अॅड किरण घोणे तक्रारदारांतर्फे
अॅड सी.व्ही अत्रे जाबदेणारांतर्फे
द्वारा- मा. श्रीमती. क्षितीजा कुलकर्णी, सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 26/6/2014
प्रस्तुतची तक्रार ग्राहकाने ग्राहक सरंक्षण कायदा 1986, कलम 12 अंतर्गत सेवेतील त्रुटी संदर्भात दाखल केलेली आहे. यातील कथने थोडक्यात खालील प्रमाणे-
[1] तक्रारदार क्र 1 व 2 सख्खे भाऊ असून दापोडी, पुणे येथील रहिवासी आहेत. तक्रारदारांनी जाबदेणार – बांधकाम व्यावसायिक यांच्या जाहिरातीस अनुसरुन, जाबदेणार यांच्याकडून बोपोडी येथील सर्व्हे नं 1-ए/11, 1-ए/12, 1-ए/14 येथे बांधण्यात येणा-या इमारती मधील चौथ्या मजल्यावरील दोन सदनिका क्र बी-15 व बी-16, प्रत्येकी रक्कम रुपये 6,83,820/- ला विकत घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे दिनांक 5/9/2003 रोजी हवेली नं 4 येथील कार्यालयात उभय पक्षकारातील करार नोंदणीकृत करण्यात आला. त्यावेळी तक्रारदारांनी ठरल्याप्रमाणे दोन्ही सदनिकांची मिळून एकूण बयाणा रक्कम रुपये 22,000/- जाबदेणार यांना अदा केली. सदनिका क्र बी-15 चा दस्त क्र 3019/03 व सदनिका क्र बी-16 चा दस्त क्र.3020/03 आहे. दोन्ही सदनिकांचे काम पूर्ण झाल्यावर जाबदेणार सदनिकांचा ताबा देणार असे नोंदणीकृत करारात ठरले होते. तसेच बयाणा रक्कम प्रत्येकी रुपये 11,000/- व ताबा देते वेळी प्रत्येकी रुपये 6,72,820/- जाबदेणार यांना देण्याचे तक्रारदार यांनी मान्य केले होते. तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी ठरलेली रक्कम जाबदेणार यांना अदा करण्यासाठी बँकेत कर्ज प्रकरण केले होते. परंतू बँकेच्या एजंट कडून कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे कर्ज मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी खाजगी सावकार व नातेवाईक यांच्याकडून कर्ज घेऊन सदनिकांची रक्कम रुपये 13,45,640/- तयार ठेवली होती व तशी कल्पना जाबदेणार यांना दिली होती व त्याच गोष्टीचा फायदा घेऊन जाबदेणार यांनी दोन्ही सदनिका त्रयस्थ इसमास विक्री केल्यामुळे तक्रारदारांनी जाबदेणार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली. तसेच तक्रारदार यांनी वेळोवेळी जाबदेणार यांच्याकडे लेखी व तोंडी सदनिकांचा ताबा मागितला. परंतू जाबदेणार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी तक्रारदार यांनी दिनांक 3/8/2009 रोजी जाबदेणार यांना नोटीस बजावली परंतू जाबदेणार यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्या विरुध्द सेवेतील त्रुटी संदर्भात प्रस्तूतची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार जाबदेणार यांना करारात ठरल्याप्रमाणे रक्कम रुपये 13,45,640/- देण्यास तयार असून सदनिकांचा ताबा मागत आहेत. तसेच जर जाबदेणार यांना सदनिकांचा ताबा देणे अशक्य असेल तर चालू बाजारभावाप्रमाणे तक्रार अर्जात नमूद केलेल्या सदनिकांची चालू बाजार भावाप्रमाणे जी किंमत आहे त्याप्रमाणे नुकसान भरपाई, तसेच त्रासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/-ची मागणी करतात.
[2] जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारीतील मजकूर नाकरलेला आहे. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार नोंदणीकृत करारातील मुद्या क्र 9 अनुसार तक्रारदार यांनी उर्वरित रक्कम वेळेत न भरल्यामुळे दोन्ही करार संपूष्टात आलेले आहेत. तसेच जाबदेणार यांनी मुद्या क्र 9 अनुसार कायदेशीरपणे सर्व गोष्टी पाळून व तक्रारदार यांना नोटीस बजावून मगच हे करार कायदेशीरपणे रद्य केलेले आहेत. जाबदेणार यांच्या म्हणण्याप्रमाणे दिनांक 12/9/2005 रोजी त्यांनी तक्रारदार यांना रुपये 11,000/- प्रत्येकी चेकने व रजिस्टर्ड पोस्टाने परत पाठविले होते. परंतू तक्रारदार यांनी त्याचा स्विकार केलेला नाही. त्यामुळे जाबदेणार यांनी दिनांक 23/9/2005 रोजी सदनिका क्र बी-15 श्री.मोहमदअली अप्तार व सदनिका क्र बी-16 श्री.आरिफ महमद अप्तार व श्रीमती रजिया अप्तार यांना विकल्याचे नमूद केले आहे. तसेच तक्रारदार यांना सुध्दा या गोष्टीची कल्पना सन 2006 पासून होती. तरीही त्यांनी प्रस्तूतची तक्रार सन 2009 मध्ये कोर्टात दाखल केलेली आहे असे जाबदेणार यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जाबदेणार यांच्या मते सदर तक्रारीस मुदतीची बाधा येते, म्हणून तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती जाबदेणार करतात.
[3] दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्रे, कथने व लेखी युक्तीवाद यांचा विचार करुन खालील मुद्ये निश्चित करण्यात येत आहेत. सदरील मु़द्ये, त्यावरील निष्कर्ष व कारणे खालील प्रमाणे-
अ.क्र | मुद्ये | निष्कर्ष |
1 | तक्रारदारांनी दाखल केलेल्या तक्रारीस मुदतीची बाधा येते का ? | नाही |
2 | जाबदेणार यांनी कराराची पूर्तता न करुन वेळेत सदनिकेचा ताबा न देऊन सेवेतील त्रुटी निर्माण केली आहे काय? | होय |
3 | अंतिम आदेश काय ? | तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते. |
कारणे-
मुद्या क्र 1 ते 3-
[4] तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे स्पष्ट होते की, तक्रारदार व जाबदेणार यांच्यामध्ये बी-15 व बी-16 या एकाच इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील सदनिका प्रत्येकी क्षेत्र 80.81 चौ.मि. संदर्भात नोंदणीकृत करारनामा दिनांक 5/9/2003 रोजी झालेला होता. नोंदणीकृत करारनाम्यानुसार जाबदेणार यांनी तक्रारदारांना सदनिकांचा ताबा अद्यापपर्यन्त दिलेला नाही. सबब तक्रारीस सततचे कारण घडत आहे, तक्रार मुदतीत आहे असे मंचाचे मत आहे.
[5] या प्रकरणातील करारनाम्यांचे अवलोकन केले असता असे स्पष्ट होते की, जाबदेणार यांनी करारात नमूद केल्याप्रमाणे अटी व शर्तीचे पाल न करताच बेकायदेशीरपणे तक्रारदारांचे नोंदणीकृत करारनामे कुठल्याही कायदेशीर कार्यवाही शिवाय संपुष्टात आणून निकृष्ट दर्जाची सेवा दिलेली आहे. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना दिनांक 12/9/2005 रोजी नोंदणीकृत करार रद्य करण्याची नोटीस पाठविली आहे. तसेच चेकद्वारे दिनांक 12/9/2005 रोजी तक्रारदारांचे पैसे परत पाठविल्याचे नमूद केलेले आहे. परंतू जाबदेणार व तक्रारदार यांच्यामध्ये जो नोंदणीकृत करार झाला त्यामधील मुद्या क्र 9 नुसार जाबदेणार यांनी करार संपुष्टात आणण्यासाठी तक्रारदार यांना पंधरा दिवस आधी लेखी नोटीस देणे आवश्यक होते. परंतू जाबदेणार यांनी दिनांक 12/9/2005 रोजी तक्रारदार यांना करार रद्य करण्याची नोटीस बजावली आहे. तर दिनांक 23/9/2005 रोजी जाबदेणार यांनी सदरच्या सदनिका त्रयस्थ इसमास विकल्याचे दिसून येत आहे. यावरुन जाबदेणार यांनी सेवेतील त्रुटी निर्माण केल्याचे दिसून येते.
[6] तक्रारदारांनी जाबदेणार यांना सदनिकांची उर्वरित रक्कम अदा करुन सदनिकांचा ताबा मागितलेला आहे व जर जाबदेणार यांना सदनिकांचा ताबा देणे अशक्य असेल तर, चालू बाजारभावाप्रमाणे तक्रार अर्जात नमूद केलेल्या सदनिकांची किंमत नुकसान भरपाईपोटी मागितलेली आहे. परंतू जाबदेणार यांनी सदनिकांची विक्री आधीच त्रयस्थ इसमांना केलेली असल्यामुळे तक्रारदारांची सदनिकांचा ताबा मिळण्याची मागणी अमान्य करण्यात येत आहे. पर्यायाने तक्रारदारांनी चालू बाजारभावाप्रमाणे सदनिकांची किंमत मागितलेली आहे, परंतू ही मागणी अवास्तव आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदार हे जाबदेणार यांच्याकडून बयाणा रक्कम रुपये 22,000/- व त्यावरील द.सा.द.शे 10 टक्के व्याज नोंदणीकृत करार दिनांक 5/9/2003 पासून मिळण्यास पात्र आहेत. तसेच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- मिळण्यास पात्र आहेत, असे या मंचाचे मत आहे.
वर नमूद केलेल्या विवेचनावरुन, मुद्यांचे निष्कर्ष काढण्यात येऊन खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार यांनी करारातील अटींची पूर्तता न करुन
सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे असे जाहीर करण्यात येत आहे.
3. जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 22,000/- व त्यावर नोंदणीकृत करार दिनांक 5/9/2003 पासून द.सा.द.शे 10 टक्के व्याज आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
4. जाबदेणार यांनी तक्रारदार यांना शारिरीक, मानसिक व
आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावा.
5. तक्रारदारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या
दिनांकापासून एका महिन्यात घेऊन जावेत, अन्यथा संच नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शूल्क पाठविण्यात यावी.
स्थळ-पुणे
दिनांक-26/6/2014