तक्रारदारातर्फे अॅड. घोणे हजर.
जाबदेणार गैरहजर (एकतर्फा)
द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
** निकालपत्र **
(01/11/2013)
प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने कुरिअर कंपनीविरुद्ध सेवेतील त्रुटीकरीता ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे आहेत.
1] तक्रारदार हे उद्योजक आहेत. त्यांनी जाबदेणार कंपनीमार्फत हैद्राबाद येथे रक्कम रु. 3,17,250/- या किंमतीचा माल दि. 01/04/2010 रोजी पाठविला होता. त्यासाठी त्यांनी सेवेचा मोबदला रु. 450/- दिले. त्यानंतर 5 दिवसांनी तक्रारदारांनी ज्या व्यक्तीला हे सामान पाठविले होते, त्यांच्याकडून बीलाची मागणी केली, त्यावेळी सदरचे सामान त्यांना मिळाले नाही, असे त्यांनी कळविले. त्यानंतर तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या कार्यालयामध्ये चौकशी केली असता, त्यांनी असे सांगितले की, हैद्राबाद येथे माल पोचविण्याची सेवा उपलब्ध नसल्यामुळे कुरिअर परत आले. त्यानंतर एक महिन्याने सदरचा माल जाबदेणार यांनी परत केला. त्यामुळे तक्रारदारांचे आर्थिक नुकसान झाले, त्यासाठी व सेवेतील त्रुटीसाठी तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार जाबदेणार यांचेकडून आर्थिक नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 90,000/-, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु. 5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.4,000/- ची मागणी करतात.
2] प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये जाबदेणार नोटीस बजवूनदेखील गैरहजर राहीले, त्यांनी लेखी किंवा तोंडी पुरावा दाखल केला नाही, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध हे प्रकरण गुणवत्तेवर एकतर्फा चालविण्यात येत आहे.
3] तक्रारदार यांनी तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र, कुरिअरची पावती, नोटीशीची स्थळप्रत इ. कागदपत्रे दाखल केली. यावरुन असे स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेमार्फत हैद्राबाद येथे पाठविण्याकरीता माल दिला होता, परंतु तो योग्य त्या ठिकाणी पोहोचला नाही. यावरुन हे सिद्ध होते की, जाबदेणार यांनी सेवा देताना कसुर केलेली आहे व ते तक्रारदारांना नुकसान भरपाई देण्यास बांधील आहेत. तक्रारदारांची आर्थिक नुकसानापोटी रक्कम रु. 90,000/- ची मागणी अवास्तव आहे. तक्रारदार हे सेवेतील त्रुटीसाठी रक्कम रु. 10,000/-, आर्थिक नुकसानासाठी रक्कम रु. 5,000/- व प्रकरण्याच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- मिळण्यास पात्र आहेत. वर उल्लेख केलेले कथनांचा विचार करता, खालील आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सेवा देताना त्रुटी
निर्माण केलेली आहे, असे जाहीर करण्यात येते.
4. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना सेवेतील त्रुटीसाठी
रक्कम रु. 10,000/-(रु. दहा हजार फक्त), आर्थिक
नुकसानासाठी रक्कम रु.5,000/-(रु. पाच हजार फक्त)
व प्रकरण्याच्या खर्चापोटी रक्कम रु. 2,000/-(रु. दोन
हजार फक्त) या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून
सहा आठवडयांच्या आत द्यावेत.
5. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात यावी.
6. पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की
त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक
महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे
संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट
करण्यात येतील.
स्थळ : पुणे
दिनांक : 01/नोव्हे./2013