नि.56
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 352/2010
तक्रार नोंद तारीख : 20/07/2010
तक्रार दाखल तारीख : 21/07/2010
निकाल तारीख : 29/04/2013
----------------------------------------------
श्री गंगाधर आप्पासो मगदूम
वय 42 वर्षे, धंदा – शेती
रा.इसापुरे गल्ली, अशोक पाटील
दवाखान्याजवळ, मिरज ....... तक्रारदार
विरुध्द
श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
मिरज, मंगळवार पेठ, शनिमारुती देवळासमोर, मिरज
चेअरमन, व्हा.चेअरमन संचालक मंडळ
1. श्री निळकंठ पांडुरंग माळकर, चेअरमन
रा.कवलापूर, ता.मिरज जि. सांगली
2. सौ माधुरी सुरेश चरणकर, व्हा.चेअरमन
रा.आयोध्या अपार्टमेंट, शिवनेरी चौक,
ब्राम्हणपुरी, मिरज
3. श्रीपाल किसन भागवत, संचालक
रा.अंकलखोप, ता.पलूस जि.सांगली
4. सुभाषराव गणपतराव कांबळे, संचालक
रा.मणेराजुरी, ता.तासगांव जि. सांगली
5. जगन्नाथ यशवंत देशमाने, संचालक
रा.अंबाबाई देवळामागे, मंगळवार पेठ, मिरज
6. बापूसो महादेव फल्ले, संचालक
रा.कामेरी, ता.वाळवा जि. सांगली
7. रावसो सातलिंग विभुते, संचालक
रा.अंकलखोप, ता.पलूस जि.सांगली
8. प्रकाश गुरुलिंग कुंभोजे, संचालक
रा.गुरुवार पेठ, मिरज
9. रविंद्र बापूसो कुपाडे, संचालक
रा.आष्टा ता.वाळवा जि. सांगली
10. महालिंग शंकर फल्ले, संचालक
रा.चिंचणी, ता.तासगांव जि. सांगली
11. यशवंत आण्णा सावंत, संचालक
रा.पाण्याच्या टाकीतील ऑफिसमध्ये देणे, मिरज
12. महालिंग गुरुलिंग माईणकर, संचालक
रा.गुरुवार पेठ, बागणे कॉर्नर, कासार गल्ली,
मु.पो.तासगांव जि.सांगली
13. महादेव लक्ष्मण देशमाने, संचालक
रा.शिराळा, ता.शिराळा. जि.सांगली
14. बापूसो दत्तोबा बनसवडे, संचालक
मु.पो.बेडग, ता.मिरज जि. सांगली ...... जाबदार
तक्रारदार : व्यक्तीशः
जाबदारक्र.1 ते 5, 7 व 9 ते 14 : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. सदरची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. त्यामध्ये तक्रारदाराने त्याने जाबदार संस्थेत ठेवलेल्या ठेवीची रक्कम व बचत खात्यातील रक्कम त्यावर देय असणा-या व्याजासह व शारिरिक, मानसिक त्रासापोटी भरपाई म्हणून रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च इ. रकमांची मागणी केली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदाराने जाबदार संस्थेने ठेवपावती क्र. 21 अन्वये रु.20,000/- दि.18/6/2007 रोजी 5 महिन्यांकरिता ठेवली. त्याची मुदत दि.27/11/2007 रोजी संपली. मुदतीनंतर व्याजासह सदर ठेवपावतीची रक्कम रु.20,800/- तक्रारदारास मिळणे जरुर होते. तसेच तक्रारदाराने संस्थेत बचत खाते ठेवलेले असून त्यात एकूण रक्कम रु.14,000/- जमा आहेत. सदरचे बचत खाते तक्रारदाराने दि.13/9/2007 रोजी सुरु केले आहे. ठेव पावतीची मुदत दि.27/11/07 रोजी संपलेनंतर सन 2008 मध्ये तक्रारदाराने जाबदारकडून ठेव पावतीची रक्कम व्याजासह व बचत खात्यातील रक्कम अधिक त्यावरील व्याज इत्यादी रकमांची मागणी केली. परंतु जाबदारांनी त्यास आजअखेर रक्कम दिलेली नाही. सदर बाबतीत दि.25/1/10 व 15/4/10 रोजी तक्रारदाराने मिरज शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली व लोकशाही दिनी जिल्हाधिकारी सांगली यांचेकडे देखील पाच वेळा तक्रार अर्ज केला. तथापि त्यांस अद्यापही रक्कम मिळालेली नाही त्यायोगे जाबदारांनी त्यास सदोष सेवा दिलेली आहे. अशा कथनांवरुन तक्रारदाराने वर नमूद केल्याप्रमाणे प्रस्तुत प्रकरणी मागणी केलेली आहे.
3. अभिलेखावरुन असे दिसते की, जाबदार क्र.1, 2, 3, 4, 5, 7, 9, 10, 11, 12, 13 व 14 यांना नोटीसा बजावण्यात आल्या तथापि ते गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश झाला. जाबदार क्र.6 व 8 हे मयत असलेबद्दलचा अहवाल सादर करण्यात आला. प्रस्तुत प्रकरणी जाबदार संस्थेतर्फे कोणीही लेखी कैफियत अथवा म्हणणे दाखल करण्यात आलेले नाही.
4. तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्ठयर्थ नि.3 ला आपले शपथपत्र दाखल करुन नि.4 सोबत ठेव पावती क्र.21 व बचत खाते पासबुकाच्या प्रती, त्याने मिरज शहर पोलिस स्टेशनला दि.4/8/09 ला जाबदारविरुध्द दिलेला तक्रारीअर्ज, व लोकशाही दिनी जिल्हाधिकारी सांगली यांचेसमोर दाखल केलेल्या तक्रारी यांच्या प्रती तसेच जाबदार क्र.1 या पतसंस्थेच्या संचालक मंडळातील सर्व सदस्यांची यादी व पत्ते हजर केलेले आहेत.
5. तक्रारदाराने नि.52 सोबत मूळ ठेवपावती व बचत खात्याचे मूळ पासबुक हजर केलेले आहे.
6. तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सर्व कथने व त्यने सादर केलेला लेखी पुरावा यास जाबदारकडून कसलाही उजर करण्यात आला नाही, किंबहुना जाबदारांनी सदर तक्रारीस कोणताही उजर केलेला नाही आणि ते गैरहजर राहिलेमुळे सदर प्रकरण त्याचेविरुध्द एकतर्फा निकाली करण्यात येत आहे. तक्रारदरांचे संपूर्ण कथनास जाबदारांनी कोणतेही नकारात्मक उत्तर दिलेले नसल्यामुळे तक्रारदाराचे संपूर्ण कथन व त्यांचा पुरावा हा स्वीकारार्ह आहे. त्या पुराव्यावरुन हे स्पष्ट होते की, ठेव पावतीची मुदत ओलांडून देखील आणि तक्रारदाराच्या मागणीनंतर देखील जाबदारांनी तक्रारदारास त्याच्या ठेवपावतीची व्याजासह देय रक्कम व त्याचे बचत खात्यातील जमा रक्कम व्याजासह तक्रारदारास परत केलेली नाही आणि ही एक प्रकारे सदोष सेवाच आहे. तक्रारदार हा जाबदार पतसंस्थेचा ग्राहक आहे त्यामुळे त्यास सदरचा वाद या मंचासमोर उपस्थित करण्याचा अधिकार आहे व तो वाद ग्राहकवाद होतो. संपूर्ण प्रकरणाचा विचार करता तक्रारदाराने आपली संपूर्ण केस शाबीत केलेली असून त्याचे तक्रारीतील विनंती मान्य करावी लागेल या निष्कर्षास हे मंच आलेले आहे त्यामुळे आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
- आ दे श -
1. तक्रारदाराची तक्रार ही खर्चासह मंजूर करणेत येत आहेत.
2. जाबदार क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्या अथवा संयुक्तरित्या तक्रारदारास ठेव पावतीची जमा रक्कम व त्यावरील व्याज अशी एकूण रक्कम रु. 20,800/- व तक्रारदाराचे बचत खात्यातील जमा असलेली रक्कम रु.14,000/- व त्यावर देय होणारे व्याज तक्रारदारास या आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत द्यावेत. पावतीवरील रकमेवर ठेव पावती देय झालेल्या दिनांकापासून त्याची रक्कम प्रत्यक्ष तक्रारदारास देण्याचे तारखेपर्यंत तक्रारदारास त्या रकमेवर द.सा.द.शे. 8.5 टक्के दराने व्याज द्यावे.
3. तसेच जाबदार क्र.1 ते 14 यांनी संयुक्तरित्या अथवा वैयक्तिकरित्या तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी म्हणून रु.10,000/- द्यावेत.
4. तसेच जाबदार क्र.1 ते 14 यांनी संयुक्तरित्या अथवा वैयक्तिकरित्या तक्रारदारास तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रु.500/- द्यावेत.
5. जाबदार क्र.1 ते 14 यांनी विहीत मुदतीत रकमा न दिल्यास तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 25 किंवा 27 खाली प्रकरण दाखल करण्याची मुभा राहील.
सांगली
दि. 29/04/2013
( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष