न्या य नि र्ण य
(व्दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्या)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार हे शेतकरी असून त्यांची त्यांच्या राहते गावी शेती आहे. सदर शेतामध्ये ते विविध पिके घेत असतात. त्यांना वारंवार या पिकांच्या मळणीसाठी मळणी मशिनची गरज पडत असे व त्यासाठी ते मळणी मशीन भाडयाने घेत असत. जानेवारी 2017 मध्ये गडहिंग्लज येथे भरलेल्या कृषी संजीवनी प्रदर्शनामध्ये तक्रारदार यांनी सर्वप्रथम वि.प. यांचे ट्रॅक्टरला जोडून वापरायचे मळणी मशीन पाहिले. एकत्र कुटुंबाच्या जमीनीतील पिकांची मळणी करण्याचे उद्देशाने तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून दि. 8/1/2017 रोजी 40 हॉर्सपॉवरचे ट्रॅक्टरला जोडून वापरायचे सोयाबीन मळणी मशीनचे कोटेशन घेतले. सदर मशिन विक्री करतेवेळी वि.प. यांनी एक वर्षासाठी विक्री पश्चात सेवा देण्याचे वचन दिले होते. त्यानंतर तक्रारदार यांचे मागणीनुसार वि.प. यांनी सदर मशिनचे प्रात्यक्षिक तक्रारदारास दाखविले. तक्रारदार यांनी सदर प्रात्यक्षिक दाखविलेले मशीन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु वि.प. यांनी त्यांना दुसरे मशिन बनवून देवू असे सांगितले. तदनंतर तक्रारदारांनी बँकेकडून कर्ज घेवून दि. 23/8/2017 रोजी रु.1,50,000/- इतकी रक्कम तक्रारदाराचे करंट खात्यामध्ये जमा केली. त्यानंतर प्रत्यक्ष मशीनचा ताबा तक्रारदार यांना दि. 26/9/2017 रोजी मिळाला. परंतु सदर मशिन दाने व कचरा वेगवेगळा न करता दाण्याबरोबर मोठया प्रमाणात कचरा टाकत होते तर ब-याच वेळा शेंगा आजिबात न सोलता अख्ख्या स्वरुपातच शेंगा मशीनमधून बाहेर टाकत होते. तक्रारदार यांनी सदरची बाब वि.प. यांच्या निदर्शनास आणून दिली असता वि.प. यांनी जुजबी दुरुस्ती करण्याचे नाटक केले परंतु नंतर देखील सदरचे मशिनने एकदाही व्यवस्थित काम केले नाही. वारंवार पाठपुरावा केलेनंतर वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरचे मशिन वि.प. यांचे उत्तूर येथील वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी सोडून जाण्यास सांगितले. तदनंतर वि.प. यांनी दोन वेळी मशिन दुरुस्त केलेबाबत तक्रारदारांना कळविले. परंतु मशीन पूर्वीप्रमाणेच नीट काम करत नसल्याने तक्रारदारांनी मशिन परत नेण्यास नकार दिला. त्यानंतर वि.प. यांनी तक्रारदारांना सदरचे मशिन विकण्याचा सल्ला दिला व त्यासाठी ग्राहक मिळवून देण्याचे आश्वासन दिले. परंतु तक्रारदार यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. अशा प्रकारे सन 2017 व 2018 चे दोन्ही हंगामामध्ये तक्रारदार मशिन वापरु शकले नाहीत व त्यांना श्री सुनिल मुत्राळे यांचेकडून मशिन भाडयाने आणून मळणी करुन घ्यावी लागली. अशा प्रकारे वि.प. यांनी दिलेल्या सेवात्रुटीमुळे तक्रारदाराचे प्रचंड नुकसान झाले आहे. सबब, तक्रारदारास भाडयाने मळणी मशिनी आणल्याने त्यापोटी रु.1,63,250/-, मशिनचे कर्जापोटी भरलेली रक्कम रु. 1,88,288/-, वि.प. यांचेकडे येण्याजाण्यासाठी झालेल्या खर्चापोटी रु. 6,400/-, प्रवास खर्चापोटी रु. 12,600/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,00,000/-, नोटीस व वकील खर्चापोटी रु. 45,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
2. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत तक्रारदारांनी वि.प. यांचे खात्यात रक्कम जमा केल्याची पावती, बँकेचे सर्टिफिकेट, वि.प. यांचा इनव्हॉईस, मशीनचे फोटो, तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीसची पोचपावती, वि.प. यांचे नोटीस उत्तर, तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेली दुसरी नोटीस, सदर नोटीसची पोचपावती, तक्रारदार यांनी कर्ज फेडलेचा दाखला, तक्रारदार यांनी भाडयाचे मळणी मशीन वापरल्याबाबतचा दाखला व बिल, तक्रारदार यांनी भाडयाची गाडी वापरल्याची बिले, तक्रारदाराचे जमीनीचे सातबारा उतारे, तक्रारदार यांनी दुसरे मशीन खरेदी केल्याचे बिल, व्हिडीओ रेकॉर्डींग करणा-याचे प्रतिज्ञापत्र व सर्टिफिकेट, व्हिडीओ रेकॉर्डींगची सी.डी., वि.प.यांचे मिळकतीचा उतारा, तक्रारदारांचे आधार कार्ड, रेशनकार्ड,
इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
3. प्रस्तुत कामी वि.प. यांना नोटीस लागू झालेचा ट्रॅक रिपोर्ट तक्रारदाराने दाखल केला आहे. वि.प. ला नोटीस लागू होवूनही ते याकामी गैरहजर आहेत. सबब, वि.प. विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करणेत आला.
4. तक्रारदारांचा तक्रारअर्ज, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र यांचा विचार करता निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हे वि.प.यांचे ग्राहक आहेत का ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे नुकसान भरपाईची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
5 | अंतिम आदेश काय ? | अंशतः मंजूर. |
कारणमिमांसा –
मुद्दा क्र. 1 –
5. तक्रारदार आणि त्यांचे भावाचे एकत्र कुटुंब असून ते सर्व त्यांची वडिलोपार्जित जमीन एकत्र कुटुंबात कसून रोजी व्यवसाय करतात. वि.प. यांचा मगदूम इंजिनियर्स या नावाने काजू प्रक्रिया मशीन्स, कडबाकुट्टी मशिन्स, सोयाबीन, शेंगदाणा अशा विविध प्रकारच्या पिकांच्या मळणीसाठी लागणा-या स्पेशल पर्पज मळणी मशीन बनविण्याचा विक्रीचा व दुरुस्तीचा व्यवसाय आहे. तक्रारदार हे शेतकरी असून त्यांची एकत्र कुटुंबाची शेती आहे. तक्रारदार हे शेतामध्ये भात, ज्वारी, सोयाबीन अशी व इतर विविध पिके घेत असतात. त्यांना वारंवार पिकाच्या मळणीसाठी मळणी मशीनची गरज पडत होती. जानेवारी 2017 मध्ये गडहिंग्लज येथे भरलेल्या कृषी संजीवनी प्रदर्शनामध्ये तक्रारदार यांनी सर्वप्रथम वि.प. यांचे ट्रॅक्टरला जोडून वापरायचे मळणी मशीन पाहिले. ता. 8/1/2017 रोजी वि.प. यांचेकडून 40 हॉर्सपॉवरचे ट्रॅक्टरला जोडून वापरायचे सोयाबीन मळणी मशीनचे कोटेशन घेतले. तक्रारदार यांनी बँकेकडून कर्ज काढून ता. 23/8/17 रोजी रक्कम रु.1,50,000/- इतकी रक्कम बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा नूल मार्फत वि.प. यांचे बँक ऑफ बरोडा, शाखा गडहिंग्लज, येथील करंट अकाऊंट नं.35760200000270 मध्ये जमा करुन वि.प. यांना अदा केली. त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी कर्जे काढलेचा पुरावा तसेच वि.प. यांचे खात्यात ता. 23/8/18 रोजी रक्कम रु.1,50,000/- जमा झालेचे कागदपत्रे तसेच वि.प. यांचा त्यांना सदरचे पेमेंट मिळालेचा ता. 26/9/17 रोजीचा इन्व्हॉईस तक्रारीसोबत दाखल केलेला आहे. सदरची कागदपत्रे वि.प. यांनी नाकारलेली नाहीत. सबब, वि.प. यांनी सदरचे मशिनचा संपूर्ण मोबदला (consideration) तक्रारदार यांचेकडून स्वीकारले असलेने तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2
6. उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारादार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार यांनी योग्य व पूर्ण किंमत मोजून वि.प. यांचेकडून मशीन विकत घेतले होते. सदरचे मशिन विकत घेतल्यावर दोन दिवसांनी तक्रारदार यांनी मळणी मशीन वापरण्यास सुरुवात केली. परंतु त्यावेळी प्रात्यक्षिक प्रमाणे मळणी न होता म्हणजे फोलपट, काडया व अन्य कचरा सोयाबीन दाण्यापासून पूर्णपणे वेगळा होवून एका बाजूने केवळ दाणे तर दुसरीकडे कचरा असे वेगवेगळ पडणे मशिनकडून अपेक्षित असताना सदरचे मशिन कचरा वेगवेगळा न करता दाण्याबरोबर मोठया प्रमाणात कचरा टाकत होते, तर ब-याच वेळा शेंगा अजिबात न सोलता अख्ख्या स्वरुपात शेंगा मशिनमधून बाहेर टाकत होते. ता. 1/10/2017 रोजी म्हणजे मशिन विकत घेतल्यापासून एक आठवडयाच्या आतच मशीन नेहमी खराब असल्याने स्वखर्चाने तक्रारदार यांनी सदरचे मशीन वि.प. यांचे उत्तूर येथील वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी सोडले. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना सदोष मशिन विक्री करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्याचे अनुषंगाने तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन करता,
7. अखेरीस वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरचे मशीन वि.प. च्या उत्तूर येथील वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी सोडून जाणेस सांगितले व एक आठवडयात मशीन पूर्ण दुरुस्त करुन देण्याचे वचन दिले. त्यानुसार दि. 01/10/2017 रोजी म्हणजे मशीन विकत घेतल्यापासून एक आठवडयाच्या आत मशीन नेहमी खराब असल्याने स्वखर्चाने तक्रारदार यांनी सदरचे मळणी मशीन वि.प. यांच्या उत्तूर येथील वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी नेवून सोडले. अशा प्रकारे सर्वप्रथम वि.प. यांनी त्यांच्या मशीन असले जागेवर मोफत दुरुस्ती करुन देणेच्या वचनाचा सर्वप्रथम कायदेशीररित्या भंग केला.
8. यानंतर काही दिवसांनी “मशीन दुरुस्त झाले आहे. तक्रारदार यांनी मशीन घेवून जावे” असे वि.प. सांगितले असता तक्रारदार यांनी उत्तूर येथे जाग्यावर येवून प्रत्यक्ष पाहणी केली व मळणीची जाग्यावरच ट्रायल घेतली असता मशीन पूर्वीप्रमाणे दोषपूर्वकच चालत असल्याचे आणि मशीन मळणी नीट करत नसून सोयाबीन दाण्यासोबत प्रचंड प्रमाणात फोलपटे, काडया असा कचरा तर ब-याच प्रमाणात अख्ख्या शेंगा येत असल्याचे दिसून आले. त्यावेळी तक्रारदार यांनी मशिनच्या कामगिरी बाबत अजूनही असमाधानी असल्याचे स्पष्ट सांगितले. त्यावर वि.प. यांनी मशीन दुरुस्तीसाठी परत काही कालावधी मागून घेतला व पुढच्या खेपेस मशीन पूर्णपणे दुरुस्त करुन देणेचे मान्य केले.
9. दुस-यावेळी देखील मशीन दुरुस्त झाले आहे. तक्रारदार यांनी मशीन घेवून जावे, असे वि.प यांनी सांगितले असता तक्रारदार यांनी उत्तूर येथे जाग्यावर येवून प्रत्यक्ष पाहणी कली व मळणीची जाग्यावरच ट्रायल घेतली असता मशीन पूर्वप्रमाणे दोषपूर्वकच चालत असल्याचे आणि मशीन मळणी नीट करत नसून सोयाबीन दाण्यासोबत प्रचंड फोलपाटे, काडया असा कचरा तर ब-याच प्रमाणत अख्ख्या शेंगा येत असल्याचे दिसून आले आणि तसे तक्रारदार यांनी वि.प. यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी तक्रारदार यांनी वि.प. यांच्या असमाधानकारक कामावर आक्षेप घेतला असता वि.प. सांगू लागले की, “मशीन जास्तीत जास्त इतकेच चांगले काम करु शकते, तेव्हा त्यांनी तक्राररदार यांनी सदरचे मशीन आहे त्या परिस्थितीत परत घेवू जावे” यावर खराब मशीन नेणेस तक्रारदार यांनी नकार दिला आणि वि.प. शी मतभेद होवून तक्रारदार यांनी वि.प. यांना मशीनचे घेतलेले पैसे परत करा किंवा मशीन पूर्ण दुरुस्त करा नाहीतर, तक्रारदार हे वि.प. वर कायदेशीर कारवाई करतील असा तोंडी इशारा दिला असता त्यावेळी देखील वि.प. यांनी तक्रारदार यांना “सदर मशीन नीट दुरुस्त होईल असे वाटत नाही, हे मशीन दुरुस्त करण्याऐवजी विकून टाका, मी तुम्हाला एक लाख रुपये देणारे गि-हाईक मिळवून देतो” असा विचित्र सल्ला दिला. तथापि तक्रारदार यांनी सदरचे मशिन विकण्यास स्पष्ट नकार दिला व एकत्र मशीनची पूर्ण किंमत तसेच मशीनसाठी काढलेल्या कर्जावरील व्याज वि.प यांनी द्यावे किंवा मशीन साठी काढलेल्या कर्जावरील व्याज वि.प यांनी द्यावे किंवा मशीन पूर्णतः दुरुस्त करुन द्यावे अन्यथा कायदेशीर परिणाम भोगावे लागतील असे निक्षून सांगितले असता वि.प यांनी पुनः काही कालावधी दुरुस्तीसाठी मागून घेतला व मशीन पूर्णपणे दुरुस्त करणेचे वचन दिले. याप्रमाणे नंतर तक्रारदारांनी वि.प. कडे प्रत्यक्ष येवून दोन तीन वेळा विचारणा केली असता वि.प. हे मशीन दुरुस्त न करताच खोटेपणाने “मशीन दुरुस्त झाले आहे, घेवून जा” असे सांगत आले आहेत. पण दरवेळी तक्रारदार यांनी प्रत्यक्ष जागेला मशीनची ट्रायल घेतली असता मशीनने कधीही समाधानकारक काम केलेले नाही व त्यामुळे तक्रारदार यांना मशीन त्यांचे हेतूनुसार वापरासाठी नेता आलेले नाही. अशा प्रकारे वि.प. यांनी सदोष वस्तूंची विक्री केली व सेवा देणेत देखील गंभीर त्रुटी ठेवल्या.
असे पुराव्याचे शपथपत्रात कथन केले आहे. सदरचे पुराव्याचे शपथपत्रातील कथने वि.प. यांनी नाकारलेली नाहीत. सदरचे घटनांनी व्यथित झालेमुळे तक्रारदार यांनी वि.प. यांना ता. 15/12/17 रोजी अॅड ए.एम. बामणे यांचेमार्फत नोटीस पाठविली. वि.प. यांनी दि. 15/2/18 रोजीचे नोटीसीने उत्तर दिले व स्वतःची जबाबदारी नाकारलेली आहे. सदरचे नोटीसा तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केल्या आहेत. ता. 27/9/18 रोजी पुन्हा एकदा मशीन दुरुस्त झाले आहे, घेवून जावे, असे वि.प. यांनी सांगितले असता तक्रारदार यांनी मशिनचे कामगिरीबाबत असमाधानी असलेचे स्पष्ट सांगितले.
“नवीन मशिन्समध्ये असे होतच राहते, यापुढे मशीनची दुरुस्ती होवू शकत नाही, पाहिजे असल्यास आहे असे घेवूनजा नाहीतर ठेवून जा, आम्ही या पुढे मशीन दुरुस्त करु शकत नाही” अशी उत्तरे दिली. तसेच “आम्ही काजू बी फोडण्याचे मशीन बनवले तेव्हा देखील असेच झाले, सुरुवातीच्या मशीन कडून काजू बी व्यवस्थित फुटत नसत, मग आम्ही अनुभवातून हळूहळू शिकलो, परंतु सोयाबीन मशीन आम्ही आता पहिल्यांदा बनवले असल्याने आम्हाला हे मशीन योग्य रित्या कसे बनवायचे हे माहित नव्हते आणि तुम्ही पहिले दुस-या नंबरचे गि-हाईक असल्याने तुम्हाला त्रासझाला. तुम्ही 4/5 मशीनची विक्री झाल्यावर आला असता तर तुम्हाला असा त्रास झाला नसता” अशा प्रकारची उत्तरे दिली. मशीन दुरुस्त करण्यापेक्षा एक लाखाला विकता आले असते या सल्ल्याचा वि.प.यांनी पुनरुच्चार केला. वि.प. सौ मगदूम वरीलप्रमाणे बोलत असल्याचे व्हिडीओ रेकॉर्डींग पुरावा म्हणून तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेला आहे. सदर रेकॉर्डींगची सी.डी.हजर केलेली आहे. सदरचे व्हिडीओ रेकॉर्डींग तक्रारदार यांचे सांगणेवरुन तक्रारदार यांचा मुलगा सागर मारुती मास्तोळी याने केलेचे तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्रामध्ये कथन केले आहे. त्याअनुषंगाने व्हिडीओ रेकॉर्डींग करणा-याचे पुराव्याचे शपथपत्र तक्रारीसोबत दाखल केलेले आहे. व्हिडीओ रेकॉर्ड करणा-याचे सर्टिफिकेट दाखल केले आहे. श्री विक्रांत यादव यांचे भारतीय पुरावा कायद्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक पुरावा सादर करण्यासंदर्भातील तांत्रिक अचूकतेबाबत सर्टिफिकेट दाखल केलेले आहे. त्याचे अवलोकन करता त्यावर सदर विक्रांत यादव यांची सही व शिक्का आहे. तक्रारदार यांनी दि. 5/2/2020 रोजी तक्रारदारतर्फे मशिनची तपासणी केलेचे मेकॅनिकल इंजिनिअर बाजीराव खेडकर यांचे पुरावा शपथपत्र दाखल केले आहे. सदरचे पुराव्याचे शपथपत्राचे अवलोकन करता “मी व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर असून माझे शिक्षण बी.ई. मेकॅनिकल झाले आहे. गेली 18 वर्षे सदर क्षेत्राचा अनुभव आहे. “मी माझ्यासमोर त्यांना मशीनमध्ये सोयाबीन घालावयास सांगितले आणि मशीन चालवून पाहिले असता त्यामध्ये खरोखरच तक्रारदार यांनी सांगितल्याप्रमाणे दोष होता. त्याचवेळी तक्रारदार यांनी मार्केट मध्ये प्रसिध्द असलेले प्रकाश कंपनीचे मशीन देखील भाडयाने आणले होते. त्यावर देखील सोयाबीनची चाचणी घेतली असता प्रकाशचे मशीन अत्यंत उच्च दर्जाची मळणी करत असून त्यामध्ये मळलेल्या धान्याबरोबर अजिबात कचरा बाहेर येत नसल्याचे आढळून आले. त्याअनुषंगाने मी मगदूम यांनी बनवलेल्या मशीनची तपासणी केली असता त्यांच्या मशिनच्या मेकॅनिकल अलायनमेंट सुधारणा हवे असल्याचे मला दिसून आले जेणेकरुन मळलेल्या धान्यात मिसळला जाणारा कचरा योग्य त्या चेंबरमधून बाहेर टाकला जाईल. तथापि त्यावेळी मशीन हे वॉरंटी पिरेडमध्ये असल्याने मी सदर मशीनवर कसल्याही प्रकारचे किरकोळ किंवा मोठी दुरुस्ती अजिबात केलेली नाही व तक्रारदार यांना मशीन मूळ उत्पादकाकडून दुरुस्त करुन घेणेचा सल्ला दिला. तरी मला दाखवण्यात आलेले मशीन हे त्रुटी युक्त आणि सदोषपणे काम करीत होते तसेच इतर प्रसिध्द मशीन सोबत एकाच वेळी, एकाच धान्यावर ट्रायल घेवून तुलनात्मक दृष्टया पाहिले असता देखील, सदरचे मशीन असमाधानकारकरित्या काम करीत असल्याचे मी स्वतः पाहिले आहे आणि सदर मशीन समाधानकारकरित्या काम करण्यासाठी यामध्ये दुरुस्तीची गरज आहे असे माझे माझ्या व्यावसायिक ज्ञान व अनुभव यांचेनुसार मत आहे.” सदरचे पुराव्याचे शपथपत्रातील कथने वि.प. यांनी नाकारलेली नाहीत.
7. सबब, वरील सर्व कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन करता, वि.प. हे आजतागायत दरवेळी तक्रारदार यांना केवळ आश्वासन देवून मुदत मागून घेत आले आहेत. दाखल कागदपत्रांवरुन सदरचे मशिन सदोष आहे हे सिध्द होते. वि.प. यांनी मंचात हजर होवून तक्रारदारांची कथने पुराव्यानिशी नाकारलेली नाहीत. सदरचे सदोष मशिन पूर्णपणे दुरुस्त करुन देणे हे वि.प. यांचेवर बंधनकारक होते. कोणत्याही उत्पादनाची विक्री करीत असताना विक्रीपश्चात असणारी सेवा देणेची जबाबदारी प्रिव्हीटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट (Privity of contract) या तत्वानुसार उत्पादित कंपनी व त्यांचे विक्रेत्याची असते. सदरची जबाबदारी केवळ उत्पादन विक्री करणेपुरती मर्यादीत नसून विक्रीपश्चात सेवा देण्याची असते. तथापि खरेदी केल्यापासून एका आठवडयाच्या आत सदरचे सदोष मशिन वि.प. यांचेकडे परत दिलेले असून आजतागायत एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी सदरचे मशिन वि.प. यांचे ताब्यात आहे. भाडयाने मशिन आणणेचा वाढीव खर्च यामुळे कंटाळून तक्रारदार यांनी अखेरीस जानेवारी 2019 मध्ये प्रकाश कंपनीचे मळणी मशिन रक्कम रु.1,76,000/- या रकमेस खरेदी केले. सदरचे मशिन खरेदी पावती तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेली आहे. सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांना दुस-या कंपनीचे मशिनचे प्रात्यक्षिक दाखवून प्रत्यक्ष विक्री वेळी निकृष्ट प्रतीचे मशीन तक्रारदार यांना देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र. 3
8. उपरोक्त मुद्दा क्र.2 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी कर्जफेडीपोटी रक्कम रु.1,88,288/- इतके रकमेची मागणी मंचात केली आहे. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी कर्ज फेडलेचा पुरावा दाखल केला आहे. त्या कारणाने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून सदरचे मशिनचे खरेदीपोटी बँकेकडून घेतलेल्या व्याजासह कर्जाची रक्कम रु. 1,88,288/- मिळणेस पात्र आहेत.
9. प्रस्तुतकामी तक्रारदार यांनी सन 2017 आणि 2018 सालचे सोयाबीन दोन्ही मळणी हंगामामध्ये सदर सदोष मशिनमुळे सदरचे मशिन वापरु शकले नाहीत. त्यावेळी श्री सुनिल महादेव मास्तोळी रा. कसबा नूल ता. गडहिंग्लज यांचेकडून मळणी मशीन भाडयाने आणून त्यांना स्वतःचे पिकाची मळणी करुन घ्यावी लागली व त्याचे भाडेपोटी 2017 साली रक्कम रु. 80,750/- व 2018 साली रक्कम रु. 82,500/- अदा करावे लागले. सदर मुद्याचे अनुषंगाने तक्रारदाराने तक्रारीसोबत ता. 2/1/19 रोजीचे सुनिल मास्तोळी यांचे प्रमाणपत्र दाखल केले आहे. सदरचे प्रमाणपत्राचे अवलोकन करता सन 2017 व सन 2018 मध्ये मारुती मास्तोळी यांचेकडून मला ट्रॅक्टर मळणी मशीन भाडे रक्कम रु.1,63,250/- रोख मिळालेचे नमूद असून त्यावर सुनिल महादेव मुस्ताळे यांची सही आहे. सदरचे प्रमाणपत्र वि.प. यांनी नाकारलेले नाही. सबब, तक्रारदार हे वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने सदर मशिन वापरु न शकलेने झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम रु.1,63,250/- मिळणेस पात्र आहेत.
10. तक्रारदार यांना उतारवयात विनाकारण सतत नूल ते उत्तूर असे एकमार्गी 40 किलोमीटर व येवून जावून 80 किलोमीटर चकरा माराव्या लागल्या. सदरचे प्रवास खर्चापोटी प्रत्येक खेपेस रु. 800/- प्रमाणे रु.6,400/- इतका खर्च आला असून सदरचे खर्चाची पावत्या तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या आहेत. सदरचे पावत्या वि.प. यांनी नाकारलेल्या नाहीत. सबब, सदरचे खर्चाची एकूण रक्कम रु. 6,400/- तक्रारदार मिळणेस पात्र आहेत.
11. तक्रारदार यांना नूल ते कोल्हापूर असे एकमार्गी 75 किलोमीटर व येवून-जावून 150 किलोमीटर नाहक प्रवास करावा लागला आहे. सदरचे प्रवास खर्चापोटी प्रत्येक खेपेस रु.1,800/- याप्रमाणे एकूण रक्कम रु. 12,600/- इतके खर्चाची मागणी मंचात केलेली आहे. त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी पावत्या दाखल केल्या आहेत. सदरचे खर्चाचे पावत्या वि.प. यांनी नाकारलेल्या नाहीत. सबब, तक्रारदार हे रु. 12,600/- मिळणेस पात्र आहेत. सबब, वरील सर्व कागदपत्रांचा बारकाईने विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना सदोष मशीन पुरविलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून सदरचे मशिनची खरेदीच्या रकमेसह नुकसान भरपाई रक्कम रु.3,70,538/- मिळणेस पात्र आहेत तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 3/4/2019 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत. सदरची रक्कम मिळालेनंतर तक्रारदाराचा सदर मशिनवरील हक्क संपुष्टात येतो. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर हे मंच होकारार्थी दिले आहे.
मुद्दा क्र.4
12. वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार यांना सदरची तक्रार मंचात दाखल करणे भाग पडले. तसेच तक्रारदार हे वयोमानानुसार शारिरिक व्याधीने त्रस्त असल्याने त्यांना प्रचंड मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागला. तसेच सदरचा तक्रारअर्ज दाखल करणेसाठी खर्च करावा लागला. त्या कारणाने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून वृध्दापकाळात झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.10,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.4 उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.5 - सबब आदेश.
- आ दे श - - तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
- वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरचे मशिनचे नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 3,70,538/- अदा करावी. सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 03/04/19 पासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
- तक्रारदार यांनी वादातील मशीन वि.प. यांना परत अदा करावे.
- वि.प. यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.10,000/- अदा करावी.
- वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
- विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
- आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.
|