::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या
(पारीत दिनांक २३/०७/२०१८)
१. विरुध्द पक्ष यांनी, तक्रारकर्त्यास सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. तक्रारकर्ता हा शेतकरी असून त्याने वि.प. यांचेकडून निवासी वापराकरीता विद्युत मिटर घेतले आहे. तक्रारकर्त्याचे कुटूंब लहान असून त्याचा विजवापर उन्हाळयाचे एप्रिल व मे हे महिने वगळता सरासरी ५० ते ६० युनिट आहे. वि.प.ने तक्रारकर्त्याला जुलै – २०१५ मध्ये दिनांक २६/०६/२०१५ चे विजदेयक पाठविले. परंतु त्यात चालु विजमिटर रिडींग हे मागील रिडींगपेक्षा कमी दाखवून विजवापर हा ४६ युनिट दाखविला गेला. त्यामुळे तक्रारकर्त्याचे मुलाने दिनांक ८/७/२०१५ रोजी याबाबत वि.प.कडे तक्रार नोंदविली. यावर कोणतीही पुर्वसूचना व विजमीटर तपासणी अहवाल न देता वि.प.नी अचानकपणे फेबृवारी, २०१६मध्ये त्याचे जुने मीटर बदलून इलेक्ट्रॉनीक विजमीटर क्र ५८०४२९५८५५ बसवून दिले. मात्र यानंतर, तक्रारकर्त्याचा विजवापर कमी असूनही विजबिलात भरमसाठ वाढ झाली. तक्रारकर्त्याने मे,२०१६ च्या विजदेयकाचा भरणा दिनांक १०/०८/२०१६ रोजी केला. मात्र वि.प.ने यानंतर तक्रारकर्त्याला जुन,२०१६ चे ५८४ युनीट तर जुलै,२०१६मध्ये ३३३ युनीटचे विजदेयक दिले. मात्र सदर देयक अवाजवी जास्त असल्याने तक्रारकर्त्याचे मुलाने दि.१/०८/२०१६ रोजी विजमीटर सदोष असून ते तपासण्याबाबत वि.प.ला सूचित केले. यावर कोणतीही पुर्वसूचना व विजमीटर तपासणी अहवाल न देता वि.प.नी तक्रारकर्त्याचे अनुपस््थीतीत त्याचे जुने नादुरुस्त मीटर बदलून दुसरे विजमीटर क्र.६५०७६८२७५२ बसवून दिले. यानंतर वि.प.ने तक्रारकर्त्याला दि.३/११/२०१६ ला नोटीस पाठवून १५ दिवसांचे आंत सप््टेंबर, २०१६ चे विजदेयक दिनांक २३/०९/२०१६ची रक्कम रू१०,४२६.७५ भरण्याची सुचना केली. सदर विजदेयक अवास्तव असल्यामुळे तक्रारकर्त्याने वकीलामार्फत वि.प.ला दिनांक ३/११/२०१६रोजी नोटीस देवून सुधारीत देयकाची मागणी केली. परंतु त्याची दखल न घेता वि.प.ने, सदर नो्टीसला दिनांक १७/१२/२०१६ च्या दिलेल्या उत्तरात तक्रारकर्त्यावर उचीत कारवाईची धमकी दिली. अर्जदाराकडे सद्यस्थितीत असलेले विजमीटर क्र. ६५०७६८२७५२ देखील ऑक्टोबर, २०१६ पासून रीडिंग दर्शवीत नसून वि.प. हे तक्रारकर्त्याला सरासरी २१० युनीट विजवापर दर्शवून सरासरी देयके पाठवीत आहेत तक्रारकर्त्यास कोणतीही सूचना न देता ,मिटरचा पंचनामा न करता,तक्रारकर्त्याकडील मिटर सीलबंद न करता काढून नेले विरुद्ध पक्षांनी तक्रारकर्त्यास वादग्रस्त देयकाच्या रकमेकरिता तक्रार कर्त्याचा वीज पुरवठा खंडित करण्याची धमकी दिली आहे.
३. तक्रारकर्त्याचे माघारी त्याचे घरातील वीज मिटर बदलणे ,मिटरची तपासणी न करणे, बिघाड असलेले मिटर लावणे, चुकीचे वीज देयक देणे हि विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराप्रती पध्दती अवलंबवलेली अनुचित व्यापार पध्दती आहे तसेच सेवेत त्रृटी दिली. त्यामुळे तक्रारदाराने वि.प. यांच्या विरुध्द मंचा समक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे कि, तक्रारदाराला वि.प. यांनी दि. २३.०९.२०१६ चे रु.१०,४१०/-,दि.२६.१०.२०१६चे रु..११,९७०/- व दि.२३.१२.२०१६चे रु.१५,३१०/-चे वीजदेयक बेकायदेशीर ठरविण्यात यावे विरुद्ध पक्ष यांनी उपरोक्त बेकायदेशीर देयकाकरिता अथवा त्याचे थकबाकी करीता तक्रारर्त्याचा ग्राहक क्र ४६००६००००२१३ चा विजपुरवठा खंडित करू नये असा तक्रारकर्त्याकरिता व विरुद्ध पक्षा विरुद्ध आदेश पारित करावा, तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.४०,०००/- आणि तक्रार खर्चापोटी एकुण रक्कम रु. १०,०००/- वि.पक्ष यांनी तक्रारकर्त्यास देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केली.
४. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत होवुन विरुध्द पक्ष यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. वि.प हजर होऊन वि.प. त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले. वि.प. यांनी तक्रारीतील तक्रारदाराचे कथन नाकबुल करुन पुढे नमुद केले कि, वि.प. ने तक्रारकर्त्यास त्यांचे वापरानुसार विज देयके दिले असुन तक्रारदार सदर देयकाचा भरणा करण्यास जबाबदार आहे. वि.प.ने तक्रारकर्त्यास दि.२६/०६/२०१५ चे विजदेयक पाठविले तक्रारकर्त्याने मे,२०१६ च्या विजदेयकाचा भरणा दि.१०/०८/२०१६ रोजी विरूध्द पक्षाकडे केला. वि.प.यांनी जुन, २०१६ मध्ये ८५४ युनिटचे विजदेयक व जुलै,२०१६ मध्ये ३३३ युनिटचे विजदेयक तक्रारकर्त्यास पाठविले. परंतु तक्रारकर्त्याच्या मुलाने दि.१०/०८/२०१६ रोजी सदर मीटरमध्ये दोष असल्याने रिडींग जास्त दाखवीत असून मीटर तपासणीबाबतची सुचना वि.प.ला केली. वि.प.ने तक्रारकर्त्यास दि.३/११/२०१६ रोजी नोटीसपाठवून १५ दिवसांचे आत सप्टेंबर,२०१६चे दि२३/०९/२०१६ चे विजदेयक रक्कम रू.१०,४२६. चा भरणा करण्यांस सांगितले, या बाबी वादात नाही. तक्रारकर्त्याचे उर्वरीत कथन नाकबूल करून पुढे नमूद केले की तक्रारकर्त्याने जेंव्हा जेंव्हा मीटरबाबत तक्रार नोंदविली त्या त्या वेळी वि.प.ने त्याचे जुने मीटर बदलवून नवीन मिटर लावून दिलेले आहे. तक्रारकर्त्याच्या घरातील विजवापरानुसारच त्याला रिडींगनुसार विजदेयक देण्यांत आले आहे. वि.प.ने तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे निरसन करून नवीन मीटर क्र. ६५०७६८२७५२ लावल्यानंतरसुध्दा सप्टेंबर,२०१६मध्ये आलेले रिडींग समायोजीत करून एकुण विजवापर ११४ युनीट विजवापराचे व थकबाकी रक्कम रू.२६८८/- जोडून रू.१०,४१० चे विजदेयक देण्यांत आले होते. परंतु सदर विजदेयकाची रक्कम तक्रारकर्त्याने न भरल्यामुळे विलंब आकार रू.१२.७७ आकारून तक्रारकर्त्याला एकुण रू.१०,४२६.७५ थकीत रक्कम भरण्याची नोटीस वि.प.ने पाठविली. त्यानंतर वि.प.चे कर्मचारी तक्रारकर्त्याकडे मीटर रिडींग घेण्याकरीता गेले असता मीटर रिडींग प्राप्त न झाल्यामुळे नियमानुसार मागील ६ महिन्यांचे विजवापराचा विचार करून तक्रारकर्त्याला सरासरी विजवापराचे देयक देण्यांत आले. त्यामुळे सदर सरासरी विजदेयक वगळता त्यापुर्वीची विद्युत देयके मीटर रिडींगनुसारच देण्यांत आलेली असल्यामुळे तक्रारकर्त्याने त्यांचा भरणा करणे आवश्यक आहे परंतु तक्रारकर्ता ती भरण्यांस टाळाटाळ करीत आहे. विद्यमान मंचास सदर विजमीटरची तपासणी व्हावी असे वाटत असल्यांस त्याकरीता तक्रारकर्त्याने आवश्यक ते शुल्क जमा करून अर्ज केल्यांस वि.प. सदर मीटरची तपासणी तक्रारकर्त्यासमक्ष करून देण्यांस तयार आहेत. यापुर्वीचे विजमीटरची तपासणी करण्याकरीता तक्रारकर्त्याने कोणताही अर्ज वा तपासणी शुल्काचा भरणा वि.प.चे कार्यालयात केला नसल्यामुळे सदर मीटरची तपासणी करण्यांत आली नव्हती. त्यामुळे तक्रारकर्त्याला याबाबत आक्षेप घेण्याचा कोणताही अधिकार नाही. तक्रारकर्त्याच्या घरातील मीटरवर असलेला मंजूर भार व त्याच्याकडील विजवापर बघता तक्रारकर्त्याला देण्यांत आलेले विजदेयक हे विजवापराच्या नोंदविलेल्या मीटर रिडींगप्रमाणेच देण्यांत आलेले आहे. वि.प.ने तक्रारकर्त्यांस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही सबब तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज होण्यांस पात्र आहे.
५. तक्रारकर्त्याची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, तक्रारकर्ता यांचे तक्रार अर्जालाच लेखी युक्तिवाद समजण्यांत यावा अशी पुरसीस व वि.प. यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र तसेच तक्रारकर्ता व विरुद्धपक्ष यांचे तोंडी युक्तीवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
१. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
२. विरुद्ध पक्ष यांनी विज पुरवठा कराराप्रमाणे सेवासुविधा
पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारकर्ता सिद्ध करतात काय ? नाही
३. आदेश काय ? अंतीम आदेशानुसार
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ बाबत :-
६. तक्रारकर्त्याने निवासी वापराकरीता वि.प. यांचेकडुन विद्युत पुरवठा घेतला असुन सदर विद्युत मिटर हे तक्रारकर्त्याचे नावांने असुन त्याचा मीटर क्र.६५०७६८२७५२ असा आहे. याबाबत तक्रारकर्त्याने विज देयक दाखल केले आहेत. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्र. १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.च्या मुलाने दि.८/०७/२०१५रोजी विरूध्दपक्षाकडे अर्ज केला
मुद्दा क्र. २ बाबत :-
७.वि.प.ने तक्रारकर्त्यास दि.२६/०६/२०१५ चे विजदेयक पाठविले व तक्रारकर्त्याने मे,२०१६ च्या सदर विजदेयकाचा भरणा दि.१०/०८/२०१६ रोजी विरूध्द पक्षाकडे केला. वि.प.यांनी जुन,२०१६ मध्ये ८५४ युनिटचे विजदेयक व जुलै,२०१६ मध्ये ३३३ युनिटचे विजदेयक तक्रारकर्त्यास पाठविले. परंतु तक्रारकर्त्याच्या मुलाने दि.१०/०८/२०१६ रोजी सदर मीटरमध्ये दोष असल्याने रिडींग जास्त दाखवीत असून मीटर तपासणीबाबतची सुचना वि.प.ला केली. वि.प.ने तक्रारकर्त्यास दि.३/११/२०१६ रोजी नोटीस पाठवून १५ दिवसांचे आत सप्टेंबर,२०१६चे दि२३/०९/२०१६ चे विजदेयक रक्कम रू.१०,४२६.७५ चा भरणा करण्यांस सांगितले, तसेच तक्रारकर्त्याने जेंव्हा जेंव्हा मीटरबाबत तक्रार नोंदविली त्या त्या वेळी वि.प.ने दोनवेळा त्याचे जुने मीटर बदलवून नवीन इलेिक्ट्रक मीटर लावून दिलेले आहे या बाबी वि.प.नी आपल्या लेखी बयानामध्ये मान्य केल्या आहेत. तसेच तक्रारकर्त्यानेसुध्दा त्याचेकडे असलेले विजमीटर वि.प.नी बदलून नवीन इलेक्ट्रॉनीक मीटर लावून दिले असे तक्रारीत कथन केलेले आहे. मात्र विजमीटरची तपासणी करण्याकरीता तक्रारकर्त्याने कोणताही अर्ज वा तपासणी शुल्काचा भरणा वि.प.चे कार्यालयात केला नसल्यामुळे सदर मीटरची तपासणी करण्यांत आली नव्हती. त्यामुळे तक्रारकर्त्याला याबाबत आक्षेप घेण्याचा कोणताही अधिकार नाही असे वि.प.चे म्हणणे आहे. तक्रारकर्त्याने सदर मीटरतपासणीकरीता वि.प. यांच्याकडे आवश्यक शुल्काचा भरणा केला होता असे तक्रारकर्त्याचे म्हणणे नाही किंवा तसा शुल्क भरल्याचा दस्त तक्रारकर्त्याने दाखल केलेला नाही. त्यामुळे वि.प.चे म्हणणे की तक्रारकर्त्याने मीटर तपासणीकरीता आवश्यक शुल्काचा भरणा केला नाही ग्राहय धरण्यायोग्य आहे. त्यामुळे मंचाचे मते वि.प.ने तक्रारकर्त्यास कोणतीही सेवेत न्यूनता दिली नाही हे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देण्यांत येते. वि.प.ने आपल्या लेखी उत्तरात नमूद केलेले आहे की सदर लावलेले विजमीटर दोषयुक्त आहे व म्हणून त्याची तपासणी व्हावी असे तक्रारकर्त्यास वाटत असल्यांस त्याकरीता तक्रारकर्त्याने आवश्यक ते शुल्क जमा करून अर्ज केल्यांस वि.प. सदर मीटरची तपासणी तक्रारकर्त्यासमक्ष करून देण्यांस तयार आहेत. त्यामुळे नैसर्गीक न्यायतत्वाचा विचार करून असे निर्देश देण्यांत येतात की तक्रारकर्त्याने उपरोक्त मीटर तपासणीकरीता वि.प.कडे आवश्यक शुल्काचा भरणा करून इलेक्टि्रकल इन्स्पेक्टरकडून विजमीटर तपासून घ्यावे व सदर तपासणीमध्ये विजमीटर हे दोषयुक्त आढळून जास्त गतीने फिरत असल्याचे निदर्शनांस आल्यांस वि.प.नी तक्रारकर्त्याला सदर मीटर बदलवून द्यावे तसेच नवीन मीटरवरील पुढील तीन महिन्यांच्या सरासरी युनीट वापरानुसार संपूर्ण विवादीत कालावधीचे जुन,२०१५ते डिसेंबर,२०१६ या कालावधीचे सुधारीत विजदेयक तक्रारकर्त्यांस द्यावे तसेच देय रकमेची गणना करतांना,या कालावधीकरीता तक्रारकर्त्याने विजदेयकांपोटी भरणा केलेल्या रकमेचे समायोजन करण्यांत यावे, असे निर्देश देणे मंचाचे मते न्यायोचीत होईल.
मुद्दा क्र. ३ बाबत :-
८. मुद्दा क्र. १ व २ च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतिम आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. ८/२०१७ खारीज करण्यात येते. असे असले तरी नैसर्गीक न्यायतत्वानुसार तक्रारकर्त्याने उपरोक्त मीटर तपासणीकरीता वि.प.कडे आवश्यक शुल्काचा भरणा केल्यांस विरूध्द पक्षानी रक्कम भरल्याचे दिनांकापासून २० दिवसांचे आंत तक्रारकर्त्याकडील विजमीटर इलेक्टि्कल इन्स्पेक्टरकडून तपासून घ्यावे. सदर तपासणीमध्ये विजमीटर दोषयुक्त व जास्त गतीने फिरत असल्याचे निदर्शनांस आल्यांस वि.प.नी तक्रारकर्त्याला सदर मीटर बदलवून द्यावे तसेच नवीन मीटरवरील पुढील तीन महिन्यांच्या सरासरी युनीट वापरानुसार जुन,२०१५ ते डिसेंबर,२०१६ या संपूर्ण विवादीत कालावधीचे सुधारीत विजदेयक तक्रारकर्त्यांस द्यावे तसेच देय रकमेची गणना करतांना,या कालावधीकरीता तक्रारकर्त्याने विजदेयकांपोटी भरणा केलेल्या रकमेचे समायोजन करण्यांत यावे असे निर्देश उभय पक्षांस देण्यांत येतात.
२. उभय पक्षांनी आपआपला तक्रारीचा खर्च सहन करावा.
३. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष