(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 21.01.2016)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायद्याचे कलम 14 सह 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
1. अर्जदाराचे घरी तळ मजल्याकरीता एक तर पहिल्या मजल्याकरीता दुसरे वीज कनेक्शन असून तळ मजल्यावरील वीज कनेक्शन अर्जदाराने दिनांक 9.9.1992 रोजी त्यावेळचे महामंडळाकडून कायदेशीर बाबींची पुर्तता करुन घेतले आहे. त्याचा ग्राहक क्रमांक 450010271296, डी एल – 4894 हा आहे. या वीज कनेक्शनकरीता गैरअर्जदाराकडून वेळोवेळी प्राप्त सर्व देयकांचा चुकारा अर्जदाराने नियमीतपणे केलेला आहे. मागील 7-8 वर्षापासून अर्जदाराचे ईमारीतीचा तळ मजला अर्जदार मुलाकडे हैद्राबाद येथे गेल्यामुळे रिकामा असून तळ मजल्यावरील ईमारतीमध्ये किरायेदार ठेवला नाही. अर्जदाराचा या मीटरचा वीज वापर फारच कमी असल्यामुळे कमीत-कमी आकाराचे देयक गैरअर्जदाराकडून येत आहे. अर्जदारास गैरअर्जदाराने दिनांक 20.9.2014 चे 2269 युनीट रुपये 26,600/- चे देयक प्राप्त झाले. अर्जदाराचे वतीने गौतम क्रिष्णप्रताप कोठारी यांनी गैरअर्जदाराकडे तोंडी तक्रार केली असता,गैरअर्जदाराने मीटर रिडरची चुक झाली असावी असे सांगून बिल भरु नका, मौका चौकशीकरतोअसेअर्जदारास सांगीतले. त्यानंतर अर्जदारास दिनांक 21.10.2014, 19.11.2014, 18.12.2014 व 21.1.2015चे अवास्तविक देयक गैरअर्जदाराकडून प्राप्त झाले. गैरअर्जदाराने दि.20.9.2014 चे देयकानंतर पाठविलेले वीज देयक हे कमी वीज वापराचे आहेत. त्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 18.2.2015 चे मीटर रिडींग इनएक्सेस शेरा मारलेले देयक पाठवीले. अर्जदाराचा कधीही 2000 यनीट वीज वापर नव्हता व नाही. यामुळे अर्जदाराने गैरअर्जदारास वीज मीटर तपासण्याकरीता विनंती केली त्यावेळी दिनांक 22.1.2015 रोजी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे रुपये 500/- चा भरणा मीटर टेस्टींगकरीता केला. गैरअर्जदाराने अर्जदाराचे मीटर समक्ष न मोजता दिनांक 5.2.2015 रोजी मीटर तपासल्याचा अहवाल दिनांक 24.2.2015 चे पञासोबत अर्जदारास पाठविला. या रिपोर्टमध्ये मीटरचा बि फ्रेज जळालेला आहे असे स्पष्ट नमूद असून सुध्दा मीटर चांगले आहे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे व वरील देयक रुपये 28,600/- व त्यावरील थकीत व्याज अशी एकूण रुपये 29,040/- भरणा करण्याचा तगादा लावत असून या कारणाकरीता वीज पुरवठा खंडीत करण्याची धमकी दिली आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदाराने अर्जदारास नियमीत मीटर वाचन घेवून नियमाप्रमाणे वीज देयक द्यावे व अर्जदारास पाठविलेले वरील देयके बेकायदेशीर ठरविण्यात यावे. तसेच अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदाराने सदर नोटीस मिळाल्यानंतर मंचात सदर प्रकरणात हजर झाले व गैरअर्जदाराने लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने तक्रारीत गैरअर्जदाराचेविरुध्द लावलेले आरोप खोटे असल्यामुळे नाकबूल केले आहे. गैरअर्जदाराने लेखीबयाणातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदार हा वादातील वीज पुरवठ्याचा वापर स्वतः करीत नाही. त्यामुळे अर्जदार सदर वीज वापराबद्दल काही सांगण्यास सक्षम नाही. माहे सप्टेंबर 2014 चे देयक वगळता दिले गेलेले सर्व देयक हे सरासरी वापरानुसार बरोबर दिल्या गेलेले आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराकडील वीज मीटर तपासणीकरीता पाठविले असता मीटर सुस्थितीत आढळून आले. गैरअर्जदाराने कसलीही अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला नसून योग्य ती सेवा पुरविली आहे. अर्जदार सदर वीज देयक भरण्यास जबाबदार असून, जर वीज देयकाचा भरणा केला नाही तर गैरअर्जदाराचे तसेच सार्वजनिक पैशाचे नुकसान होईल. तसेच अर्जदार स्वतः वीज वापर करीत नसल्यामुळे अर्जदारास सदर तक्रार दाखल करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. करीता अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
4. अर्जदार व गैरअर्जदाराचे तक्रार व जवाब, दस्ताऐवज, शपथपञ व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ? : होय
3) अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? :अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडून वीज पुरवठा घेतलेला आहे व त्याकरीता अर्जदार गैरअर्जदाराकडे वीज वापरानुसार नियमीतपणे देयकाचा भरणा करीत आहे. याबाबत दोन्ही पक्षाचा वाद नसल्याने अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. गैरअर्जदाराने त्याचे जबाबात असे मान्य केले आहे की, अर्जदाराला वादातील देयक सरासरी वीज आकारुन पाठविण्यात आलेले होते, तसेच अर्जदाराने दाखल निशाणी क्रमांक 4 वर दस्त क्रमांक अ-9 ची पडताळणी करतांना असे दिसले की, गैरअर्जदाराने अर्जदाराला पाठविलेले वीज देयकामध्ये चालु रिडींग ‘’ इनएक्सेस’’ दर्शविण्यात आलेले आहे त्याचा खुलासा गैरअर्जदाराने जबाबात किंवा शपथपञात केलेला नाही. जेंव्हा की, गैरअर्जदाराने अर्जदाराचे मीटरची तपासणी केली व सदरहू मीटर व्यवस्थित आढळले. अर्जदारांचे देयकामध्ये चालु रिडींग ‘’ इनएक्सेस’’ दाखवून कोणतेही कारण नसतांना अर्जदाराला सरासरी बील पाठविणे, ही बाब गैरअर्जदाराची अर्जदाराप्रती न्युनतमपूर्ण सेवा दर्शवीतो. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन अर्जदाराचे तक्रारीत खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतीम आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदाराने अर्जदाराला पाठविलेले देयक दिनांक 20.9.2014, 21.10.2014, 19.11.2014, 18.12.2014, 21.1.2015 व 18.2.2015 चे देयक रद्द करण्यात येते.
3) गैरर्जदाराने दिनांक 20.9.2014 ते 18.2.2015 कालावधीकरीता अर्जदाराचे वीज वापरानुसार सुधारीत देयक अर्जदाराला देण्यात यावे तसेच सदर कालावधीकरीता देयकांमध्ये अर्जदाराकडून घेतलेली रक्कम सुधारीत देयकात समाविष्ठ करुन सुधारीत देयक अर्जदाराला देण्यात यावे.
4) अर्जदाराने सुधारीत देयक व नियमीत देयकांचा भरणा गैरअर्जदाराकडे करावे.
5) उभय पक्षांनी आप-आपला तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
6) आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्य पाठविण्यात यावी.
7) सदर निकालपञाची प्रत संकेतस्थळावर टाकण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 21/1/2016