सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 215/2014.
तक्रार दाखल दि.30-12-2014.
तक्रार निकाली दि.05-10-2015.
श्री. दादासो एकनाथ गाडे,
रा. कोंडवे, ता.जि.सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
1. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ
मर्यादित,अकोला
महाबीज भवन, कृषीनगर, अकोला,
पिन – 444 104 तर्फे सचिव
2. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ
मर्यादित,अकोला
शाखा गोडोली, सातारा.
तर्फे जिल्हा व्यवस्थापक
3. म्हसवडकर एजन्सीज,
283/1/2,राधिका रोड,सातारा
तर्फे माहितगार इसम .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.जे.पी.शिंदे.
जाबदार क्र. 1 ते 3 तर्फे – अँड.पी.व्ही.सपकाळ.
– अँड.एस.एस.कुलकर्णी.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे मौजे कोंडवे, ता.जि.सातारा येथील रहिवाशी असून व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यांनी त्यांचे जमीन सर्व्हे नंबर 117/1 मध्ये सोयाबीन पीक घ्यायचे असलेने दि.16/6/2014 रोजी रक्कम रु.2,385/- जाबदार क्र. 1 ने तयार केलेले मार्केटमध्ये उत्तम बीयाणे म्हणून विक्रीस पाठवलेले सोयाबीन J.S.335 वाणाचे बीयाणे जाबदार क्र. 3 चे म्हसवडकर एजन्सी मधून खरेदी केले. प्रस्तुत बीयाणे खरेदी करताना तक्रारदाराने 12:32:16 च्या 50 किलोच्या दोन गोणी प्रत्येकी रक्कम रु.1,055.24 प्रमाणे रक्कम रु.2,110.48 देऊन खरेदी केले. तक्रारदार व त्यांचे भाऊ प्रकाश एकनाथ गाडे हे एकत्र राहणेस असून शेतीही एकत्रीत करतात. तक्रारदार कुटूंबप्रमख असलेने बियाणे त्यांनी खरेदी केले व ता. 15/07/2014 रोजी प्रस्तुत बियाणे खतासह डबल चाडयाच्या कुरीने (पाथरीने) पेरणी केली. परंतू बियाणे सदोष असलेने व उगवण शक्ती नसलेने ते उगवले नाही. म्हणून तक्रारदार यांनी ता. 22/7/2014 रोजी जाबदार क्र. 1 चे प्रतिनिधी जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, सातारा यांचेकडे अर्ज देऊन एकूण रक्कम रु.10,495/- खर्च झालेचे टिपणासह कळवून एकरी दहा क्विंटलप्रमाणे नुकसानी द्यावी असा अर्ज दिला. परंतू त्याची जाबदारतर्फे कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे दि.2/8/2014 रोजी कृषी अधिकारी, पंचायत समिती, सातारा यांचेकडे तक्रार अर्ज दिला व त्यांना तक्रारदाराचे सर्व्हे नं. 117/1 मध्ये त्यांनी 40 आर क्षेत्रात सोयाबीन बियाणे दोन गोणी खताबरोबर पेरले. परंतू ते उगवले नसलेने आर्थिक हानी झाली असून जाबदार यांचेवर कारवाई करुन नुकसानभरपाई मिळावी असे कळविले. त्यानंतर दि.27/8/2014 रोजी कृषी अधिकारी, तालुका पंचायत समिती, सातारा तथा सदस्य सचिव, बियाणे तक्रार निवारण समिती यांनी पाहणी करणेस येत असलेचे कळविले व त्यांनी दि.5/9/2014 रोजी तपासणी केली. त्यावेळी जाबदारतर्फे गोडोली,सातारा शाखेचे महाबीज प्रतिनिधी श्री. कुलकर्णी व जाबदार क्र. 3 चे प्रतिनिधी शशांक शहा उपस्थित होते. प्रस्तुत बियाणे तक्रार निवारण समिती सदस्य तथा कृषी अधिकारी यांचे तपासात बियाणे सदोष असलेने उगवण शक्ती फक्त 15 टक्के दिसून आली असे त्यांचे प्रत्यक्ष पाहणी व चौकशीवरुन दिसून आले. या परिस्थितीत तक्रारदाराने हंगामात केलेले कष्ट, शेताची मेहनत, मशागत व पेरणी खर्च, बियाणे खरेदी खर्च, हे सर्व वाया गेले. तसेच तक्रारदाराचे दहा क्विंटल सोयाबीन पिकाचे उत्पन्न बुडाले. त्याचप्रमाणे तक्रारदाराचे शेतीची मेहनत, निगा, पेरणी, खत-बियाणे ने-आण करुन जागेवर पोहचवण्याचे कष्ट, असे शारिरीक कष्टाचे नुकसान झाले. तसेच पिक न आलेने मानसिकत्रास व शारिरीकत्रास यास सामोरे जावे लागले, यासाठी जाबदार यांचेकडून नुकसानभरपाई मिळणेसाठी तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार यांचेकडून रक्कम रु.10,495/- मेहनत, पेरणी, बियाणे, खत यांचे झाले खर्चास्तव, तसेच बुडाले पिकाचे नुकसानीस्तव रक्कम रु.35,000/-, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/-, तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.5,000/- अशी नुकसानभरपाई जाबदार यांचेकडून वसूल होवून मिळावी अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. प्रस्तुत कामी तक्रारदाराने नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि. 5/9 कडे अनुक्रमे तक्रारदाराने जाबदार यांचेकडून बियाणे खरेदी केलेबाबतचे बियाणांचे पिशवीवरील बियाणे प्रमाणीत प्रमाणपत्रे, तक्रारदाराने जाबदार क्र. 2 कडून जाबदार क्र. 1 कंपनीचे सोयाबिन बियाणे खरेदी केलेची पावती (मूळ बील), सदरचे बियाणे उगवले नसल्याने तक्रारदाराने मा. जिल्हा व्यवस्थापकसो, महाबीज, सातारा यांचेकडे केलेली लेखी तक्रार, तक्रारदाराने कृषी अधिकारीसो, सातारा पंचायत समिती सातारा यांचेकडे केलेल्या लेखी तक्रारीची खरी प्रत, तक्रारदाराचे तक्रारीबाबत मा. सचिव बियाणे तक्रार निवारण अधिकारी/कृषी अधिकारी, सातारा पंचायत समिती यांचा तपासणी अहवाल, तक्रारदाराने जाबदार यांना वकीलांमार्फत पाठवलेली रजि. नोटीस, पावत्यांसह, तक्रारदाराने जाबदार यांना पाठवलेली नोटीस जाबदारांना मिळालेच्या पोहोचपावत्या, नि.20 कडे तक्रारदाराने दाखल केलेले अँफीडेव्हीट व कागदपत्रे हाच पुरावा समजणेत यावा म्हणून तक्रारदाराची पुरसीस वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 2 ने नि. 12 कडे म्हणणे, नि.22 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि.23 कडे लेखी युक्तीवाद, जाबदार क्र. 3 ने नि.17 कडे म्हणणे, नि. 18 कडे अँफीडेव्हीट, नि. 23/1 कडे मुक्तता अहवाल, नि. 23/2 कडे परिपत्रक, नि.24 कडे जाबदार क्र. 1 ने जाबदार क्र. 2 ने दाखल केलेला युक्तीवाद हाच जाबदार क्र. 1 चा युक्तीवाद समजणेत यावा म्हणून पुरसिस वगैरे कागदपत्रे याकामी जाबदाराने दाखल केली आहेत.
जाबदार क्र. 2 व 3 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रार अर्जातील सर्व कथन फेटाळलेले आहे. त्यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदलेले आहेत. तक्रारदाराने जाबदार कंपनीच्या जे.एस.335 वाणाचे बियाणे खरेदी केले त्याची किंमत रक्कम रु.1,050.24 झाली हे कथन बरोबर आहे. परंतू प्रस्तुत तक्रारदाराने बियाणे निर्मीतीच्या व बियाणे लागवडीच्या आवश्यक असणा-या संपूर्ण बाबींची पूर्तता न करता मन मानेल त्याप्रमाणे लागवड केली तसेच चूकीच्या पध्दतीने केलेली लागवड व मशागत यामुळे झाले नुकसानीस जाबदारांना जबाबदार धरणे तसेच सदर बियाणे खराब आहे हे ठरविण्यासाठी स्वतःच्या आर्थिक बळाचा वापर करुन कृषी विभागाबरोबर संगनमत करुन त्यांच्यावर दबाव आणून सदरचे सोयाबिन बियाणे सदोष असलेचा निष्कर्ष काढून घेतला आहे. सदर कामी केलेला पंचनामा बोगस आहे. तक्रारदाराने जाबदारांला खोटया मजकूराची नोटीस पाठवली ती नोटीस जाबदाराला मान्य नाही. या नोटीसला जाबदाराने उत्तर पाठवले आहे. दि. 22/7/2014 रोजी संगनमताने पिकपाहणी पंचनामा केला आहे. त्यावेळी तक्रारदाराने सोयाबीन पीकामध्ये घेवडयाचे आंतरपीक घेतले होते. सोयाबीनची उगवण बीयाणांच्या दोषांमुळे झालेचा उल्लेख पंचनाम्यात नाही. त्यामुळे जाबदारांचे बीयाणे दोषयुक्त नाही हे सिध्द होते. तक्रारदाराने मागणी केलेली नुकसानीची रक्कम अवास्तव असून मान्य नाही. प्रस्तुत वाणाचे बियाणे खरेदी केलेल्या इतर कोणत्याही शेतक-यांची बियाणे सदोष असलेची तक्रार नाही. तक्रारदाराने केलेली लागण ही चूकीच्या पध्दतीने केल्याने व इतर घटकांचा परिणाम झाला व त्यामुळे उत्पादन कमी झाले त्यामुळे तक्रारदाराची तक्रार ही संयुक्तिक नाही. तक्रारअर्ज फेटाळणेस पात्र आहे.
जाबदार क्र. 3 ने म्हटले आहे की, फक्त विक्रेता असलेने व तो उत्पादक नसलेने प्रस्तुत जाबदार क्र. 3 यांस याकामी तक्रारदाराचे नुकसानीस जबाबदार धरु नये असे म्हटले आहे.
5. प्रस्तुत कामी वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्तुत तक्रार अर्जाच्या निराकरणार्थ मे. मंचाने पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा
पुरविली आहे काय? होय.
3. तक्रारदार नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? होय.
4. अंतिम आदेश काय? खाली नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण-तक्रारदाराने त्याचे जमीन सर्व्हे नं.117/1 मध्ये सोयाबीन पीकाची लावण करणेसाठी दि.16/6/2014 रोजी जाबदार क्र. 1 यांनी तयार केलेले व मार्केटमध्ये उत्तम बियाणे म्हणून विक्रीस पाठवलेले सोयाबीन J.S. 335 वाणाचे रक्कम रु.2,385/- चे बियाणे जाबदार क्र. 3 यांचे म्हसवडकर एजन्सी मधून खरेदी केले. प्रस्तुत बियाणे खरेदी करतेवेळीच तक्रारदाराने सोयाबीन पेरणीसाठी 12:32:16 व 10 :26:26 या खताच्या दोन गोणी खरेदी केल्या. त्याची किंमत प्रत्येकी रक्कम रु.1,055.24 व रक्कम रु.2,110.48 अशी होती आणि सदरची रक्कम तक्रारदाराने जाबदारांना अदा केलेच्या पावत्या, बियाणे प्रमाणीत प्रमाणपत्रे, नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 व 5/2 कडे दाखल केले आहेत. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक असलेचे निर्विवादरित्या स्पष्ट झाले आहे. तसेच प्रस्तुत कामी तक्रारदाराने योग्य त्या पध्दतीने सोयाबीनची लावण केली. परंतू प्रस्तुत लावण/पेरणी दि.15/7/2014 रोजी त्यांचे शेतामध्ये केली. परंतू प्रस्तुत सोयाबीन उगवून आले नाही. त्यामुळे तक्रारदाराने ता. 22/7/2014 रोजी जाबदार क्र. 1 चे प्रतिनिधी जिल्हाव्यवस्थापक, महाबीज, सातारा यांचेकडे अर्ज देऊन एकूण रक्कम रु.10,495/- खर्च झाल्याचे टिपणासह कळवून एकरी दहा क्विंटल प्रमाणे नुकसानभरपाई मिळावी असा अर्ज दिला, परंतू जाबदार यांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदाराने दि. 2/8/2014 रोजी कृषी अधिकारी, पंचायत समिती, सातारा यांचेकडे तक्रार अर्ज सादर केला व त्यांना त्यांना तक्रारदाराचे सर्व्हे नं.117/1 मध्ये 40 आर क्षेत्रात सोयाबीन दोन गोणी खतांबरोबर पेरले. परंतू आतपर्यंत सोयाबीन बीयाणे उगवलेले नाही. त्यामुळे खरीप पिकाचे पूर्ण नुकसान झाले आहे. तरी योग्य ती कारवाई करुन नुकसानभरपाई मिळणेसाठी कृषी अधिकारी तालुका पंचायत समिती, सातारा तथा सदस्य सचीव, बियाणे तक्रार निवारण समिती यांना कळविले असता प्रस्तुत कृषी अधिकारी यांनी दि. 3/9/2014 रोजी प्रस्तुत शेताची पाहणी केली व बियाणे सदोष असलेने उगवणशक्ती फक्त 15 टक्के असलेचा अहवाल सदर कृषी अधिकारी यांनी दिला. प्रस्तुत पाहणीचेवेळी जाबदार क्र. 1 चे व जाबदार क्र. 3 चे प्रतिनिधी समक्ष उपस्थित होते. या दोघांचीही साक्ष कृषी अधिकारी यांनी नोंदवली आहे व अहवाल सादर केला आहे. प्रस्तुत सर्व कागदपत्रे तक्रारदाराने नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि.5/9 कडे दाखल केली आहेत. प्रस्तुत कृषी अधिकारी यांनी बियाणे सदोष असलेने उगवण शक्ती 15 टक्के असलेचा अहवाल सादर केलेनंतर तक्रारदाराने त्यांचे झाले आर्थिक व शारीरिक त्रासाबाबत नुकसानभरपाई मिळणेसाठी जाबदार यांना नोटीस दिली परंतू जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही. प्रस्तुत नोटीस जाबदार क्र. 1 ते 3 यांना पाठवलेच्या व प्रस्तुत नोटीस सदर जाबदार यांना मिळाल्याच्या पोहोचपावत्या तसेच नोटीसची स्थळप्रत, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/7,5/8 व 5/9 कडे याकामी दाखल आहे. परंतू नोटीस मिळूनही जाबदार यांनी त्यास कोणतेही उत्तर दिले नाही अथवा नुकसानभरपाई सुध्दा अदा केली नाही. तक्रारदाराने त्यांचे कथन सिध्द केलेले आहे.
प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1,2 व 3 यांनी तक्रारदाराने बियाणे खरेदी केलेचे मान्य केले आहे. परंतू तक्रारदाराचे सोयाबीन पिक घेतले जमिनीचा पिकपाहणी पंचनामा हा राजकीय व आर्थिक बळाचा वापर करुन केला आहे असे म्हटले आहे. तसेच पंचनाम्यामध्ये आंतरपिकाचा उल्लेख नाही, तो मोघम केलेला आहे असे म्हटले आहे. तसेच तालुका कृषी अधिका-यांचा अहवाल ही खोटा व चूकीचा असलेचे जाबदाराने म्हटले आहे. परंतू ही बाब सिध्द करणेसाठी जाबदाराने कोणतेही लेखी अथवा तोंडी पुरावे मे. मंचात दाखल केलेले नाहीत. त्यामुळे जाबदाराचे सदर म्हणणे सिध्द होत नाही. त्यामुळे तक्रारदाराने दाखल केले तालुका कृषी अधिकारी यांचा अहवाल व पिक परिस्थितीचा पंचनामा विश्वासार्ह वाटतात व अशी परिस्थिती असतानाही तक्रारदाराचे पिकाचे पूर्णतः नुकसान होऊनही जाबदाराने तक्रारदाराला कोणतीही नुकसानभरपाई दिली नाही. तसेच सदोष बियाणांची विक्री केली ही सेवेतील त्रुटी असून जाबदाराने अनुचित व्यापारी व्यवस्थेचा अवलंब केला आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
सबब जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तीकपणे तक्रारदार यांना नुकसानभरपाई देणेसाठी जबाबदार धरणे न्यायोचीत होईल असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. जाबदार क्र. 3 हे विक्रेते आहेत. त्यामुळे जाबदार क्र. 3 यांना तक्रारदाराचे नुकसानीस जबाबदार धरणे योग्य होणार नाही असे आम्हास वाटते. सबब सदर कामी जाबदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना बीयाणे, खते, शेतीची मशागत, व पगरणी यासाठी रक्कम रु.10,000/- तसेच सोयाबीन उगवले नसलेने, पिकाचा हंगाम बुडाल्याने, तक्रारदाराचे झालेले नुकसान रक्कम रु.30,000/-, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.5,000/- जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिपणे तक्रारदाराला अदा करणे न्यायोचीत होणार आहे असे आम्हास वाटते.
8. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार क्र. 1 व 2 यांना वैयक्तिक व संयुक्तीकपणे तक्रारदाराची
नुकसानभरपाई देणेसाठी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार धरणेत येते.
3. जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे तक्रारदार यांना बी-
बीयाणे, खते, शेतीची मशागत व पेरणी याकरीता आले खर्चापोटी रक्कम
रु.10,000/-(रुपये दहा हजार फक्त) अदा करावेत.
4. तक्रारदाराचे पिकाचे सदोष बियाणामुळे खरीप पिकाची उगवण अत्यल्प झालेने
हंगाम बुडाल्याने झाले नुकसानीपोटी रक्कम रु.30,000/- (रुपये तीस हजार
फक्त) जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे तक्रारदाराला अदा
करावेत.
5. प्रस्तुत रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत
द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व
संयुक्तीकपणे तक्रारदाराला अदा करावे.
6. जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे मानसिक व शारिरिक
त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त) तक्रारदाराला अदा
करावेत.
7. जाबदार क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकपणे तक्रारदाराला तक्रार
अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/-(रुपये पाच हजार मात्र) अदा करावेत.
8. वरील नमूद सर्व आदेशाचे पालन/पूर्तता तक्रारदार व जाबदार यांनी आदेश
पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावे.
9. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण
कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द कारवाई करणेची मुभा राहील.
10. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
11. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 05-10-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.