जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 183/2010 तक्रार दाखल तारीख- 03/01/2011
श्रीमती. रेखा भ्र. भारत मळेकर,
वय -30 वर्षे, व्यवसाय – शेती,
रा.मळेकरवाडी, पो.डोंगरकिन्ही,
ता. पाटोदा, जि.बीड. ....... तक्रारदार
विरुध्द
1. महाराष्ट्र शासन, मार्फत जिल्हाधिकारी साहेब,
जिल्हाधिकारी कार्यालय, बीड ता.व जि.बीड
2. तालुका कृषी अधिकारी,
कृषी अधिकारी कार्यालय, पाटोदा
ता.पाटोदा जि. बीड
3. कबाल इंश्युरन्स सर्व्हिसेस प्रा.लि.
मार्फत विनीत आठल्ये, व्यवस्थापक (विभाग प्रमुख)
भास्करायण, एच.डी.एफ.सी.होम लोन बिल्डींग,
प्लॉट नं.7, सेक्टर-इ-1, टाऊन सेंटर, सिडको,
औरंगाबाद ता.व जि. औरंगाबाद
4. युनायटेड इंडिया इंश्युरन्स कंपनी लि.
मार्फत शाखा व्यवस्थापक,
प्रादेशिक कार्यालय, अंबिका भवन क्रं.19,
तिसरा मजला, धरमपेठ एक्स्टेंशन
शंकर नगर चौक, नागपूर
समन्स – सुभाष रोड, छत्रपती संकुल, बीड ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – ए.जी.काकडे,
सामनेवाले 1 व 2 तर्फे – प्रतिनिधी,
सामनेवाले 3 तर्फे - स्वत:
सामनेवाले 4 तर्फे - वकील- ए.पी.गंडले,
।। निकालपत्र ।।
( घोषितद्वारा अजय भोसरेकर, सदस्य)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार ही माळेवाडी पो.डोंगरकिन्ही ता.पाटोदा, जि. बीड येथील रहिवाशी असुन त्यांचे पतीचे दि.7.11.2009 रोजी मोटार सायकर व ट्रॅक्टर यांचे अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यांचे नाव भारत सयाजी मळेकर असे आहे. मयत भारत मळेकर हा शेतकरी असल्याने तो शेतकरी अपघात विम्यास पात्र असल्यामुळे तक्रारदाराने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे. तक्रारदाराने सामनेवाले नं.2 यांचेकडे क्लेम फॉर्म व इतर सर्व आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज दाखल केला होता. तक्रारदार हा सामनेवाले नं.2 ते 4 यांचेकडे वारंवार प्रयत्न करत राहले. सामनेवाले यांचेकडून टाळाटाळीचे उत्तर मिळाल्यामुळे तक्रारदाराने दि.13.11.2010 रोजी पतीच्या अपघाती मृत्यूचा शेतकरी विम्यातील रक्कम मिळण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठविली. नोटीसीचे उत्तर प्राप्त नसल्यामुळे तक्रारदाराने शेतकरी वैयक्तीक अपघात विमा रक्कम रु.1,00,000/-, शारीरिक मानसिक आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.30,000/- तक्रारीचा खर्चापोटी रक्कम रु.5,000/- असे एकुन 1,35,000/- ची मागणी केली आहे. त्यावर तक्रार दाखल तारखेपासुन द.सा.द.शे.18 टक्के व्याज मागीतले आहे.
तक्रारदाराने आपले तक्रारीचे म्हणनेचे पुष्टयार्थ एकुण 20 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले नं.1 दि.11.2.2011 रोजी हजर होवून आपले लेखी म्हणन्यात सदर तक्रार ही सामनेवाले नं.2 यांचेकडे प्रलंबीत असल्याचे म्हणटले आहे.
सामनेवाले नं.3 यांचे लेखी म्हणने दि.11.2.2011 रोजी दाखल केले असुन त्यात त्यांनी तक्रारदाराचा क्लेम दि.21.12.2010 पासुन सामनेवाले नं.4 यांचेकडे प्रलंबीत असल्याचे म्हटले आहे.
सामनेवाले नं.4 हे दि.11.2.2011 रोजी हजर होवून दि.11.7.2011 रोजी त्यांनी दि.2.4.2011 पासुन म्हणने दाखल झाले नाही म्हणुन नो-से आदेश पारित करण्यात आला आहे. त्यानंतर सामनेवाले नं.4 यांचा अर्ज दि.5.4.2011 रोजी नामंजूर केला व त्यानंतर सामनेवाले नं.4 यांनी आज पावतो आपले लेखी म्हणने दाखल केले नाही.
सामनेवाले नं.2 यांचे लेखी म्हणने दि.9.3.2011 रोजी दाखल झाले असुन त्यात त्यांनी दि.3.2.2010 रोजी सदर प्रस्ताव सामनेवाले नं.3 यांचेकडे पाठविल्याचे म्हणटले आहे.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे व सामनेवाले नं.1 ते 3 यांनी दाखल केलेले लेखी म्हणने व कागदपत्रे यांचे बारकाईने अवलोकन केले असता, सामनेवाले नं.3 यांनी दि.21.12.2010 पासुन सामनेवाले नं.4 यांचेकडे सदर प्रस्ताव प्रलंबीत असल्याचे म्हणटले आहे. सामनेवाले नं.4 यांना प्रस्ताव मिळून तसेच न्यायमंचाची नोटीस मिळूनही हजर झाले नाहीत अथवा आपले लेखी म्हणने दाखल केले नसल्यामुळे सामनेवाले नं.4 यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत कसूरी केली आहे हे दिसून येते.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले नं.4 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदाराचे मयत पतीचा शेतकरी वैयक्तीक अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/-(अक्षरी रुपये एक लाख फक्त), आदेश मिळाल्या तारखेपासुन 30 दिवसाचे आत तक्रारदारास अदा करावी.
3. सामनेवाले नं.4 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र.2 चे पालन मुदतीत न केल्यास दि.21.12.2010 पासुन तक्रारदाराचे पदरी पडेपर्यन्त द.सा.द.शे.9 टक्के व्याज देण्यास सामनेवाले नं.4 जबाबदार राहतील.
4. सामनेवाले नं.4 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.4,000/- (अक्षरी रुपये चार हजार फक्त), व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार पाचशे फक्त) आदेश मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत तक्रारदारास अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावीत.
( अजय भोसरेकर ) ( पी. बी. भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड