निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 09/10/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 30/10/2012
तक्रार निकाल दिनांकः- 03/01/2014
कालावधी 01 वर्ष. 02 महिने.04 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
मोहम्मद ताहेर पिता मोहम्मद उस्मान. अर्जदार
वय 58 वर्षे. धंदा.शेती. अॅड.डि.बी.नांदापूरकर.
रा.राजमोहल्ला जिंतूर ता.जिंतूर जि.परभणी.
विरुध्द
1 महालक्ष्मी ट्रॅक्टर्स, गैरअर्जदार.
प्रो.प्रा.पवार बंधु, अॅड.वि.वि.देशपांडे.
नुतन महाविद्यालय समोर,जिंतूर रोड, सेलू,ता.सेलू जि.परभणी
2 महालक्ष्मी ट्रॅक्टर्स,
प्रो.प्रा.पवार बंधु,
पेट्रोल पंपाचे जवळ, भोकरदन नाका, जालना,ता.जि.जालना.
3 सोनालिका इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेड. अॅड.एस.एस.देशपांडे.
Vill Chak Gujran, P.O. Piplanwala.
व्हिल चाक गुजरान,पि.ओ.पिपलानवाला.
Jalandhar Road, Hoshiarpur, Panjab.
जालंधर रोड, होशियारपूर, पंजाब राज्य पिन – 146 001.
4 एच.डी.एफ.सी.इरगो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
औरंगाबाद.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास त्याचे मालकीचे ट्रॅक्टर MH-22-X 988 चे चारीही खराब टायरची विक्री करुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तो जिंतूर येथील रहिवाशी असून तो शेतीचा व्यवसाय करतो व त्याकरीता त्याने शेती वापरासाठी व उदरनिर्वाह करण्याच्या उद्देशाने गैरअर्जदार क्रमांक 1 कडून “ 745—D.I- III ” सोनालिका इंटरनॅशनल या कंपनीचे सदरील मॉडेलचे ट्रॅक्टर गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दिलेल्या वॉरंटी व शब्दावर विश्वास ठेवुन सदरचे ट्रॅक्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे अर्जदाराने कोटक महिंद्रा बँक लि. च्या सहकार्याने सदरचे ट्रॅक्टर गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडून 5,50,000/- रु. मध्ये मॉडेल 745—D.I- III खरेदी केला.ज्याचा इंजीन नं. 3102 I L 13 L 27610915 असा असून ज्याचा चेसीस नं. B Z C S D – 274817/3 असा आहे. सदर नविन खरेदी केलेले ट्रॅक्टरचे सर्व चारीही टायर सिएट सम्राट ( CEAT SAMRAT) कंपनीचे होते.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर ट्रॅक्टरचे हे पहिल्यापासून खराब व डॅमेज होते. ट्रॅक्टरच्या मागच्या दोन मोठया टायरचा मार्क नंबर साईज पुढील प्रमाणे आहे.
मागील डावे टायर 89265011 13:06:80 CEAT Samrat.
मागील उजवे टायर 41553011 13:06:80 CEAT Samrat.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर ट्रॅक्टर खरेदी करते वेळी गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 याने ट्रॅक्टरच्या सर्व पार्टची व साहित्याची वॉरंटी व गॅरंटी दिली होती. त्यावेळी अर्जदाराला गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 याने सदर ट्रॅक्टरची सर्व पार्टसहीत 18 महिन्याची व 1500 घंटयांची वॉरंटी दिलेली होती. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अर्जदारास ट्रॅक्टर खरेदी करते वेळी ट्रॅक्टरच्या स्पेअर पार्टची गॅरंटी व वॉरंटी ही कंपनीने स्वतः म्हणजे गैरअर्जदार क्रमांक 3 याने दिलेली आहे. असे सांगीतले होते व तसेच विमा कंपनी गैरअर्जदार क्रमांक 4 देखील ट्रॅक्टरची सर्व सुटया भागाची गॅरंटी व वॉरंटी घेते व देते असे गैरअर्जदारांनी अर्जदारास सांगीतले होते.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर ट्रॅक्टर खरेदी करते वेळी त्याने गॅरअर्जदार 1 व 2 कडून सदर ट्रॅक्टर कशा पध्दीने वापरायचे या बद्दल माहिती अर्जदाराने घेतली होते व त्यांच्या सांगण्यानुसार ट्रॅक्टरचा उपयोग घेण्याचा प्रयत्न व नियमानुसार ट्रॅक्टरचा वापर केला.
अर्जदारारचे म्हणणे की, सदर ट्रॅक्टर खरेदी केल्यापासून त्याचे चारीही टायर निकृष्ट दर्जाचे होते व सतत पंक्चर होत असत, त्यामुळे त्याला सतत दुरुस्तीसाठी जिंतूर येथे जावे लागत असे, त्यामुळे त्याच्या शेतीच्या कामकाजावर परिणाम झाला व ज्या उद्देशाने अर्जदाराने ट्रॅक्टर खरेदी केले होते तो त्यात सफल झाला नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर खराब टायर बाबत अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडे व त्यांच्या सेल्समन लोखंडे मार्फत अनेकवेळा तक्रार केली व टायर बदलुन देण्याची विनंती केली, परंतु त्याने कुठल्याही प्रकारची दाद दिली नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यानी सदर टायरची तक्रार त्यांचे कंपनीचे वरिष्ठ सुनिल क्षीरसागर व समशेर वर्मा यांना इमेल पाठवुन करण्यास सांगीतले. त्याप्रमाणे अर्जदाराने ट्रॅक्टरची तक्रार संबंधीतांना इमेलव्दारे पाठविली, परंतु कोणीही दाद दिली नाही. अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार क्रमांक 1 याने दिनांक 20/09/2012 रोजी सदर ट्रॅक्टर बाबतचे पुस्तीका भरुन दिली व गैरअर्जदाराने दिनांक 26/09/2012 रोजी पावती दिली व तुमच्या टायरच्या अंतिम अहवाल आहे, असे सांगीतले सदरचा अहवाल खोटा आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने सदर ट्रॅक्टरच्या टायरचा 18 महिन्याची व 1500 घंटयाची वॉरंटी दिलेली होती व आज पर्यंत सदरील मुदत संपलेली नसून सदर ट्रॅक्टर आजच्या तारखेला केवळ 565 घंटे एवढेच चाललेले आहे. व गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ने सदर ट्रॅक्टरचे टायर बदलून न दिल्यामुळे त्याचे अतोनात नुकसान होत आहे, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करावा व गैरअर्जदारांना आदेश करावा की, संयुक्तिक व एकत्रितरित्या त्याने सदर ट्रॅक्टरचे चारीही टायर बदलुन देण्याचा आदेश व्हावा अथवा त्याबद्दल 45,000/- रु. देण्याचा आदेश व्हावा.व तसेच गैरअर्जदाराने अर्जदारास नुकसान भरपाई म्हणून 25,000/- मानसिक त्रासापोटी 10,000/- रु. व तक्रार अर्जाचा खर्च 5,000/- रु. देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर व नि.क्रमांक 16 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
अर्जदाराने नि.क्रमांक 4 वर 11 कागदपत्रे दाखल केले आहेत. ज्यामध्ये ट्रॅक्टर मालकीचे प्रमाणपत्र, सर्व्हीसिंग पावती, सर्व्हीसिंग पावती, सर्व्हीसिंग पावती, अर्जदाराने गैरअर्जदारास केलेल्या इमेलची प्रत, गैरअर्जदारास पाठविलेली इमेलची प्रत, आर.सी. बुकची प्रत, विम्याची पावती, गैरअर्जदाराने सदर दिलेली ट्रॅक्टरचे विमा पावती, टायरचे फोटो, गैरअर्जदाराने दिलेल्या दिनांक 26/09/2012 रोजी तपासणी अहवाल कागदपत्रे दाखल केले आहे. व तसेच अर्जदाराने नि.क्रमांक 20 वर 7 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये दिनांक 15/09/2012 ची इस्टीमेट पावती, 7/12 उतारा, मौजे जिंतूर गट क्रमांक 187/1 चा 7/12 उतारा, गट क्रमांक 187/3 चा 7/12 उतारा ट्रॅक्टरची झेरॉक्स पावती मॅन्युअल कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 8 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार खोटी व बनावटी आहे व तसेच त्यांचे म्हणणे आहे की, अर्जदाराना त्यांनी विक्री केलेला ट्रॅक्टर हे गैरअर्जदार क्रमांक 3 यानी निर्मित केलेला आहे. सदर ट्रॅक्टर अर्जदाराने खरेदी करते वेळी पुर्णपणे पाहणी करुन खरेदी केला होता व विक्री पूर्वी कंपनीव्दारे तपासणी केली होती व तसेच गैरअर्जदाराचे म्हणणे आहे की, अर्जदाराने सदर ट्रॅक्टरचा वापर नफा कमविण्यासाठी व व्यावसायिक लाभासाठी करत होते हे त्यांच्या तक्रार अर्जावरुन दिसून येते. त्यामुळे अर्जदार हा ग्राहक या संज्ञेत बसत नाही व सदरची तक्रार विद्यमान मंचात चालू शकत नाही व तसेच त्यांचे म्हणणे आहे की, अर्जदाराची तक्रार ही ट्रॅक्टरच्या मशीन बाबत नाही, त्यांची तक्रार टायर बद्दल आहे व सदरचे टायर हे CEAT कंपनीने बनवले होते व CEAT कंपनीस सदर प्रकरणात पार्टी केले नाही व ती आवश्यक आहे व त्याना समाविष्ट न केल्यामुळे सदरची तक्रार फेटाळणे योग्य आहे.
गैरअदाराचे म्हणणे की, सदर ट्रॅक्टर विक्री करताना त्याने अर्जदारास ट्रॅक्टर कसे वापरावे याबद्दल माहिती पुस्तिका दिली होती. ट्रॅक्टरची वाहन चालविण्याची पध्दत व रस्त्यावर स्थिती यावरही टायरचे भवितव्य व आयुष्यमान अवलंबुन असते व प्रस्तुत ट्रॅक्टर अर्जदाराने खराब रस्त्यावर अवलंबुन केलेला असावा त्यास आम्ही जबाबदार नाहीत व अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून सदरची तक्रार 10,000/- रु. खर्च आकारुन खारीज करावी अशी विनंती केली आहे.
लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 1 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 15 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे म्हणणे आहे की, अर्जदार हा विद्यमान मंचासमोर स्वच्छ हाताने आलेला नाही व सदरची तक्रार ही Ceat कंपनीस पार्टी न केल्यामुळे प्राथमिक मुद्दा उपस्थित करुन तक्रार खारीज करणे योग्य आहे.तसेच गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदार हा ग्राहक होवु शकत नाही. कारण अर्जदाराने सदर ट्रॅक्टर व्यावसायिक उद्देशाने खरेदी केला होता व तसेच त्यांचे म्हणणे आहे की, टायरच्या तक्रारी बाबत टायर कंपनीच जिम्मेदार आहे व अर्जदाराने Ceat टायर कंपनीस प्रस्तुत प्रकरणात पार्टी केले नाही.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने सदर ट्रॅक्टर दिनांक 03/01/2012 रोजी खरेदी केले त्यानंतर पहिली सर्व्हीसिंग 15/01/2012 , दुसरी सर्व्हिसिंग 03/03/2012 व तिसरी सर्व्हिसिंग 18/08/2012 ला करुन घेतली व तिन्ही सर्व्हिसिंग वेळा अर्जदाराने कुपनवर सह्या केल्या व त्या एकाही वेळी अर्जदाराने सदर टायर बाबत तक्रार केली नव्हती, म्हणून सदरची तक्रार खोटी आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराच्या विनंती वरुन दिनांक 26/09/2012 रोजी त्यांच्या कंपनीच्या सर्व्हीस इंजिनिअरने डिलर व अर्जदारा समक्ष पहाणी केली व अहवाल दिला की, सदरचे टायर 100 टक्के पाणी भरलेले आहे. सदर टायर मध्ये कोणताही दोष नाही व जे काही Damage आहे ते External आहे व सदर अहवालावर अर्जदाराने सही केले आहे. अर्जदाराच्या ट्रॅक्टरचे बाहेरुन नुकसान झालेले आहे, त्यास आम्ही जबाबदार नाहीत तसेच अर्जदाराने त्याच्या तक्रारी मध्ये म्हंटले आहे की, तक्रार दाखल करते वेळी त्याचे ट्रॅक्टर 565 तास काम केले या बाबत कोणताही पुरावा अर्जदाराने मंचासमोर आणला नाही, तसेच अर्जदाराने वॉरंटी बाबतचा कोणताही पुरावा मंचासमोर आणलेला नाही अर्जदाराने सदरची तक्रार खोटी दाखल केली आहे व कोणतीही सेवा त्रुटी दिली नाही, म्हणून मंचास विनंती केली की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 4 यास मंचाची नोटीस तामिल होवुनही मंचासमोर हजर नाहीत. ( नि.क्रमांक 5 वर पोच पावती ) त्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ने गैरअर्जदार क्रमांक 3 ने निर्मित
केलेले ट्रॅक्टर अर्जदारास विक्री करतांना त्याच्या ट्रॅक्टरचे चारीही
खराब टायरची विक्री करुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 गैरअर्जदार क्रमांक 4 विमा कंपनी अर्जदाराच्या नुकसानीस
जबाबदार आहेत काय ? नाही.
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा ट्रॅक्टर नं. MH-22-X988 चा मालक आहे ही बाब नि.क्रमांक 4/7 वर दाखल केलेल्या आर.सी. बुकच्या प्रत वरुन सिध्द होते. सदरचे ट्रॅक्टर अर्जदाराने गैरअर्जदाराकडून 03/01/2012 रोजी घेतले होते, हे गैरअर्जदार क्रमांक 3 ने त्यांच्या लेखी जबाबात मान्य केले आहे व नि.क्रमांक 4/1 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते. वादाचा मुद्दा हा आहे की, अर्जदाराने सदर ट्रॅक्टर खरेदी केल्यापासून त्याचे चारीही टायर खराब होते की नाही ? या बद्दल अर्जदाराने गैरअर्जदाराकडे तक्रार केल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 3 च्या सर्व्हीस इंजिनिअरने दिनांक 26/09/2012 रोजी पहाणी केले व Outdoor Inspecton Slip तयार केले व त्यात त्याने टायरच्या कंडीशन बद्दल असा रिपोर्ट दिला की, Tyer has 100 % Water Filled. Tyer has no manufacturing fault. damage due to external damage. ही बाब नि.क्रमांक 4/11 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते, परंतु सदरचा अहवाल हा पुराव्यात ग्राहय धरणे योग्य होणार नाही, कारण गैरअर्जदार क्रमांक 3 ने संबंधीत सर्व्हीस इंजिनिअरचे शपथपत्र मंचासमोर दाखल केलेले नाही. व तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 चे म्हणणे की, Ceat Tyer कंपनीला सदर प्रकरणात पार्टी केली नाही, म्हणून दावा खारीज करावा हे मंचास योग्य वाटत नाही, कारण अर्जदाराने ट्रॅक्टर खरेदी करते वेळी स्वतः गैरअर्जदारानेच त्या कंपनीचे टायर ट्रॅक्टर सोबत दिले होते. अर्जदाराने ते वेगळे खरेदी केले नव्हते. त्यास गैरअर्जदार नं. 1 ते 3 च जबाबदार आहेत. तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 ने फक्त आपला लेखी जबाब सादर केला आहे. आपले शपथपत्र दाखल केले नाही.
तसेच नि.क्रमांक 20/7 वर दाखल केलेल्या सोनालिका ट्रॅक्टरचे मॅन्युअलचे पान नं. 59 वर असलेल्या वॉरंटी अटीचे अवलोकन केले असता ट्रॅक्टर खरेदी केल्यापासून 18 महिन्याच्या आत किंवा 1500 तास चे काम जे कोणते आधी होईल तो पर्यंत वॉरंटी पीरिअड लागु राहिल, असे म्हंटले आहे. या बाबत गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 वरील नियमाचे उल्लंघन अर्जदाराने केले आहे. असे कोठेही म्हंटले नाही, व त्याबाबत गैरअर्जदारराने कोणताही पुरावा मंचासमोर आणला नाही, व तसेच अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 20/7 वरील ट्रॅक्टर मॅन्युअलचे अवलोकन केले असता अर्जदाराचे सदरच्या ट्रॅक्टरचे फक्त तिनदाच फ्री सर्व्हीसींग झालेले आहे व तिसरी सर्व्हीसींग हे 500 ते 510 तासापर्यंतच लिहलेले आहे. याचाच अर्थ सदरचे ट्रॅक्टर 1500 तासाच्या आतच वॉरंटी पिरीअड मध्ये होते, यावरुन हे सिध्द होते की, अर्जदाराचे सदरचे ट्रॅक्टरचे टायर हे वॉरंटी पिरीअड मध्ये खराब झाले होते वरील कथनावरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 ने अर्जदारास ट्रॅक्टर विक्री करते वेळी चारीही सदोष ( खराब ) टायर विक्री केली होती. गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 ने सदरचे चारीही टायर Warranty period मध्ये बदलुन देणे आवश्यक होते व केवळ Ceat कंपनीचे Tyer होते व ते त्या कंपनीकडूनच अर्जदाराने बदलुन घेणे आवश्यक आहे व त्यांना पार्टी न केल्यामुळे दावा खारीज करावे असे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही, निश्चितच गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 अर्जदारास निश्चितच सेवेत त्रुटी दिली आहे. असे मंचाचे ठाम मत आहे. म्हणून मंच मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्रमांक 2.
वरील चर्चेवरुन गैरअर्जदार क्रमांक 4 यांचा या मध्ये काहीही भुमिका नाही वा त्यास जबाबदार नाही, असे मंचाचे ठाम मत आहे.म्हणून मुद्दा क्रमांक
2 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच गैरअर्जदार क्रमांक 4 विरुध्द तक्रार खारीज करत आहे, व मचं खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 याने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या (Joint &
Severally) आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत अर्जदाराचे ट्रॅक्टर क्रमांक
MH-22-X988 चे चारीही खराब टायर बदलुन नविन सुस्थीतीत असलेले चारीही
टायर अर्जदारास द्यावेत.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.