::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 25/07/2019)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता याने विरुद्ध पक्ष यांचेकडून निवासी वापराकरिता विज कनेक्शन घेतले असून त्यांचा विज ग्राहक क्र. 450010191136 हा आहे तक्रारकर्त्याचे घरी दोन फॅन, दोन लाईट व बाहेर लावलेला एक लाईट आहे व ते फक्त त्याकरिताच विजेचा वापर करतो व वि.प. यांनी दिलेल्या विजदेयकाचा नियमित भरणा करतात वि. प. यांनी तक्रारकर्त्याला दिलेल्या उपरोक्त ग्राहक क्र.चे विजदेयकावर नेहमी चुकीच्या नावाचा उल्लेख केलेला आहे तक्रारकर्त्याचे नाव डब्ल्यू .जि.दर्शनवार (पूर्ण नाव वारलूजी गणपती दर्शनवार )असे असताना सुद्धा वि.प.वारंवार एस.जि. दर्शनवार या नावाने विज देयक पाठवितात .तक्रारकर्त्याने वि.प. यांचेकडे तक्रारकर्त्याचे नावात दुरुस्ती करण्याचे अनुषंगाने वारंवार तक्रार करूनसुद्धा वि.प.यांनी देयकावरील नावामध्ये कोणतीही दुरुस्ती आजपर्यंत केलेली नाही .वि.प. यांनी तक्रारकर्त्यास सातत्याने अनियमित विजदेयक पाठवली तरीसुद्धा तक्रारकर्त्याने सदर देयकांचा भरणा केला दि. 1/1/2018 रोजी वि. प. यांनी तक्रारकर्त्याला 49 युनिटकरीता रु. 9,930/- चे विजदेयक दिले तक्रारकर्त्याने सदर देयकाबाबत वि.प. यांचेकडे चौकशी केली असता वि.प. यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही . तक्रारकर्ता यांची आर्थिक परिस्थिती बिकट असतांना सुद्धा त्यांनी दि. 5.1.2018 रोजी रु.1080/- चा भरणा वि.प. यांचे कडे केला पुन्हा वि.प. यांनी दि. 30/1/2018 रोजी तक्रारकर्त्याला 36 युनिटकरिता रु. 9,490/- चे विजदेयक दिले सदर देयकाबाबत आधी विजदेयक भरा अन्यथा विजपुरवठा खंडित करण्यात येईल असे सांगितले वि.प.यांचे कर्मचारी तक्रारकर्त्याकडील दि. 30/1/2018चे विजदेयकाकरिता विजपुरवठा खंडित करण्याकरीता वारंवार येत असल्याने तक्रारकर्त्याने दि. 23/2/2018 रोजी रु.4,000/- चा सुद्धा भरणा केला तक्रारकर्त्याने वि. प. यांना विजपुरवठा खंडित करू नये याबाबत विनंती केली परंतु त्याचा काही उपयोग न झाल्याने तक्रारकर्त्याने त्याचे मुलामार्फत दि. 16/2/2018 रोजी वि.प. यांचेकडे लेखी विनंती करून विजवापर अत्यंत कमी असतांना सुद्धा विजदेयक अवास्तव का येतात याबाबत विचारणा केली परंतु वि.प. यांनी आजपर्यंत कोणतेही समाधानकारक उत्तर न देऊन तक्रारकर्त्याप्रती अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब करून सेवेत न्यूनता दिल्याने तक्रारकर्त्याने दि.1/3/2018 रोजी अधिवक्त्यामार्फत वि. प.यांना नोटीस पाठवली नोटीस प्राप्त होऊन सुद्धा वि.प.यांनि पुर्तता केली नाही.सबब तक्रारकर्त्याने मंचासमक्ष गैरअर्जदारा विरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की,विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्यास पाठवलेले दि. 30/11/2017 चे रु.1080/-, दि. 01/1/2018 चे रु.9,930/- व दि. 30/1/2018चे रु. 9,490/- चे विजदेयक बेकायदेशीर ठरवावे व तक्रारकर्त्याने वि. प. यांचे कडे भरणा केलेली रक्कम 18% द.सा.द.शे. दराने परत करण्याचा आदेश व्हावा तसेच तक्रारकर्त्याकरिता ग्राहक क्र. 450010191136 चा विजपुरवठा खंडित करू नये असा आदेश वि.प. यांना देण्यात यावा तसेच शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान-भरपाई रक्कम रू. 50,000/- व तक्रार खर्च रू.5,000/- वि.प यांनी तक्रारकर्त्यांला द्यावा असे आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
3. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करुन विरुद्धपक्षाविरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्ष हजर होवून त्यांनी दिनांक 25/4/2018 रोजी नि.क्र.25 वर आपले लेखी म्हणणे दाखल केले असून त्यामध्ये नमूद केले कि तक्रारकर्त्याकडे असलेल्या विजमिटरचा ग्राहक क्र.450010191136 हा असून सदर विजकनेक्शन हे निवासी वापराकरिता असल्याचे व वि.प. यांनी दि.1/1/2018 रोजी तक्रारकर्त्यास 49युनिटकरीता रु.9,930/-चे व दि.30/01/2018 रोजी 36 युनिटकरीता रु.9,490/-चे विजदेयक दिले होते या बाबी मान्य केल्या असून तक्रारीतील उर्वरीत कथन नाकबूल करून पुढे नमूद केले कि वादातील विजकनेक्शन हे तक्रारकर्त्याचे नावे नसून दि.22/7/1987पासून श्री एस.जि.दर्शनवार यांचे नावाने दिलेले होते व आहे त्यामुळे तक्रारकर्त्याचा वादग्रस्त विजकनेक्शन बाबत कोणताही संबद्ध नसल्याने तक्रारकर्ता हा वि. प. यांचा ग्राहक नाही त्यामुळे तक्रारकर्त्यास सदर विजकनेक्शन बाबत कोणतीही दाद मागण्याचा विद्यमान ग्राहक मंचासमक्ष अधिकार नाही. तक्रारकर्त्याने वि.प. यांचेकडे डब्लू .जि. दर्शनवार नावात दुरुस्ती करण्याकरीता अर्ज केला होता याबांबत एकही तक्रार अर्ज दाखल केला नाही तक्रारकर्ता यांना कोणताही अधिकार नसतांना सुद्धा तक्रार दाखल करून वि. मंचाची दिशाभूल करीत आहे व स्वच्छ हाताने विद्यमान मंचासमक्ष आलेला नाही या कारणास्तव सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे वि.प.यांनी आपला हक्क अबाधित ठेऊन पुढे नमूद केले कि.महा.विद्युत नियामक मंडळ यांच्या आदेशानुसार वि. प. यांनी वाणिज्यिक निर्णय 209 नुसार दि. 7/09/2013 रोजी सप्टे. 2013 ते फेब्रु.2014 च्या विजदेयकामध्ये विद्युत वापराप्रमाणे अतिरिक्त विजशुल्क आकारून हे शुल्क वसूल करण्याचे ठरविले व त्यानुसार वि.प.कंपनीने तयार केलेल्या अहवालावरून ग्राहक क्र. 45000510191136 असलेल्या ग्राहकाकडून सप्टे.2013 ते फेब्रु. 2014चे विज वापराप्रमाणे अतिरिक्त विज शुल्क आकारल्या गेले नव्हते त्यामुळे तक्रारकर्त्याने त्या कालावधीतील वापरलेल्या विज वापरानुसार शुल्क रु. 8,543.27/ -माहे डिसें. 2017च्या विजदेयकामध्ये हि रक्कम वापरलेल्या विज वापराच्या रकमेत जोडून रु.9,930/-चे देयक देण्यात आलेले आहे तक्रारकर्त्याने सदर शुल्काची रक्कम न भरल्यामुळे जाने.2018 मध्ये एकूण विज वापराच्या देयकामध्ये शुल्काची न भरलेली रक्कम जोडून जाने.2018 मध्ये रक्कम रु. 9,490/- चे देयक देण्यात आले आहे वि.प. हे तक्रारकर्त्याकडून कोणतीही अतिरिक्त रक्कम वसूल करीत नसून फक्त अतिरिक्त विज शुल्काची रक्कम जोडून विजदेयक दिले असून ते योग्य व बरोबर आहे वि. प. यांनी तक्रारकर्त्याप्रती कोणताही अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब करून न्युनतापूर्ण सेवा दिली नाही सबब सदर तक्रार खर्चासहित खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
4. तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपत्र, तक्रारअर्ज, दस्तावेज व रिजॉईंडर यातील मजकुरास तक्रारकर्त्याचा लेखीयुक्तीवाद समजण्यात यावे अशी नि.क्र.32 वर पुरसीस दाखल, तसेच विरूध्दपक्षाचे लेखीउत्तर, रिजॉईंडर, लेखीयुक्तीवाद आणि उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व विरूध्दपक्ष यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता विरूध्द पक्षांचा ग्राहक आहे काय ? : होय
2) विरूध्दपक्षाने तक्रारकर्त्याप्रति न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? : होय
3) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे
काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1बाबत ः-
5. तक्रारकर्त्याकडे असलेले विज कनेक्शन हे निवासी वापराकरिता दिले असून तक्रारकर्त्याचा विजग्राहक क्र. 450010191136 हा आहे याबाबत वाद नाही असे वि.प. यांनी आपले लेखी उत्तरामध्ये परि.क्र.3मध्ये नमूद केले आहे. सदर क्र.चे विज कनेक्शन तक्रारकर्ता वापरतात व विरुद्ध पक्ष यांनी दिलेल्या विजदेयकाचा भरणा करतात हे नि.क्र. 4वरील दाखल विजदेयकावरून स्पष्ट होते तसेच नि.क्र.29 वर असलेल्या दि. 30/07/2014 रोजीच्या अर्जानुसार तक्रारकर्त्याने वि.प. यांना विजदेयक हे वारलूजी गणपती दर्शनवार या नावाने देण्याकरिता अर्ज दिला होता परंतु वि.प. यांनी नावामध्ये दुरुस्ती केली नाही व सदर दि. 30/07/2014 चा अर्ज केल्याचे सुद्धा नाकारले नाही. त्यामुळे वि.प. यांनि घेतलेला आक्षेप कि तक्रारकर्त्याच्या नावात बदल असल्याने तक्रारकर्ता हा वि.प. यांचा ग्राहक नाही हि बाब ग्राह्य धरण्यायोग्य नाही. तक्रारकर्ता हे सदर विज कनेक्शन वापरतात व दिलेल्या देयकाचा भरणा करत असल्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 2(1)( डी) अन्वये तक्रारकर्ता हा वि.प. यांचा ग्राहक आहे हि बाब सिद्ध होत असल्याने मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. तक्रारकर्ता व विरुद्ध पक्ष यांचेमध्ये वि.प. यांनी दि. 30/11/2017 रोजी व त्यानंतरच्या विजदेयकांमध्ये अतिरिक्त विज शुल्क आकारून विज देयक दिल्याबाबत वाद आहे. तक्रारकर्त्याने निशाणी क्रमांक 4 वर दाखल केलेल्या दस्तावेजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की विरुद्ध पक्ष यांनी दस्त क्र.अ 9ते अ 11 या विजदेयकांमध्ये अतिरिक्त विजशुल्क आकारून तक्रारकर्त्यास अनुक्रमे रु.1,080/-,रु.9,930/- व रु.9,490/-चे विज देयक दिले वि.प. यांनी महाविद्युत नियामक मंडळ यांच्या आदेशानुसार वाणिज्यिक निर्णय 209 दि.7/1/2013नुसार विद्युत वापराप्रमाणे अतिरिक्त विजशुल्क सप्टे.2013 ते फेब्रु.2014 या कालावधीत आकारल्या गेले नसल्याने तक्रारकर्त्यास माहे.दिसे.2017च्या विजदेयकामध्ये रु. 8,543.27/- हे अतिरिक्त विजशुल्क जोडून रु. 9,930/-चे विजदेयक दिल्याचे नमूद केले आहे परंतु वि.प.यांनी विद्युत वापराप्रमाणे अतिरिक्त विजशुल्क आकारून इतरही ग्राहकांना विजदेयक देऊन त्यांचेकडून वसूल केल्याबाबत कोणताही दस्तावेज वा पुरावा दाखल केला नाही तसेच सदर विजदेयकांपैकी तक्रारकर्त्याने दि. 30/11/2017चे देयकाचा पूर्ण भरणा रु.1,080/- व दि. 1/1/2018चे रु. 9,930/-पैकी रु.1,080/- व दि. 30/1/2018 चे रु. 9,490/-पैकी रु.4,000/-चा भरणा वि.प.यांचेकडे केला. तक्रारकर्ता यांनी दिनांक 16/2/2018 रोजी सदर विजदेयकांची रक्कम जास्त असल्याने ती कमी करण्याबाबत वि.प.कडे अर्ज केला तसेच दि.1/3/2018 रोजी अधिवक्ता श्री ए.यु. कुल्लरवार मार्फत नोटीस पाठवून तक्रारकर्त्याकडे असलेल्या उपरोक्त विजग्राहक क्र.चा विजवापर कमी असताना सुद्धा विजदेयक अवास्तव का येतात याबाबत विचारणा करून सदर विजदेयक रद्द करणेबाबत मागणी केली वि.प. यांना सदर नोटीस प्राप्त होऊनसुद्धा वि. प. यांनी तक्रारकर्त्यास सदर विजदेयकांमध्ये लावलेल्या अतिरिक्त विज शुल्काबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही व नोटीसची पुर्तता सुद्धा केली नाही. सदर नोटीस दस्त क्र.अ 14वर दाखल आहे वरील बाबींवरून वी. प. यांनी तक्रारकर्त्यास अतिरिक्त विजशुल्क आकारून विजदेयक दिले व त्याबाबत विचारणा केली असता त्यावर कोणतेही स्पष्टीकरण न देऊन तक्रारकर्त्याप्रति न्युनतापूर्ण सेवा दिल्याचे सिध्द होते असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुद्ध पक्ष यांचेकडून उपरोक्त विजदेयकांमध्ये आकारलेले अतिरिक्त विजशुल्क रद्द करून मिळण्यांस व त्यामुळे झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यांस पात्र आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं.3 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र. 54/2018 अंशत:मंजूर करण्यात येते.
(2) विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचे दिनांक 30/11/2017, 01/01/2018, दिनांक 30/01/2018 चे विजदेयक रद्द करून तक्रारकर्त्याने अंतरीम आदेशानुसार भरलेल्या रकमेचे समायोजन करून सुधारित विजदेयक तक्रारकर्त्यास द्यावे व तक्रारकर्त्याने सदर विज देयकाचा भरणा करावा.
(3) विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रू.5,000/- व तक्रार खर्च रू.5,000/- द्यावा.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.