निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 15/04/2013 तक्रार नोदणी दिनांकः- 23/04/2013
तक्रार निकाल दिनांकः- 21/11/2013
कालावधी 06 महिने. 29 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
अनंत पिता बापुराव कदम. अर्जदार
वय 40 वर्षे. धंदा.नोकरी. अॅड.डी.यु.दराडे.
रा.लोकमान्य नगर,परभणी.
विरुध्द
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. गैरअर्जदार.
तर्फे उप अभियंता शहर विभाग, अॅड.एस.एस.देशपांडे.
जिंतूर रोड,परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराने घरगुती वापरासाठी गैरअर्जदाराकडून विद्युत पुरवठा घेतला. ज्याचा ग्राहक क्रमांक 530010347318 असा आहे व मिटर क्रमांक 01614644 असा आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने मिटरचे रिडींग न घेता सरासरीने देयके देतात, गैरअर्जदारांनी नोव्हेंबर 2011 ते फेब्रुवारी 2012 पर्यंत मिटर चालु असतानांही आर.एन.ए. दाखवुन 51 युनीटचे प्रतीमहा बील दिले. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे अधिकचे बील भरणा केले होते, त्यामुळे सदर सरासरी देयकाची रक्कम गैरअर्जदारानी चालु बिलात वळती करुन घेतली. अर्जदाराचे म्हणणे की, मार्च 2012 मध्ये गैरअर्जदाराने मिटरची रिडींग घेतली, त्यावेळी रिडींग नुसार त्यांनी 4413 युनीटचे बिल दिले, सदर देयक रक्कम रु.36,260/- होती अर्जदाराचे म्हणणे की, तो एक सर्व सामान्य नोकरदार मानुस आहे गैरअर्जदार हे नियमित प्रत्यक्ष नोंदी नुसार लाईट बील देत नाहीत.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराचीच रक्कम गैरअर्जदाराकडे जमा होती, परंतु गैरअर्जदाराने चुकीचे बिले दिली, गैरअर्जदाराने एप्रिल 2012 चे लाईटबील रु.37,790/- चे दिले. मे 2012 चे रु.44,390/- चे बिल दिले सदरचे दोन्ही बिले अर्जदाराने भरले नाहीत.
गैरअर्जदाराने जुन 2012 च्या देयकात सदर रक्कम जमा दाखवून त्या महिन्याचे 26,340/- रु. चे बिल दिले. त्यानंतर सुध्दा जुलै 2012 ते जानेवारी 2013 पर्यंत प्रत्यक्ष नोंदी न घेता सरासरीवर आधारीत 665 युनीट प्रतीमहा प्रमाणे लाईट बील दिले ते चुकीचे आहे. कारण अर्जदाराचा वापर 90 ते 100 युनीट प्रतीमहा आहे, त्यामुळे गैरअर्जदाराने दिलेले सर्व लाईट बील चुकीचे दिले आहे व अर्जदाराकडून अगावु रक्कम घेतली, अर्जदाराने वरील चुकीच्या बिलापोटी 24/07/2012 रोजी रु.10,000/-, 23/08/2012 रोजी रु.15,000/-, 28/10/2012 रोजी रु.15,000/- व 27/12/2012 रोजी रु.13,000/- अशी रु.58000/- रक्कम भरणा केली. शेवटी फेब्रुवारी 2013 चे गैरअर्जदाराने अर्जदारास बील दिले, ज्यामध्ये अर्जदाराचे गैरअर्जदाराकडे 9812/- रु. जमा असलेचे दाखविले.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराची गैरअर्जदाराकडे अगाऊ रक्कम जमा असतांना देखील जुन 2012 मध्ये अर्जदाराचा विद्यु पुरवठा तोडला, तसेच ऑग्स्ट 2012 मध्ये विद्युत पुरवठा तोडला, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करुन गैरअर्जदारास असा आदेश करावा की, अर्जदारास त्याच्या मिटरच्या रिडींगनुसार विद्युत बिले द्यावीत व गैरअर्जदाराने अर्जदाराकडून जास्तीची रक्कम भरणा करावी लागली, म्हणून त्या रक्कमेवर 24 टक्के द.सा.द. शे. व्याज तक्रारदारास द्यावे, व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी रु.5,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास द्यावयाचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केले आहे. अर्जदाराने नि.क्रमांक 4 वर 5 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये Bill History, अर्जदाराने गैरअर्जदारास दिनांक 14/01/2013 रोजी दिलेला अर्ज व फेब्रुवारी 2013 चा लाईट बील व नि.क्रिमांक 8 वर सी.पी.एल. दाखल केले आहे.
मंचातर्फे लेखी निवेदन सादर करण्यासाठी गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, परंतु गैरअर्जदारांना लेखी निवेदन सादर करण्यासाठी अनेक संधी देवुनही मुदतीत लेखी जबाब सादर न केल्यामुळे त्यांचे विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रार अर्जावरुन व कागदपत्रां वरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास फेब्रुवारी 2013 मध्ये मिटर
रिडींग न घेताच बिले देवुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 अर्जदाराने मागणी केले प्रमाणे गैरअर्जदाराने अर्जदाराकडून जास्तीची
रक्कम भरणा करुन घेतली त्या रक्कमेवर अर्जदार व्याज मागण्यास
पात्र आहे काय ? नाही.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. ही बाब नि.क्रमांक 4/3 वर दाखल केलेल्या फेब्रुवारी 2013 च्या लाईट बिलावरुन सिध्द होते. गैरअर्जदाराने अर्जदारास फेब्रुवारी 2013 मध्ये मागील रिडींग 1 दाखवुन चालू रिडींग 2387 दाखवून अर्जदारास 2386 युनीटचे बिल रिडींग न घेताच दिले होते, ही बाब नि.क्रमांक 4/3 वरील दाखल केलेल्या लाईट बिलावरुन सिध्द होते. कारण सदर बिलाचे अवलोकन केले असता गैरअर्जदाराने अर्जदारास एप्रिल 2012 मध्ये 171 युनीट, मे 2012 ला 764 युनीट, जुन 2012 ला 1169 युनीट, जुलै 2012 ते जानेवारी 2013 मध्ये 665 युनीटचे Average Bill दिले व एकदम फेब्रुवारी 2013 मध्ये 2386 युनिटचा वापर दाखवुन रिडींग न घेताच गैरअर्जदाराने अर्जदारास लाईट बिल दिल्याचे दिसून येते. निश्चितच गैरअर्जदाराने सदरचे कृत्य करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे, मानसिकत्रास दिला आहे. असे मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देत आहे.
मुद्दा क्रमांक 2.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने लेखा खाते व्यवस्थीत न ठेवुन अर्जदाराकडून जास्तीची रक्कम भरणा करुन घेतली, त्या रक्कमेवर 24 टक्के द.सा.द.शे. व्याज गैरअर्जराकडून अर्जदारास द्यावेत हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, कारण अर्जदाराने फक्त तक्रार अर्जाच्या विनंती मध्ये व्याजाची मागणी केली आहे. किती रक्कमेवर व गैरअर्जराकडे अर्जदाराचे किती रक्कम जमा आहे, याचा खुलासा केलेला नाही, म्हणून अर्जदार गैरअर्जदाराकडून केवळ व्याज मागणेस पात्र नाहीत, असे मंचाचे मत आहे, म्हणून मुद्दा क्रमांक 2 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास आदेश तारखे पासून पूढील प्रत्येक महिन्यात न चुकता
मिटरची रिडींग घेवुन, रिडींग प्रमाणे बिले द्यावेत.
3 गैरअर्जदाराने अर्जदारास आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत मानसिक
त्रासापोटी 1,000/- फक्त ( अक्षरी रु. एकहजार फक्त ) व तक्रार
अर्जाच्या खर्चापोटी 1,000/- फक्त ( अक्षरी रु. एकहजार फक्त ) द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.