जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 41/2008 तक्रार दाखल तारीख –29/08/2011
सौ.शारदा गणेश जोशी
वय 35 वर्षे धंदा घरकाम व शती .तक्रारदार
रा.दासखेड ता.पाटोदा जि.बीड
विरुध्द
महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी
उपविभाग पाटोदा, ता.पाटोदा जि.बीड. सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.आर.पी.सुलाखे
सामनेवाला तर्फे ः- अँड.एस.एन.तांदळे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार दासखेड ता.पाटोदा येथील रहिवासी आहे. तिचे नांवे शेत जमिन ग.क्र.194 असून शेतात ऊस, आंब्याचे झाडे, चिक्कूचे झाडे इत्यादी पिक होते. सदर शेत जमिनीवरुन विजेच्या तारा एका खांबावरुन दुस-या खांबावर गेलेल्या आहेत. शेतात तक्रारदाराची विहीर आहे. बाजूला तलाव आहे. तक्रारदार सामनेवाला यांचे ग्राहक असून शेतीला पाणी देण्यासाठी विज जोडणी घेतलेली आहे. तक्रारदाराच्या शेतात तिन एकर ऊस, 50 आंब्याची झाडे, 50 चिक्कूचे झाडे लावलेली होती. सदरच्या शेतातून दूस-या शेतात पाणी नेण्यासाठी पाईपलाईन केलेली आहे.
दि.27.2.2008 रोजी तक्रारदाराच्या शेतावरुन नेलेल्या विहीरीच्या तारा आपसात घर्षन होऊन स्पार्कीग झाले त्यांचा परिणाम खाली असलेल्या ऊस व फळाच्या झाडांवर झाला. स्पार्कीगच्या ज्वाळा ऊसात पडल्या व ऊसाने पेट घेतला, त्यामुळे बाजुला असलेले आंब्याचे 50 झाडे व चिक्कूचे 50 झाडे जळून खाक झाली. तक्रारदाराचे शेतातील ऊस एकरी 40प्रमाणे 120 टन ऊस जळाला आहे. तक्रारदाराचे अंदाजे रु.1,20,000/- चे नूकसान झालेले आहे. तसेच चिकूची 50 झाडे जळाल्यामुळे रु.25,000/- चे नूकसान झाले व आंब्याची 50 झाडे जळाल्यामूळे रु.20,000/- असे तसेच पीव्हीसी पाईप 50 जळाल्यामुळे रु.12,000/-चे नूकसान झाले असे एकूण रु.1,77,000/- चे नूकसान झाले आहे.
सदर घटनेनंतर सामनेवाला यांनी अपघाताची पाहणी करुन भरपाई देण्या बाबत सामनेवाला यांचे पाटोदा कार्यालयात अर्ज दिला परंतु अद्यापपर्यत कंपनीने कोणतीही चौकशी केली नाही किंवा नूकसान भरपाई दिली नाही.
तक्रारदाराचे पती श्री.गणेश विठठल जोशी यांनी सामनेवाला व तहसीलदार पाटोदा यांना दि.26.10.2006 रोजी विजेच्या तारा बाबत संभाव्य धोक्याची शक्यता ओळखून तात्काळ दखल घेण्याविषयी निवेदन दिलेले होते. त्या बाबत विज कंपनीने जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले. घटनेची सूचना पोलिस स्टेशन पाटोदा येथे दिली. त्यांनी घटनास्थळ पंचनामा केला.
विंनती की, सामनेवाला यांचे हलगर्जीपणामूळे रु.1,77,000/-चे नूकसान झाले. तक्रारदाराचा खर्च, मानसिक त्रासाचे रु.10,000/- नूकसान भरपाई सामनेवालाकडून देण्यात यावी.
सामनेवाला यांनी त्यांचा खुलासा दि.3.1.2012 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. सन 2006-07 मराठवाडयात अतिरिक्त ऊसाचे उत्पादन झाले होते. त्यामुळे कारखाना ऊस गळीतास घेऊन जात नव्हते. त्यामुळे शेतकरी ऊस पेटवून देत असत व नंतर कारखाना ताबडतोब ऊस गळतीस घेऊन जात असत. मात्र जळालेल्या ऊसाचे पेमंट हे ठरवून दिलेल्या दरापेक्षा रु.100/- ते रु.125/- वजा करुन पेमेंट करत असत. या प्रकरणात असाच प्रकार झाला आहे. तक्रारदार हिस ऊसच नव्हता जो ऊस होता तो गणेश विठठल जोशीचा होता. तो कारखान्याने गळीतास नेलेला आहे. तो ऊस लाईटच्या शार्टसर्कीटने जळालेला नसून अन्य कारणाने जळालेला असावा त्यांस हे सामनेवाले जिम्मेदार नाहीत. तक्रारदाराने सामनेवाले विरुध्द खोटी तक्रार दाखल केली आहे. तिचा ऊस जळालेला नाही. त्यांचेकडे ऊसाची नोंद नाही. कूठलाही पुरावा नाही. तक्रार रदद करण्यात यावी. जो ऊस जळाला तो कडा सहकारी साखर कारखान्याने गळीतास नेलेला आहे. त्यांचेकडून 20.879 किलो ग्रॉम भरलेला असून त्यांना त्यांची किंमत रु.560/- प्रमाणे दिलेली आहे. त्यातून जळालेल्या ऊसा बददल रु.31,132/- वजा केलेले आहे. त्यामुळे ऊस जरी जळाला तरी तो संपूर्ण जळत नाही. तो कारखाना गळीतास घेऊन जाते. ऊस जळीताची माहीती मिळाल्यानंतर सामनेवाला यांचे कनिष्ठ अभिंयता आले नाही. दोन्ही तारामध्ये अंतर होते. स्पार्कीगचा प्रश्नच येत नाही. सदरील प्रकरणात विद्यूत निरिक्षकाचा अहवाल नाही. 50 आंब्याचे व 50 चिक्कूचे झाडे तसेच 50पाईप जळाले यांचा कूठलाही पुरावा सादर केलेला नाही. तक्रारीत दाखल झालेला पंचनामा हे सामनेवाला यांचे पश्चात केलेले आहेत.ते पुरावा ग्राहय धरता येणार नाही. तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा खुलासा, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.काळे व सामनेवाले यांचे विद्वान वकील श्री.तांदळे यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारारचे नांवे 7/12 उतारा किंवा ऊस लागवडीचे क्षेत्र दाखविणारा कोणताही पुरावा नाही. तहसील कार्यालयातील पंचनाम्याची झेरॉक्स प्रत दाखल केली आहे. तसेच तक्रारदाराचे पती यांनी तहसीलदार यांचेकडे पाण्यातील पोलवर लाईन ओढल्याचे संभाव्य धोका निर्माण झाल्या बाबत पत्र दिलेले आहे. घटनास्थळ पंचनामा, तलाठी पंचनामा इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदार हे या विज कंपनीची ग्राहक असल्याचे तक्रारदारानी म्हटले आहे. तक्रारदाराच्या नांवाने विज जोडणी आहे. सन 2007-08 पंधरवाडा सभासद ऊस खरेदी बिल कालावधी दि.1.3.2008 ते 15.3.2008 गणेश विठठल जोशी च्या नांवाने 20 टन 879 किलो प्रतिटन रु.560/- प्रमाणे रु.11,692/- जळीताचे रक्कम रु.3132/- वजा जाता रु.8560/- गणेश जोशी यांना मिळाले आहेत.
मूळात तक्रारदाराचे नांवाचा 7/12 किंवा ऊसाची नोंद असलेला कागदपत्र नसल्याने तक्रारदाराचा ऊस जळाला हे विधानच शाबीत होत नाही. ऊस हा विज तारामधील घर्षणामूळे जळाल्या बाबत विद्यूत निरिक्षक यांचा अहवाल नाही. त्यामुळे स्पार्कीग होऊन ऊस जळाला आंब्याची व चिक्कूची झाडे व पाईप जळाले ही बाब स्पष्ट होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड