निकालपत्र
दिनांक: (26.05.2016) द्वाराः- मा. सदस्य – श्री दिनेश एस.गवळी.
1. वि.प. नं. 1 ते 3 यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने, तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा कलम 1986, कलम-12 अन्वये प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केली आहे.
2. प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प.क्र.1 ते 3 यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प.क्र.1 यांनी व वि.प.क्र.2 व 3 यांनी लेखी म्हणणे दाखल केले. तक्रारदार व वि.प.क्र.1 व वि.प.क्र.2 ते 3 तर्फे वकिलांचा तोंडी व अंतिम युक्तीवाद ऐकला.
3. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी की, :-
तक्रारदार हे ऑडीटींगचे काम करीत असतात. वि.प.क्र.3 हे वेगवेगळया मॉडेलचे नोकीया हॅन्डसेटचे उत्पादक असून वि.प.क्र.1 हे सदर हॅन्डसेटचे कोल्हापूर स्थित विक्री करणेचा व्यवसाय करीत आहेत. वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.1 यांनी उत्पादित केलेल्या मोबाईल हॅन्डसेटचे विक्री पश्चात सेवा देणारे सर्व्हिस सेंटर म्हणून कार्य करीत आहेत. तक्रारदारांनी त्यांचे स्वत:चे वापराकरीता वि.प.क्र.1 यांचेकडून नोकीया आशा 502 या मॉडेलचा व 358149056194387 असा आय एम ई आय नंबर असलेला मोबाईल हॅन्डसेट दि.28.01.2014 रोजी रक्कम रु.5,550/- या किंमतीस खरेदी केलेला आहे. त्याप्रमाणे सदर वि.प.क्र.1 यांनी तक्रारदारांना मोबाईल हॅन्डसेट खरेदीची पावती दिलेली होती व आहे. तक्रारदारांनी मोबाईल खरेदी करतेवेळी संयुक्तिकरित्या सदर हॅन्डसेटची वॉरंटी दिली होती. सदरचा हॅन्डसेट खरेदी केलेपासून 2 महिन्यानंतर बंद (Switch off) केला असता तो पुन्हा चालू (Switch on) झाला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी दि.05.04.2014 रोजी सदरचा हॅन्डसेट वि.प.क्र.1 यांना दाखविला असता सदर वि.प.यांनी वरवरची दुरुस्ती करुन सदरचा हॅन्डसेट चालू केला परंतु तो नंतर सातत्याने Switch off होऊ लागला. त्यावेळी तक्रारदार हे वि.प.क्र.1 कडे गेले असता, वि.प.क्र.1 यांनी वि.प.क्र.2 या सर्व्हिस सेंटरला संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सदर तक्रारदारांनी वि.प.क्र.2 यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदरचा हॅन्डसेटबाबतच्या वर उल्लेखलेली तक्रार स्पष्टपणे विशद करुन त्यांचेकडे दुरुस्तीकरीता दिला. दि.07.04.2014 रोजी जॉब शिटची प्रत दिली व सदर हॅन्डसेट 7-8 दिवसांत दुरुस्ती झालेबाबत तक्रारदारांना कळविणेत येईल असे सांगून वि.प.क्र.2 यांनी सदरचा हॅन्डसेट दुरुस्तीकरीता ठेऊन घेतला होता.
4. तक्रारदारांनी सदरचा हॅन्डसेट दुरुस्त करुन देणेबाबत वि.प.यांचेकडे विनंत्या केल्या होत्या. वि.प.क्र.2 यांचेकडून दि.07.04.2014 रोजीच्या जॉब शीटची प्रत स्वत:चे ताब्यात घेउुन दि.25.04.2014 रोजीने नवीन जॉब शीट तयार करुन दिली. तक्रारदारांनी बरेच हेलपाटे मारले नंतर सुध्दा सदरचा हॅन्डसेट वि.प.यांनी दुरुस्त करुन अदयाप तक्रारदारांना दिलेला नाही. तक्रारदारांनी हॅन्डसेट दुरुस्त झाला किंवा नाही याबाबत चौकशी केली असता, सदर वि.प.क्र.2 यांनी सदर मॉडेलच्या सर्वच हॅन्डसेटमध्ये तांत्रिकबिघाड असून तो दुरुस्त करणे दुरापास्त आहे. त्यामुळे तुम्ही सदरचा हॅन्डसेट वि.प.क्र.1 कडे परत करुन त्यांचेकडून दुसरे मॉडेलचा हॅन्डसेट बदलून घ्या असा सल्ला तक्रारदारांना देणेत आला.
5. वि.प.क्र.1 यांनी हॅन्डसेटच्या खरेदी किंमतीरुपी मोबदला स्विकारलेला आहे आणि सदर हॅन्डसेटचे विक्री पश्चात व वॉरंटी कालावधीत तक्रारदारांना हॅन्डसेटची सेवा देणेची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी सदर वि.प.क्र.1 ते 3 यांची आहे. तथापि वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारांना केवळ मानसिक व आर्थिक नुकसान पोहचवून सेवा देणेत अक्षम्य कसुर केलेली आहे. तसेच दुरुस्ती दरम्यानच्या कालावधीत हॅन्डसेटचा वापर करता आला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी हॅन्डसेटची रक्कम रु.5,550/-, सदर रक्कमेवर दि.28.01.2014 पासून आजअखेर 18 टक्के प्रमाणे व्याजाची रक्कम, हॅन्डसेट वापरात न आलेने नुकसानीची रक्कम रु.10,000/-, तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासाची रक्कम रु.10,000/- व सदर अर्जाचा खर्च वकील फीसह रक्कम रु.5,000/- अशी एकूण रक्कम रु.30,900/- व सदर रक्कम तक्रारदारांचे हाती मिळेपावेतो पुढील 18 टक्केप्रमाणे वि.प.क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना दयावी अशी विनंती सदरहू मंचास केलेली आहे.
6. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत एकूण 3 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अ.क्र.1 ला वि.प.क्र.1 यांनी दिलेली मोबाईल खरेदीची पावती, अ.क्र.2 व 3 ला दि.07.04.2014 व दि.25.04.2014 चे जॉब शीटस् व दि.06.05.2015 रोजीचे तक्रारदारांचे शपथपत्र, इत्यादीं कागदपत्रे जोडलेली आहेत.
7. वि.प.क्र.1 यांनी तक्रारदारांचे तक्रारीस लेखी म्हणणे दाखल केले असून त्यांनी तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदाराचा तक्रार अर्ज हा अर्धसत्य वस्तुस्थितीवर अवलंबून असून तक्रारदाराने कायदयातील तरतुदींचा गैरवापर करुन कोर्टाची दिशाभूल करुन मोबदला मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वि.प.क्र.1 हे सर्व मजकुराचे स्पष्ट शब्दात इन्कार करतात. मोबाईल विक्री पश्चात तक्रारदार हे वि.प.क्र.1 यांना कधीही भेटलेले नाहीत वा त्यांचेशी कधीही संपर्क साधलेला नाही वा तसे लेखी कळविलेले नाही. सदर मजकूराबाबत कोणतीही माहिती नाही किंवा त्यांचेशी संबंध नाही. तक्रारदारांची सदरची कथने पूर्णपणे संदिग्ध असून कधीही मोबाईल हॅन्डसेट दुरुस्तीकरीता दिलेला नाही किंवा सदर मोबाईल हॅन्डसेट दुरुस्ती किंवा बदलून मिळणेकरीता कधीही संपर्क साधलेला नाही. वि.प.क्र.1 निरनिराळया कंपन्याचे मोबाईल अधिकृतरित्या विक्री करणेचा व्यवसाय करतात. ते कोणतीही वेगवेगळया प्रकारे जाहीरात करीत नाहीत किंवा सर्व्हिस देणेचे कार्य करीत नाहीत. तथापि वि.प.क्र.1 यांनी विक्री पश्चात मोबाईल हॅन्डसेट दुरुस्ती अथवा बदलीबाबत कंपनीची एक वर्षाची वॉरंटी असलेचे सांगून मोबार्इल दुरुस्त अथवा बदली करणे, इत्यादी बाबीं वि.प.क्र.1 यांचे आखत्यारित येत नसलेचे देखील सांगितले होते. तसेच विक्री पश्चात सेवा देण्याची कोणत्याही प्रकारची संयुक्तिकरित्या वॉरंटी तक्रारदारास दिलेली नाही. सबब, सदरचा हॅन्डसेटबाबत विक्री पश्चात झालेल्या ना दुरुस्तीबाबत वि.प.क्र.1 यांना कोणतीही माहिती व ज्ञान नसून त्याकरीता जबाबदार धरता येणार नाही. सबब, तक्रारदाराचा अर्ज फेटाळून लावणेत यावा तसेच तक्रार अर्जातील विनंती फेटाळून लावणेत याव्यात तसेच वि.प.क्र.1 यांचे विरुध्द खोटी तक्रार दाखल केली असलेने नुकसानभरपाईचा आदेश व्हावा अशी सदरहू मंचास विनंती केलेली आहे.
8. वि.प.क्र.2 यांनी दि.09.01.2015 रोजी म्हणणे दाखल केले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.1 यांनी उत्पादीत केलेल्या मोबाईल हॅन्डसेटला कोणतीही सेवा देत नाहीत. वि.प.क्र.2 हे वि.प.क्र.1 चे सर्व्हिस सेंटर नाही. तक्रारीतील सदरहू मजकूर पूर्णता, चुकीचा, रचनात्मक व धांदात खोटा आहे. तो वि.प.यांना बिलकूल मान्य व कबूल नाही. तक्रारदारांनी वि.प.क्र.2 यांचेशी कोणताही व्यवहार केलेला नव्हता व नाही, तसा तक्रारदारांनी असा कोणताही पुरावा मे. कोर्टासमोर आणून ते शाबीत केलेले नाही. दि.07.04.2014 रोजी तक्रारदार त्यांचा हॅन्डसेट घेऊन वि.प.क्र.2 यांचेकडे आले होते. त्यावेळी वि.प.क्र.2 यांनी त्यांची तक्रार विचारुन घेतली. त्यावेळी तक्रारदारांनी हॅन्डसेट काही वेळा सुरु होत नाही असे सांगितले, त्याप्रमाणे जॉबशिट बनवून हॅन्डसेट वि.प.क्र.2 यांनी घेतला व त्याची जॉबशिट तक्रारदारांना दिली. तक्रारदारांना 2 ते 4 दिवसांत येऊन हॅन्डसेट घेऊन जावा किंवा चौकशी करा असे सांगितले होते परंतु तक्रारदार हे दि.25.04.2014 पर्यंत कधीही वि.प.क्र.2 यांचेकडे चौकशीला आले नाहीत. तक्रारदारांनी निष्काळजीपणाने हॅन्डसेटबाबत चौकशी करणेचे जाणूनबुजून टाळले. वि.प.क्र.2 यांनी त्यांनी दिलेल्या फोन नंबरवर अनेकवेळा फोन करुन हॅन्डसेअ घेऊन जाणेबाबत सांगितले पंरतु तक्रारदारांनी जाणूनबुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केले. सदर हॅन्डसेटमध्ये कोणत्याही प्रकारचा उत्पादित दोष नव्हता. तक्रारदारांच्या चुकीच्या वापरामुळे व हॅन्डसेटची बॅटरी व्यवस्थित चार्ज न केलेमुळे बॅटरी उतरुन हॅन्डसेट बंद पडत होता. दि.25.04.2014 रोजी वि.प.क्र.2 यांचेकडे आले त्यावेळी हॅन्डसेटमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नसलेचे त्यांना सांगितले. काही वेळानंतर तक्रारदार पुन्हा वि.प.यांचेकडे आले त्यावेळी त्यांनी हॅन्डसेटमध्ये कार्ड घातले असता, हॅन्डसेट बंद झाला अशी तक्रार केली.
9. वि.प. त्यांचे म्हणणेत पुढे असे कथन करतात की, तक्रारदारांची त्याबाबत तक्रार होती त्यांचे म्हणणे कार्ड घातल्यानंतर हॅन्डसेट सुरू व्हायला पाहिजे परंतु सदर हॅन्डसेट हा कार्ड घातल्यानंतर अॅटोस्विच ऑप होतो व नंतर सुरु होतो हा काही उत्पादीत दोष नाही किंवा मोबाईलचा दोष नाही हे तक्रारदारांना समजावून सांगितले परंतु तक्रारदार हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांचे म्हणणे होते हॅन्डसेट कंपनीकडे पाठवा त्यामुळे तक्रारदारांचे समाधानाकरीता हॅन्डसेट पुन्हा घेतला व जॉबशीट तयार करुन दिली. तक्रारदारांचे हॅन्डसेटला कोणत्याही प्रकारचा दोष नव्हता. कोणत्याही हॅन्डसेटला जर सिमकार्ड घालायचे असेल तर बॅटरी काढावी लागते व अशा वेळी मोबाईल हा बंदच होतो व पुन्हा कार्ड घालून बॅटरी बसविले नंतर मोबाईल सुरु होतो ही एक नैसर्गिक प्रक्रियाच आहे आणि हा काही मोबाईलमधील उत्पादित दोष नाही. वि.प.क्र.2 यांनी हॅन्डसेटमध्ये तांत्रिक बिघाड आहे व तो दुरुस्त होऊ शकत नाही बदलून घ्या असे तक्रारदारांना सांगितले हे म्हणणे खोटे आहे. सदर हॅन्डसेटमध्ये उत्पादित दोष आहे याचा कोणताही पुरावा तक्रारदारांनी मे.कोर्टासमोर शाबीत केलेला नाही वा कोणत्याही तज्ञाचे शपथपत्र वा अहवाल सादर केलेला नाही किंवा सदरहू हॅन्डसेटमध्ये दोष दाखवण्यासाठी तज्ञ व्यक्तीची कमिशनर म्हणून नेमणूक करुन मागितलेली नाही. वि.प.क्र.2 यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कधीही त्रुटी केलेली नाही. तक्रारदारांनी मागणी केलेली नुकसानभरपाई पुर्णपणे चुकीची आहे अशी कोणतीही रक्कम देणेस वि.प.क्र.2 जबाबदार नाहीत. तक्रारदारांना वॉंरंटीमध्ये तक्रारदारांना योग्य ती सेवा दिली आहे. सबब, तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर होणेचा आदेश व्हावा व प्रस्तुत तक्रारीमुळे वि.प.यांना आलेला खर्च रक्कम रु.2,000/- तक्रारदारांनी वि.प.यांना देणेचा आदेश व्हावा अशी सदरहू मंचास विनंती केलेली आहे.
10. तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच तक्रारदारांच्या वकीलांचा युक्तीवाद विचारात घेता, प्रस्तुत प्रकरणी तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | वि.प. यांनी तक्रारदार यांना दोषयुक्त मोबाईल हॅन्डसेट देऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? | होय |
2 | आदेश काय ? | तक्रार अंशत: मंजूर. |
कारणमिमांसाः-
मुद्दा क्र.1:- प्रस्तुत प्रकरणात यातील तक्रारदारांनी वि.प.क्र.1-श्री महालक्ष्मी मोबार्इल, कोल्हापूर यांचेकडून दि.28.01.2014 रोजी नोकीया आशा 502 या मॉडेलचा मोबाईल खरेदी केला. त्या अनुषंगाने, तक्रारदारांनी कागद यादीसोबत अ.क्र.1 कडे बिल दाखल केलेले आहे. सदर बिलावरती महालक्ष्मी मोबाईल, कोल्हापूर या नावाने दुकानाचे बिल आहे. त्याचप्रमाणे अ.क्र.2 व 3 कडे तक्रारदाराने वि.प.क्र.2 कडे त्यांचा मोबाईल हॅन्डसेट दुरुस्तीकरीता दिलेचे सर्व्हीस सेंटरचे जॉबशीट दाखल केले असून त्यामध्ये मोबाईल हॅन्डसेटमध्ये sometime not on, sim insert time HS Auto Switch Off असे problem असलेचे नमुद केले आहे. सदरचे सर्व्हीस रेकॉर्डवरुन तक्रारदाराने खरेदी केलेल्या मोबाईलमध्ये सुरुवातीपासून वर नमुद केलेप्रमाणे तक्रारी असलेचे दिसून येते. सदरचे तक्रारी या मोबार्इलचे वॉरंटीच्या कालावधीमध्ये आहेत. तक्रारदाराने सदरचे आपले तक्रारीच्या पृष्ठर्थ या मंचात पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. वरील सर्व बाबींवरुन तक्रारदारांना देण्यात आलेला मोबाईल हॅन्डसेट दोषयुक्त होता ही बाब स्पष्ट होते.
प्रस्तुत कामातील वि.प.क्र.1 महालक्ष्मी मोबाईल हे या मंचासमोर हजर होऊन म्हणणे दाखल केले. त्यांनी त्यामध्ये तक्रारदारांनी दि.28.01.2014 रोजी त्यांचेकडून मोबाईल खरेदी केला आहे ही बाब मान्य केली आहे. तथापि सदर मोबाईल कंपनीचे विक्री पश्चात दुरुस्त सेवा केंद्राबाबतची संपूर्ण माहिती तक्रारदारांना दिली होती व आहे. वि.प.क्र.1 हे फक्त मोबाईल हॅन्डसेट विक्री करण्याचे कार्य करीत असून विक्री पश्चात सेवा देत नसल्याने तसेच तक्रारदाराने मोबाईल हॅन्डसेट बिघाड झालेबाबत व त्याचे दुरुस्तीबाबत कधीही वि.प.क्र.1 कडे संपर्क करुन तक्रार केली नाही. त्यामुळे त्यांना जबाबदार धरता येणार नाही. याबाबत हे मंच या ठिकाणी असे नमुद करते की, माल विक्री कायदयाप्रमाणे विक्रेत्याने ग्राहकांना विक्री करणारी वस्तु ही चांगल्या दर्जाची व चांगल्या प्रतीची देणे आवश्यक आहे. परंतु प्रस्तुत कामी तक्रारदारांना दिलेला मोबाईल हॅन्डसेट हा दोषयुक्त असून वि.प.यांचेकडून विक्री केलेला आहे. त्यामुळे वि.प.क्र.1 यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे असे या मंचाचे मत आहे.
प्रस्तुत कामी वि.प.2 व 3 यांचे वकीलांनी वि.प.यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेली नाही. त्याचप्रमाणे, तक्रारदारांचे मोबाईल हँडसेटमध्ये कोणता दोष आहे हे तक्रारदारांना योग्य तो पुरावा देऊन मे.मंचासमोर तक्रार शाबीत केलेली नाही. तसेच तक्रारदारांचे हॅन्डसेट कोणताही उत्पादित दोष नाही. तक्रारदार हे जाणूनबुजून हॅन्डसेट नेत नाहीत. त्याचप्रमाणे, केवळ जॉबशीटमध्ये नमुद केले म्हणून सदरचे वस्तुमध्ये उत्पादित दोष होता असे म्हणता येणार नाही असा युक्तीवाद केला. याबाबत हे मंच या ठिकाणी हे नमुद करु इच्छिते की, प्रस्तुत प्रकरणात यातील वि.प.यांनी तक्रारदारांना मोबाईल हॅन्डसेट विक्री केल्याचे मान्य केलेले आहे. त्याचप्रमाणे सदरचे मोबाईलमध्ये दोष असल्याने वि.प.यांचेकडे दुरुस्तीकरीता दिलेला आहे. परंतु जर वि.प.यांचे म्हणणेप्रमाणे मोबाईलमध्ये कोणताही दोष नव्हता तर मग वि.प.यांनी तक्रारदारांना प्रस्तुतचा मोबाईलमध्ये दोष नाही. त्यामुळे तो परत घेऊन जावा याकरीता कोणते प्रयत्न केले याबाबत कोणताही सबळ पुरावा या कामी दाखल केलेला नाही. त्याचप्रमाणे वि.प.त्यांचे म्हणणेमध्ये तक्रारदारांच्या चुकीचे वापरामुळे व हॅन्डसेटची बॅटरी व्यवस्थित चार्ज न केलेमुळे बॅटरी उतरुन हॅन्डसेट बंद पडत होता. तसेच कोणत्याही हॅन्डसेटला जर सिमकार्ड घालायचे असेल तर बॅटरी काढावी लागते व अशावेळी मोबाईल बंदच होतो व पुन्हा कार्ड घालून बॅटरी बसविले नंतर मोबाईल सुरु होतो ही नैसर्गिक प्रक्रियाच आहे. तो उत्पादित दोष नाही. सदरचा वि.प.यांनी घेतलेला बचाव यांचा विचार करता, सदरचे बाबी या कॉमन सेन्स् (सामान्य ज्ञान) चे आहे. त्यामुळे सदरचे गोष्टीचे ज्ञान तक्रारदारांना माहीत नाही हे म्हणणे आजकालचे कॉम्प्युटर व विज्ञान युगात न पटणारे व अयोग्य आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे, कारण यातील तक्रारदार हे तर सुशिक्षित असून ऑडीटींगचे काम करीत असल्याचे तक्रारीत नमुद आहे. त्यामुळे वि.प.यांनी सदरचा घेतलेला बचाव हे मंच मान्य करीत नाही. वरील सर्व विवेचनाचा विचार करीता, वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारांना दयायवयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2:- वर नमुद मुद्दा क्र.1 मध्ये नमुदप्रमाणे वि.प.क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवल्याने वि.प. क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारांना मोबाईलची हॅन्डसेटची किंमत रक्कम रु.5,550/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार पाचशे पन्नास फक्त) इतकी तक्रारदारांना दयावी व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- (अक्षरी रक्कम रुपये तीन हजार फक्त) व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- (अक्षरी रक्कम रुपये दोन हजार फक्त) अदा करावेत, या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश.
आदेश
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. वि.प.क्र.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या वा वैयक्तिकरित्या तक्रारदारांना मोबाईलची किंमत रु.5,550/- (अक्षरी रक्कम रुपये पाच हजार पाचशे पन्नास फक्त) इतकी रक्कम तक्रारदारांना अदा करावी.
3 वि.प. क्र.1 ते 3 यांनी संयुक्तिकरित्या वा वैयक्तिकरित्या तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- (अक्षरी रक्कम रुपये तीन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- (अक्षरी रक्कम रुपये दोन हजार फक्त) अदा करावेत.
4 आदेशाच्या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.