::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 15/04/2019)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. सदर तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्त्याच्या मालकीचे एल.एम.व्ही.इनोव्हा 2.5 जी, रजिस्ट्रेशन क्र.एमएच-12, केजे 7302 हे वाहन असून सदर वाहन त्यांनी दिनांक 8/11/2008 रोजी मॅग्मा कंपनीकडून अर्थसहाय्य घेवून खरेदी केले होते व वेळोवेळी त्यांनी संपूर्ण कर्ज परतफेड केलेली आहे. सदर वाहन विरूध्द पक्ष यांचेकडे विमा पॉलिसी क्र.पिओ 117400024/4101/110006 नुसार दिनांक 6/3/2017 ते दिनांक 7.3.2018 या कालावधीकरीता विमाकृत केलेले आहे. सदर वाहन दिनाक 23/6/2017 रोजी अमरावती-नागपूर बायपास हायवे वर जातांना पलटी होवून क्षतीग्रस्त झाले. अपघातानंतर तक्रारकर्त्याने सदर वाहन नॅशनल मोटर्स, संजय गांधी मार्केट, चंद्रपूर येथे आणले व त्याच दिवशी घटनेची माहिती विरूध्द पक्षास देवून विमादावा रक्कम देण्याची मागणी केली. वि.प.च्या संबंधीत अधिका-याने ऑनलाईन क्लेमफॉर्म भरण्याची सुचना केल्यामुळे तक्रारकर्त्याने दि.6/11/2017 रोजी ऑनलाईन क्लेमफॉर्म भरून वि.प.ना सादर केला. यानंतर वि.प.ने त्यांचे सर्व्हेयर श्री.कृष्णकांत पोद्दार यांना तक्रारकर्त्याच्या वाहनाची तपासणी करून नुकसानाचे आकलन करण्याकरीता पाठविले व त्यांनी वाहन तपासणी करून रू.6,18,350/- नुकसानाची विमा रक्कम काढली. मात्र वि.प.यांनी तक्रारकर्त्यांस दिनांक 7/11/2017 रोजी पत्र पाठवून अपघाताची सुचना वि.प.ना उशिरा कां दिली याबाबत माहिती देण्यांस सांगितले व त्यानुसार तक्रारकर्त्याने वि.प.यांचे कार्यालयात जावून लेखी स्वरूपात कारणे कळविली. मात्र वि.प.यांनी 17/1/2018 रोजी तक्रारकर्त्यांस पत्र पाठवून त्याचा विमादावा नाकारण्यांत आला असल्याचे कळविले. वि.प.यांनी तक्रारकर्त्यांस विमादावा रक्कम नाकारून न्युनतापूर्ण सेवा दिली आहे. सबब तक्रारकर्त्याने मंचासमक्ष गैरअर्जदाराविरूध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विमादावा रक्कम रू.6,18,350/- विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याला द्यावी तसेच मानसीक व शारिरीक त्रास तसेच आर्थीक नुकसानापोटी नुकसान-भरपाई रू.50,000/- विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यांला द्यावी असे आदेश पारीत करण्यांत यावेत अशी विनंती केली.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारा विरुध्द नोटीस काढण्यात आले. विरूध्द पक्षाने हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले असून त्यात तक्रारकर्त्याच्या वाहनाची विमा पॉलिसी काढल्याची तसेच अपघाताची सुचना मिळाल्यानंतर दिनांक 7/11/2017 चे पत्रान्वये, अपघाताची सुचना देण्यांत झालेल्या विलंबाबात तक्रारकर्त्याला विचारणा केली होती हे मान्य केले आहे. मात्र तक्रारकर्त्याचे तक्रारीतील उर्वरीत कथन नाकबूल करून विशेष कथनात नमूद केले की तक्रारकर्त्याने वाहनाच्या अपघाताचे खोटे कथानक रचले असून अपघाताचे वेळी असलेले वाहनचालक, वाहनातील प्रवाशांची संख्या, त्यांचे नांव गांव व वाहन अपघात स्थळावरून कां हलविण्यांत आले याबाबत स्पष्टीकरण केलेले नाही. तसेच विमा पॉलिसीवर नमूद असलेल्या टोल फ्री क्रमांकावर अपघाताची सुचना अपघात झाल्याचा दिनांक 23/6/2017 पासून दिनांक 6/11/2017 पर्यंत तब्बल 134 दिवसं कां देण्यांत आली नाही याबाबत दिनांक 7/11/2017 च्या पत्रान्वये स्पष्ट विचारणा करूनही तक्रारकर्त्याने कोणतेही संयुक्तीक कारण सांगितले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्याचा विमादावा दिनांक 17/1/2018 चे पत्रान्वये, पॉलिसीच्या शर्ती व अटींची पुर्तता न केल्यामुळे खारीज करण्यांत आला व तशी सुचनादेखील तक्रारकर्त्यांस देण्यांत आली. सबब विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्यास कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नसून सदर तक्रार खोटी असल्याने ती खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
4. तक्रारर्त्याची तक्रार, दस्तावेज, शपथपत्र, तसेच लेखी युक्तीवाद आणी विरूध्द पक्षाचे लेखी म्हणणे तसेच लेखी उ्त्तरालाच पुरावा शपथपत्र समजण्यात यावे अशी नि.क्र.12 वर दाखल केलेली पुरसीस, उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1 विरूध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे
काय ? : नाही
2 तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे
काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. तक्रारकर्ता हा विरूध्द पक्षाचा ग्राहक आहे ही बाब निर्विवाद आहे. तक्रारीत दाखल नि.क्र.5 वरील दस्तावेजांचे अवलोकन केले असता निदर्शनांस येते की तक्रारकर्त्याने, विवादीत वाहनाचा दिनांक 23/6/2017 रोजी अपघात झाल्याचे नमूद केले आहे व विमादाव्याची रक्कम मिळण्याकरीता विरूध्द पक्ष यांना दिनांक 6/11/2017 रोजी म्हणजेच 134 दिवसांनंतर ऑनलाईन क्लेम फॉर्म सादर केला आहे. त्यापूर्वी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षांस वाहनाचा अपघात होवून ते क्षतीग्रस्त झाले याबाबत सुचना दिल्याचे तक्रारकर्त्याने नमूद केले असले तरीही त्यापुष्टयर्थ कोणताही दस्तावेज वा पुरावा दाखल केलेला नाही. याशिवाय वि.प.ने तक्रारकर्त्यांस दिनांक 7/11/2017 च्या पत्रान्वये, अपघाताची सुचना अपघात झाल्याचा दिनांक 23/6/2017 पासून दिनांक 6/11/2017 पर्यंत तब्बल 134 दिवसं कां देण्यांत आली नाही याबाबत स्पष्टीकरण मागितल्यानंतर तक्रारकर्त्याने विलंबाचे स्पष्टीकरण वि.प.ना दिले होते याबाबत कोणतेही दस्तावेज दाखल केलेले नाहीत. तसेच आपल्या तक्रारीतसुध्दा तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांना अपघाताची माहिती देण्यांत झालेल्या 134 दिवसांच्या विलंबाबात कोणतेही कारण नमूद केलेले नाही. विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार तशी सुचना वाहनाच्या अपघातानंतर विनाविलंब विमा कंपनीला देणे आवश्यक होते. परंतु तक्रारकर्त्याने, वि.प.ना तशी सुचना दिलेली नाही. तसेच विरूध्द पक्षाने उपरोक्त पत्रान्वये स्पष्टीकरण मागवून देखील तक्रारकर्त्याकडून योग्य प्रतिसाद व स्पष्टीकरण न मिळाल्यामुळे त्याचा विमादावा दिनांक 17/1/2018 चे पत्रान्वये, पॉलिसीच्या शर्ती व अटींची पुर्तता न केल्याचे कारणास्तव नामंजूर करून तक्रारकर्त्याप्रती कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिली नाही हे दाखल दस्तावेजांवरून सिध्द होते असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. मुद्दा क्रं. 1 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.71/2018 खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
चंद्रपूर
दिनांक – 15/04/2019
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.