(आदेश पारीत व्दारा - श्री नितीन मा. घरडे, मा.सदस्य)
(पारीत दिनांक : 19 एप्रिल 2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांचेकडून ट्रक क्रमांक MH-31 CQ 4091 हा रुपये 6,90,000/- चे कर्ज घेवून विकत घेतलेला होता. त्याप्रमाणे विरुध्दपक्ष यांचेशी करारनामा करुन दिनांक 19.6.2009 रोजी करण्यात आला. सदर करारनाम्याचे अटी व शर्तीप्रमाणे रुपये 21,290/- चे मासिक हप्ते एकूण 47 पाडण्यात आले. सदरच्या मासिक हप्त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांना लगातार 25 हप्त्याची परतफेड केली. परंतु, दिनांक 20.7.2011 पासून तक्रारकर्त्याने धंद्यात झालेल्या नुकसानीमुळे पुढील मासिक हप्ते देऊ शकला नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला मासिक हप्त्याची किस्त भरण्याबाबत नोटीस बजाविली, तरी सुध्दा तक्रारकर्ता हा मासिक किस्त भरण्यास असमर्थ होता, त्यामुळे तक्रारकर्ता याला सदरच्या ट्रकवर पुन्हा लोन घेण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता.
3. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, दिनांक 14.9.2012 रोजी तक्रारकर्त्याचे भाऊ श्री वसीम कालीदास बैस हे हल्दीराम फॅक्टरी, भंडारा रोड येथे जात असतांना साधरणतः दुपारी 12-30 वाजताचे दरम्यान विरुध्दपक्ष यांनी पाठविलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी तक्रारकर्त्याला रत्यावर थांबविले व CPWD च्या क्वॉर्टरसमोर काटोल रोड येथे विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याचे वाहन जप्त केले. तेंव्हा विरुध्दपक्ष यांनी पाठविलेले गुंड प्रवृत्तीचे लोक गाडीच्या समोर उभे राहून त्यापैकी ऐकाने तक्रारकर्त्याच्या भावाचे कॉलर पकडून त्याच्या खिशातून रुपये 10,000/- ची रक्कम सुध्दा हिस्काऊन घेतली व गाडीची जाबा घेवून ट्रक जप्त केला. यासर्व घडलेल्या घटनेबाबत तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांचेविरुद गिट्टीखदान पोलीस स्टेशन येथे जावून तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीसांनी तक्रारकर्त्याची तक्रार नोंदवून घेतली नाही. त्याशिवाय, सायंकाळी विरुध्दपक्ष यांच्या कार्यालयातून नेहा मॅडम यांनी तक्रारकर्त्याला फोन करुन त्यांना शिवीगाळ केली व तसेच तक्रारकर्त्याच्या आई-वडीलांना सुध्दा शिवीगाळी केली. पुन्हा या तक्रारीबाबत तक्रारकर्त्याने गिट्टीखदान पोलीस स्टेशन येथे जावून तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला, परंतु विरुध्दपक्षाच्या वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या लोकांनी तक्रारकर्त्याला धमकी देऊ लागले.
4. तक्रारकर्ता पुढे असे नमूद करतो की, दिनांक 11.9.2012 रोजी दुपारी 1-00 वाजताचे दरम्यान विरुध्दपक्ष यांचे कार्यालयात तक्रारकर्ता गेले असता, त्यांनी दिनांक 17.9.2012 चा वर्धमाननगर शाखेचा रुपये 24,000/- चा धनादेश क्रमांक 386649 त्याची तारीख बदलवून देण्यास सांगितले व मासिक हप्ता हे प्रत्येक महिण्याचे 20 तारखेला द्यावे असे सांगितले. विरुध्दपक्षाची प्रतिकृती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी स्पष्टपणे दिसून येते, कारण विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला कोणत्याही प्रकारचे नोटीस किंवा सुचना न देता तक्रारकर्त्याचे वाहन गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून विरुध्दपक्षाने जप्त केले. तक्रारकर्त्याने सदरचे वाहन पुन्हा फायनान्स करुन रुपये 2,07,576/- चा भरणा केला व त्यामुळे पूर्वी घेतलेल्या लोन रक्कम रुपये 6,90,000/- पैकी रुपये 2,16,000/- देवून आता फक्त रुपये 4,34,000/- राहिलेली होती असे दर्शविते. परंतु, सदरची रक्कम रुपये 4,34,000/- ही बरोबरनसून विरुध्दपक्ष जास्तीची रक्कम मागत आहे. विरुध्दपक्षाच्या वागणुकीमुळे तक्रारकर्त्याला अतिशय ञास झाला व तक्रारकर्त्याला याकरीता प्रत्येक दिवशी रुपये 3,000/- चा तोटा होऊ लागला. विरुध्दपक्षाच्या अशा वागणुकीमुळे तक्रारकर्त्याला अतिशय शारीरीक व मानसिक ञास सहन करावा लागला. करीता, तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल करुन खालील प्रमाणे प्रार्थना केली आहे.
(1) विरुध्दपक्ष यांना आदेश करावे की, त्यांनी तक्रारकर्त्याचा अवैधपणे ताब्यात घेतलेला ट्रक ताबडतोब तक्रारकर्त्याला परत करावा.
(2) तसेच, तक्रारकर्त्याला झालेल्या नुकसान भरपाईमुळे प्रतीदिवशी प्रमाणे रुपये 3,000/- दिनांक 14.9..2012 पासून आजपर्यंत देण्याचे आदेशीत व्हावे.
(3) तसेच, तक्रारकर्त्याच्या भावाकडून जबददस्तीने ट्रक जप्त करणा-या लोकांनी रुपये 10,000/- हिसकावून घेतले ते परत करावे.
(4) तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरीक व मानसिक ञासापोटी रुपये 1,50,000/- व तक्रार खर्च म्हणून रुपये 50,000/- देण्याचे आदेशीत व्हावे.
5. तक्रारकर्त्याच्या तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष यांना मंचा मार्फत नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष यांनी तक्रारीला आपले उत्तर सादर करुन नमूद केले की, तक्रारकर्ता हा न्यायालयात दाद मागण्यासाठी स्वच्छ हाताने आला नसून त्याने तक्रारीत सत्य बाब लपविलेली आहे. तसेच, विरुध्दपक्ष हे 1956 च्या इंडियन कंपनी अॅक्टच्या अधिपत्याखाली येते. सदर बाबत फायनान्स कंपनीचा ब्युझीनेस हा कलकत्ता हेड ऑफीसर येथे असून, त्याची शाखा नागपूर येथे आहे. तक्रारकर्ता यांना ट्रक घेण्याकरीता फायनान्सची गरज होती, त्याकरीता ते विरुध्दपक्षासोबत संपर्कात आले. विरुध्दपक्ष याचा फायनान्स करुन देण्याचा व्यवसाय आहे. पुढे विरुध्दपक्ष यांनी आपला आक्षेप नोंदवून सांगितले की, तक्रारकर्ता हा ग्राहक होत नाही. कारण, तक्रारकर्त्याने सदरचा ट्रक हा व्यवसाय करुन त्यापासून नफा कमविण्याचा उद्देश होता, त्याकरीता त्याने ट्रक विकत घेतला होता. त्यामुळे, तक्रारकर्त्याने आपले पालन-पोषन त्या ट्रकवर अवलंबून आहे ही बाब खोटी आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. तक्रारकर्ता यांनी ट्रक करीता कर्ज घेतेवेळी केलेला करारनाम्याप्रमाणे कराराची पुर्तता केली नाही, जसे तक्रारकर्ता यांनी मासिक किस्त ही वेळेवर भरली नाही. तक्रारकर्त्यावर मासिक किस्त न भरल्यामुळे रकमेची थकबाकी वाढलेली होती व करारनाम्याच्या अटी व शर्तीप्रमाणे विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यावर कार्यवाही केली. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी स्वतःच करारनाम्याचा भंग केलेला आहे.
6. तसेच, दिनांक 8.8.2011 च्या तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांच्या झालेल्या करारनाम्याप्रमाणे विरुध्दपक्ष यांचे मुख्य कार्यालय ‘कलकत्ता’ येथे असल्यामुळे सदरची तक्रार ही या मंचात चालविण्या योग्य नाही. तसेच, सदरची तक्रार ही या मंचाच्या अधिकारक्षेञात बसत नाही, ती कलकत्ता कोर्टात बसण्या योग्य आहे, करीता तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे. पुढे विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यावर लावलेले आरोप व प्रत्यारोप खोडून काढले व तक्रारकर्त्याची सदरची तक्रार बिनबुडाची असून ती खारीज होण्यास पाञ आहे असे नमूद केले.
7. तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारी बरोबर 1 ते 6 दस्ताऐवज दाखल करुन त्यात प्रामुख्याने वाहनाचे नोंदणीकृत प्रमाणपञ, एफ.आय.आर. ची प्रत, वाहनाचा विमा, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला थकबाकी रक्कम मागण्याकरीता पाठविलेली नोटीस, तसेच, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांना मासिक हप्त्याचा भरणा केल्याच्या पावत्या इत्यादी दस्ताऐवज दाखल केले. विरुध्दपक्ष यांनी सुध्दा सदरच्या तक्रारीतील उत्तरा बरोबर 1 ते 6 दस्ताऐवज दाखल करुन त्यात रि फायनान्स अॅग्रीमेंटची प्रत, तक्रारकर्त्यास दिलेले दिनांक 24.9.2012 चे पञ, त्याच्या पोष्टाच्या पावत्या, तसेच दिनांक 6.9.2012 चे पञ, टेलीग्राम सुचना गिट्टीखदान पोलीस स्टेशन यांना दिल्याचे दिनांक 18.9.2012 चे पञ व त्यानंतर पोलीस स्टेशन यांना वारंवार दिलेली सुचना इत्यादी दस्ताऐवज दाखल केले.
8. सदर प्रकरणात दोन्ही पक्षाने लेखी युक्तीवाद दाखल केले. तसेच, दोन्ही पक्षांचा मंचासमक्ष मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला व उभय पक्षांनी अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष यांचा ग्राहक होतो काय ? : होय
2) विरुध्दपक्ष यांचेकडून तक्रारकर्तीस अनुचित व्यापार प्रथेचा : नाही
अवलंब किंवा सेवेत ञुटी झाल्याचे दिसून येते काय ?
3) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
9. सदरची तक्रार ही तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून ट्रक विकत घेण्याकरीता आर्थिक सहाय्य/ लोन रुपये 6,90,000/- घेतले व सदरच्या लोनची परतफेड करण्याकरीता एकूण 47 मासिक किस्तीप्रमाणे रुपये 21,290/- मासिक हप्ता देण्याचे ठरले व त्याप्रमाणे करारनामा करण्यात आला. तक्रारकर्त्याने वेळोवेळी 25 मासिक किस्तीचा भरणा विरुध्दपक्षाकडे केला. परंतु, व्यवसायात तोटा आल्यामुळे पुढील मासिक किस्त तक्रारकर्ता भरु शकला नाही, त्यामुळे विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्ता यांना कोणतीही सुचना न देता गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती पाठवून तक्रारकर्त्याचा भाऊ ट्रक रस्त्यावर चालवीत असतांना सदरचा ट्रक गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी रस्त्यावर तक्रारकर्त्याचा ट्रक थांबवून त्याला मारहाण/ शिवागाळी करुन ट्रक ताब्यात घेतला व तक्रारकर्त्याच्या भावाच्या खिशातून रुपये 10,000/- हिसकावून ती रक्कम सुध्दा ताब्यात घेतली. त्याकरीता, तक्रारकर्त्याने झालेल्या घटनेची पोलीस तक्रार गिट्टीखदान पोलीस स्टेशन येथे नोंद केली, परंतु पोलीसांनी तक्रारकर्त्याच्या घटनेची एफ.आय.आर. दर्ज न करता एन.सी. कॉपी दिली. सदरची एन.सी. कॉपी तक्रारकर्त्याने सदरच्या तक्रारीत दाखल केली आहे. तसेच, तक्रारकर्ता यांनी वेळोवेळी रकमेचा भरणा केलेल्या पावत्या सुध्दा अभिलेखावर दाखल केल्या आहेत. विरुध्दपक्ष यांनी सुध्दा आपल्या उत्तरात असे नमूद केले आहे की, तक्रारकर्ता यांनी वेळोवेळी 25 मासिक हप्त्याचा भरणा केला, त्यानंतर तक्रारकर्त्याने मासिक हप्त्याची रक्कम भरण्याकरीता वेळोवेळी पञ पाठविले. परंतु, त्याबाबत तक्रारकर्ता हे कोणतेच पाऊल उचलत नाही त्यामुळे करारनाम्याचा अटी व शर्ती प्रमाणे तक्रारकर्त्याला सुचना देवून त्यांनी ट्रक जप्त केला. विरुध्दपक्ष यांनी उत्तरात दाखल केलेले दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याचा ट्रक जप्त दिनांक 14.9.2012 रोजी केला, तेंव्हा ट्रक हा नागपूर पासून 15 कि.मी. अंतरावर लावारीस अवस्थेत होता. सदरच्या घटनेबाबत विरुध्दपक्ष यांनी पोलीस स्टेशन, गिट्टीखदान यांना दुरसंचार निगम लिमिटेड यांचेकडून पाठविलेली तार व तार केल्याबाबतची पावती अभिलेखावर दाखल केली आहे. याबाबत, तक्रारकर्ता यांनी आपल्या प्रतीउत्तरात कोणताही उल्लेख केलेला नाही, तसेच तक्रारकर्ता यांनी मासिक हप्त्याचा भरणा करण्याबाबत वेळोवेळी सुचना पञे दिली, त्याबाबतच्या पोष्टाच्या पावत्या सुध्दा विरुध्दपक्ष यांनी अभिलेखावर दाखल केलेल्या आहेत. यावरुन, असे दिसून येते की, तक्रारकर्ता यांनी स्वतः ट्रकसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही, तसेच तक्रारकर्ता यांनी सुध्दा ही बाब मान्य केली आहे की, मासिक किस्तीचा भरणा तक्रारकर्ता हे व्यवसायाचे तोट्यामुळे भरु शकला नाही. अशापरिस्थितीत, करारनाम्याच्या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारकर्त्याने स्वतः करारनाम्याचा भंग केल्याचे दिसून येते. तसेच, तक्रारकर्त्याने सदरच्या वाहनाची उर्वरीत किस्त वेळेवर भरली नाही व कराराचा भंग स्वतः केला असे दिसून येते. करीता, तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पाञ आहे असे मंचाला वाटते. सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.
(3) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.