::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- ०८/१२/२०१५ )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
१ अर्जदाराने तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदार ही तुकूम येथिल कायमची रहिवासी आहे. सन २००२ मध्ये गुलमोहर अर्पाटमेंट मध्ये त्यांच्या परिवारसह निर्वाह करण्याकरीता ‘’ शालिनी कलेक्शन अॅन्ड जनरल स्टोअर्स’’ या नावाने स्वंयरोजगार सुरु केले. व आपले परिवाराचे पालनपोषन करीत होते व आहे. अर्जदाराचे पती दि. १०.०७.२०१३ रोजी मरण पावले. पतीचे मृत्यु नंतर सदर दुकानावर अर्जदाराचे बाई स्वतःचे व आपले मुलाचे भरण पोषण करीत होते व आहे. गैरअर्जदाराकडून अर्जदाराने दि. १७.०१.२००२ रोजी मिटर घेतले व अर्जदाराने विज मिटर घेतल्यापासून नियमित देयकाचा भरणा केलेला आहे. अर्जदाराने दि. २९.०५.२०१४ पर्यंत देयकाचे भरणा केलेला आहे व अर्जदाराचे विज वापराचे इतिहास बघीतल्यावर स्पष्ट होते कि, अर्जदाराचा विज वापर ५० युनिटच्या आत आहे. गैरअर्जदाराने दि. २८.०५.२०१४ रोजीचे ४४ युनिटचे वापराचे देयकामध्ये थकबाकी रकम रु. १४,५००/- दाखविलेली आहे. अर्जदाराला सदर देयक मान्य नसल्याने दि. १४.०७.२०१४ रोजी गैरअर्जदाराला लेखी अर्ज देवून, देयक कमी करुन देण्यास विनंती केली. सदर देयक अर्जावर गैरअर्जदाराने दखल न घेता दि. २८.०७.२०१४ चे देयकामध्ये विवादित रक्क्म देयक पाठविले. गैरअर्जदाराने दि. ०६.०८.२०१४ रोजीचे पञ अवलोकन केले अर्जदाराचे लक्षात आले कि, दि.०३.०६.२०१० ची रिकव्हरी दाखविली आहे. जर अर्जदारावर सदर रिकव्हरी निघत असेल तर गैरअर्जदाराने सदर रिकव्हरी तिन वर्षाचे आत करायला पाहिजे होती. गैरअर्जदाराने दि. ०३.०६.२०१० ते ०३.०६.२०१३ पर्यंत सदर विवादित रकमेची कोणतीही मागणी केली नाही किंवा वसुली करण्याकरीता कोणतीही कार्यवाही केली नाही. सदर मागणी मुदतीच्या बाहेर असून कोणताही नोटीस न देता अर्जदाराचा विज पुरवठा बेकायदेशिर खंडीत केलेला आहे. गैरअर्जदाराचे फिरते पथकांनी अर्जदाराचे मिटरची पाहणी करायला आले नाही. अर्जदाराने रिडींग प्रमाणे देयकाची भरणामध्ये कधीही कसूर केलेला नाही. असे असतांना सुध्दा गैरअर्जदाराने दि. ०३.०९.२०१४ रोजी अर्जदाराचा विज पुरवठा बेकायदेशिर खंडीत केलेला आहे. गैरअर्जदाराने दि. २८.०६.२०१४ चे देयकांमध्ये थकबाकी म्हणून जोडलेले रक्कम रद्द होणे आवश्यक आहे व विज मिटर जोडणी करुन मिळणे आवश्यक आहे. गैरअर्जदाराने दि. ०६.०८.२०१४ चे पञ अर्जदाराला दिले व त्यानंतर दि. ०३.०९.२०१४ रोजी अर्जदाराचे विज पुरवठा खंडीत केले. या कृत्यामुळे अर्जदाराला आर्थिक व मानसिक, शारिरीक ञास सहन करावा लागला आहे म्हणून सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्यात आली आहे.
२. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने दि. २८.०५.२०१३ चे देयकामध्ये जोडलेली व मागणी केलेली थकबाकी रक्क्म रु. १४,५००/- रु. रद्द करावे व गैरअर्जदाराकडून खंडीत केलेला विज पुरवठा सूरु होईपर्यंत अर्जदाराला नुकसान भरपाई तसेच अर्जदाराला झालेले शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
३. अर्जदाराने तक्रारी सोबत अंतरीम अर्ज क्रं. २१/२०१४ दाखल केले आहे. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार मंचासमक्ष हजर होवून नि. क्रं. १२ वर त्यांचे अंतरीम अर्जावर लेखीउत्तर व लेखी बयाण दाखल केले. गैरअर्जदाराने त्यांच्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून व्यवसायीक हेतुकरीता विज पुरवठा घेतलेला आहे. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार विदयमान मंचासमक्ष चालु शकत नाही. अर्जदार यांनी तक्रारीत व अंतरीम अर्जात गैरअर्जदाराविरुध्द केलेले कथन, गैरअर्जदाराला नाकबुल आहे. गैरअर्जदाराने लेखी जवाबात विशेष कथनात असे नमुद केले आहे कि, दि. १७.०५.२०१० रोजी गैरअर्जदाराचे भरारी पथक यांनी अर्जदाराकडे असलेल्या मिटरची पाहणी केली. सदर चौकशी करतांना अर्जदाराकडे असलेला मिटर बंद स्थितीत आढळले तसेच पल्स सुध्दा बंद स्थितीत आढळले त्यामुळे भरारी पथकाने अर्जदाराचे मिटर बदली करण्याचे आणि मिटर बंद असल्याचे कारणाने विदयुत चार्जेस नियमाप्रमाणे वसूल करण्याचे सुचविले. सदर सुचने नुसार गैरअर्जदाराने अर्जदाराकडील बंद मिटर सदंर्भात अससेमेंट काढले परंतु सदर असेसमेंट रक्क्म त्यावेळेस अर्जदाराच्या देयकात जोडून देण्यात आली नव्हती. सदर बाब गैरअर्जदार कंपनीचे भरारी पथकाने गैरअर्जदाराचे कार्यालयात लक्षात आणून दिली तसेच इतर थकीत दाराचे स्टेटमेंट गैरअर्जदाराच्या कार्यालयात पाठविलेले आहे. त्यानुसार गैरअर्जदाराने जून २०१४ देयकामध्ये असेसमंटची रक्क्म जोडून अर्जदारास विज देयक देण्यात आले. अर्जदार सदर देयक भरण्यास जवाबदार आहे. जर सदर रकमेची भरणा करण्यात आली तर गैरअर्जदार कंपनीचे नुकसान होईल. गैरअर्जदाराकडे असलेला विज कनेक्शन व्यवसाय हेतुकरीता असल्याचे स्पष्ट होते. म्हणून अर्जदार हा ग्राहक या संज्ञेत मोडत नाही म्हणून तक्रार व अंतरीम अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावी अशी मागणी केली.
४. नि. क्रं. ०६ वर अर्जदार व गैरअर्जदाराचे तोंडी युक्तीवाद ऐकूण अंतरीम अर्जावर गैरअर्जदाराने अर्जदाराचा खंडीत केलेला विज पुरवठा अर्जदाराने गैरअर्जदाराकडे वादातील देयकाचे ५० टक्के रक्कम भरल्यानंतर पुर्ववत सुरु करावे असा आदेश मंचाने दि. १२.११.२०१४ रोजी पारीत केले व अंतरीम अर्ज क्रं. २१/२०१४ चे निकाल करण्यात आले.
५. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
१) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
२) गैरअर्जदाराने अर्जदराप्रति न्युनतम सेवा दर्शविलेली
आहे काय ? होय. .
३) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीची
अववलंबना केली आहे काय ? होय.
४) आदेश काय ? अंतीम आदेशा प्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १ बाबत ः-
६. अर्जदार ही स्वंयरोजगाराकरीता सूरु केलेल्या शालिनी कलेक्शन जनरल स्टोअर्स करीता दि. १८.०१.२००२ रोजी गैरअर्जदाराकडून विज मिटर घेतले होते व अर्जदाराचे ग्राहक क्रं. ४५००१०४६७६२० आहे. ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ कलम २ (ड) नमुद असलेले स्पष्टीकरण ‘’उपकलम १ मधील व्यापारीकरणाकरीता या तरतुदी एखादयाने उदर्निवाहासाठी स्वंय रोजगारासाठी, वस्तुची खरेदी केली असेल तर ती तो स्वतः वापरीत असेल तर अशा वस्तुचा होणार नाही ‘’.सदर प्रकरणात सुध्दा अर्जदाराने विज पुरवठा गैरअर्जदाराकडून स्वंय रोजगारासाठी घेतला होता ही बाब अर्जदाराच्या तक्रारीत नमुद आहे म्हणून गैरअर्जदाराने त्यांच्या बचाव पक्षात घेतलेला आक्षेप कि, अर्जदार हा ग्राहक संज्ञेत मोडत नाही ही बाब ग्राहय धरण्यासारखी नाही असे मंचाचे मत ठरले. अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडून स्वंयरोजगारासाठी विज पुरवठा घेतलेला आहे हे सिध्द झाले आहे म्हणून अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. २ व ३ बाबत ः-
७. गैरअर्जदाराने त्यांच्या जवाबात हे मान्य केलेले आहे कि, अर्जदाराचे मिटर दि. १७.०५.२०१० ला भरारी पथक यांनी पाहणी व चौकशी केल्यानंतर अर्जदाराला असेसमेंटची रक्कम त्यावेळेस देयकात जोडून देण्यात आलेली नव्हती. मंचाचे मताप्रमाणे गैरअर्जदाराला सदरहु असेसमेंटची रक्कम अर्जदाराला देणे आवश्यक होते परंतु गैरअर्जदाराने अर्जदाराकडून तशी कोणतीही देयकांमध्ये असेसमेंट करुन अतिरिक्त रक्कम अर्जदाराकडून सन २०१४ पर्यंत मागितली नाही ही बाब गैरअर्जदारातर्फै अर्जदाराप्रति न्युनतम सेवा दर्शवितो. मंचाचे मताप्रमाणे गैरअर्जदाराने तिन वर्षाची कालावधी संपल्यानंतर अर्जदाराकडून कोणतीही इतर रक्कम देयकांमध्ये समाविष्ट करुन घेण्याचे अधिकार नाही, तरी सुध्दा गैरअर्जदार कंपनीने अर्जदाराला सन २०१० ची रिकव्हरी सन २०१४ मध्ये देयकामध्ये समायोजित करुन अर्जदाराकडून मागणी केली व ती न भरल्यास अर्जदाराचे विज पुरवठा खंडीत केले ही बाब अर्जदाराप्रति न्युनतम सेवा आहे व अनुचित व्यवहार पध्दती आहे असे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. २ व ३ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. ४ बाबत ः-
८. अर्जदाराने किंवा गैरअर्जदाराने अंतरीम अर्ज क्रं. २१/२०१४ मध्ये झालेले आदेशाचे अन्वयाने अर्जदाराने वादातील देयकातील ५० टक्के रक्कम गैरअर्जदाराकडे भरली किंवा नाही व गैरअर्जदाराने सदरहु रक्कम भरल्यास अर्जदाराचे विज पुरवठा सुरु केले कि नाही याबाबत कोणतीही माहीती प्रकरणात अर्जदार व गैरअर्जदाराने दाखल केलेली नाही.
९. मुद्दा क्रं. १ ते ३ च्या विवेचनावरुन व नि. क्रं. ६ वर दि. १२.११.२०१४ ला केलेला मंचाने आदेशाच्या अन्वयाने मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
१. अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. गैरअर्जदाराने अर्जदाराचे खंडीत केलेला विज पुरवठा सुरु करुन दयावे.
३. गैरअर्जदाराने अर्जदाराला पाठविलेले दि. २८.०५.२०१४ रोजीचे
देयकामध्ये थकबाकी दर्शविलेली रक्कम रु. १४,५००/- रद्द करावी.
४. उभय पक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
५. उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - ०८/१२/२०१५