदारकडून केली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार क्र.1 या मयत उमाजी दगडू मंडले यांच्या आई तर तक्रारदार क्र.2 ही मयताची पत्नी व तक्रारदार क्र.3 ते 5 ही त्यांची मुले आहेत. जाबदार कंपनी ही विद्युत निर्मिती करुन ग्राहकांना विद्युत पुरवठा करणारी व सेवा देणारी कंपनी आहे. विद्युत पुरवठा करणा-या सामुग्रीचे व्यवस्थापन, देखभाल व दुरुस्ती करणे इ. जाबदारची कर्तव्ये आहेत. मयत उमाजी दगडू मंडले हे एका ट्रकमध्ये बसून त्या ट्रकमध्ये विटा भरण्याकरिता करगणी-खरसुंडी रस्त्याने खरसुंडीकडे जात असताना बाळेवाडी या गावानजीक असलेल्या कुरण नावाच्या शिवारालगत रस्त्यावर 11 केव्हीच्या मुख्य वाहिनीच्या तारा “U” आकाराप्रमाणे खाली आल्या होत्या व त्यात मयताची मान अडकून ती कापली जावून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तक्रारदार हा शेतकरी असून त्याला मौजे करगणी तालुका आटपाडी येथे 0 हे 21 आर इतकी जमीन होती व त्यासोबत तो हमालीचे देखील काम करीत होता व त्यास त्याला दररोज रु.300 इतकी हमाली मिळत होती.
3. तक्रारदाराचे असे कथन आहे की, सदर रस्त्यावर आडव्या येणा-या विद्युत वहन करणा-या वायर्स “U” आकाराप्रमाणे लोंबकळत असतानाही आणि सरकारी रस्ता हा डांबरीकरण होताना मुरुमाने, काळया खडीने व डांबरीकरण होवून रस्त्याची उंची वाढली असतानाही, तसेच ऊस भरुन जाणारे ट्रॅक्टर्स, व इतर अवजड वाहने सदरचे वायरला थटत असतानाही, तोंडी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करुन, हलगर्जीपणा करुन, त्या विद्युत वहन करणा-या तारा लोंबकळत ठेवून जाबदार हे मयत उमाजी दगडू मंडले यांच्या मृत्यूस कारणीभूत झालेले आहे व त्यांनी कर्तव्यच्युती करुन गंभीर स्वरुपाची सदोष सेवा दिली आहे. मयत उमाजी दगडू मंडले हा जाबदारांचा potential user आहे. तक्रारदारांनी मयताचे मृत्यूकरिता नुकसान भरपाई मिळण्याकरिता ऑक्टोबर 2010 मध्ये जाबदारकडे अर्ज दाखल केला होता. परंतु मयत उमाजी दगडू मंडले याचे अपघाती निधन झाल्यानंतर कसल्याही स्वरुपाची आर्थिक मदत जाबदारांनी तक्रारदारांना दिलेली नाही. तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक आहेत व तक्रारदार क्र.2 हे तक्रारदार क्र.1 व तक्रारदार क्र.3 ते 5 यांना कसेतरी अर्धपोटी सांभाळ करीत आहेत. त्यांना जबर मानसिक धक्का बसलेला आहे. तक्रारदार क्र.2 यांना तक्रारदार क्र.3 ते 5 यांना प्राथमिक शिक्षण देणेदेखील अवघड झाले आहे. विद्युत निरिक्षक, निरिक्षण विभाग, मिरज यांनी चौकशी करुन जाबदारांची जबाबदारी निश्चित केली आहे. तरीदेखील जाबदारांनी नुकसान भरपाईची रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे व तक्रारदारावर अन्याय केला आहे. तक्रारदार सदर रकमेवर अपघाताचे तारखेपासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याज देण्यास जबाबदार आहेत. तक्रारदारांना कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. सर्व तक्रारदार मयताचे उत्पन्नावर अवलंबून होते. ते मयताचे प्रेमाला, उत्कर्षाला, भाग्याला व सहवासाला मुकले आहेत. अशा एकूण कथनांवरुन तक्रारदारांनी वर नमूद केलेप्रमाणे मागण्या या कामी केल्या आहेत.
4. आपल्या तक्रारअर्जातील कथनांच्या पुष्ठयर्थ तक्रारदाराने आपले शपथपत्र नि.2 ला दाखल केले असून नि.4 या फेरिस्तसोबत एकूण 15 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्याच्यामध्ये अपघाताचा वर्दी जबाब, पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, अपघाताच्या स्थळाचा हातनकाशा, जाबदार कंपनीचे पत्र, करगणी येथील शेतीचा 8अ चा उतारा, 7/12 उतारा, मयत उमाजी दगडू मंडले यांचा शाळा सोडल्याचा उतारा, तक्रारदार क्र.1 व 2 यांच्या आधार कार्डचा उतारा तसेच विद्युत निरिक्षक, निरिक्षण विभाग मिरज यांचा दि.14/3/11 च्या अहवालाची नक्कल यांचा समावेश आहे.
5. प्रस्तुत प्रकरणी जाबदार विद्युत वितरण कंपनी हजर होवून त्यांनी आपली लेखी कैफियत नि.14 ला दाखल करुन तक्रारदाराच्या संपूर्ण मागण्या व आरोप अमान्य केले आहे. जाबदार विद्युत वितरण कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे मयत उमाजी दगडू मंडले हा जाबदार विद्युत कंपनीचे ग्राहक नव्हता. त्यास जाबदार कंपनीने कोणताही विद्युत पुरवठा केलेला नव्हता किंवा मयताने तसा कोणताही मागणीचा अर्ज देखील दाखल केलेला नव्हता. कोणत्याही प्रकारची सेवा देण्यासाठी मयताकडून जाबदार कंपनीने सेवा शुल्क अथवा कोणताही आकार घेतलेला नव्हता किंवा मयताने दिलेली नव्हते. त्यामुळे मयत उमाजी दगडू मंडले हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होत नसल्याने त्याचे तथाकथित वारसांना अशा प्रकारची तक्रार या मंचासमोर दाखल करता येणार नाही व ती चालू शकत नाही. सबब, सदरबाबत मुद्दा काढून त्याचा निर्णय व्हावा अशी मागणी जाबदार कंपनीने केली आहे. तक्रारदारांनी अर्जासोबत दाखल केलेला वर्दी जबाब पाहिल्यास सदरची घटना मयताच्या आणि ज्या ट्रकमध्ये मयत बसला होता त्या ट्रकच्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाला होता ही बाब स्पष्ट होते. मयत हा माल ट्रक नं. एमएच 10-ए-9236 या मालट्रकच्या केबीनवर बसलेला होता. सदर मालट्रक रोडने बाळेवाडी बाजुकडे जात असताना सदर रस्त्यास छेद देवून जाणा-या वीज वाहक तारांना जोडलेल्या सपोर्टची तार केबीनवर बसवून प्रवास करणा-या इसमापैकी मयत उमाजी दगडू मंडले यांच्या गळयात सदर तार अडकली आणि त्यांना कापीव खोलवर जखमा होवून तो केबीनवरुन ट्रकच्या हौदयात खाली पडून त्याचा मृत्यू झालेचे दिसून येते. सदर ट्रकवर मयता व्यतिरिक्त आणखी 2 जण बसलेचे दिसून येते. सदरचा अपघात नजउद्दीन रसूल जमादार या ट्रक ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे, मालट्रक वेगाने चालविल्यामुळे व वीज वहन तारा खालून जात असतानाही योग्य ती खबरदारी न घेतल्याने, झाल्याचे निष्पन्न झाल्याने सदर ड्रायव्हरवर भा.दं.वि. च्या कलम 279, 304अ, मोटार अपघात कायदा कलम 184, 66(1)/192 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. त्यावरुन जाबदार कंपनीची कोणत्याही प्रकारची चूक नव्हती हे स्पष्टपणे दिसून येते. मयत हा ट्रकच्या केबीनवर बसून प्रवास करीत होता. तो कोणत्याही प्रकारे सदर ट्रकवर कामगार नसल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदारांना मोटार अपघात कायद्यातील तरतुदींनुसार नुकसान भरपाई मिळणार नाही, या सर्वांचा विचार करुनच कंपनीविरुध्द तक्रारदाराने खोटा अर्ज दाखल केला आहे. मयताचा मृत्यू शॉक बसून झालेला नाही ही बाब स्पष्ट होते. त्यामुळे कंपनीने तक्रारदारांना सदोष सेवा दिली हे म्हणणे खरे नाही. तक्रारदार हे ग्राहक कायद्याचा दुरुपयोग करीत असल्याचे स्पष्ट होते. मयत उमाजी दगडू मंडले खरसुंडीकडे ट्रकमध्ये वीटा भरणेकरिता जात होते हे म्हणणे खरे नाही. अपघाताचेवेळी ट्रकमध्ये मयत हा केवळ प्रवास करीत होता. करगणी-खरसुंडी रस्त्यावर बाळेवाडी नजीक कुरण या नावाच्या शिवारालगत रस्त्यावर 11 केव्हीची मुख्य वाहिनीच्या तारा “U” आकाराप्रमाणे खाली आल्या होत्या हे म्हणणे चुकीचे व खोटे आहे. रस्त्यास छेदून जाणा-या वीज वाहक तारा लोंबकळू नये म्हणून त्यांना “U” आकाराचे गार्डींग साठे तारांना बसविले जाते. त्या “U” आकाराच्या तारांमध्ये केबीनवर बसलेल्या तीन इसमांपैकी मयताचे गळयात सदरची तार अडकली. तक्रारदाराचे कथन की, सदरची वायर “U” आकाराप्रमाणे लोंबकळत असतानाही व सदर रस्त्याचे डांबरीकरण होत असताना मुरमाने, काळया खडीने व डांबरीकरण होवून रस्त्याची उंची वाढली असतानाही ऊस भरुन जाणारे ट्रक व इतर अवजड वाहने सदरचे वाहिनीस थटत असलेबाबत तोंडी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करुन जाबदार कंपनीने हलगर्जीपणा करुन “U” आकाराच्या विद्युत वहिनी तारा लोंबकळत ठेवल्या व त्यामुळे जाबदार कंपनी ही मयताचे मृत्यूस कारणाभूत झाली इ. तक्रारदाराची कथने अत्यंत चुकीची व लबाडीची व खोटी आहे. घटनेपूर्वी 5 वर्षात किंवा तत्पूर्वी केव्हाही वाहनांवरुन जाणा-या प्रवाशांशी तारेचा संपर्क झालेला नाही. डांबरणीकरण, खडीकरण, किंवा मुरुमीकरण अशा प्रकारे कोणत्याही गोष्टीमुळे रस्त्याची उंची वाढलेली नाही. आजही विद्युत खांबाची उंची, रस्ता व तारांमधील अंतर तितकेच आहे. यापूर्वी किंवा आजअखेर पर्यंत कोणीही व कधीही ऊस भरुन जाणारे ट्रक अथवा इतर अवजड वाहन तारांना तटलेले नाहीत किंवा त्याबाबत कोणीही तोंडी किंवा लेखी तक्रार केलेली नाही. जाबदारांनी ोणत्याही प्रकारची कर्तव्यचुती केलेली नाही व सदोष सेवा दलेली नाही. सबब, सदरचा अर्ज फेटाळणेस पात्र आहे व सदरचा अपघात ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे व मयत ट्रकच्या केबीनवर बसून व उभा राहून प्रवास करीत असलेने त्याच्या निष्काळजीपणमुळे झालेला असल्याने व मयताला शॉक लागून त्याचा मृत्यू झालेला नसल्याने कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देण्याची तरतूद नाही व देण्याची कारणही नाही. या व अशा कथनांवरुन जाबदार विद्युत कंपनीने तक्रारदाराच्या संपूर्ण मागण्या अमान्य केल्या आहेत.
6. आपल्या लेखी कैफियतीतील कथनांचे पुष्ठयर्थ जाबदार विद्युत वितरण कंपनीने लेखी कैफियतीच्या खालीच आपले कार्यकारी अभियंता श्री सिध्दार्थ राजाराम रसाळ यांचे शपथपत्र दाखल केले आहे.
7. प्रस्तुतचे प्रकरण पुराव्याला लागले असताना तक्रारदारांनी नि.16 या फेरिस्त सोबत घटनास्थळाचे एकूण 5 फोटो याकामी दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी नि.24 ला पुरसीस सादर करुन जे तक्रारअर्जासाबत शपथपत्र (नि.2) दाखल केले आहे, तेच आपले पुराव्याचे शपथपत्र समजावे असे नमूद करुन नि.25 ला पुरसीस सादर करुन आपला पुरावा थांबविलेला आहे. तद्वतच जाबदार विद्युत वितरण कंपनीने देखील नि.26 ला पुरसीस सादर करुन आपणास तोंडी पुरावा द्यावयाचा नाही असे नमूद करुन आपला पुरावा संपविलेला आहे. पुरावा संपल्यानंतर आम्ही उभय पक्षकारांचे विद्वान वकीलांचा मौखिक युक्तिवाददेखील ऐकून घेतला आहे.
8. प्रस्तुत प्रकरणात आमच्या निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हे ग्राहक होतात काय ? होय.
2. तक्रारदार नमूद करतात त्याप्रमाणे जाबदारांनी त्यास दूषित सेवा
दिली हे तक्रारदाराने सिध्द केले आहे काय ? नाही.
3. तक्रारदार मागणी करतात त्याप्रमाणे त्यास नुकसान भरपाई मिळण्याचा
अधिकार आहे काय ? उद्भवत नाही.
4. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
9. आमच्या वरील निष्कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
:- कारणे -:
मुद्दा क्र.1
10. प्रस्तुत प्रकरणामध्ये दि.26/9/10 ची घटना व त्यात झालेला मयत उमाजी दगडू मंडले यांचा मृत्यू आणि तक्रारदार हे मयताचे वारस असल्याबद्दलचे कथन, या उभयपक्षी मान्य असलेल्या बाबी आहेत. तथापि जाबदारचे कथन असे आहे की, मयत हा जाबदार विद्युत वितरण कंपनीचा ग्राहक नव्हता, त्याला कुठल्याही प्रकारचा विद्युत पुरवठा जाबदार कंपनीने केला नव्हता किंवा मयताने देखील त्याचेकडे विद्युत पुरवठा करणेबाबत कोणताही अर्ज दिलेला नव्हता किंवा त्याचेकडून विद्युत पुरवठा करण्याकरिता आवश्यक असलेल्या काही रकमादेखील जाबदार कंपनीने भरुन घेतलेल्या नव्हत्या. त्यामुळे मयत हा विद्युत वितरण कंपनीचा ग्राहक नव्हता आणि सबब, तक्रारदार देखील जाबदार विद्युत कंपनीचे ग्राहक होत नाहीत. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार ही या मंचापुढे चालण्यास कायद्याने पात्र नाही. जाबदार विद्युत वितरण कंपनी याकामी हजर झालेनंतर त्यांनी नि.12 ला प्रस्तुतची तक्रार कायद्याने चालू शकते का ? आणि तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याखाली ग्राहक होवू शकतात का ? याबद्दलचा मुद्दा प्राथमिक मुद्दा म्हणून काढावा आणि त्याचेवर निर्णय द्यावा असा अर्ज दाखल केला होता. तथापि पॅनकार्ड क्लब्ज लि. विरुध्द चंदा सुनिल सावंत या रिव्हीजन पिटीशन नं. 90/09 मधील दि.3/07/09 च्या आपल्या राज्य आयोगाच्या निकालाअन्वये सदरच्या बाबीवर प्राथमिक मुद्दा काढून ते निर्णीत करण्यापेक्षा, सदरचा मुद्दा अंतिम निकालाचे वेळी विचारात घेण्यात यावा असा आदेश मंचाने दि.23/7/13 रोजी पारीत केला व त्याही कारणास्तव वर नमूद मुद्दा क्र.1 आम्ही विचारात घेत आहोत.
11. तक्रारदाराचे कुठेही असे कथन नाही की, मयत किंवा तक्रारदार स्वतः हे विद्युत वितरण कंपनीचे ग्राहक आहेत. मयताला विजेचा शॉक बसून त्याचा मृत्यू झाला, अशीही तक्रारदाराची केस नाही. तक्रारदाराची केस अशी आहे की, जाबदार विद्युत वितरण कंपनीने आपल्या वीज पुरवठा करणा-या वाहिनींची योग्य ती देखभाल न केल्याने सदर विद्युत वाहिनीमध्ये झोल (sag) आला व तो झोल सदर विद्युत वाहिनीच्या तारा योग्य प्रकारे ओढून घेवून दूर करण्याचे जाबदार वितरण कंपनीचे कर्तव्य असून देखील जाबदार विद्युत वितरण कंपनीने सदर विद्युत वाहिन्यांचा झोल दूर करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही आणि त्यामुळे आपल्या कर्तव्यात त्रुटी ठेवलेली असून त्यायोगे तक्रारदारांना दूषित सेवा दिलेली आहे. तक्रारदारांनी आपल्या तक्रारअर्जात असेही कथन केले आहे की, सदर विद्युत पुरवठा वाहिन्यांच्या तारांमध्ये आलेला झोल हा इतरही वाहनांना अडथळा करीत होता आणि त्याबाबत वारंवार विद्युत वितरण कंपनीकडे तोंडी तक्रार करुन देखील जाबदार विद्युत वितरण कंपनीने सदरचा झोल दूर करण्याकरिता कोणताही प्रयत्न केलेला नव्हता. तक्रारदार हे Potential user या संज्ञेखाली येत असून ते ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(ड) खाली ग्राहक या संज्ञेखाली ग्राहक होतात आणि म्हणून त्यांना प्रस्तुतची तक्रार दाखल करण्याचा कायदेशीर हक्क आहे. आपल्या युक्तिवादादरम्यान तक्रारदाराचे विद्वान वकील श्री एम.एन.शेटे यांनी मा.राष्ट्रीय आयोगाच्या A.P. Transco and Others Vs. Bhimeshwara Swami या I(2015) CPJ 195 (NC) तसेच Smt. Muneesha Devi Vs. U.P. Power Corporation Ltd. या मूळ तक्रारअर्ज क्र. 253/02 व इतर संबंधीत प्रकरणातील दि.3/2/14 चा निकाल तसेच Madanlal Arora Vs. Dharam Palji & Others, 2013(2) CPR 471 (NC) इ. निकालांचा आधार घेतला.
12. A.P. Transco and Others Vs. Bhimeshwara Swami या वर नमूद केलेल्या प्रकरणामध्ये मा.राष्ट्रीय आयोगाने High tension power transmission वाहिनीची योग्य ती निगा, दुरुस्ती न करणे हा विद्युत वितरण कंपनीचा निष्काळजीपणा असल्याचे ठरवून त्या केसमधील मृतकांच्या वारसांना ग्राहक ठरवून नुकसान भरपाई दिलेली आहे. Smt. Muneesha Devi Vs. U.P. Power Corporation Ltd. या वर नमूद केलेल्या प्रकरणामध्ये तक्रारदाराचे मयत पती, त्याचे कर्तव्यावरुन घरी परत येत असताना, विद्युत वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर एकाएकी फुटून, त्यातील गरम तेल मयतावर पडून, तो 85 टक्के भाजला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. सदर प्रकरणात देखील मा.राष्ट्रीय आयोगाने असे नमूद केले आहे की, त्यातील जाबदार विद्युत वितरण कंपनीवर सदर ट्रान्स्फॉर्मवरची देखभाल, दुरुस्ती आणि प्रसंगी खराब झालेला ट्रान्स्फॉर्मर बदलून त्या जागी नव्याने ट्रान्स्फॉर्मर बसविण्याची जबाबदारी असते. जर इतक्या नादुरुस्त अवस्थेतील ट्रान्स्फॉर्मर विद्युत वितरण कंपनीने बदलला नसेल तर ती विद्युत वितरण कंपनीची कर्तव्यच्युती होती असा निष्कर्ष काढून त्यातील तक्रारदारास ग्राहक ठरवून नुकसान भरपाई देवविली. तक्रारदार या सर्व प्रकरणांचा आधार घेवून या मंचापुढे हे कथन करु पहातात की, जरी मयत किंवा तक्रारदार हे विद्युत वितरण कंपनीचे ग्राहक नसले आणि जरीही सदरची घटना ही सार्वजनिक ठिकाणी झाली असली तरी ते ग्राहक संरक्षण कायद्या कलमांतर्गत ग्राहक आहेत, कारण ते potential user आहेत. सबब, त्यांची तक्रार ही कायद्याने चालणेस पात्र आहे. याउलट विद्युत वितरण कंपनीचे विद्वान वकील श्री यु.जे.चिप्रे यांनी आपल्या राज्य आयोगाच्या बाबुलाल गांधी विरुध्द महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. या प्रथम अपिल क्र.ए/07/227 व ए/07/228 मधील निकालावर भीस्त ठेवून असे नमूद केले की, ज्या ठिकाणी सदरची घटना घडली, त्याठिकाणी मयत किंवा तक्रारदार यांच्या आणि जाबदार विद्युत वितरण कंपनी यांचेमध्ये ग्राहक आणि सेवा देणार असे कोणतेही नाते उत्पन्न होत नाही, त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(ड) खाली ग्राहक होवू शकत नाहीत आणि सबब, प्रस्तुतची तक्रार ही या मंचासमोर चालणेस पात्र नाही. जाबदारचे विद्वान वकीलांनी आपल्या मा.राज्य आयोगाच्या Executive Engineer Vs. Subhash Parashuram Jadhav & Ors या प्रथम अपिल क्र. ए/14/707 या प्रकरणातील दि.30/7/15 च्या निकालाचा देखील आधार घेतला. सदर प्रकरणात मा.राज्य आयोगाने असा निष्कर्ष काढला की, ज्याअर्थी General Transmission line ही तुटून सार्वजनिक रस्त्यावर पडली आणि त्यामुळे घटना घडली आणि ती General Transmission line ही तक्रारदाराच्या घराला विद्युत पुरवठा करणारी सर्व्हिस लाईन नसल्यामुळे त्याठिकाणी तक्रारदार व विद्युत वितरण कंपनी हयामध्ये ग्राहक व सेवा देणार असे नाते नव्हते. त्यामुळे घडलेला अपघात हा तक्रारदारांना देण्यात आलेल्या विद्युत पुरवठयामध्ये कुठलीही सेवेतील त्रुटी नसल्यामुळे त्या प्रकरणातील तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलमाअंतर्गत ग्राहक या संज्ञेखाली येत नाही, सबब, तक्रार खारीज करण्यास पात्र आहे. सदर प्रकरणात मा.राज्य आयोगाने मा.राष्ट्रीय आयोगाच्या शंकर सिताराम जाधव विरुध्द महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ या 1994-STPL5(CL)-582-NC या प्रकरणातील निर्णयाचा आधार घेतला. सदर प्रकरणात मा.राष्ट्रीय आयोगाने असे नमूद केले आहे की, “His death was, thus, due to accident on public road and it had no relation to any deficiency in service in the supply of electricity to the petitioner, herein, who is a consumer in relation to the supply of electricity to his residence. The line which got snagged was not the supply line to his residence but was a general transmission line. The accident, in question, was, thus, not the result of any deficiency in service in relation to the said supply of electricity to the residence of the petitioner” आपल्या राज्य आयोगापुढील Executive Engineer Vs. Subhash Jadhav या वर नमूद प्रकरणात मयत त्याचे शेतामध्ये ऊस पिकाला घटनेच्या वेळी पाणी घालत होता. त्याचे शेतामध्ये पाणी पुरवठा करण्याकरिता विहीरीवर इलेक्ट्रीक मोटार बसविलेली होती व त्याठिकाणी विद्युत पुरवठा करण्याकरिता विद्युत वाहिनी (transmission line) उभी केली होती व त्या विद्युत वाहिनीवरील एक तार तुटली व ती मयताच्या अंगावर पडली आणि त्यामुळे मयताला इलेक्ट्रीक शॉक बसून मयताचा मृत्यू झाला. या तथ्यांवरुन आणि वर नमूद केलेल्या मा.राष्ट्रीय आयोगाच्या निकालावरुन आपल्या मा.राज्य आयोगाने त्यातील तक्रारदार ग्राहक होवू शकत नाहीत असा निर्णय दिला होता.
13. प्रस्तुत प्रकरणातील तथ्ये ही थोडी वेगळी आहेत. या प्रकरणामध्ये तक्रारदाराची कुठेही अशी केस नाही की, एकतर मयत किंवा तक्रारदारांपैकी कोणीही हा जाबदार विद्युत वितरण कंपनीचा ग्राहक आहे किंवा त्यांना कुठल्या ना कुठल्या स्वरुपामध्ये वीजेचा पुरवठा जाबदार विद्युत वितरण कंपनीने केलेला आहे. तक्रारदाराची केस काय आहे, हे वर आम्ही नमूद केलेले आहे. आपल्या विद्युत वितरण करणा-या वाहिनीची योग्य ती देखभाल न केल्याने सदरचा अपघात घडला अशी तक्रारदाराची तक्रार आहे. विद्युत वितरण करणा-या वाहिनीची योग्य ती निगा, देखभाल इ. नियमितपणे करणे हे जाबदार विद्युत वितरण कंपनीचे कर्तव्य आहे आणि अपघात स्थळी विद्युत वितरण करणा-या वाहिनीची योग्य ती देखभाल न केल्याने आणि त्या वाहिनीला आलेला झोल (sag) हा वारंवार तक्रारी करुनही दूर न केल्याने जाबदार विद्युत वितरण कंपनीने कर्तव्यात त्रुटी केलेली आहे आणि म्हणून तक्रारदार हे potential user या सदराखाली त्यांना दूषित सेवा (deficiency in service) मिळाली या कारणाखाली ही तक्रार दाखल करीत आहेत आणि त्यायोगे तक्रारदार हे ग्राहक आहेत अशी तक्रारदाराची केस आहे. आम्ही मा. राष्ट्रीय आयोगाच्या अशा प्रकरणातील वर नमूद केलेल्या निकालाचा ऊहापोह केला आहे. त्यांचा आधार घेवून आणि विशेषतः ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(ओ) मध्ये “Service” या शब्दाची जी व्याख्या दिली आहे, त्यावरुन तक्रारदार हे ग्राहक आहेत असा आम्ही निष्कर्ष काढतो आणि सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
मुद्दा क्र.2
14. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदाराची तक्रार नेमकी काय आहे, हे आम्ही विस्तृतपणे नेमके नमूद केले आहे. विस्तारभापोटी, त्याचा पुनरुच्चार करण्याची याठिकाणी आवश्यकता वाटत नाही. प्रस्तुत प्रकरणामध्ये उभय पक्षांचे विद्वान वकीलांनी या मंचास युक्तिवादाचे दरम्यान घटनास्थळाचे निरिक्षण करावे, अशी मागणी केली व ती विनंती मान्य करुन दि.1/01/2016 रोजी या मंचाने प्रत्यक्ष घटनास्थळाचे निरिक्षण केले. सदरचे घटनास्थळ हे करगणी-खरसुंडी या रस्त्यावर बाळेवाडी नजीक कुरण नावाच्या शिवारालगत आहे. त्या रस्त्याला तिरकस छेद देवून 11 केव्हीची विद्युत वाहिनी जाते. त्याठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी येणारे इलेक्ट्रीक खांब यामधील अंतर साधारण 200 फूट आहे. सदर दोन खांबांवर तीन विद्युत भारीत 11 केव्हीच्या विद्युत वाहिनी आहेत. घटनेच्या वेळी सदर विद्युत भारीत तारांखाली गार्डींग केज होते, अशी तक्रारदाराची केस आहे आणि सदरची बाब जाबदार विद्युत वितरण कंपनीला मान्य आहे. तथापि, घटनास्थळाच्या प्रत्यक्ष निरिक्षणाचे वेळेला त्या दोन खांबांवर कोणतेही गार्डींग केज आढळून आलेले नाही आणि ते काढून टाकल्याचे सांगण्यात आले. तथापि, गार्डींग केजच्या लोखंडी तारा विद्युत खांबावरील ज्या आडव्या लोखंडी तुळईला बांधतात, त्या लोखंडी तुळया दोन्ही विद्युत खांबावर असल्याचे आढळून आले. जाबदार विद्युत वितरण कंपनीचे अधिका-यांचे मदतीने व उभय पक्षकारांचे विद्वान वकीलांच्या उपस्थितीमध्ये सर्वात खालील विद्युत वाहिनी आणि रस्त्याचा पृष्ठभाग यातील अंतर तपासले असता ते अंतर 17 फूट 3 इंच असल्याचे आढळून आले. जाबदार विद्युत वितरण कंपनीने आपल्या तांत्रिक कर्मचा-यांकरिता जी माहिती पुस्तिका काढली आहे, त्याची एक प्रत या मंचाला माहितीकरिता जाबदार विद्युत वितरण कंपनीने दिली आहे. त्यात पान नं.99 वर विविध प्रकारच्या विद्युत वाहिनी रस्ता ओलांडताना रस्ता आणि विद्युत वाहिनी यांचेमध्ये किती अंतर असावे त्याचे कोष्टक दिले आहे. त्याप्रमाणे 11 केव्हीची विद्युत वाहिनी ग्रामीण भागातील रस्ता ओलांडताना विद्युत वाहिनी आणि रस्त्याचा पृष्टभाग यांचेमध्ये 15 फूटांचे अंतर असावे असे नमूद असल्याचे दिसते.
15. तांत्रिक माहिती पुस्तिकेच्या पान नं.99 वर दोन प्रकारच्या गार्डींग यंत्राची सचित्र माहिती दिलेली आहे. त्यातील पहिला प्रकार म्हणजे cradle type guarding आणि दुसरा प्रकार म्हणजे carpet guarding. कारपेट गार्डींग हे दोन वेगवेगळया पॉवर लाईन क्रॉसिंग किंवा पॉवर लाईन व टेलिफोन लाईन क्रॉसिंग करिता उपयोगात आणतात तर क्रॅडल गार्डींग हे लो ट्रान्समीशन ते 33 केव्हीपर्यंत, गावात किंवा रोड क्रॉसिंगकरिता किंवा रस्त्याजवळून जाण्या-या लाईनकरिता करतात, असे नमूद केले आहे. क्रॅडल याचा अर्थ पाळणा असा होतो आणि त्या क्रॅडल गार्डींगमध्ये 6 गार्ड वायर्स बसतात, 4 खाली, 2 त्याच्यावर आणि या वायरमध्ये तीन बाजूंनी क्रॉस लाईन्सने बांधतात आणि त्या कारणामुळे जरी कंडक्टर (विद्युत भारीत वाहिनी) जोराने तुटून उसळली तरी ती गार्डींगच्या बाहेर जाणार नाही असे नमूद केलेले आहे. तक्रारदारांनी घटनास्थळाची; घटना झालेनंतर ताबडतोब काढलेली छायाचित्रे हजर केलेली आहेत. त्या छायाचित्रांवरुन घटनेच्या वेळी घटनास्थळी सदर विद्युत वाहिनीला क्रेडल गार्डींग होते असे स्पष्टपणे दिसून येते. क्रेडल गार्डीग व कारपेट गार्डींग हे विद्युत वितरण करणा-या भारीत लाईनपेक्षा, कमीत कमी सव्वा फूट अंतरावर खालील बाजूने लावल्या जात असल्याचे सदर तांत्रिक माहिती पुस्तकावरुन दिसून येते आणि ही बाब घटनास्थळाचे निरिक्षणावेळी जाबदार विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता श्री इनामदार यांनी देखील या मंचासमोर सांगितले.
16. सदर ठिकाणी करगणी-खरसुंडी या रस्त्याचे पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत डांबरीकरण झाल्याचे दिसून आले व सदरचे डांबरीकरण 2012 साली सुरु करण्यात आल्याबद्दलचा माहितीफलक सदर रस्त्यावर आढळून आला. प्रस्तुत प्रकरणातील घटना ही दि.26/9/10 रोजी घडली असल्याचे उभय पक्षांनी कथन केले आणि सदरची बाब ही उभयपक्षी मान्य बाब आहे. याचा अर्थ असा की, घटनेच्या दिवशी सदर रस्त्याचे डांबरीकरण झालेले नव्हते. तथापि तक्रारदारांनी जी छायाचित्रे या प्रकरणात दाखल केली आहेत, त्यावरुन सदरचा रस्ता हा मुळात डांबरी रस्ताच होता तथापि तो खराब अवस्थेत असल्याचे दिसून येते. नवीन डांबरीकरणाची जाडी ही जास्तीत जास्त दोन ते अडीच इंचाची असल्याचे दिसून येते. याचा विचार केला तर घटनेच्या वेळी सदर रस्ता आणि विद्युत भारीत वाहीनी यांचेमध्ये जास्तीत जास्त 18 फूटांचे अंतर असावे असे दिसून येते. सदरचे अंतर हे वर नमूद केलेल्या तांत्रिक माहिती पुस्तकात नमूद असलेल्या पान नं.99 वरील 15 फूटांच्या अंतरापेक्षा 3 फुटाने जास्त असल्याचे दिसून येते. सदर विद्युत भारीत वाहीनीखाली क्रेडल टाईप गार्डींग होते ही बाब आम्ही वर नमूद केलेली आहे व त्या क्रेडल गार्डींगच्या वायरमध्ये मयताची मान अडकून सदरचा अपघात घडला, ही तक्रादाराची केस आहे आणि जाबदार विद्युत वितरण कंपनीने देखील सदरची बाब मान्य केली आहे. क्रेडल टाईप गार्डींग किंवा कारपेट गार्डींग हे विद्युत भारीत वाहिनीच्या खाली कमीत कमी सव्वा फूट अंतरावर बसविलेले जातात ही बाब सदर तांत्रिक माहिती पुस्तिकेवरुन दिसून येते आणि ही बाब जाबदारांचे सहायक अभियंता यांनी या मंचापुढे नमूद केली आहे हे आम्ही वर नमूद केलेलेच आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की, घटनेच्या वेळी सदर घटनास्थळी दोन विद्युत खांबावर क्रेडल टाईप गार्डींग बसविलेले होते. त्याची उंची रस्त्याच्या पृष्ठभागापासून 16.75 फूट आहे असे अनुमान काढायला काहीही हरकत नाही. क्रेडल टाईप गार्डींगमध्ये गार्डींगच्या दोन तारांना काही विहीत अंतरावर “U” टाईप लोखंडी तारा आडव्या बसविल्या जातात, जेणेकरुन वरील विद्युत भारीत वाहिनी तुटली तरी ती त्या क्रेडलवर पडेल. सदरचे गार्डींग वायरी या खांबाला लावलेल्या निगेटीव्ह आणि अर्थिंग वायरला जोडलेल्या असतात, जेणेकरुन विद्युत भारीत तार जर तुटून क्रेडल टाईप गार्डींगवर किंवा कारपेट गार्डींगवर पडली तर विद्युतपुरवठा आपोआप शॉर्ट सर्किट होवून बंद पडेल. क्रेडल टाईप गार्डींगला बसविण्यात आलेल्या आडव्या “U” टाईप तारा या जवळपास 9 इंच ते 1 फूट उंचीच्या असतात, असे या मंचापुढे सांगण्यात आले. त्यामुळे जरी क्रेडलच्या तारा दुस-या खांबावर योग्य ताणात बांधून ठेवल्या असतील तरी क्रेडल गार्डींगच्या “U” टाईप तारा आणि रस्त्याचा पृष्ठभाग यांचेमध्ये केवळ 15 ते 16 फूटांचे अंतर असू शकते.
17. केंद्रीय मोटार वाहन कायदयातील नियमानुसार माल वाहतुक करणारे वाहन, किंवा प्रवाशांची वाहतूक करणारे वाहन, यांची लांबी, रुंदी व उंची किती असावी याबद्दलचे नियम आहेत. प्रचलित (संशोधीत) नियमानुसार अशा वाहनाची रस्त्याच्या पृष्ठभागापासून उंची ही 12.5 फूट असावी असा नियम आहे. त्या नियमामध्ये संशोधन होण्यापूर्वी ही उंची 12 फूटाची असावी असे नमूद केले होते. अशा वाहनाची रुंदी ही 8.5 फूट असावी असे नवीन संशोधानाप्रमाणे आहे आणि त्या संशोधनानुसार पूर्वी मान्यताप्राप्त रुंदी ही 8 फूटाची होती. या लांबी रुंदी आणि उंचीच्या नियमांचा भंग करणा-या वाहनांना नोंदणी मिळत नाही ही कायद्याची तरतूद आहे. ज्याअर्थी ज्या ट्रकमध्ये बसवून मयत चाललेला होता, त्या वाहनाला नोंदणी नंबर मिळालेला होता, त्याअर्थी सदरचे वाहन हे मोटार वाहन नियमानुसार लांबी रुंदी आणि उंचीचे होते असे कायदेशिररित्या अनुमान या मंचाला काढता येते. त्यामुळे घटनेच्या वेळेला ज्या ट्रकच्या केबीनवर बसून मयत प्रवास करीत होता, त्या ट्रकची किमान उंची 12 फूट होती असे अनुमान या मंचाला कायदेशीररित्या काढता येते. याचा अर्थ असा झाला की, विहीत उंचीचे मालवाहतूक करणारे वाहन आणि योग्य तो ताण दिलेली आणि जोडणी केलेली विद्युत वाहिनीखालील क्रेडल टाईप गार्डींग यांचेमध्ये केवळ 4 फूटाचे अंतर राहते आणि रहायला हवे. जाबदार विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता श्री इनामदार यांनी या मंचासमोर असे प्रतिपादन केले की, गार्डींगच्या वायरना स्वतःचे वजन असते. त्या तारा लोखंडी तारा असतात. वीजेच्या दोन खांबामधील अंतर हे 200 फूटाचे असते आणि अशा 2 खांबांवर हे लोखंडी तारांनी बनविलेले क्रेडल गार्डींग बसविलेले असते. या दोन खांबातील अंतरामुळे आणि लोखंडी तारांच्या स्वतःच्या वजनामुळे या विद्युत वाहिन्या किंवा क्रेडल गार्डीग यांना एक झोल (slag) येतो. तो सर्वसाधारण झोल 6 ते 9 इंचापर्यंत असतो आणि त्याची कल्पना विद्युत वितरण कंपनीला असते आणि असा झोल असणे ही अत्यंत सर्वसाधारण बाब आहे. जर विद्युत वितरण कंपनीच्या सहायक अभियंत्यांचे हे प्रतिपादन विचारात घ्यावयाचे झाले तर अशा प्रकारच्या झोलामुळे (slag) क्रेडल गार्डींगच्या तारा या 16 फूटापेक्षा आणखी खाली येण्याची शक्यता असते आणि अशा स्वरुपात रस्त्याची पृष्ठभूमी आणि क्रेडल गार्डींगच्या तारा यांचेमध्ये सामान्यतः 15 ते 15.5 फूटाचे अंतर असू शकते.
18. तक्रारदारांनी आपल्या तक्रारअर्जामध्ये आणि पुराव्याच्या शपथपत्रामध्ये असे नमूद केले आहे की, सदर झोलबाबत जाबदार विद्युत वितरण कंपनीला वारंवार तक्रारी करुन देखील विद्युत वितरण कंपनीने त्याची काहीही दखल घेतली नाही आणि सदर विद्युत वाहिनीत योग्य ती दुरुस्ती केलेली नाही म्हणजे सदरचा झोल काढून टाकण्याबद्दल कोणताही प्रयत्न केलेला नाही. तक्रारदाराचे असेही कथन आहे की, सदर झोलमुळे सदरची विद्युत वाहिन्या वारंवार उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर्स किंवा इतर तत्सम वाहनांना थटत होत्या (causing obstruction to traffic), तरीदेखील जाबदार विद्युत वितरण कंपनीने सदरची वाहिनी दुरुस्त करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही आणि ही जाबदार विद्युत वितरण कंपनीने केलेली कर्तव्यच्युती असून तक्रारदारांना देण्यात आलेली दूषित सेवा आहे. एकतर तक्रारदार या विधानाचे पुष्ठयर्थ कोणताही पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. कोणताही साक्षीदार; की ज्याने घटनेच्या अगोदर सदर ठिकाणी विद्युत वाहिनीतील सदर झोलामुळे सदर विद्युत वाहिनी ऊसाची वाहतूक करणा-या ट्रॅक्टरला किंवा इतर वाहनांना तटत होत्या, हे बघीतलेले आहे आणि त्याबाबत जाबदार विद्युत वितरण कंपनीकडे वारंवार तक्रारी केलेल्या आहेत; असा तपासलेला नाही. तक्रारदारांनी देखील घटनेपूर्वी, स्वतः जाबदार कंपनीकडे, सदर विद्युत वाहिनीमुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होत आहे, अश्या लेखी तक्रारी दिल्याचे सांगितलेले नाही. त्यामुळे घटनास्थळी घटनेच्या पूर्वीपासून सदर विद्युत वाहिन्या वाहनांना थटत होत्या (obstructing the traffic) ही बाब तक्रारदार शाबीत करु शकले नाहीत.
19. दुसरी आणि अत्यंत महत्वाची बाब म्हणजे तक्रारदाराचेच म्हणण्याप्रमाणे मयत हा मालवाहतूक करणा-या ट्रकच्या केबीनवर बसून घटनेच्या वेळेला प्रवास करीत होता. ट्रकवर असणा-या ट्रकच्या केबीनच्या वर असणा-या भागामध्ये प्रवास करु नये असा नियम आहे आणि ती सर्वसाधारण ज्ञानाची गोष्ट आहे. अशा ठिकाणी बसून प्रवास करणे ही धोकादायक गोष्ट आहे याची पुरेपूर जाणीव सर्वांनाच असते. ट्रकच्या ड्रायव्हरच्या केबीनवरती जी काही थोडी बहुत मोकळी जागा असते, त्याठिकाणी ट्रकला आवश्यक असणारी काही सामुग्री ठेवण्याकरिता ती जागा केली असते. तेथे बसून प्रवास करणाकरिता कोणतीही सुरक्षिततेची साधने नसतात आणि असा प्रवास करणे हा कायद्याने देखील गुन्हा आहे. मयत हा सुरक्षिततेची सर्व बंधने झुगारुन आणि आपला जीव धोक्यात टाकून, ज्या ठिकाणी प्रवास करायला नको, अशा ठिकाणी बसून प्रवास करीत होता आणि त्यामुळे अपघात झाला ही बाब स्वयंस्पष्ट आहे. सदर ठिकाणी बसल्यामुळे मयत आणि रस्त्याला छेद देवून जाणा-या विद्युती वाहिनी यांचेमधील अंतर कमी होणे हे स्वाभाविक होते आणि अशा मुळे सदरचे क्रेडल गार्डींगच्या खाली लटकणा-या तारा या मयताच्या गळयात अडकून सदरचा अपघात होणे ही देखील तितकीच स्वाभाविक गोष्ट आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये सदरच्या ट्रकच्या चालकाची चूक असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. एकतर त्याने मयत आणि इतर दोघांना ड्रायव्हरच्या केबीनवर असलेल्या ठिकाणी बसून प्रवास करण्यास मज्जाव करावयाला हवा होता आणि दुसरे असा धोकादायक प्रवास करणा-या व्यक्ती केबीनवर बसलेल्या आहेत आणि त्या रस्त्याला छेद देवून जाणा-या विद्युत वाहिनीच्या संपर्कात येवू शकतात याचा अंदाज घेवून त्याने ट्रक चालविला पाहिजे होता. जी तक्रारदाराने घटनास्थळाची छायाचित्रे या मंचासमोर आणली आहेत, त्यांचेवरुन असे दिसते की, मयत क्रेडल गार्डींगच्या “U” आकाराच्या तारेमध्ये अडकल्यामुळे त्या तारा आपापल्या जागा सोडून लटकू लागल्या आणि अशा कमीत कमी 4 ते 5 तारा बाधीत झाल्याचे दिसते. याचा अर्थ असा की, घटनेवेळी सदरचा ट्रक हा वेगात होता. त्या ट्रकच्या चालकाला विद्युत वाहिनी आणि ट्रक आणि ट्रकच्या केबीवनवर बसलेले लोक यांचेमधील अंतराचा अंदाज आला नाही आणि सदरचा अपघात घडला. त्या घटनेकरिता जाबदार विद्युत वितरण कंपनीला जबाबदार धरता येणार नाही असा या मंचाचा स्पष्ट निष्कर्ष आहे.
20. आमच्या वरील निष्कर्षाचे मुख्य कारण असे आहे की, तक्रारदाराने असा कोणताही पुरावा आणला नाही की, घटना घडायच्या अगोदर देखील सदर विद्युत वाहिनीच्या झोलामुळे वाहिनी तटत होती किंवा अशा प्रकारचा काही अपघात आधी झालेला होता आणि सदर बाब जाबदार विद्युत कंपनीच्या नजरेस आणून देखील जाबदार विद्युत कंपनीने सदर विद्युत वाहिनी दुरुस्त करण्याबाबत कोणताही प्रयत्न केलेला नव्हता. ग्रामीण भागातील रस्ते छेद देवून जाणा-या विद्युत वाहिनी व रस्त्याचा पृष्ठभाग यांच्यामधील जे मान्यताप्राप्त अंतर आहे, त्या विद्युत वाहिनीखाली बसविलेल्या क्रेडल टाईप गार्डंच्या आडव्या बसविलेल्या U टाईप तारा व रस्त्याचा पृष्ठभाग यामधील जे acceptable अंतर आहे आणि मोटार वाहन कायद्याच्या नियमानुसार वाहनाचे कायदेशीर उंचीचा विचार करता अशा विद्युत वाहिनीच्या खालून जाताना वाहने सामान्यतः तटणार नाहीत आणि विद्युत वाहिनीच्या संपर्कात येणार नाही ही बाब स्पष्टपणे दिसून येते. एखादा अपवादात्मक प्रसंग, जसा या केसमध्ये आहे, असा घडू शकतो व तो प्रसंग वाहन चालक व त्या वाहनावर प्रवास करणारे अतिउत्साही लोक यांचेमुळेच होतो. त्याकरिता जाबदार विद्युत वितरण कंपनीला जबाबदार धरता येणार नाही. घटनास्थळी आजही उभी असलेली विद्युत वाहिन्या या वर नमूद केलेल्या तांत्रिक माहिती पुस्तिकेतील नियमानुसार उंचावर असल्याचे दिसून येते आणि घटनेच्या वेळी देखील त्याच नियमानुसार अस्तित्वात होत्या असे दिसून येते. अशा परिस्थितीमध्ये जाबदार विद्युत वितरण कंपनीने कोणती कर्तव्यच्युती केली हे स्पष्ट होत नाही. जर मयताच्या स्वतःच्या अतिउत्साही धोकादायक आणि बेकायदेशीर प्रवासामुळे जर घटना घडली असेल तर त्याकरिता म्हणून जाबदार विद्युत वितरण कंपनीला जबाबदार धरता येणार नाही. मयत हा स्वतः धोका पत्करुन सदर ट्रकवर बेकायदेशीररित्या प्रवास करीत होता. त्याकरिता जाबदार विद्युत वितरण कंपनीला जबाबदार धरता येणार नाही. कदाचित याची कल्पना तक्रारदारांना आली असावी आणि त्यांच्या हेही लक्षात आले असावे की, इतर कोणत्याही मार्गाने मयताच्या मृत्यूकरिता जाबदार विद्युत वितरण कंपनीकडून नुकसान भरपाई मागता येणार नाही. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे प्रस्तुत ग्राहक तक्रारीची रचना करुन जाबदार विद्युत वितरण कंपनीने आपल्या कर्तव्यात च्युती केली आणि म्हणून त्यांनी दूषित सेवा दिली अशा स्वरुपाची तक्रार मांडली आहे. प्रस्तुत प्रकरणात जाबदारांनी कोणतीही त्रुटी केलेली नाही असा या मंचाचा स्पष्ट निष्कर्ष आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी दिले आहे.
मुद्दा क्र.3
21. वर दिलेल्या मुद्दा क्र.2 मधील निष्कर्षामुळे तक्रारदारांना या प्रकरणामध्ये जाबदार विद्युत वितरण कंपनीकडून कोणतीही दाद मिळण्यास ते पात्र नाहीत. तक्रारदारांना मयताचे मृत्यूकरिता नुकसान भरपाई मागण्याकरिता वेगळया अशा सक्षम न्यायालयाकडे वेगळया कायद्याखाली प्रकरण दाखल करावे लागेल आणि त्यांना जर तसा अधिकार असेल तर असे सक्षम न्यायालय त्याचा विचार करेल. परंतु प्रस्तुत प्रकरणमध्ये जाबदार विद्युत वितरण कंपनीने तक्रारदारांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नसल्याने मयताचे मृत्यूकरिता जाबदारांना जबाबदार धरता येत नाही आणि त्यामुळे तक्रारदारांना जाबदारकडून कोणतीही नुकसान भरपाईची मागणी मागता येत नाही. सबब, मुद्दा क्र.3 हा आमच्या निष्कर्षाला उद्भवत नाही असा या मंचाचा निष्कर्ष आहे. सबब, आम्ही मुद्दा क्र.3 चे उत्तर त्याप्रमाणे दिले आहे.
मुद्दा क्र.4
22. वरील सर्व निष्कर्षावरुन प्रस्तुतची तक्रार ही नामंजूर करणेस पात्र आहे असा या मंचाचा स्पष्ट निष्कर्ष आहे. सबब आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. प्रस्तुतची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. तक्रार अर्जाचा खर्च उभय पक्षकारांनी आपला आपण सोसावयाचा आहे.
3. सदर निकालपत्राच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क देण्यात याव्यात.
सांगली
दि. 05/01/2016
सौ मनिषा कुलकर्णी ए.व्ही.देशपांडे
सदस्या अध्यक्ष