जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 1671/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः – 17/12/2008
सामनेवाला यांना नोटीस लागलेली तारीखः 04/02/2009.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-01/09/2009
श्री.योगेश प्रल्हाद सुरमारे,
उ.व.सज्ञान, धंदाः नौकरी,
रा.141/3, प्लॉट नं.35, साई पार्क,
अयोध्या नगर, जळगांव, ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
1. व्यवस्थापक / प्रोप्रायटर,
महादेव एजन्सीज, महाराष्ट्र फेअर स्केलजवळ,
तुकाराम वाडी, नेरी नाक्याजवळ, जळगांव.
2. व्यवस्थापक / प्रोप्रायटर,
2.सोलर इंटरनॅशनल लि.
2.डी 13/4, ओखला इंडस्ट्रीयल एरिया,
2.फेस 2, नवी दिल्ली. ....... सामनेवाला.
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 01/09/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदार तर्फे श्री फरीद ए.एम.शेख वकील हजर
सामनेवाला क्र. 1 तर्फे श्री.विक्रम पद्यमाकर केसकर वकील हजर.
सामनेवाला क्र. 2 एकतर्फा.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केलेले आहे. संक्षिप्तपणे प्रकरणाची हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. तक्रारदाराने सामनेवाला क्र. 2 यांचेमार्फत आयात केलेला सोनी इरिक्सन कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट मॉडेल क्र.डब्ल्यू 300 आय, इ.एम.आय.नं.357977016930683 वर्णनाचा मोबाईल हॅण्डसेट दि.22/11/2007 रोजी रक्कम रु.6,000/- रोख सामनेवाला क्र. 1 यांना देऊन बिल क्र.2947 अन्वये खरेदी घेतला. सामनेवाला तर्फे सदरचा हॅण्डसेट खरेदी घेतल्यापासुन एक वर्षाचे कालावधीपर्यंत वॉरंटी कालावधी देण्यात आला होता. मोबाईल हॅण्डसेट घेतल्यापासून दोन महीन्यातच सदर हॅण्डसेट मध्ये नेटवर्क प्रॉब्लेम, रिंगर प्रॉब्लम, स्पिकर खराब असल्यामुळे आवाज स्पष्ट ऐकु न येणे, बोलणे चालु असतांना मध्येच बंद पडणे, मोबाईल कॅमेरा मध्ये कोणतेही छायाचित्र / फोटो चित्रित न होणे, इयर फोन मध्ये स्पष्ट आवाज ऐकु न येणे असे दोष निर्माण झाले. तक्रारदाराने सदर बाबी सामनेवाला क्र. 1 यांचे निर्दशनास आणुन देऊन सदरचा हॅण्डसेट सामनेवाला क्र. 1 यांचेकडे दुरुस्तीसाठी दिला असता सामनेवाला क्र. 1 यांनी सदर हॅण्डसेट मध्ये उत्पादीत दोष असुन ते दुरुस्त होणे अशक्य असल्याचे सांगीतले. तक्रारदाराने दि.4/12/2007 रोजी सदर सदोष मोबाईल हॅण्डसेट सामनेवाला क्र. 1 कडे दुरुस्तीसाठी दिला तथापी सदरचे दोष आजपर्यंत दुरुस्त करण्यात आलेले नाही व कोणतेही समाधानकारक उत्तर सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेले नाही. सदोष मोबाईल हॅण्डसेट विक्री करुन सामनेवाला यांनी तक्रारदारास त्रृटीयुक्त सेवा प्रदान केलेली आहे. सबब सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेकडुन वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या हॅण्डसेटची किंमत रक्कम रु.6,000/- दि.22/11/2007 पासुन द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह मिळावी, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.15,000/-, तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
2. सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. सामनेवाला क्र. 1 हे सामनेवाला क्र. 2 यांचे वितरक नाहीत तसेच तक्रारदार यांचा सोनी एरिक्सन मोबाईल हॅण्डसेट त्यांनी सामनेवाला क्र. 1 यांचेकडुन खरेदी घेतला असलेबद्यलचे म्हणणे खरे आहे. तथापी सदर हॅण्डसेट मध्ये उत्पादीत दोष असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे खोटे आहे. हॅण्डसेट विकत घेतल्याची तारीख, मॉडेल नंबर, इ.एम.आय नंबर, हॅण्डसेट रक्कम व बिल नंबर हे बरोबर आहे तथापी सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दिलेले बिलात टर्म व कंडीशन नं. 2 मध्ये स्पष्टपणे नमुद केलेंडर होते की, मोबाईल हॅण्डसेट सर्व्हीस संबंधी विक्रेता जबाबदार नाही त्याबाबत सर्व्हीस सेंटरशी संपर्क करावा त्यामुळे सामनेवाला क्र. 1 यांना हॅण्डसेट मधील सर्व्हीसचे तक्रारी बाबत जबाबदार धरता येणार नाही. सर्व्हीस सेंटर कडे जाणेबाबत सुचित करुनही तक्रारदार सर्व्हीस सेंटर कडे गेले नाहीत. सदरचा हॅण्डसेट हा सामनेवाला क्र. 2 यांनी उत्पादीत / इंम्पोर्ट केला आहे त्याचे नादुरुस्तीबाबत अथवा सर्व्हीस बाबत कंपनी व अधिकृत सर्व्हीस सेंटर हेच जबाबदार आहेत. सामनेवाला क्र. 1 हे फक्त मोबाईलचे अंतीम विक्रेता आहेत. सबब तक्रारदाराचा तक्रार नामंजुर करण्यात यावा अशी विनंती सामनेवाला क्र. 1 यांनी केली आहे.
3. सामनेवाला क्र. 2 यांना या मंचातर्फे रजिस्ट्रर पोटाने तसेच यु.पी.सी. ने नोटीस बजावणी करण्यात आली. सामनेवाला क्र. 2 हे नोटीस प्राप्त होऊनही प्रस्तुत प्रकरणी गैरहजर राहील्याने सामनेवाला क्र. 2 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले.
4. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला क्र. 1 यांचे लेखी म्हणणे, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे अवलोकन केले असता व उभयंतांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1)
प्रमाणे ग्राहक आहे काय ? .......होय
2. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न
देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय ? ...... होय
3. म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
5. मुद्या क्रमांक 1 तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांचे महादेव एजन्सीज या दुकानातुन दि.22/11/2007 रोजी DODY W 3001 357977016930683 हा इरक्सन कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट एकुण रक्कम रु.6,000/- इतक्या किंमतीस खरेदी घेतल्याचे नि.क्र.3 लगत दाखल असलेल्या पावती क्र.2947 वरुन स्पष्ट होते तसेच सदरची बाब सामनेवाला क्र. 1 यांनी देखील त्यांचे लेखी म्हणण्यात कबुल केलेली असल्याने तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक संरक्षण कायदा,1986 चे कलम 2 (1) नुसार ग्राहक होतात या निष्कर्षाप्रत हे मंच आलेले आहे.
6. मुद्या क्रमांक 2 सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास खरेदी दिलेला मोबाईल हॅण्डसेट खरेदी घेतल्यापासुन दोन महीन्यामध्येच सदर हॅण्डसेट मध्ये नेटवर्क प्रॉब्लेम, रिंगर प्रॉब्लम, स्पिकर खराब असल्यामुळे आवाज स्पष्ट ऐकु न येणे, बोलणे चालु असतांना मध्येच बंद पडणे, मोबाईल कॅमेरा मध्ये कोणतेही छायाचित्र / फोटो चित्रित न होणे, इयर फोन मध्ये स्पष्ट आवाज ऐकु न येणे असे दोष निर्माण झाले असल्याबाबतची तक्रारदाराची प्रामुख्याने तक्रार आहे. तक्रारदाराने सदरची बाब सामनेवाला क्र. 1 यांचे निर्दशनास आणुन दिली असता सामनेवाला यांनी तक्रारदारास मोबाईल हॅण्डसेट मध्ये उत्पादीत दोष असुन तो दुरुस्त करण्यास असमर्थता व्यक्त केलेली आहे. तसेच तक्रारदार यांनी रिगल मोबाईल, 11 शाहु नगर कॉम्प्लेक्स, जळगांव यांचेकडील वादातील मोबाईल सदोष असल्याबाबतचा अहवाल दि.5/8/2009 रोजी सादर केला असुन त्यात कॅमेरा, स्पिकर, बॅटरी विक, नेटवर्क इत्यादी दोष नमुद केलेले दिसुन येतात. सामनेवाला क्र. 1 यांनी वादातील मोबाईल हॅण्डसेट मध्ये जर दोष असेल तर तो दुरुस्ती बाबत अथवा सर्व्हीस बाबत कंपनी अथवा अधिकृत सर्व्हीस सेंटर जबाबदार असल्याचे प्रतिपादन त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये केलेले आहे. सामनेवाला क्रमांक 1 व 2 यानी तक्रारदारास सदोष व उत्पादीय दोष असलेला मोबाईल हॅण्डसेट विक्री केल्याबाबत तक्रारदाराने दि.5/8/2009 रोजीचे मोबाईल तज्ञाचा अहवाल या सदराखाली रिगल मोबाईल, 11 शाहु नगर कॉम्प्लेक्स, जळगांव येथील तज्ञांचा अहवाल सादर केला असुन त्यात कॅमेरा, स्पिकर, बॅटरी विक, नेटवर्क असे नमुद करुन दोष कथन केलेले आहेत. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास विक्री केलेला मोबाईल हॅण्डसेट सदोष असल्याचे तक्रारदाराने शाबीत केलेले आहे. याउलट सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदारास सदर मोबाईल हॅण्डसेट खरेदी देतेवेळी दिलेल्या बिलात नमुद अट व शर्त क्र. 2 चा आधार घेऊन त्यांची जबाबदारी नसल्याचे कथन केले आहे. तथापी याबाबत मंचास येथे नमुद करावेसे वाटते की, एकदा एखादया विक्रेत्याने एखादया ग्राहकास वस्तु अगर सेवा विक्री केली तर त्यापश्चात सेवा देण्याची जबाबदारी सर्वस्वी विक्रेत्याची असते. तसेच तक्रारदाराने दि.5/8/2009 रोजी दाखल केलेल्या तज्ञाचे अहवालासही सामनेवाला यांनी काहीएक आक्षेप घेतलेला दिसुन येत नाही. सदोष व उत्पादीय त्रृटी असलेला मोबाईल हॅण्डसेट सामनेवाला यांनी तक्रारदारास विक्री केलेबाबत तक्रारदाराने सामनेवाला यांना दि.11/11/2008 रोजीचे नोटीसीने कळविलेले असुन नोटीस प्राप्त होऊन देखील सामनेवाला यांनी तक्रारदारास विक्री केलेल्या सदोष हॅण्डसेट बाबत काहीएक कारवाई केल्याचे दिसुन येत नाही. तक्रारदारास सामनेवाला क्रमांक 1 व 2 यांनी उत्पादीत दोष असलेला सदोष मोबाईल हॅण्डसेट विक्री करुन त्रृटीयुक्त सेवा प्रदान केल्याचे स्पष्ट होते. सबब आदेश.
आ दे श
( अ ) तक्रारदाराची तक्रार मंजुर करण्यात येते.
( ब ) सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या तक्रारदाराचा उत्पादनातील दोष असलेला हॅण्डसेट बदलुन त्याच मेकचा दोषविरहीत मोबाईल हॅण्डसेट त्वरीत द्यावा.
अथवा
( ब ) (1) सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या तक्रारदारास मोबाईल हॅण्डसेट पोटी स्विकारलेली रक्कम रु.6,000/- (अक्षरी रक्कम रु.सहा हजार मात्र ) दि.17/12/2008 पासुन द.सा.द.शे.8 टक्के व्याजासह तक्रारदारास परत करावेत.
( क ) सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.1,000/- (अक्षरी रक्कम रु. एक हजार मात्र ) द्यावेत.
( ड ) सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या तक्रारदारास तक्रारीचे खर्चापोटी रु.500/- (अक्षरी रक्कम रु.पाचशे मात्र ) द्यावेत.
( इ ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 01/09/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव