(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार मा.सदस्या)
(पारीत दिनांक – 31 जानेवारी, 2019)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्षा विरुध्द दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून ती सुशिक्षित आहे आणि मोहाडी येथील महाविद्यालयामध्ये तासिका वेळेनुसार पदवीधर वर्गाला शिकविण्याचे काम करते. तक्रारकर्ती उच्च शिक्षित असुन कायम स्वरुपाची नोकरी करण्याकरीता तिला पी.एच.डी. करणे गरजेचे होते, म्हणून तिने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर तर्फे पी.एच.डी. करीता माहे सप्टेंबर 2016 ला घेण्यात येणा-या पुर्व परिक्षा चाळणी (पी.ई.टी.) करीता ऑनलाईन अर्ज दिनांक 10/08/2016 पर्यंत भरावयाचा होता तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत व त्या संबंधीत कागदपत्रे कार्यालयीन वेळेत रजिस्टर पोस्टाने/ कुरिअरने किंवा स्वतः व्यक्तीशः दिनांक 16/08/2016 पर्यंत नागपूरविद्यापीठ नागपूर येथे पाठवावयाचा होता.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिने पुर्व परिक्षेचा (पी.ई.टी.) अर्ज दिनांक 08/08/2016 रोजी ऑनलाईन भरला व त्या अर्जाची प्रत व आवश्यक असणारे कागदपत्रे लिफाफ्यामध्ये बंद करुन दिनांक 11/08/2016 रोजी विरुध्द पक्षाच्या कार्यालयात कुरिअरने नागपूर विद्यापीठ नागपूर येथे पाठविण्याकरीता दिला. तक्रारकर्तीने सदर लिफाफा कधी पोहचणार अशी चौकशी केली असता विरुध्द पक्षाने सदर लिफाफा हा आजच्या आज किंवा उद्या दिनांक 12/08/2016 रोजी नागपूर विद्यापीठ नागपूर येथे पोहचेल असे सांगितले, तसेच जर आपणाला अति तात्काळ पाठवावयाचे असेल तर त्याला रुपये 50/- अति तात्काळ शुल्क लागतील असे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाला पावती क्रमांक 6673 नुसार रुपये 50/- दिले व विनंती केली की, सदर लिफाफा दिनांक 16/08/2016 च्या आत पोहचायला पाहिजे, तसे आश्वासन विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दिले होते. तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाकडे दिलेला लिफाफा दिनांक 16/08/2016 पर्यंत पोहचलाच नाही तर तो लिफाफा मुदतीनंतर गंतव्य ठिकाणी पोहचल्यामुळे सदर लिफाफ्यावर “डेट इज ओव्हर” असा शेरा मारुन सदर कुरिअर परत आले. विरुध्द पक्षाने सदर परत आलेला लिफाफा तक्रारकर्तीच्या भावाकडे दिनांक 24/08/2016 रोजी परत आणुन दिला. तक्रारकर्तीने पुर्व परिक्षा चाळणी (पी.ई.टी.) या परिक्षेकरीता रिसर्च मेथडॉलॉजी हा कोर्स पुर्ण करण्याकरीता रुपये 30,000/- खर्च करुन पुर्ण केला. विरुध्द पक्षाच्या निष्काळजीपणामुळे व निकृष्ट सेवेमुळे तक्रारकर्तीच्या पुर्व परिक्षा चाळणी (पी.ई.टी.) या परिक्षेचा अर्ज मुदतीमध्ये नागपूर विद्यापीठ नागपूर येथे पोहचू शकला नाही. त्यामुळे तक्रारकर्तीला सदर परिक्षेपासून वंचित राहावे लागले. तक्रारकर्तीला नोकरी पासून मिळणा-या फायद्यापासून दुर राहावे लागले व त्यामुळे तक्रारकर्तीचे आर्थिक, मानसिक, सामाजिक व शैक्षणिक नुकसान झाले. तक्रारकर्तीने सदर पुर्व परिक्षा चाळणी (पी.ई.टी.) ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता रुपये 600/- शुल्क जमा केले होते. तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाच्या कार्यालयात जावून चौकशी केली असता विरुध्द पक्ष व त्यांच्या दुकानातील व्यक्ती ने तक्रारकर्तीसोबत उध्दटपणे बोलून तिचा अपमान केला, त्यावेळेस तक्रारकर्तीने पोलीस स्टेशन, तुमसर येथे विरुध्द पक्ष यांचेविरुध्द तक्रार सुध्दा केली होती. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचा लिफाफा वेळेवर न पोहोचविल्यामुळे तक्रारकर्तीचे आर्थिक, मानसिक, शारीरीक व भरुन न निघणारे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. जरी सदर नुकसान पैशांनी मोजता येत नसले तरी सदर नुकसानीपोटी रुपये 1,50,000/- विरुध्द पक्ष देण्यास जबाबदार आहे. तक्रारकर्तीने आपल्या वकीलामार्फत दिनांक 16/09/2016 रोजी विरुध्द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविला. सदर नोटीस विरुध्द पक्ष यांना मिळूनही त्यांनी उत्तर दिले नाही. म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल करुन विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दिलेल्या निकृष्ट ग्राहक सेवेबाबत व शैक्षणिक नुकसान भरपाईबाबत रुपये 1,50,000/- तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह देण्याचे आदेशित करावे व तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रासापोटी रुपये 50,000/- तसेच तक्रार खर्च रुपये-10,000/- विरुध्द पक्षाकडून मिळण्याची विनंती केली आहे.
03. विरुध्दपक्षा तर्फे मंचासमक्ष पृष्ठ क्रं. 34 ते 37 वर दाखल करुन तक्रारकर्तीच्या तक्रारीस सक्त विरोध केला आहे. विरुध्द पक्षाने त्यांच्या लेखी उत्तरात असा प्राथमीक आक्षेप घेतला आहे की, मधुर कुरिअर सर्व्हिस ही विरुध्द पक्षाच्या स्वतःच्या मालकीची नाही. विरुध्द पक्ष हे फक्त मधुर कुरिअर सर्व्हिसचे तुमसर येथील शाखेचे व्यवस्थापक आहेत. आणि तक्रारकर्तीने मुख्य व्यवस्थापक तसेच संचालक मंडळाला तक्रारीमध्ये आवश्यक पक्ष म्हणून जोडलेले नसल्यामुळे सदर तक्रार न्यायाच्याहेतुने प्राथमिक अवस्थेतच खारीज करावी अशी विनंती केली आहे.
विरुध्द पक्षाने त्याला तक्रारकर्तीने दिनांक 11/08/2016 रोजी सायंकाळ च्या वेळेस नागपूर विद्यापीठ नागपूर या नावाने लिफाफा दिला होता व त्याकरीता साधारण शुल्क रुपये 50/- घेऊन पावती दिली होती ही बाब मान्य केली असून तक्रारीतील उर्वरीत कथन अमान्य केलेले आहे. विरुध्द पक्षाने असेही नमुद केले आहे की, तक्रारकर्तीने दिलेला लिफाफा नागपूर येथील मधुर कुरिअर सर्व्हिसच्या शाखेकडून “Date is over” असा शेरा लिफाफ्यावर टाकून पाठविण्यात आला व दिनांक 19/08/2016 रोजी तक्रारकर्तीच्या घरी विरुध्द पक्षाचा प्रतिनिधी गेला असता घराचे दार बंद असल्यामुळे सदर प्रतिनिधी परत आला व त्या लिफाफ्यावर दरवाजा बंद था असा शेरा लावून विरुध्द पक्षाकडे परत दिला. त्यानंतर दिनांक 24/08/2016 रोजी तक्रारकर्तीला सदर लिफाफा परत देण्यात आला.
विरुध्द पक्षाने विशेष कथनात असे नमुद केले की, विरुध्द पक्ष हा मागील 20 वर्षापासून तुमसर शाखेचे व्यवस्थापक आहे व अविरतपणे शाखा सुरु आहे. तक्रारकर्तीने सदर लिफाफा नागपूर विद्यापीठ येथे पाठवायचे आहे एवढेच सांगितले होते. विरुध्द पक्षाने दुकानामध्ये मधुर कुरिअर सर्व्हिस यांनी ठरवून दिलेल्या अटी, शर्ती व नियमांचा फलक लावलेला होता व त्या अटी, शर्ती व नियमांची तक्रारकर्तीला पुर्णतः जाणीव असतांनाही तिने सदर लिफाफा विरुध्द पक्षाकडे पोहचविण्याकरीता दिला. दिनांक 11/08/2016 ला दिला तो दिवस गुरुवार होता व दिनांक 12/08/2016 ला शुक्रवार व दिनांक 13/08/2016 ला महिन्याचा दुसरा शनिवार व 14/08/2016 ला रविवार व दिनांक 15/08/2016 हा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस असे लागोपाठ सुट्याचे दिवस आहेत ही बाब तक्रारकर्तीला पुर्णतः माहित होती. विरुध्द पक्षाने सदर लिफाफा दिनांक 12/08/2016 रोजी नागपूर ला पोहचविण्यात आला असल्यामुळे विरुध्द पक्षाने आपले कर्तव्य पार पाडले आहे. त्यामुळे विरुध्द पक्षाचा कोणतीही दोष नाही. तक्रारकर्तीने पोलीस स्टेशन तुमसर येथे रिपोर्ट दिली होती, परंतु सदर रिपोर्ट ही खोटी व तथ्यहीन असल्यामुळे पोलीसांनी अदखल पात्र गुन्हाची रजिस्टर प्रत दिली होती. विरुध्द पक्षाने त्याचे कर्तव्य पार पाडले असुन सेवेत त्रुटी केली नाही, म्हणून तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
04. तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्टयर्थ दस्तऐवज यादी पृष्ट क्रं- 11 नुसार एकूण-11 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्या असून ज्यामध्ये आचार्य पदवी प्रवेश सुचनेची प्रत, पी.ई.टी.अर्जाची प्रत, पैसे भरल्याची पावती, पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीची प्रत, अदखलपात्र गुन्हाची फिर्याद रजिस्टरची प्रत, नोटीस पाठविल्याची प्रत व पोचपावती, एम.ए.चे गुणपत्रक अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. उभय पक्षाने शपथेवरील पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. नाही. पृष्ट क्रं- 41 नुसार तक्रारकर्तीने लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
05. तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्दपक्षाचे लेखी उत्तर व तसेच तक्रारकर्तीने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे मंचातर्फे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्तीतर्फे तिच्या वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्ष व त्यांचे वकील युक्तिवादाचे वेळी गैरहजर, त्यावरुन मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
06. तक्रारकर्तीने दिनांक 11/08/2016 रोजी विरुध्द पक्षाकडे नागपूर विद्यापीठ नागपूर येथे पाठविण्याकरीता लिफाफा कुरिअर करण्यासाठी दिला होता व त्याकरीता तक्रारकर्तीने आवश्यक शुल्क रुपये 50/- विरुध्द पक्षाला दिले व विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला त्याबाबतची पावती दिली ही बाब उभय पक्षामध्ये वादातीत नाही.
07. तक्रारकर्तीचे म्हणण्यानुसार तिने पी.एच.डी. च्या पुर्व परिक्षा चाळणी परिक्षेकरीता फार्म भरला होता व तो नागपूर विद्यापीठ येथे दिनांक 16/08/2016 पर्यंत पोहोचणे आवश्यक होते, त्यामुळे तक्रारकर्तीने सदर फार्मचा लिफाफा विरुध्द पक्षाकडे नागपूर विद्यापीठ नागपूर येथे पाठविण्यासाठी दिला होता व विरुध्द पक्षाने देखील तक्रारकर्तीच्या म्हणण्यानुसार सदर फार्म मुदतीच्या दिनांकापूर्वी विद्यापीठात पोहोचविण्याची हमी दिली होती. परंतु विरुध्द पक्ष यांच्या निष्काळजीपणामुळे व दुर्लक्षीत सेवेमुळे तक्रारकर्तीच्या महत्वाच्या दस्ताऐवजाचा लिफाफा नागपूर विद्यापीठ नागपूर येथे मुदतीच्या आत म्हणजेच दिनांक 16/08/2016 पर्यंत पोहचला नाही. त्याचप्रमाणे सदर लिफाफा मुदतीनंतर गंतव्य ठिकाणी पोहचविण्यात आल्यामुळे सदर लिफाफ्यावर “डेट इज ओव्हर” असा शेरा मारुन सदर कुरिअर परत आले. विरुध्द पक्ष यांनी त्यांचकडे परत आलेले कुरिअर दिनांक 24/08/2016 रोजी तक्रारकर्तीच्या भावाकडे परत आणुन दिले.
08. याउलट विरुध्द पक्ष यांचे म्हणण्यानुसार ते मधुर कुरिअर सर्व्हिस शाखा तुमसर येथील व्यवस्थापक असुन ते मधुर कुरिअर सर्व्हिस यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती व नियमांना अधिन राहून आपले कार्य करीत आहे. तक्रारकर्तीने लिफाफा कुरिअर करण्यासाठी लागणारे शुल्क रुपये 50/- विरुध्द पक्ष यांना दिले होते व त्याबाबतची पावती विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दिली होती, परंतु सदर पावतीवर लिफाफा कोणत्या तारखेला व कोणत्यावेळी पोहचविण्यात येईल अशी कोणतीच नोंद विरुध्द पक्ष यांनी लिहून दिलेली नाही. सदर लिफाफा विरुध्द पक्ष यांनी त्यांचे नागपूर येथील मधुर कुरिअर सर्व्हिस या शाखेत दिनांक 12/08/2016 ला पोहचवून आपले कर्तव्य पार पाडले होते व त्यानंतरचे कर्तव्य हे नागपूर येथील शाखेचे होते.
09. तक्रारकर्तीने अभिलेखावर तिने पी.एच.डी. पुर्व परिक्षा चाळणी परिक्षेकरीता भरलेल्या फार्मची छायाकिंत प्रत अभिलेखावर दाखल केली आहे. त्याचप्रमाणे विरुध्द पक्षाने तिला परत दिलेल्या फार्मच्या लिफाफ्याचे मुख पृष्ठाची छायाकिंत प्रत दाखल केली आहे. सदर लिफाफ्यावर नागपूर विद्यापीठाचा पत्ता नमुद असून त्यावर “APPLICATION FORM FOR PET September 2016“ असे देखील नमुद केलेले आहे. तसेच सदर लिफाफ्यावर “MOST URGENT” असा शिक्का देखील लावलेला आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाद्वारे तिचा पी.एच.डी.पूर्व चाळणी परिक्षेकरीताचा अर्ज पाठविला होता व तो शिघ्रतेने नागपूर विद्यापीठ येथे पोहोचविण्याकरीता तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष यांचेकडे कुरिअर करण्याकरीता दिला होता. त्यामुळे तक्रारकर्तीच्या म्हणण्यानुसार तिने सदर फार्म विहित मुदतीत विद्यापीठात पोहोचेल याची खात्री विरुध्द पक्षाकडून करुन घेवूनच विरुध्द पक्षाकडे लिफाफा दिला होता व विरुध्द पक्षाला फार्मच्या मुदतीची संपूर्ण कल्पना दिलेली होती हे स्पष्ट होते.
10. वास्तविकतः एकदा विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीकडून मोबदल्याची रक्कम घेवून लिफाफा स्विकारला असता सदर लिफाफा शिघ्रतेने व विहित मुदतीत नागपूर विद्यापीठात पोहोचविणे ही विरुध्द पक्षाची जबाबदारी होती. विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार त्याने सदर लिफाफा दिनांक 12/08/2016 ला योग्य वेळात त्याचे नागपूर येथील शाखेत पाठविला होता. विरुध्द पक्षाने तुमसर वरुन नागपूरच्या शाखेत लिफाफा पोहचवून आपले कर्तव्य पार पाडले होते व त्यानंतरचे कर्तव्य हे मधुर कुरिअर सर्व्हिस शाखा नागपूर यांचे होते. विरुध्द पक्षाने त्याची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली आहे म्हणून विरुध्द पक्षाने त्यांचे नागपूर येथील शाखेला प्रकरणात पक्ष न बनविल्याबाबत आक्षेप नमुद केला असुन तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
याबाबत मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्तीने विरुध्द पक्ष मधुर कुरिअर सर्व्हिस तुमसर यांचेसोबत लिफाफा पोहोचविण्याचा करार केला होता. त्यामुळे सदर लिफाफा पोहोचविण्याची संपूर्ण जबाबदारी विरुध्द पक्षाची होती. त्याकरीता विरुध्द पक्ष जर त्यांच्या इतर शाखेची मदत घेत असेल तर ती विरुध्द पक्ष यांचीच शाखा असल्यामुळे त्या शाखेकडून झालेल्या विलंबास देखील विरुध्द पक्ष स्वतः जबाबदार आहे. त्यामुळे प्रकरणात नागपूर शाखेला पक्ष करण्याची गरज नाही, म्हणून विरुध्द पक्ष यांच्या वरील आक्षेपात काहीही तथ्य नाही.
11. अभिलेखावरील कागदपत्रांवरुन हे स्पष्ट होते की, तक्रारकर्तीने तिचा फार्म दिनांक 11/08/2016 रोजी विरुध्द पक्षाकडे दिला होता व तो दिनांक 16/08/2016 पर्यंत नागपूर विद्यापीठ नागपूर येथे पोहोचणे आवश्यक होते. विरुध्द पक्षाने दिनांक 13, 14 व 15 ऑगस्ट ची सुट्टी तसेच रक्षाबंधन सणामुळे कर्मचा-यांची अनुउपस्थितीमुळे तक्रारकर्तीचा अर्ज वेळेत पोहचू शकला नाही असा बचाव घेतला आहे. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला परत दिलेल्या लिफाफ्यावर “Date is over” असा शेरा नमुद असल्याचे दिसून येते म्हणजेच विरुध्द पक्षाने मुदत संपल्यानंतर सदर लिफाफा हा नागपूर विद्यापीठ नागपूर येथे पोहोचविल्यामुळे परत करण्यात आल्याचे सिध्द होते. दिनांक 11/08/2016 ते 16/08/2016 हा कालावधी बघता विरुध्द पक्ष सहजपणे तक्रारकर्तीचा फार्म ठरल्याप्रमाणे दिनांक 16/08/2016 पूर्वी नागपूर विद्यापीठ नागपूर या पत्त्यावर विहित मुदतीत निश्चितपणे पोहचवू शकला असता व तसे करणे ही त्यांची जबाबदारी होती. परंतु विरुध्द पक्षाने वरीलप्रमाणे कारणे दाखवून आपली जबाबदारी पार पाडण्यात हयगय केली असून तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचा अर्ज मुदतीत विद्यापीठात न पोहचविल्यामुळे तक्रारकर्तीला पी.एच.डी.च्या पुर्व परिक्षा चाळणी परिक्षेला बसता आले नाही व तिचे शैक्षणिक नुकसान झाले. तसेच शारीरीक व मानसिक त्रास झाला आहे. म्हणून तक्रारकर्ती विरुध्द पक्षाकडून रुपये 15,000/- नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे तसेच तक्रारीचा खर्च रुपये 3,000/- मिळण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत मंच येते.
12. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
(01) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला शैक्षणिक, शारीरीक व मानसिक नुकसानी पोटी रुपये 15,000/- (अक्षरी रुपये पंधरा हजार फक्त) द्यावे.
(03) विरुध्दपक्ष यांनी तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-3000/-( अक्षरी रुपये तीन हजार फक्त) तक्रारकर्तीला द्यावे.
(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
(05) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
(06) तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.