जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक : 188/2012 दाखल तारीख :15/12//2012
निकाल तारीख :13/05/2015
कालावधी :02वर्षे 04 म.28 दिवस
रुक्मीनबाई भ्र. गोविंद माने,
वय 40 वर्षे, धंदा घरकाम,
रा. मदनसुरी ता. निलंगा, जि. लातूर. ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) महाराष्ट्र शासन, द्वारा जिल्हाधिकारी,
जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर.
2) जिल्हा कृषी अधिकारी,
जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय,
प्रशासकीय इमारत , लातूर.
3) तालुका कृषी अधिकारी,
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, निलंगा,
ता्. निलंगा जिल्हा लातूर.
4) शाखा व्यवस्थापक,
डेक्कन इंशुरन्स अँड रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.
6 फरकडे बिल्डींग, बिग बाजारच्या पाठीमागे,
भानुदास नगर, आकाशवाणी चौक, जालना रोड,
औरंगाबाद.
5) विभागीय व्यवस्थापक,
न्यु इंडिया इंशुरन्स कपंनी, न्यु इंडिया इंशुरन्स बिल्डींग,
87, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001. ..... गैरअर्जदार
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
3) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड.प्रमोद एल.शिंदे.
गै.अ.क्र.2 ते 4 : स्वत:
गै.अ.क्र.5 तर्फे : अॅड.एस.जी.दिवाण.
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
अर्जदार श्रीमती रुक्मीनबाई गोविंद माने ही मौ. मदनसुरी ता. निलंगा जिल्हा लातूर येथील राहणारी असून ती मयत शेतकरी गोविंद त्र्यंबक माने यांची पत्नी आहे. अर्जदाराच्या पतीस मौ. मदनसुरी येथे गट क्र. 116/सी व 118/बी मध्ये शेतजमीन होती, अर्जदाराच्या पतीचा गैरअर्जदार क्र. 1 ते 5 यांच्याकडे महाराष्ट्र शासनाने ते शेतकरी असल्यामुळे त्यांचा शेतकरी अपघात विमा काढलेला आहे. अर्जदाराच्या पतीस जुन 2011 मध्ये गावातील मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने उजवे पायास चावा घेतला होता, कुत्रा चावल्यामुळे अर्जदाराच्या पतीस अंबाजोगाई व लातुर येथील दवाखान्यात उपचार घेतले होते. दवाखान्यात उपचार घेवुन दि. 27.11.2011 रोजी त्यांना घरी मौजे मदनसुरी येथे आणले असता त्याच दिवशी रात्री 10.00 वाजात कुत्रा चावल्याचा जास्तच त्रास झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यानंतर दुसरे दिवशी म्हणजे दि. 28.11.2011 रोजी अर्जदाराचा मुलगा तानाजी याने कासार शिरसी येथे पोलिस स्टेशन येथे आकस्मीक मृत्यू नोंद क्र. 32/11 कलम 147 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 नुसार आमस्मीक मृत्यूची नोंद घेण्यात आली. त्यानुसार सर्व पंचनामे करण्यात आले. अर्जदाराने दि. 16.03.2012 रोजी संपुर्ण कागदत्रासह गैरअर्जदार क्र. 3 यांचेकडे प्रस्ताव दाखल केला दि. 29.09.2012 रोजी गैरअर्जदार क्र. 2 यांनी दि. 19.10.2012 रोजी गैरअर्जदार क्र. 3 यांना विमा प्रस्ताव नाकारल्याच कळविले व अर्जदारास दि. 01.11.2012 रोजी मंडळ कृषी अधिकारी कासारसिरसी यांनी अर्जदाराचे मयत पतीच्या नावे पत्र देवुन प्रस्ताव मुदत बाहय झाला असल्यामुळे तो परत पाठवत असल्याचे कळवुन मुळ प्रस्ताव अर्जदाराकडे परत पाठवला. तरी गैरअर्जदार क्र. 1 ते 5 यांनी अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे. म्हणुन अर्जदारास रु. 1,00,000/-, 18 टक्के व्याजाने अपघाती तारखेपासुन दयावेत, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 25,000/- व अर्जाच्या खर्चापोटी रु. 5000/- देण्याचा आदेश पारित करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्र.3 तालुका कृषी अधिकारी यांनी सदरचा प्रस्ताव दि. 27.10.2011 रोजी अर्जदाराच्या पतीचा मृत्यू झाला असून, त्यांचा अपघात विम्याचा प्रस्ताव त्यांची पत्नी श्रीमती रुक्मीनबाई गोविंदराव माने यांनी आवक क्र. 473 दि. 16.03.2012 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय निलंगा येथे दाखल केलेला आहे. सदरील प्रस्ताव या कार्यालयाने वरिष्ठ कार्यालयात जावक क्र. 574 दि. 28.03.2012 रोजी सादर केलेला आहे व प्रस्ताव जा.क्र. 2070 दि. 03.04.2012 रोजी कंपनीस पाठविलेला आहे.
गैरअर्जदार क्र. 4 डेक्कन इंशुरन्स कंपनीने सदरचा प्रस्ताव मुदत बाहय असल्याचे कळवले आहे.
गैरअर्जदार क्र. च्या म्हणण्यानुसार डेक्कन इंशुरन्स कंपनीच्या लेटर क्र. 153401/JPA/2011 विमा कालावधी संपल्या नंतर 90 दिवसानंतर दावे स्विकारणे विमा कंपनीने नाकारले आहे.
गैरअर्जदार क्र. 5 विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार अर्जदाराचे कागदपत्र डेक्कन इंशुरन्स कंपनीकडे दि. 14.11.2011 च्या मध्यरात्री पर्यंत पोहचवाययास हवी होती मात्र 90 दिवसानंतर म्हणजेच 16.03.2012 रोजी सदरची कागदपत्रे मिळालेली आहेत. 90 दिवसानंतर कागदपत्रे मिळालेली आहेत, 90 दिवसानंतर कागदपत्रे मिळालेली असल्यामुळे सदरचा प्रस्ताव फेटाळण्यात यावा.
मुद्दे उत्तर
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय .
- काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. अर्जदाराच्या पतीची मौजे मदनसुरी येथे गट क्र. गट क्र. 116/सी व 118/बी मध्ये शेतजमीन आहे. म्हणुन तो शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत येणा-या लाभधारक आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून, अर्जदाराचे पतीस जुन 2011 मध्ये गावातील मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. कुत्रा चावल्यामुळे अर्जदाराच्या पतीवर अंबाजोगाई व लातूर येथील दवाखान्यात उपचार घेतले होते. दवाखान्यात उपचार घेऊन दि. 27.11.2011 रोजी त्यांना घरी मौजे मदनसुरी येथे आणले असता, त्याच दिवशी रात्री 10.00 वाजता कुत्रा चावल्याचा जास्तच त्रास झाल्यामुळे त्यांचे निधन झाले, अर्जदाराने सदरचा प्रस्ताव दि. 16.03.2012 रोजी संपुर्ण कागदपत्रासह गैरअर्जदार क्र. 3 कडे पाठवला होता वतो रितसर विमा कंपनीकडे गेला होता, काही त्रूटी आढळल्यामुळे परत त्या त्रूटींची पुर्तता करुन तो प्रस्ताव परत डेक्कन इंशुरन्स कंपनीकडे जाण्यास वेळ लागला, त्यामुळे अर्जदाराचा अर्ज विमा कंपनीने प्रस्ताव मुदत बाहय असल्यामुळे फेटाळला. मात्र प्रथमत: तो प्रस्ताव दि. 16.03.2012 रोजी मुदतीतच इंशुरन्स कंपनीकडे गेलेला असल्यामुळे अशा प्रकारचा प्रस्ताव प्रथमत: येवुन गेलेला आहे व त्यातील त्रूटीची कागदपत्रे मिळण्यास वेळ लागणार आहे, ही बाब विमा कंपनीस सुध्दा माहिती आहे. यावरुन विमा कंपनीस माहिती असतांना सुध्दा सदर प्रस्ताव परत करुन, प्रस्ताव 90 दिवसात आला नाही हे विमा कपंनीचे म्हणणे न्यायोचित वाटत नाही. ही गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत केलेली त्रूटी आहे. तसेच अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा अपघाती स्वरुपाचा आहे, तसे अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्र शवविच्छेदन अहवालात स्पष्ट नमुद केलेले आहे की, The Cause of death is cardio respiratory arrest secondary to dog bite, यावरुन सदरच्या शेतक-याचा मृत्यू अपघाती स्वरुपाचा आहे, अर्जदाराने प्रथमत: प्रस्तावाची कागदपत्र हे 90 दिवसाच्या आतच दिलेली असल्यामुळे गैरअर्जदार हा अर्जदारास विम्याचा लाभ देण्यास पात्र आहे. अर्जदाराचा अर्ज मंजुर करत आहोत. अर्जदारास विम्याची रक्कम रु. 1,00,000/- मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 3000/- व तक्रारीचे खर्चापोटीह रु. 2000/- देण्यात यावा.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्र. 5 विमा कंपनीने अर्जदाराच्या पतीच्या विमा दाव्याची रक्कम रु. 1,00,000/- , आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.
- गैरअर्जदार क्र. 5 यांनी आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न केल्यास, त्यावर तक्रार दाखल तारखे पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देणे बंधनकारक राहील.
- गैरअर्जदार क्र. 5 विमा कंपनीने , अर्जदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 3000/- व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु. 2000/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.
**//राजूरकर//**