::: नि का ल प ञ :::
(मंचाचे निर्णयान्वये श्री. मनोहर गो. चिलबुले मा. अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 12.07.2013)
1. तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये गैरअर्जदार यांच्या विरुध्द दाखल केली आहे.
2. संक्षेपाने तक्रार अशी आहे की, तक्रारदार तात्याजी पुरुषोत्तम चौधरी हा गै.अ.क्रं.1 व 2 या विज वितरकांचा घरगुती वापरासाठीचा विज ग्राहक असून त्याचा ग्राहक क्रं. 458150001966 आहे. तक्रारदार विज वापराप्रमाणे नियमित विज बिल भरीत आहे. माञ सप्टेंबर 2011 मध्ये गै.अ.क्रं 1 ने अर्जदारास रु. 12,000/- एवढे भरमसाठ विज बिल पाठविले. त्याची तक्रारकर्त्याने तक्रार केल्यावर गै.अ.यांनी विद्युत मिटर बदलविण्याचा सल्ला दिला. आणि बिलाच्या रक्कमेपैकी ¼ रक्कम रु. 3,000/- भरावयास सांगितली व तक्रारदाराने ती दि. 24/11/2011 ला भरली. आवश्यक पैसे भरल्यावर गै.अ.यांनी दि. 08/12/2011 रोजी जूना सदोष मिटर काढून नविन मिटर लावला.
3. त्यानंतरही गै.अ.ने सप्टेंबर 2011 च्या रक्कमेसह नोव्हेंबर 2011 चे रु.13,550/- चे तात्पुरते बिल दिले. गै.अ.ने दि. 11/02/2012 चे पञान्वये रु.14,855.60/- चे बिल दि. 25/02/2012 पर्यंत भरणा न केल्यास विजपुरवठा खंडीत करण्यात येईल असे कळविले. परंतु सप्टेंबर 2011 च्या बिलाबाबत काहीच स्पष्टीकरण दिले नाही. अशाप्रकारे गै.अ.ने सेवेत न्युनता आणली आणि अनुचित व्यापार पघ्दतीचा अवलंब केला म्हणून गै.अ.नी विद्युत पुरवठा खंडीत करण्याबाबत दिलेले दि.11/02/2012 रोजीचे पञ रद्द करावे, गै.अ.यांनी सदर पञान्वये रु.14,855/- ची केलेली मागणी गै.अ.नी परत घ्यावी आणि वरील रक्कमेकरीता अर्जदाराचा विजपुरवठा खंडीत करु नये असा आदेश होणेसाठी आणि गै.अ.नी तक्रारदाराकडून वसूल केलेले रु.3,000/- परत करण्याची मागणी केली आहे. तसेच मानसिक, शारिरीक ञासाबद्दल रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.10,000/- गै.अ.कडून मिळावा अशीही मागणी केली आहे.
4. गै.अ.क्रं. 1 व 2 यांनी नि.क्रं. 17 प्रमाणे तक्रार अर्जातील मागणी नाकारली आहे. त्याचे म्हणणे असे की, अर्जदाराचे घरी लावलेला मिटर बदलविण्यात आल्यावर त्याची तपासणी केली असता सदर मिटर 10 % जास्त गतीने चालत असल्याचे निर्दशनात आले. त्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2011 च्या रिडींग मधून 10% वापर वजा करुन आणि अर्जदाराने भरलेली ¼ रक्कम करुन Provisional Bill नि.क्रं. 5 दस्त क्रं.6 देण्यात आले. चौकशी अंती सुधारीत बिल नि.क्रं.5 सोबत दस्त क्रं. 8 प्रमाणे देण्यात आले. परंतु अर्जदाराने ते न भरल्यामुळे नि. क्रं. 5 सोबत दस्त क्रं. 1 नुसार नोटीस देण्यात आली. गै.अ.नी केलेली कार्यवाही न्याय्य असल्याने तक्रार अर्जात मागणी केलेली दाद मिळण्यास अर्जदार पाञ नाही.
5. तक्रार अर्ज व गै.अ.चे लेखी बयाणाचा विचार करता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) गै.अ.नी सेवेतील न्युनता अथवा अनुचित होय.
व्यापार पध्दती अवलंबिल्याचे निष्पन्न होते काय ?
2) तक्रारीचा अंतीम आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे मंजूर.
कारण मिमांसा :-
6. तक्रारकर्ता तात्याजी पुरुषोत्तम चौधरी यांनी आपली साक्ष शपथपञ नि. 19 प्रमाणे नोंदविली आहे. तसेच तक्रारीचे पृष्ठार्थ नि.क्रं. 5 सोबत 1) गै.अ.नी रु.14,855.60/- चे थकीत दि.11/02/2012 चे बिल भरावे अन्यथा विज पुरवठा बंद करण्यात येईल असे दिलेले सुचनापञ,
2) जून 11 चे बिल -- युनिट वापर 312 -- रु. 2850/-
3) जुलै 11 चे बिल -- युनिट वापर 165 -- रु. 3,660/- (थकबाकीसह)
4) सप्टेंबर 11 चे बिल -- युनिट वापर 1551 -- रु. 12,000/-(थकबाकीसह)
5) ऑक्टोंबर 11 चे बिल -- युनिट वापर(R.N.A.) 369 -- रु. 14,400/-(थकबाकीसह)
6) नोव्हेंबर 2011 चे बिल प्रोव्हिजनल -- रु. 13,550/-
7) डिसेंबर 2011 चे बिल -- युनिट वापर 509 -- रु. 20,200/- (थकबाकीसह)
8) जानेवारी 2012 चे बिल -- युनिट वापर
63+ समायोजित 158 युनिट वापर =221 युनिट(समायोजनासह) -- रु. 14,860/- दाखल केले आहेत.
7. गै.अ.नी त्यांचे लेखीबयाण नि.17 हाच त्यांचा शपथपञावरील पुरावा समजावा अशी पुरशीस नि.क्रं.20 प्रमाणे दिली असून कथनाचे पृष्ठार्थ नि.क्रं.18 सोबत 1) अर्जदाराचे मिटरचा टेस्टिंग रिपोर्ट व त्यावर आधारीत माहे सप्टें, ऑक्टो., नोव्हे. 2011 च्या Provisional बिलाचा हिशोब. 2) दि.14/11/2011 रोजी अर्जदाराचे घरी केलेल्या विज जोडभार सर्व्हेक्षणाचा अहवाल सादर केलेला आहे.
8. अर्जदाराचे अधि. श्री रामगिरवार यांनी युक्तीवाद केला की, विज जोडभार सर्व्हे. अहवाल नि.क्रं. 18 सोबतचा दस्त क्रं. 2 मध्ये अर्जदाराचे घरी 20 व्हॅटसचे 3 बल्ब, 1 फॅन, 1 रंगीत टी.व्ही., 1 फ्रिज एवढीच विज उपकरणे वापरीत आहेत. सदर उपकरणांच्या विज वापराचा माहे सप्टें. 2010 ते ऑगस्ट 2011 चा गोषवारा माहे सप्टें. 2011 च्या वादग्रस्त बिलात दिला आहे. या काळातील कमीत कमी मासीक विज वापर 42 युनिट आणि जास्तीत जास्त 312 युनिट दर्शविला असून सरासरी मासीक विज वापर 171.25 युनिट आहे. या काळात मिटर हळू चालत होता असे गै.अ.चे म्हणणे नाही. सप्टें. 2011 मध्ये एकाएकी 1551 युनिट विज वापराचे कोणतेही कारण घडले नाही. सप्टें. 2011 मध्ये मिटर जलद गतीने चालल्याने रिडींग जास्त दाखविले हे गै.अ.चे म्हणणे आहे. माञ सदर मिटर केवळ 10% जास्त वापर दाखवित होते याला कोणताही शास्ञीय आधार नाही. सप्टेंबर.2011 मध्ये मिटर नादुरुस्त झाले आणि ऑगस्ट 2011 च्या तुलनेत 12 पट वेगाने फिरल्याने ऑगस्ट 2011 च्या 12 पट अधिक विज बिल सप्टेंबर 2011 मध्ये देण्यात आले ते चुकीचे आहे. मिटर गै.अ.च्या मालकीचे व त्यांच्या नियंञणात असल्याने प्रत्यक्ष वापराप्रमाणे विज बिल आकारण्याची त्यांची जबाबदारी असतांना 12 पट विज वापर दाखवून त्यांनी सेवेत न्युनता आणली आहे आणि अशा चुकीच्या बिलाचा भरणा न केल्यास विजपुरवठा खंडीत करण्याची ताकीद देवून अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे. म्हणून सदोष मिटर रिडींग वर आधारीत बिलाची मागणी बेकायदेशिर ठरविणे आवश्यक आहे.
9. याउलट गै.अ.तर्फे अधि.श्री. पाचपोर यांचा युक्तीवाद असा की, माहे सप्टें. 2011 मध्ये 1551 युनिट विजवापरासाठी दस्ताऐवजाची यादी नि. 5 सोबतचे अ.क्रं. 4 हे रु.12,000/- चे बिल देण्यात आले. त्यावर अर्जदाराने हरकत घेतल्याने जुने मिटर काढून नविन मिटर बसविण्यात आले. तपासणीमध्ये जुने मिटर 10% जास्त वेगाने फिरत असल्याचे आढळून आल्यामुळे सप्टें. 2011, ऑक्टों. 2011 व नोव्हें. 2011 या तिन महिण्याचा हिशोब एकञ करुन त्यातुन 10% अधिक दाखविलेला विज वापर कमी करुन आणि अर्जदाराने भरणा केलेली ¼ रक्कम कमी करुन यादी नि. क्रं. 5 सोबतचे दस्त क्रं. 6 हे रु.13,550/- चे बिल देण्यात आले. परंतु तेही बिल व त्यानंतरचे नविन मिटर रिडींगचे बिल अर्जदाराने भरले नाही म्हणून सदर बिल भरणा करण्यासाठी दस्त क्रं. 1 ही नोटीस दिली असल्याने गै.अ.ची कारवाई कायद्यास अनुसरुन आहे व एकूण विज वापराची जानेवारी 2012 चे बिलप्रमाणे (दस्त क्रं. 8 रु.14,860/-) रक्कम वसूल करण्याचा गै.अ.कायदेशिर असल्याने तक्रार अर्ज खारीज होण्यास पाञ आहे.
10. तक्रारदार व गै.अ. यांनी दाखल केलेले दस्ताऐवज व त्यांचे तर्फे केलेला युक्तीवाद लक्षात घेता ऑगस्ट 2011 पर्यंत मिटर रिडींग योग्य होती व त्याबद्दल कोणताही वाद नव्हता. सप्टें. 2011 मध्ये 1551 युनिट, ऑक्टों. 2011 मध्ये 369 युनिट (रिडींग उपलब्ध नाही), नोव्हे. 2011 मध्ये 1025 युनिट आणि डिसेंबर मध्ये 509 युनिट असा 4 महीण्यात 3454 युनिट वापर दर्शविला आहे. तो सरासरी मासीक 863.5युनिट येतो. विजबिलातील गोषवा-यावरुन सप्टें.2010 ते ऑगस्ट 2011 काळातील सरासरी मासीक विज वापर 171.25 युनिट येतो. गै.अ.नी यादी नि. क्रं. 18 सोबत दस्त क्रं. 2 प्रमाणे अर्जदाराचे घरी असलेली विद्युत उपकरणे लक्षात घेता सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत नादुरुस्त मिटरने नोंदविलेला विजवापर हा मागील 12 महिण्याच्या सरासरीच्या 5 पटीहून अधिक आहे. प्रतिवादींच्या म्हणण्याप्रमाणे जूने मिटर सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत केवळ 10% जलद चालत होते, परंतु त्याबाबतचा लेबॉरेटरी टेस्ट रिपोर्ट दाखल नाही, तसेच या काळात विजवापर एकाएकी 5 पटीने वाढण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण गै.अ.नी दाखविलेले नाही.
11. वरील सर्व बाबींचा विचार करता मंच अशा निष्कर्षाप्रत आले आहे की, माहे सप्टेंबर मध्ये जून्या मिटरमध्ये तांञिक बिघाड झाल्याने अवास्तव मिटर रिडींग दर्शविलेली आहे व म्हणून सदर मिटर रिडींग प्रमाणे दर्शविलेली माहे. सप्टें., ऑक्टों., नोव्हे. 2011 ची मिटर रिडींग व त्यानुसार नोव्हे. 2011 मध्ये दिलेले बिल रु.13,550/- (यादी नि.5 दस्त क्रं. 6) आणि त्यापुढे सदर बिलाची थकबाकी दर्शवून माहे डिसेंबर 11 व जानेवारी 2012 चे अनुक्रमे रु. 20,220/- व रु.14,860/- ची मागणी करणारे बिल (दस्त क्रं.7 व 8) हे चूकीचे आहेत. तसेच रु.14,860/- चे बिलाचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडीत करण्याची दि.11/02/2012 ची नोटीस (यादी नि.5, दस्त क्रं. 1) ही देखील चुकीच्या मागणीवर आधारीत असल्याने बेकायदेशिर आहे. वरील प्रमाणे अवास्तव विज बिल व सदर बिलाचा भरणा न केल्यास विज पुरवठा खंडीत करण्याची ताकीद ही विद्युत पुरवठादार असलेल्या गै.अ.क्रं. 1 व 2 यांनी अनुसरलेली सेवेतील न्युनता तसेच अनुचित व्यापार पध्दती असून सदर बिल वसुलीस गै.अ.यांना प्रतिबंध करण्यास आणि सदर बिलांची अवास्तव रक्कम न भरल्यास गै.अ.नी अर्जदाराचा विज पुरवठा खंडीत करु नये असा आदेश मिळण्यास अर्जदार पाञ आहे.
12. असे असले तरी अर्जदाराने केलेल्या विजवापराचे योग्य बिल देणे आवश्यक आहे म्हणून माहे सप्टेंबर 2011, ऑक्टोंबर 2011, नोव्हेंबर 2011 व डिसेंबर 2011 या कालावधीचा सरासरी विज वापर मागील 12 महिण्याचे सरासरी ऐवढा दरमहा 171.25 युनिट आकारुन गै.अ.ने मिटर नादुरुस्तीच्या वरील कालावधीतील बिल तयार करावे व ते बिल आणि नविन मिटर रिडींग प्रमाणे येणारे बिल यातुन अर्जदाराने वेळोवेळी भरणा केलेली रक्कम वजा करुन बिलाची आकारणी करावी आणि अर्जदाराने दिलेली रक्कम वरील प्रमाणे नविन बिलापेक्षा जास्त असल्यास ती पुढील बिलात समायोजित करावी असा आदेश करणे न्यायोचित होईल.
13. वरील कारणांवरुन मंच खालील प्रमाणे आदेश परीत करीत आहे.
अंतिम आदेश
अर्जदाराचा तक्रार अर्ज खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे.
1) गै.अ.ने माहे सप्टेंबर 2011, ऑक्टोंबर 2011, नोव्हेंबर व डिसेंबर 2011 चे
अर्जदारास दिलेले विजबिल चुकीचे असल्याने ते वसुलीची कारवाई करु
नये. तसेच सदर बिल वसुली साठी दिलेल्या दि. 11/02/2013 च्या
सुचना पञात नमुद केल्याप्रमाणे वरील बिलापोटी रु.14855.60/- भरणा
केला नाही म्हणून अर्जदाराचा पुरवठा खंडीत करु नये.
2) माहे सप्टेंबर 2011 ते डिसेंबर 2011 या कालावधीतील जून्या नादुरुस्त
मिटर प्रमाणे आकारलेले विज बिल रद्द करण्यात येत असल्याने सदर
कालावधीसाठी मागील 12 महिण्याच्या सरासरी ऐवढे म्हणजे दरमहा
171.25 युनिट याप्रमाणे बिलाची आकारणी करावी व त्यानंतर नविन
मिटर प्रमाणे आकारणी करावी.
3) अर्जदाराने सप्टेंबर 2011 पासून बिलापोटी दिलेल्या रकमा नविन बिलात
समायोजित कराव्या व अशी रक्कम नविन बिलापेक्षा अधिक असल्यास
ती पुढे देय होणा-या बिलात समायोजित करावी. अर्जदाराने नविन
बिलाप्रमाणे देय असलेली रक्कम बिल मिळाल्यापासुन 15 दिवसांचे
आत भरणा करावी.
4) सदरच्या प्रकरणाचा खर्च रु. 1,000/- गै.अ.नी अर्जदारास एक महिण्याचे आत द्यावा.
6) निकालपञाच्या प्रति सर्व संबंधीत पक्षांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
चंद्रपूर,
दिनांक : 12/07/2013.