SHRIDHAR SHANKAR SUBHEDAR filed a consumer case on 29 Sep 2015 against MAHARASHTRA RAJYA VIDUT VITARAN COMPANY in the Satara Consumer Court. The case no is CC/12/132 and the judgment uploaded on 27 Oct 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
मा.श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 132/2012.
तक्रार दाखल ता.14-8-2012.
तक्रार निकाली ता.29-9-2015.
श्री.श्रीधर शंकर सुभेदार,
रा.शाहुपुरी सातारा. ता.जि.सातारा.
सध्या रा.30 कृष्णभवन को.ऑप.हौसिंग सोसायटी,
तेरणा हॉस्पिटल गार्डन समोर,
प्लॉट नं.12 व 14, सेक्टर 12, रोड नं.1,
न्यू पनवेल, जि.रायगड ....तक्रारदार.
विरुध्द
1. उपकार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.मर्या.
सातारा शहर उपविभाग, प्रतापगंज पेठ,
सातारा.
2. अधिक्षक अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. मर्या.
कृष्णानगर, सातारा. ..... जाबदार.
तक्रारदारतर्फे – अँड.डी.वाय.मुतालिक.
जाबदारतर्फे – अँड.एम.व्ही.शिंदे.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य यांनी पारित केला.
1. यातील अर्जदारानी त्यांची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 प्रमाणे यातील जाबदारांनी केलेल्या सेवेतील त्रुटीबाबत दाखल केली आहे.
2. अर्जदारांचे तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे-
तक्रारदार हा मूळ शाहुपुरी, ता.जि.सातारा येथील रहिवासी असून ते नोकरीनिमित्त न्यू पनवेल, जि.रायगड येथे असतात. सातारा येथील त्यांचे घरी अर्जदाराने जाबदाराकडून 2008 साली घरगुती वीजपुरवठा घेतलेला असून त्यांचा जुना ग्राहक क्र.0067411 व नवा ग्राहक क्र.190560674116 असा आहे. सदर अर्जदाराकडे त्याने जाबदाराकडून घेतलेल्या विद्युत पुरवठयास 7611534521 या क्रमांकाने वीजमीटर बसवलेले होते. सदर मीटरप्रमाणे येणारी वीजबिले या अर्जदाराने वेळोवेळी जाबदाराकडे भरलेली आहेत. अर्जदारांचा सरासरी वीजवापर प्रतिमहा 50 ते 60 युनिट इतका होता व एप्रिल मे च्या दरम्यान तो 110 ते 120 इतका असे. वरीलप्रमाणे प्रतिमहा वीजवापर अर्जदाराकडून होत होता व त्याप्रमाणेच अर्जदारानी जाबदारानी वीजबिले जाबदाराकडे भरलेली आहेत. असे असताना माहे सप्टेंबर 2011 रोजी अचानक अर्जदारांचा वीजवापर 463 युनिट झाल्याचे दाखवून रक्कम रु.3000/- चे वीजबील जाबदारानी अर्जदाराना दिले. सदर बाब आश्चर्यकारक असल्याने त्वरीत अर्जदारानी जाबदाराकडे त्याबाबत तक्रार केली व त्याबाबत शाहुपुरी शाखाधिकारी श्री.ताटे यांची भेट अर्जदारानी घेतली. त्यांनी सांगितले की, अर्जदारानी प्रथम देयकाची संपूर्ण रक्कम रु.3,000/- भरावी त्यानंतर मीटर तपासणी करु. मीटरमध्ये दोष असलेस फरकाची रक्कम तुम्हांस परत करु. त्याप्रमाणे अर्जदाराने जाबदाराकडे रु.3,000/-चे वीजबील दि.30-10-2011 रोजी भरले व त्याच दिवशी अर्जदाराने विषयांकित वीजकनेक्शनवरील वीजमीटर तपासणीसाठी रु.100/- जाबदाराकडे भरले परंतु जाबदारानी अर्जदारांचे वीजमीटर योग्य त्या कार्यालय-लॅबोरेटरीकडे तपासणी न करता जाबदारांचे लोकानी जुजबी तपासणी करुन मीटरमध्ये दोष नसल्याचा रिपोर्ट त्याच दिवशी अर्जदाराला दिला, परंतु वरील पध्दतीने अर्जदारांचे वीजमीटरची केलेली तपासणी यातील अर्जदाराना मान्य न झालेने त्यानी जाबदाराकडे तक्रार केली. सदरची तक्रार जाबदारातर्फे दुय्यम कार्यकारी अभियंता, सचिन जगताप यानी मान्य केली, परंतु ताटे यानी मान्य केली नाही. परंतु प्रस्तुत अर्जदार हे योग्य त्या पध्दतीने मीटर सदोष असलेने तपासणी करावी या मतावर ठाम राहले, त्यामुळे श्री.ताटे यानी त्याना दिलेला मीटर निर्दोष असलेचा दाखला स्वतःकडे ठेवून घेतला व अर्जदारास परत पाठविले, त्यामुळे अर्जदारानी परत दि.30-10-2011 रोजी मीटर बदलून मिळणेची तक्रार जाबदाराकडे केली, त्यानंतर जाबदारांचे सूचनेवरुन अर्जदारानी त्यांचे घरातील संपूर्ण वायरिंग चेक करुन घेतले व इलेक्ट्रीशियनकडून मीटरमधून घरामध्ये आलेल्या वायरला 900 वॅटसचा आय.एस.आय.मेक बल्ब जोडून विदयुत पुरवठा तपासला असता सदर मीटर सदोष असलेचे अर्जदाराचे लक्षात आले व ही बाब जाबदारांचे कार्यकारी अभियंता यांचे लक्षात अर्जदाराने आणून दिली असता त्यानी मीटर बदलून देणेचे व जाबदाराकडून घेतलेले वीजबील परत देणेचे मान्य केले व त्यांचे सूचनेनुसार जाबदारांचे कर्मचा-यानी वादातील मीटरला समांतर मीटर लावून पाहिला त्यावेळी अर्जदारांचे मूळ घरातील मीटर हे नऊपट फास्ट असलेचे दिसून आले. परंतु त्यानंतरही वादातील सदोष मीटर जाबदारानी दि.6-2-2012 पर्यंत तसाच चालू ठेवला व त्याप्रमाणेच आकारणी करुन वीजबीले देणेचे चालू ठेवले. विषयांकित मूळ मीटरवर ज्यावेळी 1225 युनिट वापराची नोंद झाली त्यावेळी समांतर मीटरवर 144 युनिट वापरलेची नोंद झाली. म्हणजेच अर्जदाराचे मूळ वादातील मीटर हे 8.71 पट वेगात फिरते व चुकीचा वीजवापर 8.71 पट जास्त दाखवते हे स्पष्ट झाले. त्यामुळे सप्टेंबर 2011 पासून सदोष मीटरप्रमाणे भरलेले वीजबील परत मिळणेसाठी दि.20-12-2011 रोजी जाबदाराकडे अर्ज दिला. त्याचा विचार जाबदारानी न केल्याने दि.30-1-2012, दि.16-3-2012 रोजी स्मरणपत्र दिले तरीही जाबदारानी पैसे परत केले नाहीत. दि.6-2-2012 रोजी जाबदारानी सदोष मीटर काढून नेला दि.26-1-11 रोजी बसवलेला समांतर मीटर कायम केला, त्याप्रमाणे सदर मीटरप्रमाणे वापरानुसार बिले अर्जदाराला येत आहेत. परंतु दरम्यानचे काळात सदोष मीटर काढून नेईपर्यंतचे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या कालावधीमध्ये जाबदारानी दिलेली बिले ही अवास्तव असल्याने भरली नाहीत त्यामुळे जाबदारानी अर्जदारांचा वीजपुरवठा दि.30-3-2012 रोजी खंडीत केला. ते समजताच अर्जदारानी जाबदारांचे सूचनेप्रमाणे त्यांचे मागणीप्रमाणे दिलेले सदोष मीटरवरील युनिट वापराप्रमाणे बिल रु.2500/- अधिक जोडणी फी रक्कम जाबदाराकडे भरली व विदयुत पुरवठा चालू करुन घेतला. त्यावेळी जाबदाराकडून अर्जदारना रु.1200/- परत मिळणे आवश्यक होते व त्याबाबतची तक्रारही रजि.पोस्टाने अर्जदारानी जाबदाराना पाठवली. दि.26-11-2011 रोजी सदोष मीटरला 3863 असे रिडींग होते. फेब्रुवारीचे रिडींगला 292 युनिट दिले, दि.1-3-12 रोजी अर्जदारास 739 चे वीजबील जाबदारानी दिले. हे बिल दि.1-12-2011 ते 6-1-2012 चे कालावधीचे होते व दि.11-11-11 ते 11-12-2011 चे बिल 501 युनिट होते. त्याचे मागील रिडींग 3783 होते व दि.11-2-11 रोजी चालू रिडींग 4284 इतके होते. यावरुन हे स्पष्ट होते की, प्रस्तुत जाबदारानी दि.26-11-2011 ते 6-1-2012 अखेर कालावधीची सदोष व समांतर मिटरची अशी दोन्ही रिडींगची बिले अर्जदाराकडून घेणेत आली. जर मंडळाचे वीजमीटर सुस्थितीत चालू असते तर जाबदारांची हीच देयके सरासरी प्रतिमहा रु.300/- आली असती. वास्तविक सप्टेबर 2011 पूर्वीचा अर्जदारांचा 12 महिन्याचा वीजवापर देयकांचा विचार करुन सरासरीप्रमाणेयेणारी वरील 3 महिन्यांची बिल आकारणी केली असती तर ते योग्य व न्याय्य ठरले असते परंतु जाबदारानी तसे न करता सदोष वीजमीटरची स्थिती लक्षात न घेता अर्जदारांचे तक्रारीचा गांभीर्याने विचार न करता त्यांचे व्यवसायात अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन अवास्तव बिल आकारणी करुन ती अर्जदारानी जाबदाराकडे भरणेची अपेक्षा ठेवली. प्रस्तुत अर्जदारांची सदोष मीटरची व त्याबाबतची बिलांची तक्रार त्वरीत विनाविलंब निर्गत केली नाही, त्याबाबत निष्काळजीपणा केला. प्रस्तुत जाबदारानी या अर्जदाराला दिलेले सदोष मीटरच्या रिडींगप्रमाणे दिलेले बिल न भरल्याने 24 तास वीजपुरवठा अर्जदारांचा कोणताही दोष नसताना खंडीत केला. विषयांकित मीटर सदोष असल्याचे माहीत असूनही अर्जदाराना अवास्तव बिल दिले. विषयांकित वीजमीटर सदोष असतानाही चुकीचा मीटर तपासणी अहवाल देणे या सर्व बाबी प्रस्तुत अर्जदारानी जाबदाराना दिलेल्या सदोष सेवा/सेवेतील त्रुटी आहेत व याबाबत प्रस्तुत जाबदाराकडून कोणतेही निराकरण न झालेने अर्जदाराने जाबदाराविरुध्द मे.मंचात दाद मागितली आहे व जाबदाराकडून सदोष वीजमीटरचे रिडींगप्रमाणे देयकापोटी आकारणी केलेले सप्टेंबर 11 ते मार्च 2012 अखेरचे वसूल रक्कम रु.5,500/- यामधून वरील कालावधीचे सरासरी वीजवापर प्रतिमहा 70 युनिट धरुन एकूण 6 महिन्याचे रु.1800/- व जाबदारानी अर्जदाराना दिलेला परतावा रु.1560/- अशी एकूण रक्कम रु.3,360/- वजा जाता रु.2,140/- अर्जदारास मिळावेत. विनाकारण अर्जदाराचा कोणताही दोष नसताना 24 तास वीजपुरवठा जाबदारानी खंडीत केल्याने झालेला त्रास त्याची रक्कम रु.1200/- व फेरजोडणी शुल्क रु.25/- अशी एकूण रु.1,225/- अर्जदाराना मिळावेत. मानसिक, शारिरीक त्रासापोटी प्रतिदिन रु.500/-प्रमाणे भरपाई अर्ज दाखल तारखेपासून रु.1,33,000/- मीटर सदोष असून जाणीवपूर्वक वीजमीटर तपासणी अहवाल चुकीचा देणेमुळे झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.5,000/- या कामी मुंबई ते सातारा अर्जदारास हेलपाटे मारावे लागले, त्याची भरपाई रु.10,000/-, अर्जाचा खर्च रु.5,000/- जाबदाराकडून अर्जदारास मिळावेत अशी विनंती मागणी मे.मंचास केली आहे.
2. सदर कामी अर्जदारानी नि.1 कडे तक्रारअर्ज, त्याचे पृष्टयर्थ नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.4 कडे वकीलपत्र, नि.5 कडे पुराव्याचे एकूण 15 कागदपत्रे, नि.15 कडे प्रतिज्ञापत्र, नि.18 सोबत अर्जदाराचे मीटर रिडींगचे व्हीडीओ शुटींग डिस्क, नि.22 कडे केलेला लेखी युक्तीवाद, नि.24 कडे प्रत्यक्ष तक्रारदारांचा लेखी युक्तीवाद, नि.26 कडे अर्जदारातर्फे तोंडी युक्तीवादाचे मुद्दे इ.कागदपत्रे न्यायनिर्णयासाठी मे.मंचात दाखल केली आहेत.
3. सदर प्रकरणाच्या नोटीसा जाबदाराना रजि.पोस्टाने मे.मंचातर्फ पाठविण्यात आल्या. सदर नोटीसा जाबदाराना मिळाल्या. जाबदार त्यांचे विधिज्ञ अँड.एम.व्ही.शिंदे हे नि.10 कडील वकीलपत्राने प्रकरणी दाखल झाले. त्यानी अर्जदारांचे तक्रारीस नि.12 कडे म्हणणे व त्याचे पृष्टयर्थ नि.13 कडे प्रतिज्ञापत्र प्रकरणी दाखल केले. नि.19 कडे जाबदारातर्फे श्री.अमित बारटक्के यांचे प्रतिज्ञापत्र, नि.21 कडे अर्जदाराचे सी.पी.एल रेकॉर्ड व मीटर रजिस्टरची प्रत दाखल केली असून नि.23 कडे युक्तीवाद इ.कागदपत्रे प्रकरणी दाखल केली असून त्यानी अर्जदारांचे अर्जास खालीलप्रमाणे आक्षेप नोंदवले आहेत-
अर्जदारांचे मूळ मीटर तपासणीअंती निर्दोष होते त्यामुळे अर्जदारांचा वीजवापर प्रतिमहा सरासरी 50 ते 60 युनिट नव्हता. प्रस्तुत अर्जदार जाबदारांचे चुकीचे बिलाबाबत तक्रार करतो परंतु याबाबत जाबदारांचे वरिष्ठाकडे त्याने तक्रार केलेचे आढळून येत नाही. त्याने एकदाच 2011 मध्ये सप्टेंबरच्या बिलाची रक्कम भरली आहे. त्यानंतर नोव्हेंबर 11 ते मार्च 12 अखेर कोणतीही रक्कम भरलेली नाही. अर्जदाराना परत करावयाचा सर्व परतावा जाबदारानी दिलेला आहे. अर्जदारांची तक्रार खोटी आहे. याबाबत कार्यकारी अभियंता यानी अर्जदाराचे तक्रारीवर दिलेला निर्णय योग्य आहे. अर्जदारास कधीही अवास्तव खोटी बिले जाबदारानी दिलेली नाहीत. अर्जदाराने प्रकरणी दाखल केलेली सी.डी.पुराव्यात वाचता येणार नाही कारण ती तयार करणा-याचे प्रतिज्ञापत्र याकामी दाखल नाही. अर्जदाराची तक्रार खोटी आहे. त्यामुळे तक्रार चालणेस पात्र नाही, ती काढून टाकणेत यावी असे आक्षेप जाबदारानी नोंदलेले आहेत.
4. प्रस्तुत अर्जदारांची तक्रार, त्यासंबंधीचे प्रकरणी दाखल पुरावे, जाबदारांचे म्हणणे, त्यातील आक्षेप पहाता सदर प्रकरणाचे निराकरणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदारांनी तक्रारदारांचे वीजपुरवठयामधील सदोष वीजमीटर
दुरुस्त न करता त्या वीजमीटरद्वारे दर्शविलेल्या अवास्तव वीजयुनिट
प्रमाणे बिल आकारणी करुन व ते वादग्रस्त बिल न भरलेने त्यांचा
वीजपुरवठा खंडीत करुन अर्जदाराना सदोष सेवा दिली आहे काय? होय.
3. प्रस्तुत कामी यातील जाबदारानी अर्जदाराना सदोष वीजमीटर
प्रमाणे दर्शविलेल्या वापर युनिटप्रमाणे आकारलेली विजबिले
जाबदाराना अदा करणेस अर्जदार जबाबदार आहेत काय? नाही.
4. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
कारणमीमांसा- मुद्दा क्र.1 ते 4-
5. प्रस्तुत अर्जदार हा शाहुपुरी सातारा, जि.सातारा येथील रहिवासी आहे. यातील जाबदार क्र.2 हा जाबदार क्र.1 चा भाग असून जाबदार क्र.1 चे जाबदार क्र.2 शाखा कार्यालय आहे. प्रस्तुत जाबदार हे विजनिर्मिती व त्याचे गरजू ग्राहकाना त्यांचे गरजेप्रमाणे वीजवितरण सेवा सशुल्क विक्री करतात व वीजपुरवठा सेवा दिलेल्यांना विद्युतपुरवठा विक्रीपश्चात सेवा देतात असा जाबदारांचा व्यवसाय असून प्रस्तुत अर्जदाराने यातील जाबदार क्र.2 कडून त्यांचे अर्जात व अर्जाचे सरनाम्यात नमूद पत्त्यावर त्यांचे रहाते घरी घरगुती वापरासाठी सन 2008 साली विद्युतपुरवठा कनेक्शन(जोडणी) घेतलेली असून त्यांचा जुना ग्राहक क्र.C0067411 व नवीन ग्राहक क्र. 190560674116 असा आहे. यातील अर्जदारानी जाबदारानी दिलेली वीजवापराची प्रतिमहा वीजमागणी बिले सप्टेंबर 2011 अखेर संपूर्ण भरलेली आहेत. वरील व्यवहारावरुन प्रस्तुत अर्जदार व जाबदार यांचेमध्ये सशुल्क सेवा घेणारा व सेवापुरवठादार असे नाते असल्याचे स्पष्ट होते, त्यामुळे प्रस्तुत अर्जदार हा जाबदाराचा ग्राहक असल्याचे पूर्णतः शाबित होते, त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
5.2- प्रस्तुत तक्रारअर्ज व जाबदारांचे नि.12 कडील म्हणणे पहाता अर्जदाराने जाबदारांचे सन 2008 साली कनेक्शन घेतले होते. वीजपुरवठा घेतलेपासून सप्टेंबर 2011 अखेरची सर्व प्रतिमहाची जाबदारांचे वीजदेयकाप्रमाणे बिले वेळोवेळी अदा केलेली आहेत ही बाब जाबदाराना मान्य आहे. अर्जदार हा जाबदारांचा ग्राहक आहे ही बाबही जाबदाराना मान्य आहे. प्रस्तुत अर्जदाराचे वीजपुरवठा जोडणीवर वीजवापर युनिटची नोंद होणेसाठी जाबदारानी 7611534521 क्रमांकाचे वीजमीटर बसविलेले होते व आहे, त्या मीटरला जाबदारांचे सील आहे. या वीजमीटरसह संपूर्ण वीजजोडणी संचाची व्यवस्था, देखरेख व त्यामध्ये वेळोवेळी निर्माण होणा-या दोषांचे निराकरण करणे व ही व्यवस्था अद्ययावत ठेवणे ही जबाबदारी सर्वस्वी जाबदारांची असून ती त्यांचे अधिकारात येते ही बाब जाबदाराना मान्य व कबूल आहे.
माहे सप्टेंबर 2011 मध्ये अचानक जाबदारानी या अर्जदाराना एकूण वीजवापर युनिट 463 इतका दाखवून त्यांचे बिल रु.3000/- भरणेस अर्जदाराना सांगितले. सदर बिल हे नियमित प्रतिमहा होणा-या वीजवापराप्रमाणे नसलेने व ते अवास्तव असलेची खात्री झालेने प्रस्तुत अर्जदाराने जाबदार क्र.2 कडे तक्रार दिली. त्यांचे तक्रारीप्रमाणे संबंधित श्री.ताटे यानी वीजबिल दिल्याप्रमाणे प्रथम संपूर्ण वीजबिल भरावे व नंतर विषयांकित वीजमीटरची तपासणी करु व त्यामध्ये दोष असलेस फरकाची रक्कम परत करु असे सांगितले. जाबदारांचे कथनावर विश्वास ठेवून अर्जदारानी दि.31-10-2011 रोजी रु.3,000/- वीजबिल व मीटर तपासणी फी रु.100/- पावती क्र.5657630(नि.5/14) भरलेचे स्पष्ट होते. त्याप्रमाणे अर्जदारारांचे विषयांकित मीटरची जुजबी तपासणी करुन मीटर ओके असल्याचा रिपोर्ट संबंधित जाबदारांचे इसमानी दिला. तो या अर्जदाराना मान्य झाला नाही, त्यामुळे तथाकथित मीटर तपासणी अहवाल जाबदारानी स्वतःकडेच ठेवला, त्यामुळे अर्जदाराने जाबदाराकडे मीटर बदलून देणेची मागणी केली. जाबदारांचे सूचनेप्रमाणे यातील अर्जदारानी त्यांचे संपूर्ण वायरिंग इलेक्ट्रिशियनकडून तपासून घेतले, त्यामध्ये दोष आढळून आला नाही. वास्तविक हे काम जाबदारांचे होते. ते अर्जदारानी स्वखर्चाने केले व विषयांकित वीजमीटर हे सदोष असलेचे श्री.बारटक्के या जाबदारांचे अधिका-यांचे निदर्शनास आणून दिले, त्याप्रमाणे जाबदारानी अर्जदारांचा वादातीत सदोष मीटर व नवीन समांत मीटर अर्जदारांचे वीजजोडणीवरती बसविला, तो बसवताच समांतर नवीन मीटरचे तुलनेत विषयांकित सदोष मीटर हा नऊपट वेगाने फिरत असलेचे आढळून आले. ही बाब जाबदारांचे निदर्शनास आलेनंतरही त्यांनी सदरचे सदोष मीटर दि.6-2-2012 अखेर तसेच चालू ठेवले व त्याप्रमाणे आलेला वीजवापर 1255 दाखवून त्याप्रमाणे बिल आकारणी करुन वीजबिलाची मागणी अर्जदाराकडे केली व हीच बाब तक्रारदाराना जाबदारानी सदोष सेवा दिलेचे सिध्द करते. वास्तविकतः अर्जदारानी मागणी केलेप्रमाणे ज्यावेळी जाबदारानी सदोष मीटरला दुसरे समांतर मीटर क्र.1265851 जोडून दोन्ही मीटरमधील तफावत पाहिली, त्यावेळी जुना मीटर 3863 वीजवापर दाखवीत होता त्यावेळी नवीन मीटरमध्ये दोन युनिटचा वीजवापर झालेचे नवीन मीटरने दाखवले. दि.29-12-2011 रोजी जुन्या मीटरचा वीजयुनिट वापर 4380 होता व नवीन मीटरचा याच कालावधीतील वीजवापर 61 युनिट इतका दिसत होता. दि.30-1-2012 रोजी जुन्या मीटरचा वीजवापर युनिट 5118 दाखवीत होते त्याचवेळी नवीन मीटरने 146 युनिट वीजवापर दाखवला आहे. वरील परिस्थिती पहाता जाबदारांनी या कामी मीटर बदली अहवाल रजिस्टरचा उतारा नि.21 सोबत झेरॉक्सप्रत हजर केली आहे. त्यामध्ये शेवटून पहिला तक्रारदाराचे मीटर 26-11-2011 रोजी बदलले असे कारण दिलेले असून ते मीटर सदोष असलेमुळे बदलणेत आले असे या अहवालात नमूद केले आहे. निःसंशयरित्या यावरुन सिध्द होते की तक्रारदारांचे सदरचे मीटर हे सदोष होते यात कोणतेही दुमत नाही. यास अनुसरुन जाबदारांनी अन्यायी वीजबिल तक्रारदाराना दिले आहे ते दुरुस्त करुन द्यावे, मीटर सदोष असलेचे सिध्द झालेने तक्रारदारानी त्यांचेकडे सदोष युनिटचे आधारे आकारलेले जाबदारांचे बील भरले. त्यातील फरक रक्कम रु.1,200/- व दि.30-3-2012 रोजी रु.2,500/- भरले, त्यातील रु.1,200/- चा परतावा मिळणेची मागणी केली आहे. दि.20-3-2012 चे देयकाप्रमाणे रक्कम रु.1,560/- परत केलेचे दाखवले परंतु त्यातील अद्याप रु.1,860/- जादा रक्कम अर्जदाराना मिळणे आवश्यक आहे. एकूणच प्रस्तुत जाबदार हे ग्राहकाच्या घरी व अन्यत्र जे वीजमीटर वीजपुरवठा देऊन त्यावर वीजमीटर बसवले जाते व त्यास सील केले जाते, या संपूर्ण संचाची जोडणीची देखभाल व्यवस्था पहाणी, निरीक्षण करणारे पथक करीत असते, त्यांचेकडे ती यंत्रणा स्वतंत्ररित्या आहे, अशा यंत्रणेने वेळोवेळी तपासणी करणेचे असते, परंतु या प्रकारच्या तपासण्या जाबदार हा वेळोवेळी या ग्राहकाच्या बाबतीत करीत आला होता व त्याच्या तपासणीच्या तारखा, त्यातील आढळलेले दोष, ते दुरुस्त केल्याच्या तारखा या प्रकारच्या सर्व बाबी मेंटेन केलेल्या रजिस्टरचा उतारा किंवा इतर कागदोपत्री पुरावा याकामी जाबदारानी मंचात दाखल केलेला नाही. स्वतः या तक्रारदारानी जेव्हा जाबदाराकडून अन्यायी, अतिरीक्त वीजमागणी करणेत आली व त्याचा युनिट वापर अवाढव्य दाखवणेत आला त्यानंतरही तक्रारदाराचे विनंतीअर्जावरुन ती तक्रार त्वरीत पहाणी करुन दुरुस्त करुन दिली नाही त्यावर अंतिम निर्णय दिला नाही, अशाच प्रकारची वारंवार अवास्तव अधिक वीजवापर दाखवून अवास्तव बिले देणेचा प्रयत्न जाबदाराने केला. अर्जदारांचे तक्रारीबाबत त्यानी अक्षम्य बेफिकीरपणा/निष्काळजीपणा केला. या बाबी स्पष्टपणे हेच दाखवतात की, जाबदारानी तक्रारदाराना सदोष सेवा दिली असलेचे निःसंशयरित्या शाबित होते त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
5.3- प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारानी नि.5/1 ते 5/22 कडे एकूण 22 कागद दाखल असून त्यात अँसेसमेट लीजचे उता-यापासून मीटर चाचणी अहवाल व विजबिलांच्या पावत्या, जाबदारांविरुध्द निरनिराळया दैनिकामध्ये जाबदारांच्या सदोष सेवेबाबतच्या घटनांची कात्रणे दाखल केली आहेत. नि.5/21 कडे जाबदारानी तक्रारदारांबाबत अवास्तव वीजआकारणी कशी केली याचे विवरण दिले आहे. त्याचे अवलोकन करता तक्रारदारांचा प्रतिमाह वीजवापर 2008 सालापासून सरासरी 200 ते 250 युनिटस् असा होता. त्यामुळे ग्राहकांची तक्रार आलेनंतर अचानक जाबदारांनी त्यांचे मीटरची तपासणी करणे व त्याचे मूळ मीटर सदोष असलेचे सिध्द होऊनही तशीच बिले आकारत रहाणे हे कायद्याला धरुन नाही. जाबदार हे या ग्राहकाप्रती अत्यंत बेफिकिर, निष्काळजीपणे वागले आहेत या निष्कर्षाप्रत आम्ही आलो आहोत. त्यामुळे सदर कामी यातील जाबदारानी अर्जदाराना सदोष मीटरप्रमाणे दिलेल्या युनिटप्रमाणे आकारलेली बिले जाबदारांकडे अदा करणेबाबत अर्जदार हा जबाबदार रहात नसल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही नकारार्थी देतो. त्यामुळे अर्जदारांचा अर्ज योग्य व न्याय्य असल्यामुळे व जाबदारानी तक्रारदाराना अन्यायी वीजबिले देऊन सदोष सेवा दिली असल्याने त्याना न्याय मागणेसाठी मंचाकडे तक्रार दाखल करावी लागली, त्यापोटी त्याना मानसिक, शारिरीक त्रास झाला. तक्रारदारानी जाबदाराकडे भरलेल्या एकूण बिलातून योग्य आकारणी करुन त्याचे बिल घेऊन उर्वरित रक्कमेचा परतावा दिला नाही त्यामुळे तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करुन त्यांच्या मागण्या मान्य करण्याच्या निष्कर्षाप्रत हा मंच आला आहे. त्यामुळे अर्जदारानी जाबदाराकडे नि.15 कडील प्रतिज्ञापत्रासोबत दाखल केलेल्या अवास्तव वीजबिल आकारणी व वस्तुस्थिती समांतर मीटर बसवलेने सिध्द झालेला मीटर दोष व तक्रारदाराना मिळावयाचा योग्य परतावा याचे विवेचन दिलेले आहे, ते आम्हांस योग्य वाटते, त्यामुळे अर्जदाराना जाबदाराकडून सप्टेंबर 2011 ते मार्च 2012 अखेर वसूल केलेली एकूण रक्कम रु.5,500/- मधून सरासरी 70 युनिटचा वीजवापर लक्षात घेऊन प्रतिमहा रु.300/-प्रमाणे रु.1,800/- वजा जाता उर्वरित रक्कम रु.3,700/-पैकी जाबदारानी दिलेला परतावा रु.1,560/- वजा जाता उर्वरित रक्कम रु.2,140/- जाबदाराकडून मिळणेस अर्जदार पात्र आहेत. त्याचप्रमाणे अर्जदारांचा वीजपुरवठा बिल न भरल्यामुळे खंडीत करुन तो अर्जदारानी भरलेनंतर जोडणी आकारणी रु.25/- शुल्कासह भरुन घेतले. सदरचे दिवस परीक्षेचे होते त्यामुळे त्याना 24 तास अंधारात रहावे लागले, त्याचे नुकसानीपोटी रु.500/-, शारिरीक, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- जाबदाराकडून मिळणेस तक्रारदार पात्र असल्याचे निष्कर्षाप्रत आम्ही आलो आहोत.
6. वरील सर्व कारणमीमांसा, विवेचन याना अधीन राहून खालीलप्रमाणे आदेश करणेत येतात.
आदेश
1. अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
2. प्रस्तुत जाबदारांनी तक्रारदारांचे वीजपुरवठयाबाबत सदोष वीजमीटर दुरुस्त न करता त्या वीजमीटरद्वारे दर्शविलेल्या अवास्तव वीजयुनिट प्रमाणे बिल आकारणी करुन व ते वादग्रस्त बिल न भरलेने त्यांचा वीजपुरवठा खंडीत करुन अर्जदाराना सदोष सेवा दिली आहे असे घोषित करणेत येते.
3. जाबदारानी तक्रारदाराना विज बिल परतावा रक्कम रु.2,140/- तसेच झालेल्या नुकसानीपोटी रु.500/- अदा करावेत. सदर आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
4. प्रस्तुत जाबदारानी या तक्रारदाराना शारिरीक मानसिक त्रासापोटी रु.15,000/-, व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- सदर आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत अदा करावेत.
5. वरील आदेशांचे पालन जाबदारानी आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयात करणेचे आहे.
6. जाबदारानी आदेशाचे पालन विहीत मुदतीत न केलेस तक्रारदारांना त्यांचेविरुध्द कलम 25 व 27 अन्वये दाद मागणेची मुभा राहील.
7. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
8. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 29 –9-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.