जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, भंडारा.
तक्रार दाखल दिनांकः 06/10/2015
आदेश पारित दिनांकः 14/09/2016
तक्रार क्रमांक. : 70/2015
तक्रारकर्ता : श्रीराम तुकाराम आंबेडारे,
वय – 63 वर्षे, धंदा – सेवानिवृत्त,
रा. गांधीनगर, ता.तुमसर जि. भंडारा.
-: विरुद्ध :-
विरुध्द पक्ष : 1) प्रशासक/अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळ कर्मचारी सहकारी
संस्था, म., राजीव गांधी चौक, भंडारा ता.जि.भंडारा
तक्रारकर्त्यातर्फे : अॅड.एम.जी.हरडे.
वि.प. : एकतर्फी
गणपूर्ती : श्री. मनोहर चिलबुले - अध्यक्ष.
श्री. एच. एम. पटेरीया - सदस्य.
श्री. मनोहर चिलबुले, अध्यक्ष यांचे आदेशांन्वये.
-// आ दे श //-
(पारित दिनांक – 14 सप्टेंबर, 2016)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
- . विरुध्द पक्ष महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळ कर्मचारी सहकारी संस्था मर्यादित,भंडारा ही भंडारा जिल्हयातील विदयुत कर्मचा-यांची सहकारी पत संस्था आहे. सदर संस्था सभासदर कर्मचा-यांकडून ठेवी स्विकारुन गरजू कर्मचा-यांना व्याजाने कर्ज देण्याचा व्यवसाय करते. या व्यवसायासाठी लागणारे भांडवल कर्मचा-यांच्या पगारातून दरमहा सभासद भाग भांडवलाची रक्कम कपात करुन निर्माण करते. इतर कर्मचा-यांप्रमाणे तक्रारकर्त्याकडून देखिल विरुध्द पक्षाने पगारातून सरळ कपातीद्वारे 1983 पासून 30/11/2010 रोजी निवृत्त होईपर्यंत दरमहा रुपये 100/-प्रमाणे भागभांडवलाची एकुण रक्कम रुपये 25,000/- कपात केली आहे.
सेवानिवृत्तीनंतर विरुध्द पक्षाकडे जमा असलेली भागभांडवलाची रक्कम परत करण्यासाठी दिनांक 9/12/2010 रोजी तक्रारकर्त्याने लेखी अर्ज दिला व त्यानंतर वारंवार भेटी घेवून पाठपुरावा केला. परंतु विरुध्द पक्षाने केवळ आश्वासन दिले मात्र रक्कम परत केली नाही. दिनांक 17/8/2015 रोजी तक्रारकर्त्याने पुन्हा विरुध्द पक्षाची भेट घेतली असता रक्कम परत देण्यास नकार दिला. म्हणुन दिनांक 18/8/2015 रोजी अधिवक्ता श्री एम.जी.हरडे यांचे मार्फत रजिस्टर्ड नोटीस पाठविली. सदर नोटीस मिळूनही विरुध्द पक्षाने पुर्तता केली नाही. म्हणुन विलंब माफीच्या अर्जासह तक्रारकर्त्याने सदरची तक्रार दाखल केली असून त्यांत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
1) वि.प.ने तक्रारकर्त्याची भागभांडवलाची रक्कम रुपये 25,000/- दिनांक 30/11/2016 पासून 18% व्याजासह देण्याचा आदेश व्हावा.
2) मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रुपये 20,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मिळावा.
तक्रारकर्त्याने तक्रारीच्या पृष्ट्यर्थ विरुध्द पक्षास पाठविलेले अर्ज, उपनिबंधक सहकारी संस्था यांना दिलेले पत्र, शेअर सर्टिफिकेटस, वकीलामार्फत पाठविलेली नोटीस, पोस्टाची पावती व पोचपावती इ. दस्तऐवज सादर केले आहेत.
- . तक्रारकर्त्याचा विलंब माफीचा अर्ज मंचाने दिनांक 6/10/2015 रोजी मंजुर केला. त्यानंतर तक्रारअर्जाची नोटीस विरुध्द पक्षाला पाठविण्यात आली. सदर नोटीस दिनांक 27/4/2016 रोजी मिळूनही विरुध्द पक्ष गैरहजर राहिल्याने त्यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा मंचाने दिनांक 1/9/2016 रोजी आदेश पारित केला.
- . तक्रारकर्त्याचे तक्रारीवरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यांत आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारणमिमांसा खालिलप्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) वि.प.ने न्यूनतापूर्ण व्यवहार केलेला आहे काय? – होय.
2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यांस पात्र आहे काय? - अंशतः
4) आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
- मुद्दा क्र.1 ते 3 बाबत – तक्रारकर्ता विरुध्द पक्ष संस्थेचा सभासद असून सदर संस्थेने तक्रारकर्त्याच्या पगारातून सरळ कपात केलेली भाग भांडवलाची रक्कम विरुध्द पक्षाकडे जमा असल्याचे विरुध्द पक्षाने संधी देवूनही नाकारलेले नाही. तक्रारकर्त्याने जरी तक्रारीत भागभांडवलाची रक्कम रुपये 25,000/- विरुध्द पक्षाकडे जमा असल्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्षात तक्रारीसोबत दस्त क्र.5/3 ते 5/10 प्रमाणे दाखल केलेल्या शेअर सर्टिफिकेट प्रमाणे प्रत्येकी रुपये 10/- चे 730 शेअर एकुण रुपये 7,300/- चे खरेदी केल्याचे सिध्द् होते. एकुण उपलब्ध पुराव्याप्रमाणे 730 शेअरची किंमत रुपये 7,300/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. मात्र तक्रारकर्त्याने दिनांक 9/12/2010 रोजीचे पत्र (दस्त क्र.5/2) आणि 18/8/2015 चे अधिवक्ता श्री एम.जी. हरडे यांचे मार्फत पाठविलेली नोटीस (दस्त क्र.5/11) प्राप्त होवूनही विरुध्द पक्ष संस्थेचा सभासद असलेल्या तक्रारकर्त्यास त्याच्या निवृत्तीनंतर देय असलेली सभासद भाग भांडवलाची रक्कम दिली नाही ही निश्चितच सेवेतील न्युनता आहे. म्हणुन तक्रारकर्ता वरील प्रमाणे 730 शेअरची रक्कम रुपये 7,300/- दिनांक 1/4/2011 पासुन (मागणी नंतर कारवाईसाठी लागणारा 3 महिन्यांचा कालावधी) प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याजासह मिळण्यास पात्र आहे.
म्हणुन मुद्दा क्र.1 ते 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
- आ दे श -
तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालील
तक्रार खालीलप्रमाणे अंशतः मंजुर करण्यात येते.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास 730 शेअरची रक्कम रुपये 7,300/- दिनांक
1/4/2011 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे.9% व्याजासह अदा
करावी.
- शारीरिक व मानसिक त्रासाबाबत रुपये 3,000/- व तक्रारखर्च रुपये
2,000/- दयावा.
- आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्य पुरवावी.
- प्रकरणाची ब व क प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.