निकालपत्र :- (दि.25.10.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2, 3 व 10 यांनी तसेच क्र.5, 7 व 9 यांनी एकत्रित म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला क्र.6, 8 व 11 यांनी त्यांचे स्वतंत्रपणे म्हणणे दाखल केले आहे.. उर्वरित सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी तसेच सामनेवाला क्र.5, 6 व 8 यांनी स्वत: युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे मुदत बंद ठेवींच्या स्वरुपात रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांच्या तपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | तक्रार क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव तारीख | मुदतपूर्ण तारीख | 1. | 289/10 | 2884 | 20000/- | 29.03.2004 | 29.03.2010 | 2. | --”-- | 2885 | 6000/- | 29.03.2004 | 29.03.2009 |
(3) सदर ठेवींची मुदत संपल्यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे रक्कमांची वारंवार लेखी व तोंडी मागणी केली आहे. तक्रारदारांनी सदरच्या ठेवी या त्यांच्या अडीअडचणीच्या काळात उपयोगी पडाव्यात म्हणून ठेवलेल्या आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्कमा देण्यास टाळाटाळ केली. ठेवींच्या मुदती संपले तारखेअखेर व्याज देवून सदरच्या ठेवींची मुदत पुन्हा पुन्हा वाढवून दिलेली आहे. तथापि, सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव रक्कमा अदा केल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्याच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला क्र.2, 3 व 10 यांनी त्यांच्या एकत्रित म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी त्यांचे नातेवाईक संचालक व माजी व्हा.चेअरमन, श्री.वसंतराव केरबा यादव यांचे नांव सामनेवालांमधून वगळून केलेला अर्ज चालणेस पात्र नाही. प्रस्तुत सामनेवाला यांनी कर्ज घेतलेले नाही अथवा नातेवाईकांना कर्ज दिलेले नाही. प्रस्तुत सामनेवाला यांनी संस्थेमध्ये 2 लाखापर्यन्त ठेव ठेवलेली आहे, ती अद्याप मिळालेली नाही. सध्या उप-निबंधक (शहर), कोल्हापूर यांनी सामनेवाला संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करुन त्याजागी प्रशासक यांची नेमणुक केली आहे व ते सध्या कर्जाची वसुली करीत आहेत. त्यामधून तक्रारदारांची रक्कम देणे क्रमप्राप्त होईल, तसे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (6) सामनेवाला क्र.5, 7 व 9 यांनी एकत्रित म्हणणे दाखल करुन तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी त्यांचे नातेवाईक व सामनेवाला संस्थेचे जेष्ठ-विद्यमान संचालक, वसंत केरबा यादव यांचे नांव मुद्दाम सामनेवाला संस्थेच्या संचालक मंडळामध्ये नोंद केलेले नाही. तक्रारदारांनी वसंत यादव यांच्या संगनमताने त्यांच्या ठेवीवर आजअखेर भरमसाठ व्याज वसूल केले आहे. विद्यमान चेअरमन, विलास सयाजी जगताप व व्हा.चेअरमन, अशोक दत्तात्रय बामणे यांनी दि.16.02.2010 रोजी संस्थेच्या कोणत्याही संचालकाला विश्वासात न घेता परस्पर आपले मर्जीतील ठेवीदारांचे प्रशासक मंडळ नेणमेबाबत उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांचेकडे लेखी अर्ज केला. त्यामुळे दि.02.03.2010 पासून सामनेवाला संस्थेमध्ये सर्व आर्थिक कारभार विद्यमान ठेवीदारांच्या प्रशासक मंडळ आणि सामनेवाला संस्थेचे चेअरमन विलास सयाजी जगताप व व्हाईस चेअरमन, अशोक दत्तात्रय बामणे हे संगनमताने करीत आहेत. त्यामुळे सामनेवाला संस्थेचे चेअरमन विलास सयाजी जगताप व व्हाईस चेअरमन, अशोक दत्तात्रय बामणे आणि प्रशासक मंडळ यांचेवर कारवाई व्हावी अशी विनंती केली आहे. (7) सामनेवाला क्र.5, 7 व 9 यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत दि.27.12.2007 रोजीचा संचालक मंडळ ठराव क्र.5, ठराव क्र.6, दि.21.01.2008 रोजी उपनिबंधकांना दिलेले पत्र, दि.29.01.2008 रोजी निवडणुक अधिकारी यांचे निवडीस मान्यता दिलेले पत्र, निवडणुकीचा मंजूर कार्यक्रम, प्रशासक मंडळ नेमणुकीचा आदेश इत्यादीच्या झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत. (8) सामनेवाला क्र.11 यांनी म्हणणे दाखल करुन तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी त्यांच्या ठेवी काढून घेतलेल्या आहेत व सेव्हींग खात्यावर परत ठेवलेल्या आहेत. त्यावेळी प्रस्तुत सामनेवाला या संचालक नव्हत्या. तक्रारदारांनी सदरच्या ठेवीवर मुदत संपलेवर व्याजही स्विकारले आहे. प्रस्तुत सामनेवाला यांच्या संचालक पदाची मुदत डिसेंबर 2007 मध्ये संपलेली असलेमुळे व महारारष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 73 (एच्) प्रमाणे नविन संचालक मंडळाची निवड केलेली नसल्याने प्रस्तुत सामनेवाला यांना तक्रारदारांचे तक्रारीबाबत जबाबदार धरता येणार नाही. सबब, प्रस्तुत सामनेवाला यांना प्रस्तुत कामातून वगळणेत यावे अशी विनंती केली आहे. (9) सामनेवाला क्र.6 व 8 यांनी सामनेवाला क्र.5, 7 व 9 यांचेप्रमाणेच म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत दि.11.12.2007 रोजीचे सामनेवाला क्र.6 चे राजीनामापत्र, दि.27.12.2007 रोजीचा ठराव क्र. 5 व 6, प्रशासक मंडळ नेमणुकीचा आदेश इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (10) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्थेमध्ये ठेव रक्कमा ठेवलेल्या आहेत; सदर ठेव पावत्यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्थेमध्ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्कमांच्या मुदती संपून गेलेल्या आहेत व सदर रक्कमांची तक्रारदारांनी व्याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यात सामनेवाला संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त झाले व प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली. तसेच, निवडणुक कार्यक्रम जाहिर झालेबाबतची कथने केलेली आहेत. त्यामुळे तक्रारदारांची ठेव रक्कम देणेची त्यांची जबाबदारी येत नसल्याचे म्हटले आहे. सामनेवाला म्हणतात त्याप्रमाणे परिस्थिती असेल तरी सामनेवाला हे तक्रारदार त्यांची ठेव संस्थेमध्ये ठेवतेवेळी संचालक म्हणून कार्यरत असलेबाबत युक्तिवादाचेवेळेस तक्रारदारांच्या वकिलांनी या मंचासमोर प्रतिपादन केले आहे. त्यामुळे सामनेवाला हे तक्रारदारांच्या व्याजासह ठेवी परत करणेबाबतची त्यांची जबाबदारी टाळू शकत नाहीत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (11) सामनेवाला क्र.6 व 11 यांनी त्यांच्या म्हणण्यात त्यांनी सामनेवाला संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला असल्याचे कथन करुन तक्रारदारांच्या रक्कमा देणेस ते जबाबदार होत नसल्याचे कथन केले आहे. उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता सामनेवाला क्र.11 यांनी सदर कथनाच्या पुष्टीप्रित्यर्थ त्यांच्या राजीनामा स्विकारलेबाबत अगर त्यांना त्यांच्या जबाबदारीतून मुक्त केले असलेबाबत तसेच त्यांच्या म्हणण्यातील अन्य कथनांच्या पुष्टी प्रित्यर्थ कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. सामनेवाला क्र.6 यांनी त्यांचा राजीनामा स्विकारलेबाबतचा व त्यांनी संचालक पदातून मुक्त करणेत आलेबाबतचा ठरावाचा उतारा दाखल केलेला आहे. तक्रारदारांच्या वकिलांनी त्यांचे युक्तिवादाचेवेळी प्रस्तुत सामनेवाला या तक्रारदारांनी त्यांच्या ठेव रक्कमा या प्रस्तुत सामनेवाला संचालक हे संचालक पदावर कार्यरत असताना ठेवलेल्या असल्याचे प्रतिपादन केले. त्यामुळे प्रस्तुत सामनेवाला यांनी त्यांच्या संचालक पदाचा राजीनामा दिला व त्यांना त्यांच्या पदावरुन कार्यमुक्त करणेत आले असले तरी प्रस्तुत सामनेवाला हे संस्थेचे तत्कालिन संचालक असल्याने तक्रारदारांच्या ठेव रक्कमा व्याजासह परत करणेची त्यांची जबाबदारी टाळू शकत नाहीत या निष्कर्षाप्रत हे मंच येते. सामनेवाला यांनी त्यांच्या उर्वरित कथनांच्या पुष्टयर्थ कोणताही समाधानकारक पुरावा दाखल केलेला नाहीत. तसेच, जी कथने केलेली आहेत त्यांचा दुरान्वयेही या तक्रारीशी संबंध नाही. सबब, तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा सामनेवाला यांनी न देवून त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्या ठेव रक्कमा देण्याची सामनेवाला क्र. 1 ते 3 व 5 ते 11 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.4 व 12 (अ)(ब)(क) हे अनुक्रमे संस्थेचे कर्मचारी व प्रशासक मंडळ असल्याने त्यांची केवळ संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (12) तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी दाखल केलेल्या ठेव पावत्यांच्या सत्यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्या या मुदत बंद ठेवींच्या आहेत व त्यांची मुदत संपलेचे दिसून येते. तसेच, तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत सामनेवाला यांनी सदर ठेवींची मुदत वाढविताना देय असलेले व्याज दिलेचे कथन केले आहे. त्यामुळे तक्रारदार हे त्यांच्या मुदत ठेव रक्कमा शेवटची मुदत संपलेल्या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (13) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र.1 ते 3, 5 ते 11 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.4 व 12 (अ)(ब)(क) यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील मुदत बंद रक्कमा द्याव्यात. सदर रक्कमांवर खालील कोष्टकात नमूद तारखेपासून संपूर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | तक्रार क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | व्याज देय तारीख | 1. | 289/10 | 2884 | 20000/- | 29.03.2010 | 2. | --”-- | 2885 | 6000/- | 29.03.2009 |
(3) सामनेवाला क्र.1 ते 3, 5 ते 11 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.4 व 12 (अ)(ब)(क) यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा. (4) सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्यांच्या ठेवींपोटी यापूर्वी जर काही व्याजाच्या रक्कमा अदा केल्या असतील तर सदर व्याजाच्या रक्कमा वळत्या करुन घेण्याचा सामनेवाला यांचा अधिकार सुरक्षित ठेवणेत येतो.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |