निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 04/01/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 12/01/2012
तक्रार निकाल दिनांकः- 02/07/2013
कालावधी 01 वर्ष. 05 महिने.20 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
वसंत पिता मल्हारी वटाणे. अर्जदार
वय 55 वर्षे. धंदा.शेती. अड.सी.पी.कुलकर्णी.
रा.वझर ता.जिंतूर.जि.परभणी.
विरुध्द
महाराष्ट्र ग्रामीण बँक, गैरअर्जदार.
तर्फे शाखा अधिकारी, अड.एम.आर.क्षिरसागर.
शाखा जिंतूर जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष)
गैरअर्जदाराने अर्जदारास पिक कर्ज रु.50,000/- देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दल अर्जदाराने सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा वझर ता. जिंतूर जि.परभणी येथील रहिवाशी असून तो शेती व्यवसाय करतो व अर्जदाराची शेती मौजे वझर ता.जिंतूर जि.परभणी येथे गट क्रमांक 247 मध्ये क्षेत्र 5 हेक्टर 41 आर व गट क्रमांक 315 मध्ये 45 आर. एकुण 5 हेक्टर 86 गुंठेचा अर्जदार हा मालक व कब्जेदार आहे.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार बँक ही शेतक-यांना कर्ज देते, व अर्जदार हा गैरअर्जदार बँकेचा सभासद आहे व गैरअर्जदार बँकेचे अधिकारक्षेत्राखाली अर्जदाराचे गाव त्यांनी दत्तक घेतले आहे. म्हणून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे तसेच अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे पिक कर्ज रु.50,000/- चे मागणी केली व त्यासाठी लागणारी कागदपत्रे गैरअर्जदार बँकेकडे अर्जदाराने दिली व त्यावर कर्ज रु.50,000/- गैरर्जदार बँकेने मंजूर केले, त्यावरुन अर्जदाराने 02/09/2011 रोजी गैरअर्जदार बँकेकडे पिक कर्ज प्रस्ताव दाखल केला व गैरअर्जदारास कर्ज देण्याची विनंती केली,परंतु नंतर गैरअर्जदार बँकेने दिनांक 12/10/2011 रोजी पत्राव्दारे अर्जदारास कळविले की, शेतासंबंधी कोर्टात दावा चालू असल्यामुळे ज्या दाव्याचा क्रमांक 84/11 व तो दावा सध्या प्रलंबित असल्यामुळे गैरअर्जदार बँकेस कर्ज देण्याचा विचार करता येत नाही, म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास पिक कर्ज रु.50,000/- देण्याचे नाकारले, त्यानंतर अर्जदाराने 24/10/2011 रोजी गैरअर्जदार बँकेस त्याच्या वकिला मार्फत नोटीस पाठविली व गैरअर्जदार बँकेस प्राप्त झाली व त्याचे उत्तर दिले, पण अर्जदारास रु.50,000/- पिक कर्ज गैरअर्जदाराने दिले नाही. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिवाणी दावा प्रलंबित असणारा याचा विचार केला तर अर्जदारा विरुध्द मा.न्यायालयाने निकाल लागेपर्यंत अर्जदारास कर्ज देवु नये अशा प्रकारचा कोणताही हुकूम दिला नाही, म्हणून अर्जदार कर्ज मिळण्यास पात्र आहे.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार हा गैरअर्जदार बँकेकडे अनेकवेळा कर्ज मिळण्यासाठी विनंती केली, परंतु अर्जदारास कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर करुन दिले नाही, दिनांक 22/12/2011 रोजी अर्जदार हा गैरअर्जदार बँकेकडे कर्ज देण्यासंबंधी विनंती केली असता, गैरअर्जदार बँकेने स्पष्ट इनकार केला, म्हणून अर्जदाराने सदरची तक्रार दाखल करुन मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराची सदरची तक्रार मंजूर करुन गैरअर्जदारास असा आदेश व्हावा की, अर्जदारास रु.50,000/- कर्ज मंजूर करुन अर्जदारास देण्यात यावे, व शारिरीकत्रासापोटी रु.10,000/- व अर्जाच्या खर्चापोटी रु.3,000/- देण्याचा आदेश व्हावा.अशी मंचास विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. नि.क्रमांक 5 वर अर्जदाराने 9 कागदपत्रांच्या यादीसह 9 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.ज्यामध्ये 5/1 वर अर्जदार विरुध्द जिंतूर न्यायालयात प्रलंबित दावा क्रमांक 126/7 दाव्याची प्रत, 5/2 वर संमतीपत्र, 5/3 वर गैरअर्जदारानें अर्जदारास कर्ज नाकारल्याचे पत्र, 5/4 वर 247 गट क्रमांकाचा 7/12, 5/4 ब वर 315 गट क्रमांकाचा 7/12, 5/5 वर अर्जदाराने गैरअर्जदारास कर्जाबाबत दिलेले अर्ज, 5/6 वर होल्डींग प्रमाणपत्र, 5/7 अर्जदाराने गैरअर्जदारास कर्ज मागणीचा केलेला अर्ज, 5/8 वर अर्जदाराने वकिला मार्फत गैरअर्जदारास दिलेली नाटीस, 5/9 वर अ प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविण्यात आल्यावर गैरअर्जदार वकिला मार्फत हजर,परंतु गैरअर्जदारास अनेक संधी देवुनही मुदतीत जबाब दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरुध्द विना जबाबाचा आदेश पारीत.
अर्जदाराच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? नाही.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास पिक कर्ज रु.50,000/- देण्याचे
नाकारुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 ते 3
अर्जदाराने हे सिध्द केले नाही की, अर्जदार हा गैरअर्जदार बँकेचा ग्राहक आहे व त्याबद्दलचा कोणताही कागदोपत्री पुरावा अर्जदाराने मंचासमोर आणला नाही व तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास पिक कर्ज रु.50,000/- देण्याचे नाकारले ही बाब नि.क्रमांक 5/3 या कागदपत्रावरुन सिध्द होते, परंतु गैरअर्जदार बँकेने पिक कर्ज अर्जदारास न देण्याचे कारण अर्जदाराच्या शेतमालकी विषयी दिवाणी न्यायालय जिंतूर येथे दावा प्रलंबित असल्यामुळे पिक कर्ज देता येत नाही, असे दर्शवून पिक कर्ज देण्याचे नाकारले सदरचा वाद हा C.P.Act 1986 च्या See 2 (e) प्रमाणे Consumer Dispute च्या व्याख्येत बसणारे नाही.त्यामुळे गैरअर्जदार बॅकेने अर्जदाराचा पिक कर्ज प्रस्ताव नाकारुन कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, हे सिध्द होते.कारण गैरअर्जदार बँकेने अर्जदारास कर्ज मंजूर करुन कर्ज रक्कम देण्याचे नाकारले ही बाब अर्जदाराने सिध्द केली नाही वा त्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर दाखल केला नाही.अर्जदार हा त्याची तक्रार सिध्द करण्यास पुर्णपणे असमर्थ ठरला आहे.म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री.पी.पी.निटूरकर. मा.सदस्य मा.अध्यक्ष