निकालपत्र :- (दि.12/10/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीस लागू झाली. सर्व सामनेवाला हे हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले.सामनेवाला तर्फे लेखी युक्तीवाद दाखल. तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकणेत आला.युक्तीवादाच्या वेळेस सामनेवाला गैरहजर. सदरची तक्रार ही सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या ठेवीच्या रक्कमेवरील व्याज न दिलेने दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) तक्रारदार हे कोल्हापूरचे कायमचे रहिवाशी असून महाराष्ट्र राज्य विद्यूत मंडळातून कार्यकारी अभियंता या पदावर दि.31/03/2002 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत. तदनंतर तक्रारदार व त्यांचे मित्रांनी साईनवेव्ह बायोमास पॉवर प्रा.लि. या नावांने कंपनी अक्ट खाली कंपनी स्थापन केलेली आहे व तिचे ऑफिस मुंबई येथे आहे.सामाजिक कार्याची आवड म्हणून तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 संस्थेचे गेली 20 वर्षे संचालक म्हणून काम केलेले आहे. त्यांचे नमुद सामनेवाला संस्थेमध्ये बचत खाते क्र.1/16 चालू केले तक्रारदार याचे आजरा को-ऑप बॅंक लि. व सिटी फायनान्स या वित्त संस्थेचे कर्ज खाते थकीत आलेने व वसुलीचा तगादा लागलेने त्यांनी नमुद कंपनीकडून रक्कम रु.3,20,000/- रक्कमेची मागणी केली. याची माहिती त्यांनी सामनेवाला संस्थेचे चेअरमन विलासराव सयाजीराव जगताप, व्हा.चेअरमन अशोक बामणे व सेक्रेटरी अशोक यादव यांना दिली असता त्यांनी वर नमुद रक्कम सदर संस्थेत भरले नंतर सदर रक्कमेचा संस्थेच्या आयडीबीआय बँकेतील खरी कॉर्नर शाखेतील खातेवरील वर नमुद रक्कमेचा चेक देत असलेची खात्री व हमी दिली. ब) वर नमुद कंपनीने तक्रारदाराचे नांवाऐवजी नमुद सामनेवाला क्र.1 पत संस्थेच्या नावाने रक्कम रु.3,20,000/- चा डी.डी. क्र.043733 पाठवला. त्यावर अकौन्ट नंबरही लिहीलेला नव्हता. नमुद डी.डी.मिळालेनंतर तक्रारदाराचा नावाऐवजी संस्थेच्या नावाने चेक आलेने तसेच तक्रारदार संस्थेचे काही कर्ज अगर देणे लागत नसलेने वर नमुद व्यक्तींनी सदर डी.डी. बॅंकेत जमा करा व तेवढयाच रक्कमेचा चेक देतो अशी खात्री दिलेने तक्रारदाराने दि.24/04/2010 रोजी नमुद सामनेवाला संस्थेच्या आयडीबीआय बँकेच्या खातेवर जमा केला व त्याच दिवशी वर नमुद व्यक्तीने खात्री दिलेप्रमाणे तेवढयाच रक्कमेचा चेक तक्रारदारास दिला. सदर डी.डी. वटून नमुद रक्कम संस्थेच्या खातेवर जमा झालेनंतर संस्थेच्या सेक्रेटरीने तक्रारदारास रक्कम रु.3,20,000/-ची जमा पावती तक्रारदाराचे सेव्हींग खाते पुस्तकावर नोंदवून दि.24/06/2010 रोजी दिलेले आहे. प्रस्तुतची रक्कम सामनेवाला संस्थेच्या खातेवर अजूनही आहे. क) तदनंतर संस्थेचे चेअरमन श्री जगताप व व्हा.चेअरमन बामणे यांनी संस्थेचे मोठेमोठे ठेवीदार सभासद असतानाही सभासद व ठेवीदारांना अंधारात ठेवून उपनिबंधकाकडून सामनेवाला क्र. 2 ते 4 यांची प्रशासक मंडळावर नियुक्ती केलेचे समजून आले. नमुद प्रशासक मंडळाने अदयापही संस्थेतील कागदपत्रांचा चार्ज अथवा ताबा घेतलेला नाही अथवा सहकार खात्यामार्फत दिलेला नाही. अशी वस्तुस्थिती असतानाही तक्रारदाराने संस्थेला दिलेला चेक तक्रारदाराचे बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा- खासबाग येथे भरला. नमुद बँकेने खाते गोठवले आहे असा शेरा मारुन प्रस्ततुचा चेक मेमोसह दि.07/05/2010 रोजी तक्रारदारास परत दिला. याचा मानसिक धक्का तक्रारदारास बसला. त्यांनी ताबडतोब जाऊन वर नमुद चेअरमन जगताप यांना विचारणा केली असता रक्कम देणेची व्यवस्था करतो असे आश्वासन दिले. सेक्रेटरीनां विचारणा केली असता चेअरमन व व्हा.चेअरमन यांनी प्रशासक मंडळाला तुमची ठेव वसुल करावयाची आहे ना तर मग आयडीबीआय बँकेस चेक वटवू नये म्हणून पत्र देणेस सांगितले. प्रशासक मंडळातील सदस्य हे नमुद चेअरमन व व्हा.चेअरमनचे मित्र असलेने मी काही करु शकणार नाही असे सांगितले. तदनंतर दि.02/05/2010 रोजी चेअरमन यांना भेटणेस तक्रारदार गेले असता प्रशासक मंडळाने पत्र दिले असलेने मी काही करु शकत नाही असे सांगून टाळाटाळ केली. तदनंतर तक्रारदाराने त्यांना नोटीसही दिलेली आहे. प्रशासक मंडळाने विनाअधिकार खाते गोठवणेचे पत्र देऊन सेवेत कसूर केलेला आहे. त्यामुळे प्रस्तुतचा अर्ज सदर मंचापुढे दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करणेत यावी व सदर सेव्हींग खातेवरील रक्कम रु.3,20,000/- रोख अथवा चेकने अदा करणेबाबत आदेश व्हावेत. सदर रक्कमेवर दि.24/04/2010 पासून 12 टक्के दराने व्याज मिळावे,शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारीतील नमुद डी.डी., सदर डी.डी. आयडीबीबाय बँकेत भरलेची पावती, तक्रारदाराने सेक्रेटरी यांना पाठवलेले पत्र, सेव्हींग खातेवर रक्कम जमा केलेची जमा पावती, सेव्हींग खातेउतारा, सामनेवाला संस्थेने तक्रारदाराचे नांवे दिलेला चेक, मेमो, बँक ऑफ महाराष्ट्र मधील तक्रारदारचे बचत खातेचा उतारा, डिमांड नोटीस, व त्याच्या पोच पावत्या इत्यादीचे सत्यप्रती तसेच रिजॉइन्डर दाखल केलेला आहे. तसेच दि.31/08/2010 रोजी तक्रारदाराचे सामनेवाला संस्थेत कर्ज अथवा येणे नसलेबाबतचा दाखला, साईनवेव्ह बायोमास पॉवर प्रा.लि.चे बँक ऑफ इंडिया येथील खातेउतारा इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला क्र.2 ते 4 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदार स्वत: संस्थेचे संचालक आहेत. तसेच ते प्रतिष्ठित अधिकारी होते. सचिव व तक्रारदार यांचेमध्ये ड्राफ्ट भरणेपूर्वी काय चर्चा झाली याबाबतचा खुलासा होणे गरजेचे आहे. गेले दिड वर्षापासून सामनेवाला संस्था कुलूप लावून बंद आहे. कोणतेही व्यवहार अथवा देवघेव चालू नाही. अशा परिस्थितीत संस्थेच्या नावाच्या डीडीच्या रक्कमेची तक्रारदाराचे सेव्हींग खातेवर जमा करुन तशी जमा पावती दिलेली आहे तसेच त्यांना चेकही दिलेला आहे. सदर हा बेजबाबदार गैरकारभार आहे. गोरगरीब ठेवीसाठी हेलपाटे घालतात व संचालक ठेवी मिळणेसाठी ग्राहक मंचात तक्रार करत आहेत. सचिव व संचालक मंडळ यांनी संगनमताने स्वत:च्या व हितसंबंधीच्या ठेवी मिळणेसाठी काहीतरी जुळवाजुळव केलेली आहे. सचिव यांनी अदयापही प्रशासक मंडळाला चार्ज दिेलेला नाही. त्याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. बायोमास कंपनीने संस्थेच्या नांवे डीडी दिेलेला आहे. नमुद संस्थेत अंदाजे 250 ठेवीदारांनी 43 लाख रुपयाच्या ठेवी ठेवलेल्या आहेत. सदर ठेवीच्या मुदती संपलेल्या आहेत. तक्रारदार सचिवांच्या सहाय्याने अधिकाराचा गैरवापर करुन नमुद कंपनीच्या रक्कमेचा आपल्या नांवे धनादेश घेतला आहे व तो वटवणेसाठी प्रयत्न केला आहे. सदर धनादेश न वटलेमुळे नमुद मंचासमोर दिशाभूल करुन खोटी तक्रार दाखल केली आहे. संस्थेच्या नावांवरील पैशाचा अपहार करणेचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचेवर कायदेशीर गुन्हा दाखल करणेबाबत आम्ही सल्ला घेत आहोत. उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे आदेशाने प्रशासकांना अधिकार प्राप्त झालेले आहेत. श्री धडाम व जाधव यांनी राजीनामा दिलेने त्यांचे जागी शेवडे व खराडे यांची नेमणूक झालेली आहे. अनेक ठेवीदारांच्या रक्कमा 6-7 वर्षापासून देणे आहे. तक्रारीतील नमुद रक्कम दि.26/04/2010 रोजी जमा दाखवलेली आहे. अगोदरच्या ठेवी अग्रक्रमाने देणे जरुरीचे आहे. सबब तक्रारदाराची तक्रार फेटाळणेत यावी व नमुद रक्कम गोरगरिब ठेवीदारांना ठेवीच्या प्रमाणात वाटणेची परवानगी मिळावी अशी विनंती प्रस्तुत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ पोलीस निरिक्षक, जुना राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूर यांना पाठवलेले पत्र तसेच उपनिबंधक यांचे आदेश तसेच वेळोवेळी प्रशासक मंडळाने केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती इत्यादीच्या सत्यप्रती दाखल केलेल्या आहेत. (6) सामनेवाला क्र.1 तर्फे सेक्रेटरी श्री अशोक यादव यांनी दाखल केलेल्या शपथपत्राप्रमाणे नमुद यादव हे 18 वर्षे सेक्रेटरी म्हणून सामनेवाला संस्थेचे कामकाज पाहतात. तसेच तक्रारदार हे 15 वर्ष संचालक असलेने त्यांना ते ओळखतात. तक्रारदाराचे सामनेवाला क्र.1 यांचे संस्थेत बचत खाते असून ते संस्थेचे कोणत्याही प्रकारचे देणे लागत नाहीत. तक्रारदाराने संस्थेच्या नावाने डीडी क्र.043733 रक्कम रु.3,20,000/- चा डीडी तक्रारदाराचे नावाऐवजी संस्थेच्या नावाने काढलेला आहे. तक्रारदार संस्थेचे देणे लागत नाहीत. सबब डीडी त्यांचे नावाने बदलून देणेबाबत चेअरमन व व्हा.चेअरमन व स्वत: सचिव यांचेसमोर तक्रारदाराने चर्चा केली असता डीडी बदलून न आणता तो बँकेत जमा करा व तेवढयाच रक्कमेचा चेक तुम्हास देतो असे सांगितलेवरुन तक्रारदाराने प्रस्तुतचा डीडी सामनेवाला संस्थेच्या आयडीबीआय बँकेतील खातेवर जमा केला. चेअरमन श्री विलास जगताप व स्वत: सेक्रेटरी या नात्याने तक्रारदारास रक्कम रु.3,20,000/- चा चेक दिेला व तदनंतर तक्रारदार यांनी दि.22/04/2010 रोजी दिलेल्या अर्जाप्रमाणे साईनवेव्ह बायोमास पॉवर प्रा.लि. या कंपनीकडून आलेल्या पत्राच्या अनुषंगाने नमुद रक्कम तक्रारदाराचे खाते क्र.1/16 वर जमा करणेत आले व प्रस्तुत डीडी संस्थेच्या खातेवर जमा झालेनंतर दि.26/04/2010 रोजी सदर रक्कमेची जमा पावती व सेव्हींग खाते पुस्तका नोंद करुन दिलेली आहे. प्रस्तुतचा डीडी हा तक्रारदाराने जमा केला असून तक्रारदार हे संचालक असलेल्या साईनवेव्ह बायोमास पॉवर प्रा.लि. यांचे ऑफिसकडून पाठवलेला आहे. आमचे संस्थेचे नमुद कंपनीस कोणत्याही प्रकारचे देणे लागत नाही. प्रस्तुतची रक्कम न मिळालेने तक्रारदारने दि.12/05/2010 रोजी व्याज व नुकसानीस जबाबदार धरुन कायदेशीर कारवाईबाबत नोटीस दिलेली होती. आयडीबीआय बँकेतील संस्थेच्या खातेतील रक्कम ही तक्रारदाराने डीडीने जमा केली असलेने सचिवांनी उत्तर दिलेले नाही. सबब मे. मंच जो हुकूम करील त्याचे पालन सेक्रेटरी या नात्याने करीन असे शपथेवर नमुद केले आहे. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे तसेच तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचा मुद्दा निष्कर्षासाठी येतो. अ) नमुद सामनेवाला संस्थेवर दि.02/03/2010चे उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांचे आदेशान्वये नमुद सामनेवाला क्र.2 तसेच राजेंद्र जाधव व महादेव धडाम यांचे प्रशासक मंडळावर सदस्य म्हणून नेमणूक झालेचे दिसून येते. मात्र सामनेवाला क्र. 2 ते 4 यांनी आपल्या म्हणणेमध्ये श्री जाधव व श्री धडाम यांचे जागेवर श्री शेवडे व खराडे यांची प्रशासक मंडळात नेमणूक केलेचे प्रतिपादन केले आहे. मात्र त्याबाबतचा उपनिबंधकांचा आदेश प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला नाही. ब) तक्रारदार हे साईनवेव्ह बायोमास पॉवर प्रा.लि. याचे संचालक असून सदर कंपनीने तक्रारदाराचे नावे डीडी देणेऐवजी तक्रारदार संचालक असलेल्या नमुद सामनेवाला संस्थेच्या नांवे रक्कम रु.3,20,000/- चा डीडी नंबर 043733 दिला. सदर डीडी तक्रारदाराचे नावांऐवजी संस्थेच्या नांवे आलेमुळे तक्रारदार नमुद साईनवेव्ह बायोमास पॉवर प्रा.लि. कंपनीकडून डीडी बदलून देणेबाबत चेअरमन श्री जगताप व व्हा.चेअरमन श्री बामणे व सेक्रेटरी अशो यादव यांचेशी चर्चा केली असता त्याची काही गरज नाही तुम्ही संस्थेच्या आयडीबीआय बॅंकेते खातेवर डीडी भरा आम्ही तुम्हास तेवढयाच रक्कमेचा संस्थेचा तुमच्या नांवे चेक देतो अशी हमी दिलेने तक्रारदाराने दि.24/04/2010 रोजी प्रस्तुत डीडी सामनेवाला संस्थेच्या आयडीबीआय बँकच्या खरी कॉर्नरच्या शाखेत भरला आहे व प्रस्तुतची रक्कम नमुद संस्थेच्या सदर खातेत जमा झालेली आहे. हे दाखल डीडीची सत्यप्रत नमुद चेक तक्रारदाराने भरलेबाबतची भरणा पावती त्याबाबत तक्रारदाराने सचिवांना दिलेले पत्र, सचिवांनी तक्रारदारास जमा पावती क्र;3001 व्दारे प्रस्तुत डीडीची रक्कम तक्रारदारचे सेव्हींग ठेव खातेस जमा केलेची जमा पावती व प्रस्तुतची रक्कम तक्रारदाराचे सेव्हींग ठेव खाते क्र.1/16 वर दि.26/04/2010 रोजी प्रस्तुत डीडीची रक्कम जमा केलेबाबतची नोंद तसेच सामनेवाला संस्थेने तक्रारदाराचे नांवे रक्कम रु.3,20,000/-चा चेक दिलेला चेक क्र.015018 यावरुन तसेच तक्रारदाराने दाखल केलेल्या साईनवेव्ह बायोमास पॉवर प्रा.लि. यांचे बँक ऑफ इंडियाकडे असणा-या खातेउता-यावरील अनुक्रमांक 8 वरील दि.19/04/2010 रोजी डीडी ऑन कोल्हापूर या नांवे प्रस्तुत चेक दिलेबाबतची नोंद इत्यादी कागदपत्रांचा विचार करता वरील वस्तुस्थिती निर्विवाद आहे. नमुद सामनेवाला संस्थेचे सचिव श्री अशोक शंकर यादव यांनी दाखल केलेल्या शपथपत्राचा विचार करता वरील वस्तुस्थिती ही सत्य असलेचे निदर्शनास येते. तसेच तक्रारदार सामनेवाला संस्थेचे काहीही देणे लागत नव्हता त्याच प्रमाणे नमुद साईनवेव्ह बायोमास पॉवर प्रा.लि. कंपनीशी सामनेवाला संस्थेचा कोणत्याही प्रकारचा व्यवहार नव्हता हे दाखल सचिवांचे शपथपत्र तसेच सामनेवाला संस्थेने तक्रारदारास दिलेल्या देणे नसलेच्या दाखल्यावरुन निर्विवाद आहे. क) सामनेवाला संस्थेवर असलेले प्रशासक मंडळातील सदस्य आनंदाराव सदाशिव वणिरे, रामकृष्ण शेवडे व रणबीर खराडे यांनी अदयापही संस्थेचा चार्ज घेतलेला नाही. अथवा त्यांना तसा चार्ज दिलेबाबत पूर्ततेचा अहवालही प्रस्तुत कामी दाखल नाही. त्याबाबत प्रशासकांनी वेळोवेळी चार्ज देणेबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. तसेच पोलीस निरिक्षक, जुना राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूर यांना सचिव चार्ज देत नसलेबाबत पत्र दिलेले आहे. त्याप्रमाणे उपनिबंधक यांनाही त्यांनी कळवलेले आहे. दि.13/05/2010 तहसिलदार कार्यालय, करवीर यांचे कार्यकारी दंडाधिकारी, तालुका करवीर यांनी आपल्या आदेशामध्ये उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांनी दि.07/05/2010 चे पत्रान्वये नमुद संस्थेचे कामकाज बंद असून दप्तराचा ताबा प्रशासकांना दिलेला नसलेने पोलीस निरिक्षक जुना राजवाडा यांना प्रस्तुत संस्थेचे दप्तर जप्त करुन प्रशासकांच्या ताब्यात देणेत यावे व तसा अहवाल कार्यालयाकडे सादर करणेबबात आदेश केलेला आहे. ड) दि.19/04/2010 च्या साईनवेव्ह बायोमास पॉवर प्रा.लि. कंपनीने पाठवलेल्या पत्रानुसार बँक ऑफ इंडियाचा डीडी क्र.043733 दि.19/04/2010 रक्कम रु.3,20,000/- नमुद सामनेवाला संस्थेच्या नांवे पाठवून दिलेचे कळवले आहे व सदरची रक्कम सेव्हींग खाते क्र.1/16 मध्ये जमा करावी असेही पत्रात नमुद केलेले आहे. तक्रारदार हे नमुद संस्थेचे संचालक असून तक्रारदाराचे नांवाऐवजी तक्रारदार संचालक असलेल्या सामनेवाला संस्थेच्या नांवे प्रस्तुतचा डीडी दिला असलेची वस्तुस्थिती निर्विवाद आहे व प्रस्तुतची रक्कम वर नमुद कंपनीने तक्रारदारास सदर डीडी दिला असलेची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदार सामनेवाला संस्थेचे कोणतेही देणे लागत नाही तसा दाखला प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. तसेच नमुद कंपनीशीही सामनेवाला संस्थेचा कोणताही व्यवहार नाही हे सामनेवाला संस्थेच्या सेक्रेटरी यांनी त्यांचे शपथपत्रात कबूल केले आहे. सबब प्रस्तुतची रक्कम तक्रारदाराचे सेव्हींग खातेवर जमा केलेली आहे व ती तक्रारदाराचीच आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. इ) सदर मंचापुढे सदर व्यवहाराबाबत सत्य वस्तुस्थिती आलेली आहे. सामनेवाला प्रशासक मंडळाने त्यांचेकडे कोणत्याही प्रकारचा चार्ज अथवा दप्तर ताबा नसताना तक्रारदाराचे सेव्हींग खातेवरील रक्कम अदा करणेबाबत सामनेवाला संस्थेने तक्रारदाराचे नांवे दिलेला चेक पत्र देवून वटवू दिेलेला नाही ही सामनेवाला प्रशासकांची कृती कायदयास धरुन नाही. सामनेवाला प्रशासकांची नेमणूक व नेमणूकीनंतर दप्तर ताब्यात आलेनंतर त्यांचे अधिकार सुरु होतात ही वस्तुस्थिती प्रशासकांनी लक्षात घेतलेली नाही. ई) तक्रारदार प्रस्तुत रक्कम रु.3,20,000/-मिळणेस पात्र आहे. सदर रक्कमेवर सेव्हींग खातेवरील व्याजदराप्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सबब तक्रारदाराची सदर रक्कम देणेची जबाबदारी ही सामनेवाला संस्थेची आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2.सामनेवाला संस्थेने तक्रारदारास रक्कम रु.3,20,000/- (रु.तीन लाख वीस हजार फक्त) त्वरीत अदा करावेत. सदर रक्कमेवर दि.24/04/2010 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.3.5 टक्के दराने व्याज अदा करावे. 3. सामनेवाला संस्थेने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.500/-(रु.पाचशे फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.500/- (रु.पाचशे फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |