मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलींद केदार, सदस्य //- आदेश -// (पारित दिनांक – 30/03/2011) 1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये मंचासमोर दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीची तक्रार थोडक्यात अशी आहे की, ती 12 वी 42.83 टक्केसह उत्तीर्ण विद्यार्थीनी असून तिने गैरअर्जदार क्र. 2 शिक्षण संस्थेचे महाविद्यालय गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे बॅचलर ऑफ फाईन आर्ट या चार वर्षीय अभ्यासक्रमामध्ये 2006-07 या सत्रात प्रवेश घेतला. महाविद्यालयाचे माहिती पुस्तिकेत या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्याकरीता कोणतीही शैक्षणिक पात्रता नमुद नव्हती. तक्रारकर्तीला परीक्षेचे ओळखपत्र मिळावे व विद्यापीठाची प्रथम सत्राची परीक्षा दिली आणि त्याची गुणपत्रिका तिला मिळाली. परंतू पुढे द्वितीय सत्राच्या परीक्षेला तिला विद्यापीठाने प्रवेश नाकारला. याबाबत गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना विचारणा केली असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तक्रारकर्तीला अधिक चौकशीअंती असे कळले की, सदर अभ्यासक्रमाला प्रवेशाकरीता 45 टक्के अनिवार्य होते. परंतू गैरअर्जदारांनी तिला नियमबाह्य प्रवेश देऊन शैक्षणिक नुकसान केले, म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमोर दाखल करुन प्रवेशाकरीता दिलेली देणगी, प्रवेश फी, दोन वर्षामध्ये झालेला शैक्षणिक खर्च आणि मानसिक त्रासाबाबत रु.2,00,000/- ची मागणी केलेली आहे. आपल्या तक्रारीदाखल तक्रारकर्तीने 12 वीची गुणपत्रिकाची प्रत, माहितीपत्रक, प्रवेशाकरीता केलेला अर्ज, माहिती अधिकारांतर्गत माहिती व नोटीस ही कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्यात आली असता त्यांनी तक्रारीस खालीलप्रमाणे लेखी उत्तर दाखल केले. 3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे की, सन 2003-04 पासून 45 टक्केपेक्षा कमी गूण असणा-यांना परीक्षेला बसू दिले जात होते व पदव्याही देण्यात आल्या होत्या. तक्रारकर्तीला विद्यापीठाने परीक्षेला बसू दिले नाही, त्यामुळे विद्यापीठाला विरुध्द पक्ष करणे गरजेचे होते. गैरअर्जदारांनी ही बाब मान्य केली की, तक्रारकर्तीला 2006-07 मध्ये प्रवेश मिळाला होता व प्रथम सत्राची परीक्षाही तिने दिली होती. द्वितीय सत्राला विद्यापीठाने प्रवेश नाकारला, ही विद्यापीठाची चूक आहे. त्यांची काही चूक नसल्याने सदर तक्रार ही खारीज करण्याची मागणी केलेली आहे. 4. सदर तक्रार मंचासमोर 17.03.2011 रोजी युक्तीवादाकरीता आली असता उभय पक्षांचा युक्तीवाद मंचाने त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. तसेच दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 5. तक्रारकर्तीने गैरअर्जदाराकडे बॅचलर ऑफ फाईन आर्ट या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतला होता ही बाब उभय पक्षांना मान्य आहे व त्यांच्या कथनावरुन स्पष्ट होते, त्यामुळे ती गैरअर्जदारांची ग्राहक ठरते असे मंचाचे मत आहे. 6. युक्तीवादाचेवेळी गैरअर्जदारांच्या वकिलांनी सदर तक्रार ही कालबाह्य स्वरुपाची असल्याचे नमूद केले. तक्रारकर्तीने गैरअर्जदारांकडून 2006-07 या सत्राच्या अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतला होता आणि सदर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या परीक्षेला तिला बसू दिले व द्वितीय सत्राचे वेळेस सदर प्रवेश अवैध असल्याचे तिला कळले. परंतू सदर बाब तक्रारकर्तीला सन 2007 मध्ये कळली व तक्रारकर्तीने सदर तक्रार ही 15.04.2010 रोजी दाखल केलेली आहे, म्हणजे तब्बल 3 वर्षांनी दाखल केलेली आहे. ग्रा.सं.का.नुसार तक्रारीचे कारण घडल्यापासून दोन वर्षाचे आत तक्रार दाखल करणे गरजेचे होते व तक्रार दाखल करण्याकरीता का विलंब लागला, याबाबत सुध्दा तक्रारकर्तीने कोणतेही कारण कथन केले नाही किंवा त्याबाबत कोणताही पुरावा दिलेला नाही. त्यामुळे सदर तक्रार कालबाह्य असल्याने खारीज होण्यायोग्य असल्याचे मंचाचे मत आहे. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात येते. 2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |