Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक ०९/०६/२०२२) - प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५ सह ३८ अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- तक्रारकर्त्याच्या मालकीचा मौजा भद्रावती, तहसील भद्रावती, जिल्हा चंद्रपूर येथे सर्व्हे क्रमांक ४४, प्लॉट क्रमांक ९०, आराजी १५०० चौरस फुट भुखंड असून त्यावर तक्रारकर्त्याचे राहते जुने घर होते. तक्रारकर्त्यास घराची दुरुस्ती व पहिल्या मजल्याचे बांधकाम करावयाचे होते त्याकरिता त्यांनी अभियंता श्री संजय ऐकरे यांचेकडून प्रस्तावीत बांधकामाचा नकाशा काढला होता आणि नगर परिषद, भद्रावती यांचेकडे बांधकामाची परवानगी करिता अर्ज केला असता त्यांनी दिनांक १७/०१/२०२० रोजी बांधकाम परवानगीचा अर्ज मंजूर केला. तक्रारकर्त्याने अभियंता यांनी काढून दिलेल्या नकाशानुसार तळमजल्याची दुरुस्ती आणि पहिल्या मजल्याचे नवीन बांधकाम करण्याचा ठेका विरुध्द पक्ष यांना दिला.यावर विरुध्द पक्ष यांनी बांधकाम करारनामा करुन दिला नाही. विरुध्द पक्ष यांनी नोव्हेंबर २०१९ च्या पहिल्या आठवड्यात बांधकाम सुरु केले. तळमजल्यावर पिल्लरकरिता गड्डे करणे सुरु केले आणि आठ दिवसात तक्रारकर्त्याकडे पैशाची मागणी केली. तक्रारकर्त्याने डिसेंबर २०१९ च्या पहिल्या आठवड्यात रुपये ८०,०००/- नगदी दिले.पैसे प्राप्त झाल्यानंतर विरुध्दपक्ष यांनी ३ ते ४ महिने काम बंद ठेवले. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षास बांधकाम सुरु करण्याकरिता तगादा लावला असता पिल्लर सेट व्हायचे आहे आणि उन्हाळ्यानंतर काम सुरु केल्यास बांधकाम पक्के होते असे सांगितले. विरुध्द पक्ष यांनी जुन २०२० मध्ये शेवटच्या आठवड्यात तक्रारकर्त्याकडील घराचे काम सुरु केले आणि लगेच २,००,०००/- ची मागणी केली. तेव्हा तक्रारकर्त्याने रुपये १,००,०००/- धनादेशाव्दारे विरुध्द पक्ष यांच्या सांगण्यावर त्यांची पत्नी सुनिता धाबेकर हिच्या नावाने दिले. रक्कम मिळाल्यानतर विरुध्द पक्ष यांनी बांधकामाची गती कमी केली. तक्रारकर्त्याने दिनांक १८/०३/२०२१ पर्यंत विरुध्द पक्षास त्यांच्या मागणीनुसार एकूण रक्कम रुपये ८,२५,८००/- दिले. यामध्ये रेती, पेंटिंग व खरेदी केलेल्या टाईल्सची रक्कम सुध्दा समाविष्ट आहे. विरुध्द पक्षाने नोव्हेंबर २०१९ मध्ये कामाला सुरुवात करुन सुध्दा मार्च २०२१ पर्यंत बांधकाम पुर्ण केले नाही आणि ६ महिण्यातच पहिल्या मजल्याचे स्लॅबला तडे गेल्याचे दिसु लागले त्यावर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास बांधकामाची गुणवत्ता चांगली ठेवण्याची विनंती केली असता विरुध्द पक्षाने टाळाटाळ केली. शेवटी तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास बांधकामासंबंधी करारनामा करुन देण्याची विनंती केली आणि करारनामा केल्याशिवाय पुढील रक्कम देणार नाही असे सांगितले तेव्हा विरुध्दपक्ष हे करारनामा करण्यास तयार झाले. दिनांक ४/५/२०२१ रोजी तक्रारकर्ता आणि विरुध्द पक्ष यांच्यामध्ये बांधकामाचा करारनामा झाला. त्यामध्ये ३ महिण्यांचे आंत बांधकाम पुर्ण करुन देण्याची विरुध्द पक्ष यांनीलेखी हमी दिली. दिनांक २५/५/२०२१ रोजी विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास रुपये १०,०००/- नगदी मागितले. त्याचप्रमाणे ग्रील खरेदी करण्याकरिता रुप्ये १२,४५४/-, टाईल्स खरेदी करण्याकरिता ८,१५०/- आणि रेती करिता रुपये ७,०००/- असे एकूण रुपये ८,६३,४०४/- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास मे २०२१ पर्यंत दिले. माञ विरुध्दपक्षाने दिनांक १२/०६/२०२१ रोजी तक्रारकर्त्याकडील बांधकाम अर्धवट स्थितीत ठेवून बंद केले. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे पाठपुरावा केला असता तक्रारकर्त्याचे फोन उचलने बंद केले त्यामुळे तक्रारकर्त्याने घरी जाऊन बांधकाम पूर्ण करुन देण्याची विनंती केली परंतु विरुध्द पक्षाने नकार दिला. तक्रारकर्त्याने दिनांक ५/७/२०२१ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती यांचेकडे वाद सोडविण्याकरिता अर्ज केला. दिनांक १३/०७/२०२१ रोजी संस्थेचे पदाधिकारी श्री चिमुरकर, श्री वराटे, व श्री कांबळे यांनी उभयपक्षात समझौता करण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा त्यांनी बांधकामाची पाहणी केली तेव्हा पहिल्या मजल्यावरील स्लॅबला तडे गेल्याचे विरुध्द पक्षाला दाखविण्यात आले आणि तेव्हा विरुध्द पक्षाने ते दुरुस्त करुन देण्याचे आश्वासन दिले. परंतु विरुध्द पक्ष यांनी बांधकामास सुरुवात केली नाही उलट दिनांक १७/७/२०२१ रोजी अधिवक्ता श्री फुल्ल्ुाके यांचे मार्फत खोट्या आशयाचा नोटीस पाठवून रुपये १,८६,५९६/- ची मागणी केली. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना उर्वरित रक्कम देण्यास नकार दिलेला नाही. विरुध्द पक्ष यांनी बांधकाम पूर्ण करण्यास तसेच स्लॅब दुरुस्त करुन देण्यास नकार दिल्याने तक्रारकर्त्याने तज्ञ तथा स्पेस डिझायनर अॅन्ड कन्सलटंट चे सिव्हील अभियंता श्री अजय वि. पालारपवार यांना बांधकामाची पाहणी करण्याकरिता बोलाविले व त्यांनी दिनांक ६/८/२०२१ रोजी मोक्यावर जावून घराची पाहणी करुन फोटोग्राफसह अहवाल दिला. अहवालानुसार उर्वरित बांधकाम करण्यास रुपये ८,०५,०००/-खर्च येणार असून जे काही बांधकाम झाले आहे त्यामध्ये छतामध्ये तडे गेले आहे असे नमूद केले होते आणि निकृष्ठ दर्जाचे बांधकाम असल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष यांचे विरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या बांधकामात असलेल्या उणीवा तज्ज्ञ श्री अजय पालारपवार यांचे अहवालानुसार दुर करुन घराची दुरुस्ती स्वखर्चाने करुन द्यावे अथवा घर दुरुस्त करणे शक्य नसल्यास अभियंता श्री अजय पालारपवार यांचे अहवालानुसार रुपये ८,०५,०००/- घर दुरुस्ती करुन पुर्णत्वाला येणा-या खर्चापोटी विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास द्यावे. तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी रुपये १०,००,०००/- आणि तक्रारीचा खर्च रुपये २५,०००/- द्यावे.
- तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्ष यांचे विरुध्द नोटीस काढण्यात आले. नोटीस तामील होऊन सुध्दा विरुध्द पक्ष हे आयोगासमक्ष हजर झाले नाही. करिता दिनांक १९/०१/२०२२ रोजी विरुध्द पक्ष यांचे विरुध्द एकतर्फा आदेश निशानी क्रमांक १ वर पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज, तक्रारकर्ता आणि साक्षिदार यांचे शपथपञ यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्षे १. तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत कायॽ होय २. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याप्रति न्युनतापूर्ण सेवा होय दिली आहे कायॽ ३. आदेश कायॽ अंतिम आदेशाप्रमाणे कारणमीमांसा मुद्दा क्रमांक १ बाबतः- - तक्रारकर्त्याच्या मालकीचा मौजा भद्रावती, तहसील भद्रावती, जिल्हा चंद्रपूर येथे सर्व्हे क्रमांक ४४, प्लॉट क्रमांक ९०, आराजी १५०० चौरस फुट भुखंड असून त्यावर तक्रारकर्त्याचे राहते जुने घर आहे. त्यामधील तळ मजल्याचे दुरुस्ती व पहिल्या मजल्याचे नगर परिषद मंजूर नकाशा प्रमाणे नवीन बांधकाम करण्याचा ठेका विरुध्द पक्ष यांना रुपये १०,५०,०००/- चे मोबदल्यात दिला. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने रुपये ८,६३,४०४/- विरुध्द पक्ष यांना दिले आहे, ही बाब विरुध्द पक्ष यांनी दिनांक १७/७/२०२१ रोजी तक्रारकर्त्याला पाठविलेल्या उत्तर नोटीस मध्ये मान्य केली आहे. सदर उत्तर नोटीस प्रकरणात दस्त क्रमांक अ-४ वर दाखल आहे. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक २ बाबतः- - विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या मालकीच्या उपरोक्त भुखंडावर नोव्हेंबर २०१९ मध्ये बांधकाम सुरु केले व बांधकाम सुरु असतांनाच त्यासंबंधी दिनांक ०४/०५/२०२१ रोजी करारनामा झाला. करारनाम्यामध्ये तक्रारकर्त्याकडील घराचे तळ मजल्यावरील किरकोळ कामे, पहिल्या मजल्याचे बांधकाम ४ खोल्या, संडास, बाथरुम, जिना, नळ फिटींग, टाईल्स, दरवाजे, खिडक्या इत्यादी काम करण्याचे आणि बांधकामाचा कालावधी ३ महिने नमूद आहे. विरुध्द पक्ष यांनी बांधकाम सुरु असतांना रक्कम घेतल्यानंतरसुध्दा अर्धवट स्थितीत बांधकाम बंद केले. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास बांधकाम करण्याची विनंती केली परंतु त्यांनी नकार दिला. त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक ५/७/२०२१ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती यांचेकडे अर्ज केला असता संस्थेचे पदाधिकारी श्री चिमुरकर, श्री वराटे, व श्री कांबळे यांनी दिनांक १३/७/२०२१ रोजी यांनी उभयपक्षात समझौता करण्याचा प्रयत्न केला. परंतु विरुध्द पक्ष यांनी मान्य केल्यानंतरही बांधकामाची दुरुस्ती केली नाही. विरुध्द पक्ष यांनी केलेले बांधकाम हे निकृष्ट, दर्जाहीन असून स्लॅबला तडे पडलेले आहे आणि त्यांनी बांधकाम दुरुस्ती करून न दिल्यामुळे तक्रारकर्ता यांनी अभियंता श्री अजय पालारपवार यांचेकडून दिनांक ६/८/२०२१ रोजी बांधकामाची तपासणी करून घेतली. श्री पालारपवार यांनी बांधकामाचे तपासणी केली तसेच फोटोग्राफ्स सुध्दा घेतले विरुध्द पक्ष यांनी घराचे केलेले बांधकाम अपूर्ण निकृष्ट व गुणवत्ताहीन आहे आणि स्ल्ॅाब ला तडे गेले आहे असे त्यांच्या अहवालामध्ये नमूद केले. सदर अहवाल आणि बांधकामाचे फोटोग्राफ्स प्रकरणात अ-६ वर दाखल आहे याशिवाय श्री अजय पालारपवार यांचे शपथपञ सुध्दा तक्रारकर्त्याने दाखल केले आहे.यावरुन विरुध्द पक्ष यांनी केलेल्या घराचे बांधकाम हे अपूर्ण, निकृष्ट व गुणवत्ताहीन असून स्लॅबला तडे गेले आहे हे सिध्द होते. विरुध्द पक्ष यांनी अपल्या बचावाकरिता लेखी उत्तर, शपथपञ आणि दस्तावेज दाखल करुन तक्रारकर्त्याचे कथन तसेच अभियंता श्री पालारपवार यांचा अहवाल खोडून काढलेले नाही त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचे घराचे बांधकाम अपूर्ण, ञुटी असलेले आणि निकृष्ट दर्जाचे करुन तक्रारकर्त्याप्रति सेवेत न्युनता दिली त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष यांचेकडून स्वखर्चाने बांधकामाचे दुरुस्ती करुन मिळण्यास तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई आणि तक्रार खर्च मिळण्यास पाञ आहे, या निष्कर्षाप्रत हे आयोग आल्याने मुद्दा क्रमांक २ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक ३ बाबतः- - मुद्दा क्रमांक १ व २ च्या विवेंचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्र. १५४/२०२१ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष यांनी स्वखर्चाने तक्रारकर्त्याचे मौजा भद्रावती, तहसील भद्रावती, जिल्हा चंद्रपूर येथील सर्व्हे क्रमांक ४४, प्लॉट क्रमांक ९० वरील घराच्या बांधकामाची दुरुस्ती करुन द्यावी.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये २५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- द्यावे.
- उभयपक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावेत.
| |