न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदार यांनी अर्जात नमूद फ्रिज वि.प. यांचेकडून विकत घेतलेला होता. सदरचा फ्रीज रक्कम रु.74,500/- इतक्या किंमतीस दि.30/12/2021 रोजी विकत घेतलेला होता. तक्रारदार यांनी दि. 31/12/2021 रोजी वि.प. यांचे बँक ऑफ बडोदामधील खाते नं. 018130110000010 या बचत खातेवर रक्कम रु.74,500/- इतकी जमा केली होती. वि.प. यांना सदरची रक्कम लगेचच प्राप्त झालेली आहे. मात्र सदरची फ्रीज खरेदीची संपूर्ण रक्कम वि.प. यांना पाठवून देवूनही व त्यांनी सदरची रक्कम स्वीकारुनही तक्रारदार यांना अर्जात नमूद फ्रीज पाठविलेला नाही. अशा प्रकारे सदरची रक्कम स्वतःकडे ठेवून वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. मात्र दि.30/12/2021 रोजीची ठरलेली रक्कम मान्य करुन लगेचच त्याचे पेमेंट तक्रारदार यांनी केलेने उभयतांमधील व्यवहार त्याचवेळी अंतिम झालेला आहे व तरीसुध्दा फ्रीजची रक्कम वाढली म्हणून रक्कम मागणी करणे अव्यवहारीक आहे व सदरची वि.प. यांची कृती ही तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेमध्ये त्रुटी निर्माण करणारी आहे. या कारणास्तव रक्कम रु.1 लाख इतकी नुकसान भरपाईची किंमत तसेच तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 25,000/- मिळावेत या मागणीसाठी प्रस्तुतची तक्रार तक्रारदारास दाखल करणे भाग पडले.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
सेलफ्रॉस्ट व्हीसी कुलर मॉडेल नं. FKG600DD या मॉडेलचा फ्रीज हा या तक्रारअर्जाचा विषय आहे. तक्रारदार यांना फ्रीजची जरुरी भासलेने व वि.प. यांचेकडून फ्रीज खरेदीसाठी आकर्षक ऑफर आलेने तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून सदरचा फ्रीज खरेदी करणेचे ठरविले व सदरचे फ्रीजची किंमत ही रक्कम रु.74,500/- इतकी होती. त्याप्रमाणे दि. 30/12/2021 रोजी इन्व्हॉईस तक्रारदार यांचे नावे वि.प. यांनी दिलेला आहे. सदरचा इन्व्हॉईस नं. एमई/164/2021-22 असा आहे व याप्रमाणे तक्रारदार यांनी दि. 31/12/2021 रोजी वि.प. यांचे बँक ऑफ बडोदामधील खाते नं. 018130110000010 या खातेवर रक्कम रु.74,500/- जमा केलेली आहे व सदरची रक्कम वि.प. यांना प्राप्त झालेली आहे. मात्र सदरचा फ्रीज हा तक्रारदार यांना पाठविणे जरुरी असतानाही तशी कृती वि.प. यांनी केलेली नाही. तक्रारदार यांनी मिळकतीबाबत वि.प. यांना वेळोवेळी फोनवर संपर्क साधून कळविलेले होते. मात्र तरीही सदरचा फ्रीज तक्रारदार यांना वि.प. यांनी पाठविलेला नाही. तक्रारदार यांचे व्यवसायासाठी म्हणून सदरचा फ्रीज तक्रारदार यांनी खरेदी केलेला आहे व तक्रारदार याचा उदरनिर्वाह मेडिकल व जनरल स्टोअरवरच आहे. या कारणाकरिता सदरचा फ्रीज तक्रारदार यांना आवश्यक होता व आहे. वाद मिळकत म्हणजेच अर्जात नमूद फ्रीज याचे उत्पादन करणारे कंपनीकडे सदरचा फ्रीज उपलब्ध नसताना वि.प. यांनी ती पुरविणेची हमी दिलेने त्या आश्वासनावर विसंबून व येणारा उन्हाळयाचा सिझन वापरता येईल या हेतूने वि.प. यांना फ्रीज खरेदीची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांनी पाठवून दिली होती. तक्रारदार यांनी व्हॉटसअॅपवरुन वेळोवेळी वि.प. यांचेशी संभाषण केले असता वि.प. यांनी फ्रीजची किंमत वाढलेली आहे, त्यामुळे वाढीव खर्चाची रक्कम पाठविलेस फ्रीज पाठवितो असे सुनावले. मात्र सदर रक्कम वाढीस तक्रारदार हे जबाबदार नसताना उलट वि.प. यांनी वेळेत फ्रीज दिला नसताना रक्कम वाढीचे कारण पुढे करुन तक्रारदार यांना फ्रीज दिलेला नाही. सबब, या कारणाकरिता तक्रारदार यांनी त्यांचे वकीलांचेमार्फतही दि. 16/3/2022 रोजी वि.प. यांना कायदेशीर नोटीस पाठविलेली आहे. मात्र नोटीसीप्रमाणे कोणतीही कृती वि.प. यांनी केलेली नाही. सबब, तक्रार मिळकतीपोटी तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेली रक्कम रु.74,500/- तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारिरिक तसेच आर्थिक नुकसानीपोटी झालेल्या त्रासासाठी रक्कम रु.1 लाख व अर्जाचा खर्च रु. 25,000/- अशी मागणी या तक्रारअर्जाद्वारे तक्रारदार यांनी केलेली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत वि.प. यांनी दिलेला इन्व्हॉईस, तक्रारदार यांनी दिलेल्या रकमेची काऊंटर स्लीप, फ्रिजचे फोटो, व्हाटसअॅपवरील संभाषण, वि.प. यांना पाठविलेली नोटीस व पोस्टाची पावती इ. कागदपत्रे दाखल केली आहे. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. कंपनीस आयोगाची नोटीस लागू होवून ते याकामी हजर झाले नाहीत त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नाही. सबब, वि.प. यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
5. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा व युक्तिवाद यावरुन आयोगासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतातक्रारदार
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
6. तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे सेलफ्रॉस्ट व्हीसी कुलर मॉडेल नं. FKG600DD या मॉडेलचा फ्रीज खरेदी करणेसाठी रक्कम रु.74,500/- इतकी रक्कम वि.प. यांचे बँक ऑफ बडोदा मधील खाते नंबर 018130110000010 या बचत खातेवर रक्कम जमा केलेली आहे. सदरची रक्कम दि. 30/12/2021 रोजीच जमा केलेली आहे व या संदर्भातील इन्व्हॉइसही वि.प. यांनी तक्रारदार यांचे नावे दिलेला आहे. सदरचा इन्व्हॉइस तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत दाखल केले कागदपत्रांबरोबर दाखल केलेला आहे. सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये सेवा घेणार व देणार हे नाते निर्माण झाले आहे. याकरिता तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
7. तक्रारदार यांनी वर अर्जात नमूद मॉडेलचा फ्रीज हा वि.प. यांचेकडे घेतलेला आहे हे दाखल कागदपत्रांवरुन या आयोगाचे निदर्शनास येते. वि.प. हे आयोगासमोर हजरही नाहीत व त्यांनी आपले म्हणणेही दाखल केलेले नाही. त्यांना यापूर्वीच या आयेागाची नोटीस प्राप्त झालेली आहे. सबब, नि.1 वर त्यांचेविरुध्द “एकतर्फा” आदेश पारीत करणेत आलेले आहेत. ज्याअर्थी आयोगाची नोटीस लागू होवूनही वि.प. हे आयोगासमोर हजर नाहीत. याचाच अर्थ त्यांना तक्रारअर्जातील सर्वच कथने मान्य आहेत असा निष्कर्ष हे आयेाग काढत आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत खरेदी केलेल्या फ्रीजचा इन्व्हॉइस तसेच वि.प. यांचे बँक ऑफ बडोदा या बँके खातेवर रक्कम रु. 74,500/- इतकी रक्कम भरलेची पावतीही दाखल केलेली आहे. सबब, तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे सदरचे फ्रीजसाठी रक्कम रु.74,500/- दिलेली आहे यावर हे आयोग ठाम आहे. मात्र असे असूनही वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरचा फ्रिज दिलेला नाही. तक्रारदार यांनी दि.24/5/2022 रोजी वकीलांमार्फत वि.प. कंपनीस नोटीस पाठविलेली आहे व याची पोहोचही तक्रारदार यांनी याकामी दाखल केलेली आहे. मात्र असे असूनही वि.प. यांनी त्यास कोणतेही उत्तर दिलेले नाही व तसे या कामी ते दाखलही नाही. तक्रारदार यांनी सदरची बाब ही आपले शपथपत्रावर शाबीतही केलेली आहे. तथापि असे असूनही वि.प. यांनी तक्रारदार यांना फ्रीज दिलेला नाही. सदरची बाब वि.प. यांनी या आयोगासमोर हजर होवून खोडूनही काढलेली नाही व तक्रारदार यांनी सदरची बाब ही शपथपत्रावर कथन केलेली आहे. सबब, तक्रारदार यांना फ्रीज वि.प. यांचेकडून मिळालेली नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत असलेने तक्रारदार यांच्या मागण्या अंशतः मंजूर करणेवर हे आयोग ठाम आहे. सबब, तक्रारदार यांना अर्जात नमूद त्याच कंपनीचा व त्याच मॉडेलचा फ्रीज देणेचे आदेश वि.प. कंपनीस करण्यात येतात
8. जरी तक्रारदार यांचे कथनाप्रमाणे वि.प. यांनी सदरचे मॉडेलची किंमत ही वाढली असलेने फरकाची रक्कम पाठविलेस फ्रीज पाठवू असे कथन केले असले तरी वि.प. यांनी सदरची रक्कम पाठविणेपूर्वीच तक्रारदार यांना या संदर्भात कळविणे आवश्यक होते. मात्र दाखल पुराव्यांवरुन वि.प. यांनी तक्रारदार यांना असे कळविलेचे दिसून येत नाही. सबब, रक्कम स्वीकारणेपूर्वी वि.प. यांनी रक्कम वाढीची कोणतीही बाब तक्रारदार यांना कळविली नसलेने वि.प. कंपनीने मागितलेल्या वाढीव रकमेचा विचार हे आयेाग करत नाही व तशी वाढीव रक्कम किती व काय होती हेही वि.प. यांनी या आयोगासमोर हजर राहून कथन केलेले नाही. सबब, तक्रारदार यांनी अर्जात नमूद ज्या मॉडेलकरिता सदरची रक्कम वि.प. यांना पाठविलेली आहे, त्याच मॉडेलचा फ्रीज हा तक्रारदार यांना देणेचे आदेश वि.प. यांना करण्यात येतात व तसे जर वि.प. यांना शक्य नसेल तर तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेली रक्कम रु.74,500/- तक्रारदार यांना परत करावी. तसेच सदरचे रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देणेचे आदेश वि.प. यांना करणेत येतात. तसेच यासाठी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.3,000/- देणेचे आदेश वि.प. यांना करण्यात येतात.
सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प. यांनी तक्रारदार यांना सेलफ्रॉस्ट व्हीसी कुलर मॉडेल नं. FKG600DD या मॉडेलचा फ्रीज देणेचे आदेश करणेत येतात.
अथवा
वि.प. यांना वर नमूद केलेप्रमाणे फ्रीज देणे शक्य नसेल तर वि.प. यांनी तक्रारदार यांना फ्रीजचे किंमतीपोटी अदा केलेली रक्कम रु. 74,500/- अदा करावी. तसेच सदरचे रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देणेचे आदेश करणेत येतात.
3. वि.प. यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
4. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6. जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची वि.प. यांना मुभा राहील.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यातक्रारदार