::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये मा.सदस्या, किर्ती गाडगीळ (वैद्य)
१. सामनेवाले यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदार बाईचा वीज ग्राहक क्रमांक ४५००१०१०२७२९ असून सदर वीज कनेक्शन हे श्री. शिवकुमार भगत यांच्या नावे असून दिनांक २३.१२.२०१० रोजी ते मयत झाले. अर्जदार ही सदर वीज कनेक्शन वापरत असल्याने ती सामनेवाले यांचे ग्राहक आहे. अर्जदाराला सामनेवाले यांचेकडून माहे एप्रिल २०१४ ते जुलै २०१४ या कालावधीचे बिल हे वीज वापर १४६ युनिट मासिक वापर दाखवून ऐवरेज स्वरूपाचे दिले. अर्जदाराची तक्रार एप्रिल २०१४ ते जुलै २०१४ या चुकीच्या बिलाबाबतची आहे. दिनांक २८.०८.२०१४ चे ऐवरेज बिल रिडींग उपलब्ध नाही. म्हणुन १९० युनीट ऐवरेज वापर दाखवुन दिनांक १७.०७.२०१४ ते १७.०८.२०१४ या १ महिण्याच्या बिलाची रक्कम रुपये १८८०/- चे चुकीचे बिल अर्जदारास दिले. सदर बिलाची तक्रार अर्जदाराने तोंडी गैरअर्जदारकडे केली परंतु गैरअर्जदार यांनी रक्कम आधी भरा त्यानंतर पुढील बिलामध्ये दुरुस्ती करून मिळेल असे सांगितले. तसेच दिनांक २६.०९.२०१४ चे बिल सुध्दा ऐवरेज स्वरूपाचे असून रीडिंग उपलब्ध नाही म्हणून दिनांक १७.०९.२०१४ पर्यंत चे बिल रक्कम रु. ११२६/- चे चूकीची बिल गैरअर्जदारयांनी अर्जदारास दिले. तसेच दिनांक ०१.११.२०१४ चे देयकामध्ये गैरअर्जदारने मीटर फॉल्टी आहे ही बाब गैरअर्जदारने मान्य केली आहे.तसेच दिनांक १७.०१.२०१५ पासुन ते १७.०२.२०१५ यामध्ये मिटर रिडींग १४०६ व चालू मिटर रिडींग १५८४ वीज वापर १७८ युनिट यामध्ये सुद्धा थकबाकी रक्कम रु. १६,९३०/- चे बिल अर्जदाराला पाठवले. तसेच दिनांक १७.०४.२०१५ ते १७.०५.२०१५ चे ही रक्कम रु. २१,११०/- चे चुकीचे बिल गैरअर्जदारने अर्जदाराला पाठविले. सबब अर्जदाराने गैरअर्जदार यांना वकिलामार्फत नोटीस पाठवून आक्टोबर २०१४ ते जुन २०१५ या कालावधीचे सर्व बिल रद्द करून सुधारित बिल देण्याची विनंती केली, परंतु गैरअर्जदाराने अर्जदाराकडे थकीत बिल रक्कम रु. २१,१४३/- असे सांगुन १५ दिवसात बिल भरण्यास मुदत दिली. दिनांक १८.०७.२०१५ ते २८.०७.२०१५ मुदत देवुन देखील १५ दिवसाच्या आतच अर्जदाराचा विद्युत पुरवठा खंडित केला. सबब अर्जदाराने प्रस्तुत तक्रार गैरअर्जदार यांचे विरुध्द दाखल केलेली आहे, अर्जदारांची मागणी अशी आहे की गैरअर्जदारने पाठविलेले देयक माहे एप्रिल २०१४ पासुन पुढील दिनांक २७.०६.२०१५ पर्यंतच्या बिलाची रक्कम रु. ३५,३१०/- चुकीचे असल्याने सदर बिलात दुरुस्ती करून द्यावी तसेच गैरअर्जदार यांनी खंडीत केलेला वीज पुरवठा पूर्ववत करून द्यावा तसेच शारीरिक मानसिक खर्च देण्यात यावा.
३. गैरअर्जदाराने तक्रारीत उपस्थित होऊन प्राथमिक आक्षेप दाखल केला की अर्जदाराच्या नावाने सदर विवादीत विद्युत मिटर नसल्याने अर्जदार गैरअर्जदारची ग्राहक नाही. इतर सर्व कथन ना कबूल करुन गैरअर्जदार पुढे नमूद करतात की अर्जदाराच्या मीटरचे वाचन संगणकीय प्रणालीमध्ये नोंद होत नसल्यामुळे अर्जदाराला दिले जाणारे देयक सरासरी पद्धतीने दिले जाते. अर्जदाराचे माहे आक्टोबर २०१४ चे देयक सात महिन्यांची दिले गेले सदर देयकात रक्कम समायोजित करून दिली गेली. त्यानंतर अर्जदाराचे वीज मीटर बदलण्यात आले, अर्जदारांनी डिसेंबर २०१४ पासून वीज देयकाचा भरणा केला नाही त्यामुळे अर्जदाराकडे थकीत रक्कम वाढत गेली अर्जदाराच्या तक्रारीनुसार मीटर तपासून अहवाल अर्जदाराला दिला आहे. अर्जदाराच्या पतीचा मृत्यु २०१२ मध्ये झाला परंतु अर्जदाराने सदर वीज कनेक्शन तिच्या नावावर करुन घेतले नाही. सबब अर्जदार ही गैरअर्जदारची ग्राहक नाही. करीता तक्रार खारीज करण्यात यावी.
४. तक्रारदाराची तक्रार कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, गैरअर्जदार यांचे कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
१. तक्रारदार सामनेवाले यांचा ग्राहक आहे काय ? होय
२. सामनेवाले यांनी तक्रारदारास विज पुरवठा कराराप्रमाणे
सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब
तक्रारदार सिद्ध करतात काय ? होय
३. सामनेवाले तक्रारदारास नुकसानभरपाई अदा
करण्यास पात्र आहेत काय ? होय
४. आदेश ? अंशत: मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ :
५. गैरअर्जदार यांनी सर्वप्रथम मुद्दा उपस्थित केला की अर्जदार हि गैरअर्जदारची ग्राहक नाही. गैरअर्जदारांना हे मान्य आहे कि, अर्जदाराचे पतीचे नावाने सदर मीटर असून ते हयात नाही. गैरअर्जदार अर्जदाराच्या पतीच्या नावाने वीज जोडणी दिले असून ते अजूनही सुरू असून त्याचा वापर अर्जदार करीत आहे. तसेच वादग्रस्त बिलाच्या पूर्वी बिलाचा भरणा अर्जदाराने केलेला आहे व तो गैरअर्जदाराने स्वीकारला असल्यामुळे व अर्जदार विजेचा वापर करीत असल्यामुळे अर्जदार ही ग्राहक नाही हे गैरअर्जदारचे म्हणणे ग्राह्य धरण्यासारखे नाही. सबब मुद्दा क्र. १ चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र. २ व ३ :
६. अर्जदाराने तक्रारीत दाखल केलेल्या दस्तावेजाची अवलोकन केले असता असे दिसून येते की अर्जदाराने दिनांक २८.०८.२०१४ तसेच देयक दिनांक ०१.११.२०१४ व २९.११.२०१४ चे जुन्या मीटरचे विज देयक अदा केले आहे. परंतु अर्जदाराने तक्रारीत माहे एप्रिल २०१४ पासून ते जुलै २०१४ पर्यंत चे देयक गैरअर्जदारांनी चुकीची रीडिंग दिली असल्याने ती faulty मीटरची असल्याबाबत दिल्याने दुरुस्ती करून द्यावी अशी विनंती केली आहे. गैरअर्जदारांनी आपल्या लेखी उत्तरात असे मान्य केले आहे की, अर्जदाराचे वीज वापराचे युनिटची नोंद संगणकीय प्रणाली प्रमाणे गायब झाल्यावर अर्जदाराला माहे ऑक्टोबर २०१४ चे देयक ७ महिण्यांचे दिले गेलेले आहे. सदर देयकात अर्जदाराने सरासरी स्वरुपाची भरणा केलेली रक्कम समायोजीत करुन अर्जदाराला देयक दिले गेले. परंतु दस्ताऐवजाचे अवनोकन केले असता असे दिसून येते की ते तीन महिन्याची दिलेले आहे. गैरअर्जदारांनी जर अर्जदाराला प्रत्येक महिण्यांचे देयक दिनांक २८.०८.२०१४ प्रमाणे अदा केले असते. तर ते अर्जदाराने ते देयक भरले असते. अर्जदारांनी देयक भरलेले असल्यास बाकीचे अतिरीक्त युनिट विज देयकात दाखवुन सदर विज देयकाची मागणी करणे न्यायोचीत नाही. यावरुन गैरअर्जदाराने अर्जदाराला दिलेल्या सेवेत त्रुटी दिलेली आहे असे दिसून येत आहे. गैरअर्जदारांनी सामनेवाले यांना माहे एप्रील २०१४ ते जुलै २०१४ या कालावधीतील विज वापर १४६ युनीट प्रतिमाह असल्याबाबतची नोंद दिनांक २८.०८.२०१४ रोजी च्या देयकामधिल मागील विज वापर मध्ये नमुद आहे. तसेच माहे ऑगष्ट,सप्टेंबर, आक्टोबर व नोव्हेंबरमध्ये १९० प्रति युनिट सरासरी विज देयक वापरल्याबद्दल गैरअर्जदारांनी नोंद केलेली आहे. त्याप्रमाणे अर्जदाराचा विज वापर माहे जानेवारी २०१४ ते मार्च २०१४ पर्यंत असलेल्या सरासरी विज वापर युनिट प्रमाणे विज देयक अदा करण्यास तक्रारदार पात्र असल्याबाबत निष्कर्ष निघतो. त्यामुळे तक्रारदारांना सरासरी विज वापर युनिटचे देयक देवुन विज देयक अदा करण्याबाबत आदेशीत करणे न्यायोचित आहे. असे मंचाचे मत आहे. मे २०१६ मध्ये गैरअर्जदाराने अर्जदारास ९९ युनिटचे बिल दिलेले आहे. अर्जदारांनी दिनांक १६ सप्टेंबर २०१४ व २२ डिसेंबर २०१४ रोजी गैरअर्जदाराकडे रक्कम रु. १,८८१/- व रक्कम रु. ४,९३२/- अदा केली असुन मंचाच्या अंतरिम आदेशाप्रमाणे वादातील २० टक्के रक्कम अदा केली असुन पुढील देयके नियमीतपणे अदा केलेली आहे. यावरुन अर्जदाराने मंचाच्या अंतरिम आदेशाची पुर्तता केलेली असुन दिनांक १०.०३.२०१६ रोजी रक्कम रु. ७०६०/- थकीत विज देयक ३५,३१०/- पैकी २० टक्के रक्कम अदा केली आहे. गैरअर्जदारांनी दिनांक २७.०६.२०१५ रोजी थकीत रक्कम रु. ३५,३१०/- चे देयक अदा केले होते. त्यानंतर माहे जुन २०१५ पासुन पुढील देयके तक्रारदाराने अदा न केल्याबाबत आक्षेप नसल्याने तक्रारदाराने तक्रारीत केलेल्या विनंती प्रमाणे माहे एप्रील २०१४ ते जुन २०१५ पर्यंत तक्रारदारास सरासरी विज वापराप्रमाणे प्रतिमाह विज आकारणी करुन देयक वसुल करणे न्यायोचित आहे. असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी माहे एप्रील २०१४ ते जुन २०१५ पर्यंत प्रतिमाह सरासरी युनिट विज वापर केल्याबाबत निष्कर्ष मंचाने नोंदविल्याने सदर कालावधीतील देय विज देयकामधुन तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे दिनांक १६.०९.२०१४ रोजी रक्कम रु. १,८८१/-,दिनांक २२.१२.२०१४ रोजी रक्कम रु ४,९३२/- व दिनांक १०.०३.२०१६ रोजी रक्कम रु. ७०६०/- थकीत विज देयक ३५,३१०/- पैकी २० टक्के रक्कम अदा केली आहे. यावरुन तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे एकुण रक्कम रु. १३,८७३/- जमा केले असुन सदर रक्कम माहे एप्रील २०१४ ते जुन २०१५ पर्यंत प्रतिमाह सरासरी युनिटप्रमाणे देय असणा-या विज देयकातुन वजा करुन उर्वरीत रक्कम तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे जमा करणे न्यायोचीत आहे. असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्र. २ व ३ च्या विवेचनावरून मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. १४६/२०१५ अंशत: मान्य करण्यात येते.
२. सामनेवाले यांनी तक्रारदारास ग्राहक संरक्षण अधिनीयम तरतुदी प्रमाणे विज
पुरवठा कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यामध्ये कसुर केल्याची बाब जाहीर
करण्यात येते..
३. तक्रारदारांनी माहे एप्रील २०१४ ते जुन २०१५ पर्यंत प्रतिमाह सरासरी युनिट विज
वापर केल्याबाबत निष्कर्ष मंचाने नोंदविल्याने सदर कालावधीतील देय विज
देयकामधुन तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे दिनांक १६.०९.२०१४ रोजी रक्कम रु.
१,८८१/-,दिनांक २२.१२.२०१४ रोजी रक्कम रु ४,९३२/- व दिनांक १०.०३.२०१६
रोजी रक्कम रु. ७०६०/- थकीत विज देयक ३५,३१०/- पैकी २० टक्के रक्कम अदा
केली आहे. यावरुन तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे एकुण रक्कम रु. १३,८७३/-
जमा केले असुन सदर रक्कम माहे एप्रील २०१४ ते जुन २०१५ पर्यंत प्रतिमाह
माहे जानेवारी २०१४ ते मार्च २०१४ मधिल सरासरी युनिटप्रमाणे देय असणा-या
विज देयकातुन वजा करुन उर्वरीत रक्कमेचे देयक सामनेवाले यांनी तक्रारदारास
या आदेश प्राप्ती दिनांकापासुन ३० दिवसात द्यावे व तक्रारदारांनी सदर देयक
प्राप्ती नंतर पुढील ३० दिवसात सामनेवाले यांचेकडे अदा करावे. असे आदेश उभय
पक्षांना देण्यात येतात.
४. सामनेवाले यांनीतक्रारदारास मानसिक, शारीरीक त्रासापोटी व तक्रारखर्चापोटी
एकत्रित रक्कम रु. २०,०००/- या आदेश प्राप्ती दिनांकापासुन ३० दिवसात अदा
करावी.
५. सामनेवाले यांना विज ग्राहकास In Access व Faulty या वर्गवारीमध्ये विज देयक
अदा करण्यास व त्याची मागणी करण्यास ग्राहक संरक्षण अधिनीयम कलम १४
(फ) अन्वये पुनरावृत्ती करण्यास प्रतिबंध करण्यात येतो.
६. न्यायनिर्णयाची प्रत उभय पक्षाना तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती.कल्पना जांगडे श्रीमती. किर्ती गाडगीळ श्री.उमेश वि. जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष)