निकालपत्र :- (दि. 26/09/2011) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी हजर राहून म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलाची युक्तीवाद केला. सामनेवाला हे गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार व सामनेवाला या दोन्ही महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याखाली नोंदणीकृत संस्था आहे. तक्रारदार ही संस्था मत्स्यव्यवसाय करते. व त्यांचे एकूण 136 सभासद आहेत. सामनेवाला ही राज्यातील मच्छीमार संस्थेचे संघ आहे. व त्यांचेमार्फत सभासद संस्थांना सोईसुविधा उपलब्ध करुन देत असतात. तक्रारदार संस्थेने सामनेवाला संघाकडे दि. 14/08/2010 रोजी मत्सबिजाची बीग हेड जातीचे 80 डबे (1 लाख 60 हजार मत्स्यबीज) ग्रास कार्प जातीचे 80 डबे(1 लाख 60 हजार मत्स्यबीज), व कटला जातीचे 20 डबे (40,000 हजार मत्स्यबीज) यांची मत्स्यबीजाची एकूण किंमत रक्कम रु. 33,700/- सामनेवाला संघाकडे दिले. त्यानंतर बीग हेड जातीच्या मत्स्यबीजाचे 100 डबे (2 लाख मत्स्यबीज) ऑर्डर कोल्हापूर येथे दिली व त्यासोबत मत्स्यबीजाची एकूण किंमत रक्कम रु. 17,500/- चा डी.डी. दिला. सदर मत्स्यबिजाची मागणी नोंदविल्यापासून 1 महिन्याच्या आत मत्स्यबीज जलाशयावर पोहोचणे आवश्यक होते. परंतु त्यापैकी मिक्स कटला व ग्रास कॉर्प जातीच्या मत्स्यबीजाचे अनुक्रमे 30, 20 व 50 असे एकंदर 100 डबे सामनेवाला संघाने तक्रारदार संस्थेला दिले. दि. 15/09/2010 रोजी धामोड, ता. राधनगरी येथील तुळशी जलाशयावर पाहोच केले. वाहतुक खर्च तक्रारदार संस्थेने सामनेवाला यांचे मत्स्यबीज पोहोच करणा-या संघाच्या प्रतिनिधीस दिला परंतु त्याची पावती दिली नाही. उर्वरीत बीग हेड जातीच्या मत्स्यबीजाचे 180 डबे, ग्रास कॉर्प जातीच्या मत्स्यबीजाचे 20 डबे सामनेवाला संघाने अद्याप दिलेले नाहीत. सदर मत्स्यबीज हे ऑक्टोंबर अखेर जलाशयात सोडणे आवश्यक होते. सदर मत्स्यबीज सामनेवाला यांनी पोहोच न केलेने तक्रारदार संस्थेचे नुकसान झालेले आहे. सदर मत्स्यबीज ऑक्टोंबर महिनाअखेर जलाशयात सोडले असते तर त्याचे संगोपन होऊन त्याची नैसर्गिकरित्या अपेक्षित असलेली 200 ते 250 ग्रॅम वाढ होऊ शकते. दि. 15/09/2010 रोजी पोहेच केलेल्या मत्स्यबीजाची नैसर्गिकरित्या अपेक्षित असलेली 200 ते 250 ग्रॅमपर्यंत वाढ झालेली आहे. तसेच बीग हेड जातीच्या मत्स्यबीजाचे 180 डबे, ग्रास कॉर्प जातीच्या मत्स्ययबीजाचे 20 डबे असे 200 डबे ( 4 लाख मत्स्यबीज) तक्रारदार संस्थेला मुदतीत न दिलेने नुकसान झालेले आहे. ते पुढीलप्रमाणे- एकंदर मत्स्यबीज | 4,00,000/- | मरण्याचे किंवा इतर कारणाने उत्पन्न न मिळण्याचे प्रमाण साधारण 75 टक्के ते 25 टक्के | 3,20,000/- | एकंदर उत्पादन 20 टक्के 25 टक्के | 80,000/- | एकंदर उत्पन्न रु. 45 रु. प्रतिकिलो | 36,00,000/- | मासेमारी खर्च व वाहतुक व बर्फ व इतर खर्च 24 रु. प्रतिकिलो | 19,20,000/- | नुकसानीची एकूण रक्कम | 16,80,000/- | मानसिक व आर्थिक नुकसानीपोटी | 25,000/- | वकील फी | 25,000/- | एकूण नुकसान भरपाई | 17,30,000/- |
उपरोक्त प्रमाणे तक्रारदार संस्थेचे नुकसान झालेले आहे व सामनेवाला संस्थेने एकूण नुकसानी रक्कम रु. 17,30,000/- देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत तक्रारदार यांनी सामनेवाला कडे मत्स्यबीज मागणी नोंदवलेबाबत अर्ज, तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे मत्स्यबीजाची रक्कम डी.डी. ने जमा केली त्या डी.डी. ची झेरॉक्स प्रत, डी.डी. ची पावती, तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे मत्स्यबीज मागणी केलेला दुसरा अर्ज, सदर मत्स्यबीजाची रक्कम डी.डी. ने जमा केली त्या डी.डी. ची पावती, तक्रारदारांनी मत्स्यबीज न मिळालेबाबत वकिलामार्फत सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, नोटीसीची पोस्टाची पोचपावती, महाराष्ट्र शासनाचे कोळंबी, कार्प या मत्स्याबाबत परिपत्रक, तक्रारदार संस्थेतर्फे ठराव इत्यादीच्या झेरॉक्स प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला संस्थेने म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी त्यांच्या म्हणण्याअन्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात,तक्रारदार हे सामनेवाला संस्थेचे ग्राहक होत नाहीत. तसेच प्रस्तुत तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र या मंचास येत नाही. तक्रारदार संस्थेस सन 2010 च्या हंगामात मत्स्यबीज घेण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे जा. क्र. 69/2010-11 दिनांक 01/06/2010 च्या पत्राप्रमाणे सामनेवाला संघाने अकोला व भुसावळ रेल्वे स्टेशन तसेच पुणे विमानतळावर मत्स्यबीज पोहच करुन मागणीदार संस्थेच्या ताब्यात देण्याचे ठरविले होते व तसे सामनेवाला संस्थेच्या सभासदांना कळविले होते. तक्रारदार संस्थेने मत्स्यबीज मागणी नोंदविलेले सदर मत्स्यबीज पुणे विमानतळापर्यंत मत्स्यबिज पुरवठा करण्याबाबतचा अलिखीत करार झाला होता. सामनेवाला संघाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. सदर संघाची महाराष्ट्रात कोणत्याही शहरात अगर ठिकाणी शाखा नाही. व सामनेवाला संघाचा सर्व व्यवसाय मुंबई येथेच आहे. तक्रारदार संस्थेने आवश्यक असलेल्या मत्स्यबीजाची मागणी सामनेवाला संघाच्या मुंबई येथे नोंदविल आहे याचा विचार करता तक्रारीस कारण या मंचाचे अधिकारक्षेत्रात घडलेले नाही. सामनेवाला त्यांचे म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदार संस्थेने दि. 16/08/2010 रोजी मत्स्यबीज बिग हेड 80 डबे, ग्रास कॉर्प 50 डबे, कटला 20 डबे, मिक्स 30 डबे तसेच दि. 23/09/2010 रोजी बीग हेड 100 डबे इत्यादीची मागणी केली त्यापैकी दि. 28/08/2010 रोजी तक्रारदारास संस्थेस कटला 20 डबे, ग्रास कॉर्प 59 डबे, मिक्स 40 डबे, व मृगळ 15 डबे प्रमाणे विमानतळावर पुरवठा केलेला आहे. उपरोक्त तक्रारदार संस्थेच्या वतीने श्री. बाळासाहेब निकम यांनी मत्स्यबीज पुणे विमानतळावर घेतलेले होते. व दि. 28/05/2010 रोजी पावती दिलेली आहे. या मत्स्यबिजाची पुणे विमानतळावर खर्चासह किंमत रक्कम रु. 22,260/- इतकी आहे. दि. 15/09/2010 रोजी सामनेवाला संघाने 30 डबे मिक्स, 20 डबे कटला, व 50 डबे ग्रास कॉर्प मत्स्यबीज पुणे विमानतळावर श्री. बाळासाहेब निकम यांचे ताबेमध्ये दिले. त्याची पुणे विमानतळापर्यंत पोहोच करण्याची खर्चाची किंमत रक्कम रु. 16,900/- आहे. त्यावेळेस मत्स्यबीज ताब्यात घेतले व घाईघाईने निघून गेले. मत्स्यबीज ताब्यात घेताना पावती दिली नाही तर पावती नंतर पाठवितो असे सांगितले. परंतु अजून पावती दिलेली नाही. तक्रारदार संस्थेने दि. 15/09/2010 रोजी त्यांनी 100 डबे मत्स्यबीज मिळाल्याची त्यांनी त्याचे तक्रारीतही मान्य केलेले आहे. तक्रारदार संस्थेने एकूण रक्कम रु. 51,200/- चा भरणा केला. सामनेवाला संघाने तक्रारदार संस्थेस यापैकी रक्कम रु. 39,160/- चा मत्स्यबीज पुरवठा केलेला आहे. व उर्वरीत रक्कम रु. 12,040/- चे बीगहेड जातीचे मत्स्यबीज तक्रारदार संस्थेस द्यावयाचे होते. दि. 15/09/2010 रोजी पर्यंत बीगहेड जातीचे मस्यबीज उपलब्ध झालेले नाही. मात्र त्यानंतर दि. 13/11/2010 व 16/11/2010 रोजी सामनेवाला संघाने तक्रारदार संस्थेस पुरवठा करण्याकरिता बीगहेड जातीचे मत्स्यबीज पुणे येथे आणले होते. परंतु तक्रारदार संस्थेच्या वतीने श्री. बाळासाहेब निकम यांना आगावू कळवूनही ते किंवा तक्रारदार संस्थेच्या वतीने कोणीही मत्स्यबीज घेण्यासाठी आलेले नाहीत. म्हणून तक्रारदार संस्थेचे नुकसान झाले हे म्हणणे चुकीचे आहे. सामनेवाला त्यांचे म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदार संस्थेची नोटीस सामनेवाला यांना मिळाली व त्यानंतर तक्रारदार संस्थेस चर्चा करण्याकरिता मुंबई कार्यालयात बोलविले होते त्या वेळेस तक्रारदार संस्थेच्या वतीने बाळासाहेब निकम हे चर्चेकरिता आले व त्यावेळेस तक्रारदार संस्थेची उर्वरीत रक्कम रु. 12,040/- तक्रारदार संस्थेस परत करण्याचे सामनेवाला संस्थेने मान्य केले होते. परंतु तक्रारदार संस्थेने रक्कम परत करणेऐवजी पुढील हंगामात जुन्याच दराने मत्स्यबीज पुरवठा करावा अशी सुचना केली. व सामनेवाला संघाने त्याप्रमाणे मान्य केले. सबब, सदरची खोटी तक्रार दाखल केलेने तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने तक्रारदाराची तक्रार व सामनेवाला यांचे म्हणणे तसेच उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केलेले आहे. तक्रारदार संस्थेने सामनेवाला संस्थेस तक्रारीत उल्लेख केलप्रमाणे मत्स्यबीज मागणी अर्ज केलेला आहे. व सदरचा अर्ज प्रस्तुत कामी दाखल आहे. तसेच सामनेवाला संस्थेस रक्कम रु. 33,700/- चा दि. 14/08/2010 रोजीचा डी.डी. नं. 871428 बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचा दिलेला आहे ही वस्तुस्थिती सामनेवाला संघाने मान्य केलेली आहे. परंतु मत्स्यबिजाचा पुरवठा हा पुणे विमानतळावर करावयाचा आहे ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येत आहे. सामनेवाला संस्थेचे कार्यालय मुंबई येथे आहे. तसेच सामनेवाला संस्थेचे शाखा कार्यालय मुंबई शिवाय अन्यत्र कुठेही नाही ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येते. सामनेवाला संघाने त्यांचे सदस्य असलेल्या मत्स्यव्यवसाय संस्थांना जलाशयापर्यंत मत्स्यबीज पुरवठा करावा याबाबत कुठेही लिखित करार नाही. तक्रारदार संस्थेस प्रथम पुरवठा केलेले मत्स्यबीज हे पुणे विमानतळावर केलेला आहे इत्यादीचा विचार करता तक्रारदार संस्था व सामनेवाला संस्था यांचेमध्ये मत्स्यबीजाबाबत झालेला व्यवहार हा त्यांचे मुंबई येथील कार्यालयात झालेला आहे. व मत्स्यबीज पुरवठा पुणे विमानतळावर करण्याचा आहे या दोन्ही बाबी विचारात घेता प्रस्तुत तक्रारीस कारण या मंचाचे कार्यक्षेत्रात झालेले नाही हे दिसून येते. सबब, प्रस्तुत तक्रार चालविण्याचे क्षेत्रिय अधिकारिता (Territorial Jurisdiction) या मंचास येत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. हे मंच यापुढे असेही स्पष्ट करीत आहे की, तक्रारदारांनी त्यांची तक्रार त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार योग्य त्या न्यायालयात दाखल करावी. तसेच हे मंच यापुढे असे स्पष्ट करते की, प्रस्तुत प्रकरणी व्यतीत झालेला कालावधी हा मुदत माफीसाठी ग्राहय धरण्यात यावा. सबब, आदेश. आ दे श 1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत येते. 2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |