::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये, श्री.अनिल एन.कांबळे, मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 16.03.2012) 1. अर्जदाराने, प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 2. अर्जदार चंद्रपूर येथील रहिवासी असुन मौजा चंदनवाही तह. राजुरा येथे शेती आहे. शेतावरील गडी माणूस राहण्याकरीता तिन खोल्याचे घर आहे. या घरात मे -1999 मध्ये घरघुती वापराचे विज कनेक्शन ग्राहक क्रं. 455125000328 डीएल 167 असे आहे. या विज कनेक्शन करीता 10/02/2011 पावेतोच्या गै.अ.कडून प्राप्त सर्व देयकाचा चुकारा नियमित पणे केलेला आहे. 3. गै.अ.ने दि.30/11/2010 चे मिटर नादुरुस्त असल्याचे 80/- रु.चे देयक पाठविले. त्याचा भरणा अर्जदाराने केल्यानंतर मार्च -2011 चे 100 युनिट वापराचे 350/-रु. चे देयक पाठविले. अर्जदाराचा विज वापर कधीही सरासरी 100 युनिट चा नव्हता. मे -2011 चे देयकात पुन्हा 100 युनिटची आकारणी अर्जदारावर लादली. गै.अ.यास 100 युनिटची सरासरी लादण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नव्हता.
4. अर्जदाराचे माघारी कोणताही पंचनामा न करता विज मिटर काढून त्या ठिकाणी दुसरे मिटर गै.अ.ने लावले. विज वापर फारच कमी असल्याने नविन मिटर मध्ये सुध्दा फक्त 4 युनिट विज वापर केला. व त्याप्रमाणे दि.25/07/2011 मिटर रिडींगचे बिल गै.अ.यांनी पाठविले. परंतु त्यात जुने सरासरी बिलाची रक्कम लावून बिल अर्जदारास दिले. त्यामुळे अर्जदाराने त्या बिलाचा भरणा केला नाही. अर्जदाराने दि.25/04/2011 रोजी लेखी तक्रार दिली, व सरासरी 100 युनिटची आकारणी कमी करण्याची विनंती केली परंतु गै.अ.ने दखल घेतली नाही. गै.अ.यांनी मिटर नादुरुस्त दाखविला असला तरी विज वापर हा फारच अल्पसा आहे. गै.अ.नियमानुसार कमीतकमी 30/- रु. अशी आकारणी व्हायला पाहिजे परंतु जाणूनबुजून अतिरिक्त सरासरी आकारणी करण्याच्या वाईट उददेशाने मिटर नादुरुस्त आहे असा रेकार्ड तयार करुन अतिरिक्त आकारणी करीत आहे. ही गै.अ.नी अवलंबलेली अनुचित व्यापार पध्दती आहे व न्युनतापूर्ण सेवा आहे. त्यामुळे अर्जदाराने तक्रारीत गै.अ.नी पाठविलेले मार्च – 2011 चे 350/- रु., मे 2011 चे 730/- रु., जुलै -2011 चे 830/-रु., ऑगस्ट 2011 चे 870/-रु., सप्टेंबर-.2011 चे 970/-रु. व ऑक्टोंबर- 2011 चे 1050/-रु. बेकायदेशीर ठरविण्यात यावे. गै.अ.यांनी या बेकायदेशीर व थकबाकी करीता विज पुरवठा खंडीत करु नये असा आदेश गै.अ.विरुध्द पारीत करण्यात यावा. तसेच अर्जदारास झालेल्या व होत असलेल्या शारिरीक मानसिक ञासापोटी रु.10,000/- आणि केसच्या खर्चापोटी रु.5,000/- गै.अ. वर लादण्यात यावा अशी मागणी तक्रारीत केली आहे. 5. तक्रारीसोबत अर्जदाराने नि. 4 नुसार 12 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. तसेच अंतरिम आदेशाचा अर्ज IR/20/2011 प्रमाणे दाखल केला. तक्रार नोंदणी करुन गै.अ.स शो-कॉज नोटीस काढण्यात आले. गै.अ.हजर होवून नि. 12 प्रमाणे अंतरिम अर्जाचे उत्तर व लेखीबयान दाखल केला.
6. गै.अ.यांनी आपले लेखीउत्तर नि. 12 मध्ये कथन केले की, अर्जदाराने केलेली मागणी खोटया कथनाच्या आधारावर असून ती पूर्णतः खोटी आहे. अर्जदारास तक्रार दाखल करण्यास कसलेही कारण उरलेले नाही म्हणून अर्जदाराने अ, ब, क, ड, इ, ई नुसार केलेली मागणी खारीज होण्यास पाञ आहे.
7. गै.अ.ने लेखीउत्तरात पुढे असेही नमुद केले की, यात वाद नाही की, अर्जदाराने गै.अ.कडे मे-1999 मध्ये घरघुती प्रर्वगातील विज कनेक्शन मिळण्याकरीता अर्ज सादर केला. अर्जदाराकडून नविन विज कनेक्शन करीता आवश्यक बाबींची पूर्तता करुन घेतल्यानंतर गै.अ.ने अर्जदारास दि.15/05/1999 रोजी विज कनेक्शन क्रं. 455125000328 डीएल 167 लावून दिले. हे म्हणणे साफ खोटे म्हणून नाकबूल की, जर नादुरुस्त असेल तरीही अर्जदाराचा विज वापर फारच अल्पसा आहे. हे म्हणणे साफ खोटे म्हणून नाकबुल की यामुळे गै.अ.चे नियमानुसार अर्जदाराला कमीतकमी 30/- रु. अशी विज आकारणी व्हायला पाहिजे. गै.अ.यांनी अवलंबलेली अनुचित व्यापार पध्दती आहे, व अर्जदारास दिलेली न्यूनतापूर्ण सेवा आहे हे म्हणणे साफ खोटे असून नाकबूल आहे.
8. गै.अ.यांनी लेखीउत्तरातील विशेष कथनात असे नमुद केली की, कोणत्याही विज ग्राहकाने मिटर संबंधी किंवा जास्त रक्कमेच्या आलेल्या बिलाची तक्रार गै.अ.कडे केल्यावर गै.अ.याला चौकशी करावी लागते. मौक्यावर जावून अर्जदाराच्या कडे विज वापराची तसेच मिटर योग्य स्थितीत आहे किंवा नाही याची तपासणी करावी लागते. तपासणी झाल्यावर कोणत्याही ग्राहकाने केलेल्या तक्रारीचे निरासरण करावे लागते. गै.अ. याने अर्जदाराकडील मिटर नादुरुस्त असल्यामुळे त्याचे ठिकाणी नविन मिटर बसवून दिले. सदर मिटर बदलवून दिल्यानंतर गै.अ.ने अर्जदाराच्या वापरानुसारच आकारणी केलेले विज बिल अर्जदारास पाठविले आहे. अर्जदाराने केलेल्या दि.13/01/2012 चे विनंतीनुसार अर्जदाराकडे जावून मिटरची योग्य तपासणी करुन तसेच अर्जदाराचा असलेला वापर याची नोंद घेवून अर्जदाराला सुधारीत बिल दिले. गै.अ.ने अर्जदारास दिलेल्या सुधारीत बिलाची झेरॉक्स प्रत तसेच गै.अ.ने केलेल्या नोंदीची झेरॉक्स प्रत दि.17/01/2012 रोजी दाखल केलेली आहे. त्यामुळे अर्जदाराला हि तक्रार पुढे चालविण्याचे काहीही एक कारण उरलेले नाही. करीता अर्जदाराने दाखल केलेली ही तक्रार गै.अ.विरुध्द खारीज होण्यास पाञ आहे. 9. गै.अ.यांनी नि. 11 च्या पुरसीस नुसार 2 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराने तक्रारीच्या कथनापृष्ठार्थ पुरावा शपथपञ नि. 13 वर दाखल. गै.अ.यांनी दाखल केलेला लेखीउत्तर हेच पुरावा शपथपञ समजण्यात यावे अशी पुरसीस नि. 14 वर दाखल केला. अर्जदाराने नि. 16 नुसार 4 झेरॉक्स बिलाच्या प्रति दाखल केल्या आहे. 10. अर्जदार व गै.अ यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ तसेच उभयपक्षातर्फे वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. // कारणे व निष्कर्ष // 11. अर्जदाराने मे- 1999 मध्ये गै.अ कडून शेतातील घराकरीता घरघुती वापराचा विज पुरवठा मिळण्याकरीता अर्ज केला होता. त्यानुसार अर्जदाराने चौकशी करुन ग्राहक क्रं. 455125000338 डीएल 167 प्रमाणे जोडून दिला. अर्जदाराने घरघुती वापराकरीता घेतलेल्या विज पुरवठाच्या देयकाचा भरणा नियमित पणे केलेला आहे. अर्जदार यास गै.अ यांनी मिटर नादुरुस्त असल्याचे दाखवून दि.30/11/2010 ला 80/- रु. चे देयक दिले. गै.अ. यांनी मार्च -2011 चे देयक 100 युनिट विज वापराचे व त्यानंतर सरासरी 100 युनिट वापराचे देयक दिले. अर्जदाराने गै.अ. यास विज वापर कमी असून सरासरी 100 युनिट विज वापाराचे देयक दिल्यामुळे दि.03/10/2011 तसेच दि.08/03/2011 ला लेखी तक्रार दिलेल्या आहेत. अर्जदाराने त्याच्या प्रती अ-11 व अ- 12 वर दाखल केले आहे. गै.अ.यास दि. 25/04/2011 व 07/06/2011 ला सुध्दा मिटर नादुरुस्त असल्याबाबत लेखी तक्रार दिली त्याच्या प्रती अर्जदाराने नि. 4 च्या यादीतील दस्त अ – 9 व 10 वर दाखल केली आहे. गै.अ. यास अर्जदाराने लेखी तक्रार देवूनही त्याची दखल, गै.अ. यांनी घेतलेली नाही, आणि अर्जदाराने तक्रार दाखल केल्यानंतर चौकशी करुन बिल दुरुस्त करुन दिले आहे. त्यामुळे तक्रारीचे कारण उरलेले नाही त्यामुळे तक्रार खारीज करण्यात यावी असे कथन केले आहे, हे गै.अ.चे कथन गैर आहे. वास्तविक अर्जदार यास मिटर नादुरुस्त असुन मार्च -2011 ला दिलेल्या 100 युनिट, सरासरी वापराचे बिल हे योग्य नाही अशी तक्रार करुनही काहीच दखल घेतली नाही, ही गै.अ. यांच्या सेवेतील न्युनता असल्याची बाब सिध्द होतो. 12. गै.अ. यांनी पुरसीस नि. 11 नुसार दोन दस्ताऐवज दाखल केले. त्यातील ब- 1 चे अवलोकन केले असता मार्च- 2011 व मे- 2011 महिन्याला मिटर फॉल्टी दाखून 100 युनिट चे बिल दिले आहे. गै.अ. यांनी जुलै -2011 ते डिसेंबर -2011 या कालावधीतील बिल अर्जदारास दिले त्यात अर्जदाराचा अत्यल्प विज वापर दाखविला आहे, आणि मिटर फॉल्टी म्हणून दर्शविला आहे. गै.अ. यांनी बिल दुरुस्त करुन सुधारीत बिल 570/- रु.चे अर्जदारास पैसे भरण्याचे अखेरचा दिवस दि.18/01/2012 चे हस्तलिखित बिल दिले आहे. सदर दस्त - ब चे अवलोकन केले असता जुलै -2011 ते डिसेंबर-2011 या कालावधीचे एकूण बिलाची बेरीज केली असता 376.88 ऐवढी होतो. तरी गै.अ. यांनी 570/- रु. चे बिल अर्जदारास दिले. गै.अ. यांनी अर्जदारास दिलेल्या 570/- रु. बिलाचा हिशोब सुध्दा दिलेला नाही. यावरुन गै.अ. यांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला तसेच सेवा देण्यात न्युनता केली असे दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होतो.
13. गै.अ. यांनी अर्जदारास मार्च -2011, जुलै -2011, मे 2011 ला दिलेले बिल हे फॉल्टी म्हणून दाखविले असून स्थिर आकार 60/- रु. लावलेला आहे, जेव्हा की गै.अ. यांनी ब- 1 वर दाखल केलेल्या दस्ताऐवजात स्थिर आकार ऑगस्ट- 2011 पासून 30/- रु. लावलेला आहे. त्यामुळे स्थिर आकार हा 60/- रु आहे की, 30/- रु. आहे हे गै.अ. ने लेखीउत्तरात स्पष्ट केले नाही. तसेच उपलब्ध रेकॉर्डवरुन मार्च- 2011 चे चालु रिडींग मध्ये मिटर फॉल्टी दाखविलेले आहे. सदर बिलात मिटर क्रं. 9000487882 हे फॉल्टी असूनही जास्त युनिटचे बिल देण्यात आले. तसेच मे- 2011 च्या बिलामध्ये व्याज सुध्दा लावलेला आहे. त्यामुळे गै.अ. यांनी दिलेले बिल हे बेकायदेशीर असून ते रद्द होण्यास पाञ आहे. अशी अर्जदाराची मागणी मान्य करण्यास पाञ आहे. गै.अ. यांनी बिल योग्य नसल्यामुळेच ते तक्रार दाखल केल्यानंतर दुरुस्त करुन दिले परंतु तक्रार दाखल करण्याचे पूर्वी अर्जदाराच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केला. गै.अ.यांनी जुलै-2011 चे देयक नविन मिटर क्र.6109411132 चे रिडींग नुसार दिला. त्यात मिटरची रिडींग ही चालु मिटर रिडींग 5 युनिट दाखवून 4 युनिटचा बिल दिला. परत गै.अ.यांनी ऑगस्ट- 2011 च्या बिलात मिटर फॉल्टी दाखवून देयक दिले. अर्जदाराने दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन अर्जदाराचा विज वापर हा अत्यल्प कमी आहे असे दिसून येतो. परंतु गै.अ. यांनी चुकीचे देयक अर्जदारास दिलेले आहे. त्यामुळे ते बिल रद्द होण्यास पाञ आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
14. गै.अ. यांनी अर्जदाराकडे स्थळ निरिक्षण करुन सुधारीत देयक दिल्याचे आपले लेखी उत्तरात व विशेष कथनात कथन केलेले आहे. गै.अ. यांनी दि.13/01/2012 ला अर्जदाराच्या विनंतीवरुन तपासणी करुन सुधारीत बिल तयार केला व त्याची प्रत दि.17/01/2012 ला मंचात दाखल केली. सदर सुधारीत देयकात गै.अ. यांनी प्रोव्हिजनल बिल 570/- रु चा दिलेला आहे. परंतु त्याचे काहीही वर्णन दिलेले नाही. त्यामुळे गै.अ.त्याचे सविस्तर वर्णन अर्जदारास देण्यास जबाबदार आहे. अर्जदाराने अंतरिम आदेश मिळण्याचा अर्ज दाखल केला. सदर अर्ज दि.19/01/2012 ला निकाली काढण्यात आलेला असून 300/- रु. भरणा करण्याच्या अटीवर मंजुर करण्यात आला. अर्जदाराने अंतरिम आदेशानुसार भरणा केलेली रक्कम सुधारीत देयकातुन वजा करुन सविस्तर वर्णनाचे बिल गै.अ. देण्यास पाञ आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 15. गै.अ. यास अर्जदाराने तक्रार करुनही मौका चौकशी तक्रार दाखल करेपर्यंत केली नाही. अर्जदाराने लेखी तक्रार देवून सुध्दा त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अर्जदारास मानसिक, शारीरीक ञास सहन करावा लागला त्यामुळे गै.अ. नुकसान भरपाई देण्यास पाञ आहे या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 16. वरील कारणे व निष्कर्षावरुन गै.अ.यांनी सेवा देण्यात न्युनता केली असून दिलेले देयक बेकायदेशीर असल्यामुळे रद्द होण्यास पाञ आहे या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने तक्रार अंशतः मंजुर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश // (1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर (2) गै.अ.ने दिलेले विज देयक मार्च- 2011 ते ऑक्टोंबर- 2011 चे सर्व देयक रद्द करण्यात येते आहे. (3) गै.अ.ने या कालावधीतील सुधारीत देयक कोणतेही व्याज, दंड शुल्क न आकारता सविस्तर वर्णनासह, भरणा केलेली रक्कम वजा करुन अर्जदारास आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत यावे. (4) गै.अ.यांनी अर्जदारास शारिरीक व मानसिक ञासापोटी रु.500/तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु.500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत दयावे. (5) सर्व पक्षांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी चंद्रपूर, दिनांक : 16/03/2012. |