जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा : सौ.व्ही.व्ही.दाणी.
मा.सदस्य : श्री.एस.एस.जोशी
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – २४६/२०११
तक्रार दाखल दिनांक – २९/१२/२०११
तक्रार निकाली दिनांक – २६/०२/२०१४
(१)श्री संदीप ताराचंद जैन ----- तक्रारदार
उ.व.४१ वर्षे, धंदा-व्यवसाय
(२)श्री सुधिर ताराचंद जैन
उ.व.३८ वर्षे, धंदा-व्यवसाय
(३)श्री समिर ताराचंद जैन
उ.व.३५ वर्षे, धंदा-व्यवसाय
वरील सर्व रा.९६/१, अग्रवाल नगर,
मालेगांव रोड,धुळे.ता.जि.धुळे
विरुध्द
महाराष्ट्र शासन ----- सामनेवाले
भूमी अभिलेख खाते,
श्री.बी.एस.मोहिते
म.नगर भुमापन अधिकारी साो
भूमी अभिलेख ता.जि.धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्य : श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.के.आर.लोहार)
(सामनेवाले – स्वत:)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांनी भूमी अभिलेखनाचा अहवाल न दिल्याने सेवते त्रुटी केली आहे. त्यामुळे भुमापन क्र.१७४३ ची विभागणी होऊन मिळाणेकामी व नुकसान भरपाई मिळणेकामी सदर तक्रार या न्यायमंचात ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, सामनेवाले हे महाराष्ट्र शासनाचे महसूल विभागातील भुमि अभिलेख खाते आहे. त्यांचे मुख्य कार्य हे जमिनीची मोजणी करणे, आकारणी करणे व जमिन धारकांना क्षेत्र व नकाशे उपलब्ध करुन देणे हे आहे. त्या कामी ते मोबदला म्हणून निर्धारीत रक्कम स्वीकारतात. मोजे धुळे ता.धुळे येथे नगर भुमापन क्र.१७४३ या संपूर्ण जागेचे क्षेत्रफळ १८०.६ चौ.मी. आहे. सदर मिळकत ही तक्रारदार यांच्या मालकी व कब्जे उपभोगातील आहे. सदर मिळकतीत तक्रारदार यांचे सहा बाय सहा असे जूने सराफाचे दुकान आहे. सदर मिळकतीत नवीन बांधकाम करावयाचे असल्याने तक्रारदारांनी त्याची विभागणी होऊन मिळण्याकामी मोजमाप होऊन तसा अभिलेख प्राप्त होण्यासाठी सामनेवाले यांच्याकडे जून २०१० मध्ये रक्कम रु.४,०००/- भरुन अर्ज केलेला आहे. परंतु सामनेवाले यांनी अद्याप पावेतो अर्जाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी माहितीच्या अधिकारात सामनेवाले यांच्याकडे अर्ज केला. परंतु त्या अर्जावर माहिती न देऊन सामनेवाले यांनी सेवा दिलेली नाही. सदर दुकानामध्ये आर्थिक नुकसान तक्रारदार यांना सहन करावे लागत आहे. त्यास सामनेवाले हे जबाबदार आहेत. सामनेवाले यांनी मोबदला स्वीकारुन आज पावेतो मोजमाप केलेले नाही. सामनेवाले यांच्या कामकाज पध्दतीत दोष असून न्यूनता आहे. त्यामुळे सदरची तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांनी भूमापन क्रमांक १७४३ चे मोजमाप करुन त्याचा अभिलेख द्यावा, माहितीच्या अधिकारात माहिती न दिल्याने, नुकसान भरपाई रु.१,००,०००/- द्यावी, उत्पन्नाचे नुकसान भरपाईपोटी रु.१५,७५,०००/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.३,००,०००/-, आणि अर्जाचा खर्च रु.१०,०००/- अशी सर्व रक्कम सामनेवाले यांचेकडून व्याजासह मिळावी.
तक्रारदारांनी नि.नं. ३ वर शपथपत्र दाखल केले असून, नि.नं.५ सोबत एकूण ६ कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत. त्यात सामनेवालेंकडे मोजमापासाठी भरणा केल्याची पावती,आयुक्त म.न.पा.धुळे यांची नोटीस इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.
(३) सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.नं.१० वर पोष्टाद्वारे दाखल केले आहे. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे अर्ज केलेला आहे. त्या बाबत त्यांनी विभाजनासाठी संमतीपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक असतांना सह हिस्सेदार यांची संमतीपत्रे जोडलेली नाहीत. तसेच धुळे महानगरपालिका धुळे यांच्याकडील ना हरकत प्रमाणपत्र जोडलेले नाही. या कागदपत्रांशिवाय विभाजन करता येत नाही. या बाबत तक्रारदार यांना दि.१२-०७-२०१० रोजीच्या पत्राने कळविले आहे, असे नमूद आहे.
सामनेवाले यांनी त्यांच्या कथनाचे पुष्टयर्थ शपथपत्र दाखल केलेले नाही. नि.नं. १० सोबत एकूण सहा कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहे. त्यात नगररचनाकार,धुळे महानगरपालिका,धुळे यांचे पत्र, संमतीपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहे.
(४) तक्रारदारांचा अर्ज, शपथपत्र आणि दाखल कागदपत्रे व सामनेवाले यांची कैफीयत पाहता तसेच तक्रारदारांचा लेखी युक्तिवाद पाहता, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब) सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते काय ? | : होय. |
(क) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे. |
विवेचन
(५) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी भूमापन क्रमांक १७४३ या जागेची मोजणी करण्याबाबत सामनेवाले यांचेकडे दि.०९-०६-२०१० रोजी अर्ज केला आहे. त्या कामी रक्कम रु.४,०००/- फी म्हणून सामनेवालेंकडे भरणा केलेला असून, त्याची पावती नि.नं.५/१ वर दाखल केली आहे. याचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले यांचे “ग्राहक” असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
सदर प्रकरणी तक्रारदारांनी खालील नमूद न्यायनिवाडा दाखल केला आहे.
Revision Petition No.2273 of 2012 (N.C.D.R.C.New Delhi)
Dr.Chandrakant Vitthal Sawant Vs Shri L.R.Pilankar Inspector of Land Records & Shri.R.S.Malankar Survey officer, Department of Land.
सदर न्यायनिवाडयाचे अवलोकन करता, त्यातील मार्गदर्शक तत्व प्रस्तुत प्रकरणी लागू करणे योग्य होईल असे आमचे मत आहे. म्हणून सदर न्यायनिवाडयाचा या प्रकरणात आधार घेण्यात आला आहे.
(६) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदारांनी नमूद जागेची मोजणी करणेकामी सामनेवाले यांच्याकडे अर्ज केलेला आहे. परंतु त्या अर्जाप्रमाणे सामनेवाले यांनी मोजणी केलेली नाही. याकामी सामनेवालेंनी असा बचाव घेतला आहे की, मोजणीकामी आवश्यक असलेली कागदपत्रे, यामध्ये सदर जागेतील सहधारकांचे संमतीपत्र व धुळे महानगरपालिका यांचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे व ते तक्रारदारांनी दाखल केलेले नाही.
या खुलाशा सोबत सामनेवाले यांनी तक्रारदार यांनी अर्जासोबत दखल केलेले संमतीपत्र नि.नं.१३ वर दाखल केले आहे. परंतु सदरचे संमतीपत्र हे अपूर्ण आहे, असे सामनेवालेंचे मत आहे. परंतु तक्रारदार यांनी सह हिस्सेदार यांचे दि.१३-०४-२०१० रोजीचे पत्र प्रकरणात दाखल केलेले असून, या पत्राप्रमाणे नव्याने संमतीपत्र देण्याची आवश्यकता नाही असे दिसते. या कारणाने तक्रारदारांनी दाखल केलेले संमतीपत्र हे सामनेवालेंच्या कार्यवाहीसाठी पुरेसे आहे, असे दिसते.
त्यानंतर सामनेवाले यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदारांनी धुळे महानगर पालिका यांचा ना-हकरत दाखला दाखल केलेला नाही. याबाबत सामनेवाले यांनी दि.२६-०७-२०१० रोजीचे धुळे महानगर पालिका यांनी दिलेले पत्र नि.नं.१२ वर दाखल केले आहे. या पत्राप्रमाणे भुमापन क्रमांक १७४३ ची उपविभागणी करणे कामी ना-हरकत दाखला देण्याबाबत तक्रारदारांची मागणी मान्य करता येत नाही, असे तक्रारदारांना कळविलेले आहे. त्यामुळे तक्रारदार यांचा अर्ज हा निकाली काढण्यात आला आहे असे दिसते.
या दोन्ही कागदपत्रांप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदरची मोजणी करता येत नाही, असे कळविलेले आहे. तसेच दि.०२-१२-२०११ रोजी उपआयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांना कळविलेले आहे असे दिसते.
तक्रारदार यांनी आयुक्त धुळे महानगरपालिका धुळे यांनी दि.२४-०१-२०१३ रोजीचे, उप लोकआयुक्त मुंबई यांना दिलेले पत्र नि.नं.२२/३ वर दाखल केले आहे. या पत्रामध्ये “सदरची मोजणी करणेकामी असलेली मिळकत ही गावठाण विभागातील असून, मोजनी करणे बाबतचे काम हे नगर भुमापन कार्यालयाकडून होत असल्याने सदर मोजणी बाबतचे काम म.न.पा. कार्यालयाशी संबंधीत नाही” असे नमूद केलेले आहे. या पत्राप्रमाणे धुळे म.न.पा. कार्यालयाची, मोजणी करणेकामी संमतीची आवश्यकता नाही, असे स्पष्ट होत आहे.
सदर पत्राप्रमाणे सहाय्यक प्रबंधक यांनी नगर भुमापन अधिकारी धुळे यांना दि.६ फेब्रुवारी २०१३ रोजी दिलेले पत्र नि.नं.२२/९ वर दाखल कले आहे. या पत्राप्रमाणे सहधारकांची संमती घेण्याची आवश्यकता नाही, असे वाटते. त्याच प्रमाणे आयुक्त धुळे म.न.पा. यांच्याकडून प्राप्त झालेल्या दि.२४-०१-२०१३ च्या अहवालाच्या पत्रावरुन असे दिसते की, सदर प्रकरणात धुळे महानगर पालिकेचा संबंध येत नाही. त्यामुळे सदर जागेची मोजणी करण्यास काही अडचण येण्याचे कारण नाही. त्यामुळे सिटी सर्व्हे नंबर १७४३ मधील सर्व हिस्सेदारांना मोजणी बाबत नोटीसा देऊन मोजणीकरुन त्या प्रमाणे अहवाल या कार्यालयाकडे पत्र पोहचल्यापासून तीस दिवसांचे आत सादर करावा अशा आषयाचे पत्र भुमापन अधिकारी यांना पाठविलेले आहे. या पत्राप्रमाणे स्वतंत्रपणे सहधारकांची संमती घेण्याची व धुळे महानगरपालिकेच्या ना-हरकत दाखल्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट होत आहे. त्याप्रमाणे सामनेवाले यांनी सदर जमिनीची मोजणी करावी असे त्यांना त्वरीत कळविलेले आहे. परंतु त्या पत्रानंतरही सामनेवाले यांनी, तक्रार अर्जाची दखल घेतलेली दिसत नाही. तसेच सदर मोजणी करणे कामी काय अडचण आहे, या बाबत मंचात हजर राहून नमूद केलेले नाही. याचा विचार होता सामनेवाले यांनी सदर पत्राचा व तक्रार अर्जाचा विचार केलेला दिसत नाही. यावरुन सामनेवालेंच्या सेवेत कमतरता स्पष्ट होत आहे, असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. “ब” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘क’’ – तक्रारदारांची अशी मागणी आहे की, सामनेवालेंनीमाहितीच्या अधिकारात माहिती न दिल्याने त्यांना नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत. तसेच तक्रारदारांच्या सराफाच्या दुकानात सामनेवाले यांच्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या बाबतची तक्रारदारांची मागणी योग्य व रास्त नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या इतर मागण्यांबाबत कोणताही विचार करणे या अर्जात योग्य व रास्त होणार नाही असे आमचे मत आहे. उपरोक्त सर्व कारणांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले यांनी या आदेशाच्या दिनांका पासून पुढील तीस दिवसांचे आत.
(१) तक्रारदारांच्या अर्जा प्रमाणे, नगर भुमापन क्रमांक १७४३ अ ची विभागणी (सब डिव्हीजन) होण्यासाठी मोजमाप करुन तसा अभिलेख तक्रारदारास द्यावा.
(२) तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम १,०००/- (अक्षरी रुपये एक हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम १,०००/- (अक्षरी रुपये एक हजार मात्र) द्यावेत.
धुळे.
दिनांकः २६/०२/२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.