नि.22 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र.103/2010 नोंदणी तारीख – 1/4/2010 निकाल तारीख – 2/7/2010 निकाल कालावधी – 91 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ सौ विजया विष्णूपंत जंबुरे रा.34, सदगुरुकृपा, जिल्हा परिषद कॉलनी, शाहूपूरी, सातारा ता.जि.सातारा ----- अर्जदार (वकील श्री संग्राम मुंढेकर) विरुध्द महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांध उपविभाग क्र.1 लष्कर (सातारा) पाणीपुरवठा केंद्र सातारा तर्फे तर्फे उपविभागीय अभियंता ----- जाबदार (वकील श्री धनंजय भोसले) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांचे जाबदार यांचेकडे नळकनेक्शन असून त्याचा ग्राहक प्रकार हा घरगुती (डोमेस्टीक) असा आहे. अर्जदार यांनी सदरचे कनेक्शन हे घरगुती वापरासाठी घेतलेले असून त्याचा वापर ते घरगुती कारणासाठीच करीत आहेत. असे असतानाही जाबदार यांनी अर्जदार यांचे पाण्याचे कनेक्शन त्यांचे जागेत भाडयाने असणा-या पतसंस्थेसाठी वापरत असल्याचे सांगून पाण्याची आकारणी संस्था दराने का करणेत येवू नये असे पत्र पाठवून खुलासा करणेस सांगितले. त्यावर अर्जदार यांनी पतसंस्थेचा व सदरचे नळकनेक्शनचा काहीही संबंध नसल्याचे जाबदार यांना कळविले तसेच पतसंस्थेच्या शाखाधिकारी यांनीही जाबदार यांना पत्र पाठवून पाणी येण्याची वेळ व पतसंस्थेची वेळ वेगवेगळी असल्याने पाणी वापरण्याचा प्रश्नच येत नाही असे कळविले. परंतु तरीही जाबदार यांनी अर्जदार यांना पत्र पाठवून संस्था सुरु होण्याच्या दिनांकापासून पाणी आकारणी ही संस्था दराने करीत असल्याचे कळविले व त्यानुसार आकारणी करणेस सुरुवात केली. त्यानंतर अर्जदार यांनी स्वतः जावून पाण्याची आकारणी घरगुती दराने करण्याबाबत विनंती केली असता जाबदार यांनी त्याची शहानिशा करुन पुन्हा घरगुती दराने आकारणी करणेस सुरुवात केली. परंतु पुन्हा जाबदार यांनी दि. 17/10/2009 पासून वाणीज्य दराने पाणी आकारणी करण्यास केली व त्यानुसार फरकासह अर्जदार यांना बिल दिले. सदरचे बिल हे बेकायदेशीर आहे. पतसंस्था असलेली जागा ही अर्जदार यांचे दिराचे मालकीची आहे. सदरचे पतसंस्थेचा नळकनेक्शनशी काहीही संबंध नाही. सबब वाणीज्य दराने आकारलेले पाणी बिल हे पूर्ववत घरगुती दराने आकारण्यात यावे, मानसिक त्रासापोटी रु.30,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि.12 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. जाबदार संस्था ही महाराष्ट्र शासनातर्फे पाणी पुरवठा करणेसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर सुरु केलेला वि भाग आहे. जाबदार संस्था ही उत्पन्न मिळवि ण्यासाठी सुरु केलेली संस्था नाही. त्यामुळे अर्जदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक व सेवादेणारे नाते निर्माण होत नाही. अर्जदार हिने सुरुवातीस घरगुती प्रकारचे नळकनेक्शन घेतले होते परंतु काही कालावधीनंतर अर्जदार हिने आपले बंगल्यामध्ये पतसंस्था सुरु करुन घराचा काही भाग भाडयाने दिला आहे. सदरचे पतसंस्थेस अर्जदार हिचे नळकनेक्शनद्वारा पाणीपुरवठा केला जातो असे पाहणीद्वारे दिसून आले. याबाबत श्री एस.एस.जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वस्तुस्थितीची पाहणी केली असता अर्जदार हिने आपले नळ कनेक्शनमधून पतसंस्थेस पाणी देत असलेचे शाबीत झाले. याबाबत जाबदार यांनी अर्जदार यांना लेखी पत्र पाठवून विचारणा केली असता अर्जदार हिने सदर पत्रास स्पष्ट उत्तर न देता काही बाबी लपवून ठेवल्या. जाबदारची मूळ मागणी व मागितलेली माहिती तक्रारदार हिने देण्याचे टाळले. यावरुन पतसंस्था पाण्याचा वापर करीत आहे हे शाबीत होते. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा व जाबदार यांना मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व नुकसान भरपाईपोटी रु.10,000/- मिळावेत असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे वकील श्री मुंढेकर यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. जाबदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि. 21 ला पाहिला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. कारणे 5. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये जाबदार संस्था ही महाराष्ट्र शासनांतर्गत ना नफा ना तोटा या तत्वावर पाणी पुरवठा करण्याचे काम करते, सबब अर्जदार हे जाबदार यांचे ग्राहक होत नाहीत असे कथन केले आहे. परंतु जाबदार यांनी केलेल्या पाणीपुरवठयाचा मोबदला म्हणून जाबदार हे ग्राहकांना बिल देतात व त्याची वसुली करतात. त्यामुळे अर्जदार व जाबदार यांचेमधील व्यवहार हा ग्राहक व सेवा देणारी संस्था अशा स्वरुपाचा आहे. सबब प्रस्तुतचा अर्जाचा न्यायनिर्णय करण्याचे अधिकारक्षेत्र या मंचास आहे असे या मंचाचे मत आहे. 6. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, अर्जदार यांनी त्यांचे घराचा काही भाग पतसंस्थेस भाडयाने दिला असून सदरचे पतसंस्थेस अर्जदार यांच्या नळकनेक्शनद्वारे पाणीपुरवठा केला जातो, म्हणून अर्जदार यांचे पाणीपुरवठयाची आकाराणी वाणिज्य दराने केली आहे. परंतु सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ जाबदार यांनी कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही. जर अर्जदारचे घरगुती नळकनेक्शनद्वारा पतसंस्थेस पाणीपुरवठा केला जात असेल तर त्याबाबत जाबदार यांनी त्याची तपासणी करुन त्याचा पंचनामा करणे आवश्यक होते. परंतु तशा प्रकारचा कोणताही पंचनामा अगर साक्षीदारांची प्रतिज्ञापत्रे इ. कोणत्याही स्वरुपाचा पुरावा जाबदार यांनी याकामी सादर केलेला नाही. सदरचे पतसंस्थेद्वारा वादातील नळकनेक्शनद्वारा होणा-या पाण्याचा वापर प्रत्यक्षपणे केला जात आहे हे दर्शविणारा कोणताही सुस्पष्ट पुरावा याकामी जाबदार यांनी दाखल केलेला नाही. जाबदार यांनी त्यांचे दि. 15/10/2008 चे पत्रामध्ये असे कथन केले आहे की त्यांनी दि. 18/9/2008 रोजी सदरचे नळ कनेक्शनची पाहणी केली असता अर्जदारचे घराला लागूनच पतसंस्थेचे कार्यालय असल्याचे आढळून आले आहे. परंतु केवळ घराला लागून पतसंस्थेचे कार्यालय आहे व अर्जदारचे घराचा काही भाग पतसंस्थेस भाडयाने दिला आहे यावरुन सदरची पतसंस्था नळकनेक्शनचा वापर करते हे सिध्द होत नाही. 7. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असेही कथन केले आहे की, अर्जदार यांचा पाण्याचा वापर अवास्तव आहे यावरुन त्यांचे घरात भाडयाने असणारी पतसंस्था पाण्याचा वापर करीत आहे हे दिसून येते. परंतु पाण्याचा वापर अवास्तव आहे या कारणावरुन पतसंस्था पाण्याचा वापर करते हे सिध्द होत नाही. त्यासाठी जाबदार यांनी सदरचे नळकनेक्शनची पाहणी करुन जर सदरच्या कनेक्शनद्वारे नियमबाहय पाण्याचा वापर होत असेल तर त्याबाबतचा पंचनामा करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा कोणताही पंचनामा अगर तज्ञ व्यक्तीचा अहवाल याकामी दिसून येत नाही. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे त्यांचे घरगुती नळकनेक्शनचा वापर वाणिज्य वापरासाठी करीत आहे ही बाब जाबदार पुराव्यानिशी शाबीत करु शकलेले नाहीत हे स्पष्ट होते. सबब जाबदार यांनी अर्जदार यांना वाणिज्य दराने पाणीवापराची बिले देवून सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. 8. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार यांनी अर्जदार यांचे घरगुती नळकनेक्शनसाठी वाणिज्य दराने आकारण्यात आलेली सर्व बिले रद्द करावीत व त्याऐवजी घरगुती दराने आकारलेली सुधारीत बिले अर्जदार यांना द्यावीत. 3. जाबदार यांनी अर्जदार यांचे पाणीवापराची आकारणी घरगुती दराने करावी. 4. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार यांनी अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. 1. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. 2. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 2/7/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| , | HONABLE MR. Mr. V.D.Deshmukh, PRESIDENT | , | |