जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर. तक्रार दाखल दिनांकः 07/10/2009 आदेश पारित दिनांकः 02/11/2010 तक्रार क्र. : 641/2009 तक्रारकर्ता : श्रीमती रेखा अशोकराव पिलपीले, वय : 52 वर्षे, व्यवसाय : ......., द्वारा सतीश भाऊरावजी खरडकर, श्रीमहालक्ष्मीनगर, प्रोसेस सर्वे सोसायटी, प्लॉट नं. 230, म्हाळगीनगर पॉवर हाऊसमागे, नरसाळा रोड, नागपूर. //- विरुध्द -// गैरअर्जदार :1 महादेव लॅण्ड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमीटेड, द्वारा संचालक-प्रमोद अग्रवाल, कार्यालय - 1132/1133, आशिर्वाद भवन, पहिला माळा, सेंट्रल एव्हेन्यु, होटल जनकसमोर, गांधीबाग, नागपूर 02. 2. मा. प्रशासक, महादेव लॅण्ड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमीटेड, कार्यालय - 1132/1133, आशिर्वाद भवन, पहिला माळा, सेंट्रल एव्हेन्यु, होटल जनकसमोर, गांधीबाग, नागपूर 02. तक्रारकर्त्यातर्फे : ऍड. सौ. अनुराधा देशपांडे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे : एकतर्फी कारवाई. गणपूर्ती : 1. श्री.विजयसिंह राणे - अध्यक्ष. 2. श्री. मिलिंद केदार - सदस्य. मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलिंद केदार, सदस्य - आदेश - (पारित दिनांक – 02/11/2010) 1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार क्र. 1 भूखंड विकासक असून ग्राहकांच्या ठेवी स्वीकारुन त्यावर व्याज देण्याचे अमीष दाखवून रक्कम स्विकारतात. तसेच गैरअर्जदार ग्राहकांना आकर्षीत करण्याकरीता अडीच वर्षात दामदुप्पट योजना व अधिक व्याजाचे प्रलोभन देतात. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडे अनेक रकमा खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे अडीच वर्षात दाम दुप्पट योजनेअंतर्गत गुंतविल्या होत्या. अ.क्र. | ठेवीची तारीख | ठेव रक्कम | पावती क्र. | व्याजाची अंतिम तारीख | 1 | 27.06.2008 | रु.86,000/- | 4212 | 12.02.2009 | 2 | 30.06.3008 | रु.60,000/- | 4812 | 12.02.2009 | 3 | 28.07.2008 | रु.30,000/- | 6759 | 12.02.2009 | 4 | 30.07.2008 | रु.10,000/- | 7206 | 12.02.2009 | 5 | 05.08.2008 | रु.14,000/- | 7845 | 12.02.2009 | 6 | 31.10.2008 | रु.35,000/- | 19832 | 12.02.2009 | 7 | 26.11.2008 | रु.25,000/- | 22513 | 12.02.2009 | 8 | 28.11.2008 | रु.18,000/- | 22518 | 12.02.2009 | 9 | 31.12.2008 | रु.33,000/- | 27233 | 12.02.2009 | 10 | 31.12.2008 | रु.20,000/- | 27369 | 12.02.2009 | 11 | 29.01.2009 | रु.20,000/- | 32125 | 12.02.2009 | 12 | 12.02.2009 | रु.42,000/- | 36278 | 12.02.2009 |
गैरअर्जदाराने काही रकमांवर सुरुवातीला व्याजाचा पहिला हफ्ता तक्रारकर्त्यास दिला व सदर व्याजादाखल मिळालेल्या रकमा ठेव पावतीच्या मागे नमूद असल्याप्रमाणे तक्रारकर्त्याला मिळाल्या, म्हणून पुढे अनेक रकमा वेगवेगळया स्वरुपात एकूण रु.3,93,000/- गुंतविण्यात आले. परंतू पुढे तक्रारकर्त्याला गैरअर्जदाराने ठरल्याप्रमाणे व्याजाची रक्कम न दिल्याने तक्रारकर्त्याने सदर रकमा व व्याज परत मागितले. परंतू गैरअर्जदाराने ते परत देण्यास नकार दिला, म्हणून तक्रारकर्त्याने तक्रार दाखल करुन रक्कम रु.3,93,000/- ही 10 टक्के व्याजासह परत मागितली आहे. तसेच मानसिक त्रास व तक्रारीच्या खर्चाची मागणी केलेली आहे. 2. मंचामार्फत गैरअर्जदारांना नोटीस पाठविण्यात आली असता गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचा नोटीस ‘घेण्यास नकार’ या पोस्टाच्या शे-यासह परत आला. तसेच पुढे मंचासमोर ते हजर न झाल्याने मंचाने त्यांच्याविरुध्द एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला. 3. सदर प्रकरण मंचासमोर दि.20.10.2010 रोजी युक्तीवादाकरीता आल्यानंतर तक्रारकर्ता स्वतः हजर. गैरअर्जदार क्र. 1 व 2 गैरहजर. तक्रारकर्त्याचा युक्तीवाद ऐकण्यात आला. मंचाने सदर प्रकरणी दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. प्रस्तुत प्रकरणी तक्रारकर्त्याने नमूद केले आहे की, त्याने गैरअर्जदार क्र. 1 कडे मुदत ठेवीअंतर्गत अडीच वर्षात दाम दुप्पट योजनेअंतर्गत एकूण रु.3,93,000/- रक्कम गुंतविले आहेत ही बाब दस्तऐवज पृष्ठ क्र. 6 ते 17 वरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदाराचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. 5. तक्रारकर्त्याने वरीलप्रमाणे एकूण रु.3,93,000/- अडीच वर्षात दाम दुप्पट योजनेअंतर्गत गैरअर्जदाराकडे गुंतविले होते ही बाब पृष्ठ क्र. 6 ते 17 वरुन स्पष्ट होते. सदर रक्कमेवर सुरुवातीला व्याज मिळाल्याने तिची काही हरकत नव्हती. परंतू नंतर गैरअर्जदाराने व्याज न दिल्याने तिने रक्कम परत मिळण्याबाबत विनंती केली. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजाचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याचे मुदत ठेवीच्या प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती आहेत. सदर प्रमाणपत्रांच्या मागे तारखेसह काही रकमा दिल्याची नोंद आहे. परंतू प्रत्यक्षात किती रकमा व्याजादाखल आजतागायत देय होत्या, याबाबत तक्रारकर्तीने कोणताही खुलासा मंचासमोर केलेला नाही. प्रस्तुत तक्रारीत गैरअर्जदारांना मंचामार्फत नोटीस पाठविण्यात आल्यानंतरही त्यांनीउपस्थित होऊन सदर तक्रारीस कोणतेच आव्हानात्मक म्हणणे सादर केले नाही. 6. तक्रारकर्त्याने नमूद केल्याप्रमाणे मुदत ठेवींचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत दाखल केलेली आहे. यावरुन हे सिध्द होते की, तक्रारकर्त्याचे गैरअर्जदाराकडे मुदत ठेवीअंतर्गत रु.3,93,000/- जमा आहेत. मंच येथे नमूद करु इच्छितो की, गैरअर्जदार हे ग्राहकांकडून ठेवी स्विकारतात व त्याकरीता ग्राहकांना जास्त व्याज देण्याचे प्रलोभन देतात व फार मोठया प्रमाणावर ठेवी स्विकारतात. त्यांनी ग्राहकांना आश्वासित केल्याप्रमाणे व्याज देणे त्यांचे कर्तव्य होते. तसेच ठेवीदारांनी रक्कम परत मागितल्यावर ती ठेव व्याजासह परत करणे ही गैरअर्जदाराची जबाबदारी आहे. त्यामुळे सदर ठेव खात्यातील रक्कम ज्या दिनांकास तक्रारकर्त्याने जमा केल्या असेल त्या दिनांकापासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह परत द्यावयास पाहिजे असे मंचाचे मत आहे. 7. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्याने मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल रु.50,000/- ची मागणी केलेली आहे. परंतु सदर मागणी पुराव्यानीशी सिध्द केलेली नाही. तथापि, मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने एवढी मोठी रक्कम गैरअर्जदाराकडे गुंतविली होती व मागणी करुनही गैरअर्जदाराने ती परत न दिल्याने तक्रारकर्त्याला सदर रकमेचा उपभोग घेता आला नाही. त्यामुळे त्याला शारीरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला, म्हणून तक्रारकर्ता सदर त्रासाची क्षतिपूर्तीबाबत गैरअर्जदार क्र. 1 कडून रु.5,000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे रास्त मत आहे. तक्रारकर्त्याला पर्यायाने मंचात तक्रार दाखल करावी लागली म्हणून तक्रारीच्या खर्चाबाबत गैरअर्जदार क्र. 1 कडून रु.2,000/- मिळण्यास पात्र आहे. गैरअर्जदार क्र. 2 विरुध्द तक्रारकर्त्याचे तक्रारीत कोणतेच आक्षेप नसल्याने त्यांच्याविरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. उपरोक्त निष्कर्षावरुन व उपलब्ध कागदपत्रांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2) गैरअर्जदार क्र. 1 ला आदेश देण्यात येतो की, तक्रारकर्त्याची मुदत ठेवी अंतर्गत रु.3,93,000/- जमा असलेली रक्कम तक्रार दाखल दिनांकापासून 07.10.2009 पासून तर रक्कम प्रत्यक्ष मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह तक्रारकर्त्याला परत करावी. 3) गैरअर्जदार क्र. 1 ने शारीरीक व मानसिक त्रासाच्या क्षतिपूर्तीबाबत तक्रारकर्त्याला रु.2,000/- अदा करावे. 4) तक्रारीच्या खर्चाबाबत गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्त्याला रु.1,000/- अदा करावे. 5) गैरअर्जदार क्र. 2 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. 6) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 1 ने आदेशाची प्रत मिळाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत करावे. (मिलिंद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |